आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच विवेक सोहनीचा सत्कार

0
157

दक्षिण महाराष्ट्रातून पहिला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंच होण्याचा बहुमान मिळवलेल्या विवेक सोहनी याचा सत्कार आज के. जी. एन. सरस्वती फाउंडेशनतर्फे करण्यात आला. रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात प्रख्यात साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी विवेकचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन सन्मान केला.
या वेळी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई, माजी अध्यक्ष चंद्रकांत हळबे, माजी सचिव ऋचा जोशी, चेसमेनचे प्रमुख दिलीप टिकेकर आणि बुद्धिबळपटू, वसतीगृहाचे विद्यार्थी उपस्थित होतेे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विवेक आंतराष्ट्रीय पंच झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला, असे माधव हिर्लेकर यांनी सांगितले.
या वेळी विवेक म्हणाला की, के.जी.एन. सरस्वतीतर्फे याच सभागृहात सहा वर्षांपूर्वी भारताचे पहिले बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा झाली. तेव्हा मी सहायक पंच म्हणून सुरवात केली. 2016 मध्ये नागपूरला या परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशात आठवा क्रमांक मिळवला. नंतर दिल्ली येथे जागतिक बुद्धिबळ संघटनेकडून घेण्यात आलेल्या फिडे आर्बीटर परीक्षेत अव्वल स्थान मिळवले. त्यानंतर विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मानांकन स्पर्धांमध्ये काम करता करता फिडे आर्बीटर हे टायटलही मिळवले. आर्बिटर्सकरीता उपयुक्त सॉफ्टवेअर्सही तयार केली आहेत.
डॉ. जोशी म्हणाले की, विवेकने रत्नागिरीत राहूनही जगभर नाव कमावले आहे, हे अनुकरणीय आहे. रत्नागिरीतील तरुणांनी बुद्धिबळाकडे वळावे. खेळणे वेगळे व पंच म्हणून काम करणेही वेगळे आहे. त्याने रत्नागिरीचे नाव उज्ज्वल केले आहे. रामचंद्र सप्रे स्मृती स्पर्धा गेल्या सहा वर्षांपासून केजीएन सरस्वती घेत असून यातून आणखी खेळाडू तयार होतील. दिलीप टिकेकर यांनीही विवेकचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here