रत्नागिरी-आगामी निवडणुकीत महायुतीला यश मिळणारच आहे. कोकणातले कार्यकर्ते त्यागसम्राट आहेत. कार्यकर्त्यांनी हताश होण्याचे कारण नाही. त्यांनी भाजपचा झेंडा अधिक जोमाने फडकवण्यासाठी कामाला लागावे. कार्यकर्त्यांचे प्रश्‍न सोडवून त्यांना बळ देण्याकरिता दर दोन महिन्यांनी खासदार दौरा करतील. इथले प्रश्‍न संसद किंवा मंत्रालयात अडले असल्यास ते सोडवले जातील. कार्यकर्त्यांच्या व्यथा वरिष्ठ पातळीवर तितक्याच तीव्रतेने मांडू, अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली.
भाजप जिल्हा कार्यालयात सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. श्री. सहस्रबुद्धे म्हणाले की, वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळे निर्णय होतात. संधी मिळाली नाही तरी उमेद टिकून राहिली पाहिजे. पुढील निवडणुकांमध्ये भाजपची ताकद दाखवण्याकरिता पूर्वीच्या चुका, उणिवा सुधारू. बूथप्रमुख, शक्तीकेंद्रप्रमुख अशी रचना महत्त्वाची असून पक्षाला बळ मिळेल. केंद्रात नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांचेच सरकार असेल. 18-18 तास सचोटीने काम करणारे हे सरकार आहे. भाजप पक्ष घराणेशाहीवर किंवा लाटेच्या भरोशावर अवलंबून नाही.

कार्यकर्त्यांना सुखावणारी गोष्ट

जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सहस्रबुद्धे यांचा सत्कार केला. चार विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी व त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी श्री. सहस्रबुद्धे आवर्जून आले. ही गोष्ट सुखावणारी असून यामुळे कार्यकर्ता अधिक जोमाने कामाला लागेल, असे पटवर्धन म्हणाले.

श्री. सहस्रबुद्धे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खाली ठेवलेला नाही. वेगवेगळ्या तालुक्यांत भाजप मजबूत करा. पक्षाने युती केली तिथे त्याग करावा लागला. पण रत्नागिरी जिल्हा हा त्यागसम्राट म्हणावा लागेल. याची योग्य जाणीव भाजपच्या केंद्रीय, प्रदेश नेतृत्वाला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना मी लिहून घेतल्या आहेत. त्या तितक्याच तीव्रतेने मांडेन. राजकारण म्हणजे भजनी मंडळ नव्हे. आकांक्षांची परिपूर्ती झाली पाहिजे. युती झाली म्हणून आपल्याला संधी नाही, असे नाही. कार्यकर्त्यांची उमेद टिकून आहे. येणार्‍या काळात निवडणुका आहेत. पूर्वीच्या चुका सुधारू. गेल्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर 122 जागा विजय मिळाला. यापुढेही कार्यकर्त्यांनी अधिक मेहनत घ्यावी. वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळे निर्णय होतात. परंतु आपण आपला वरचष्मा सिद्ध करू. ताकद वाढवणे, संघटित करून त्याचे प्रत्यंतर समाजात आले पाहिजे.

घराणेशाहीची पालखी नाही

देशात 1700 पक्ष आहेत. त्यातील 50 पक्षांकडे सत्ता आहे, त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून आले आहेत. लाटेच्या भरोशावर आणि एखाद्या नेतृत्वावर विसंबून राहणारे पक्ष आहेत. पाच-सहा पक्षच घराणेशाहीवर अवलंबून नाहीत. त्यात भाजप अग्रस्थानी आहे. घराणेशाहीची पालखी घेऊन सत्तेच्या राजकारणात उतरलो नाही. विचारासाठी उतरलो. त्यामुळे काश्मिरसारख्या प्रश्‍नावर योग्य रणनिती आखून निर्णय घेता आल्याचे खासदार सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची भरपूर गर्दी झाली होती. जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशांत शिरगावकर, विनोद चाळके, रामदास राणे, मुकुंद जोशी आदींनी मनोगतामध्ये व्यथा मांडल्या. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, डॉ. विनय नातू, अशोक मयेकर, विलास पाटणे, बाबा परुळेकर, देवरुखचे मुकुंद जोशी, सचिन वहाळकर, दत्ता देसाई, सचिन करमरकर, ऐश्‍वर्या जठार, देवरुख नगराध्यक्ष मृणाल शेट्ये आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here