मुंबईसह उपनगरात दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य, आणि हार्बर रेल्वे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिराने सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वसई ते विरार रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. मुंबईसह उपनगरात खड्यांमुळे रस्तेवाहतूकही धिम्या गतीने सुरू आहे. वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे.

मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सायन, हिंदमाता, किंग्ज सर्कल, कुर्ला भागांत पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. पुढील २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील महापालिकेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यात मुसळधार
पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी खडकवासला धरणातून 27 हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. मुळशी धरणातूनही 10 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे. परिणामी, नदी पात्रातील पाण्यात वाढ झाल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. दिवसभरात दोन्ही धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्रातील रस्ताही वाहतुकीसाठी बंद होण्याची चिन्हं आहेत. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here