कोकण रेल्वेतच महिलेची प्रसुती
कोकण रेल्वे मार्गावरुन वास्को ते पटना जाणाऱ्या गाडीत महिलेला कन्यारत्न झाले. सहप्रवासी महिलेने मोठ्या धाडसाने या गर्भवतीची सुटका केली. श्वेता सिंग यांच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेतच सुखरुप सुटका झाली. सायरा नवसार आलम (वय 24) असे महिलेचे नाव आहे. रेल्वे वेगाने धावत होती.
वातानुकूलीत शयनयानात टीसी महेश पेंडसे डब्यांमध्ये राऊंड मारत होते. बी 2 डब्यात त्यांना एका महिलेच्या विव्हळण्याचा आवाज आला. महिला गर्भवती होती. त्यांनी प्रवाशाच्या मदतीने ओळखीच्या महिलेला बोलावले. गर्भवती महिलेच्या प्रसूतीच्या वेदना असल्याने धावाधाव सुरू झाली.
श्वेता सिंग यांनी महिलेची विचारपूस करून परिस्थिती लक्षात घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आवश्यक साहित्याची जमवाजमव करत श्वेता सिंग यांनी अत्यंत धाडसाने सायरा आलम हिची रेल्वेतच सुखरुप सुटका केली. सायराने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
सायरा तब्येतीने किरकोळ होती आणि हे तिचे चौथे अपत्य असल्याने तिला वेळीच वैद्यकीय उपचार मिळणे गरजेचे होते. पेंडसे यांनी कोकण रेल्वे कंट्रोल रुमला कल्पना दिली. कंट्रोल रुमने चिपळूण येथे सर्व व्यवस्था उपलब्ध ठेवली. चिपळूण रेल्वे स्थानकावर स्टेशन मास्तर माधवी गांगण, आरोग्य कर्मचारी रेल्वे पोलीस आणि रुग्णवाहिका तत्पर होते. ट्रेन चिपळूणला पोचल्यानंतर नेहमी पेक्षा अधिक वेळ थांबवून सायराला बाळासह आरोग्य कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले.सायरा आणि तिच्या नवजात कन्येला चिपळूणच्या प्रसिद्ध प्रसूतीतज्ज्ञ रिळकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दोघीही आता सुखरुप आहेत.
www.konkantoday.com