सिंधुदुर्गात विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, मणेरी येथे विद्युतभारित तारेचा स्पर्श झाल्याने गुरूदास नाईक व शोभा नाईक या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांना सोडविण्यासाठी गेेलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. यातील नाईक कुटुंबाच्या घराजवळ विद्युतवाहिनी तुटुन पडली होती. त्याला स्पर्श होवून एक कुत्रा गतप्राण झाला होता. त्यानंतर या मेलेल्या कुत्र्याला वास येत असल्याने तो बाजूला करण्यासाठी शोभा या गेल्या होत्या. परंतु त्यांनाही विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने त्या खाली कोसळल्या. त्यांना सोडविण्यासाठी त्यांचा मुलगा गुरूनाथ हा धावला असता त्यालाही विजेचा जोरदार झटका बसून तो जागीच मृत्यूमुखी पडला. हा प्रकार पाहिल्यावर त्यांना सोडविण्यासाठी अनिल व रामदास हे दोघे गेले. त्यांनी बांबूच्या सहाय्याने त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला परंतु बांबू ओला असल्यामुळे त्यांना विजेचा धक्का बसल्याने तेही जखमी झाले. या घटनेमुळे ग्रामस्थांत महावितरणच्याविरूद्ध नाराजी निर्माण झाली असून अधिकार्यांवर गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे.
www.konkantoday.com