रिफायनरीचे समर्थन केले म्हणून गोठिवरे गावातील काही कुटुंबांवर बहिष्कार घालण्याचा गंभीर प्रकार करणार्‍यांना पोलिसांनी दिली समज, माफी मागितल्याने प्रकरण मिटले

0
112

राजापूर : राजापूर तालुक्यातील गोठिवरे येथे राहणारे सुर्यकांत पुजारी, महादेव येरम, व अनाजी खांबल आदी कुटुंबियांनी नाणार रिफायनरीच्या समर्थनासाठी निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला होता म्हणून त्यांच्यावर गावातील काही लोकांनी बहिष्कार घालण्याचा गंभीर प्रकार केला होता. याबाबत या कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतल्यावर नाटे येथील पोलीस निरीक्षक काळे साहेब यांनी दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेतले. ज्या लोकांनी हा बहिष्कार घातला आहे त्यांना त्यांनी चांगलीच समज देऊन असा बहिष्कार घालणे म्हणजे कायद्याने मोठा गुन्हा असल्याचे सांगितले. लोकशाही असल्यामुळे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. तसेच प्रत्येकालाअ आपल्या भावना आहेत. त्यामुळे त्यांना असे बहिष्कृत करणे ही गंभीर बाब आहे. असे कृत्य केल्यास कायद्याने शिक्षा होवू शकते. याची कल्पना त्यांनी दिल्यावर ज्या लोकांनी या कुटुंबावर बहिष्कार घातला होता त्यांनी आपली चूक मान्य केली व यापुढे असा प्रकार होणार नाही असे त्यांनी पोलिसांना आश्‍वासन दिले. त्यामुळे पोलिसांनी सध्या हे प्रकरण सामंजस्याने मिटविले आहे.

याविषयी अधिक माहिती अशी की, गोठिवरे येथील सुर्यकांत पुजारी, महादेव येरम, व अनाजी खांबल या कुटुंबियांनी रिफायनरीच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात सहभाग घेतला होता. त्यानंतर गावातील गणपती मंदिरात काही लोकांनी मुंबई येथील लोकांच्या सांगण्यावरून सभा घेतली व ज्या लोकांनी रिफायनरीचे समर्थन केले आहे त्यांच्याकडे कोणीही कामाला जावू नये व त्यांच्याशी बोलू नये असे सांगितले.जो कोणी या गोष्टीचा भंग करेल त्याचेकडून ५ हजार रु. दंड आकारण्यात यावा असे ठरविण्यात आले. तसेच या कुटुंबांना कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक वा धार्मिक निमंत्रण देण्यात येवू नये असा निर्णय घेण्यात आला असल्याची तक्रार या कुटुंबियांनी लेखी स्वरूपात पोलिसांकडे केली. तसेच या घरातील लोकं रस्तावरून जात असता त्यांचे मोबाईलवरून फोटो काढले जातात. या कुटुंबियांनी मंदिरात दिलेले साहित्यही न वापरता तसेच ठेवण्यात आले व या लोकांनी दिलेली वर्गणीसुद्धा स्विकारण्यात आली नाही. या कुटुंबाकडे कोणीही लोक दहशतीमुळे कामाला येत नसल्यामुळे या कुटुंबाला गावातील लोकांनी एकप्रकारे वेठीस धरून बहिष्कार घालण्याचा प्रकार केला होता. या कुटुंबातील परिचित लोकसुद्धा दबावाला व दंडाला घाबरून या कुटुंबाकडे फिरत नसल्याने ही कुटुंबे एकाकी पडली होती. त्यामुळे काहीजणांनी गावात राहणे कठीण असल्याने ते मुंबईला निघून गेले. उर्वरित कुटुंबे जीव मुठीत धरून रहात होती परंतु या कुटुंबानी या बहिष्कारासारख्या निर्णयाविरोधात पोलिसांकडे दाद मागण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी पोलिसांकडे अर्ज केल्यावर पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून घेवून बहिष्कार घालणार्‍यांना चांगलीच समज दिली.
रिफायनरीसाठी समर्थन देणार्‍या कुटुंबाच्यावतीने या भागातील सामाजिक नेते व रिफायनरी समर्थक पंढरीनाथ आंबेरकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. रिफायनरी परत यावी यासाठी इतर गावातल्या लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा रिफायनरी समर्थकांचा दावा आहे. मात्र त्या गावातही असे दहशतीचे प्रकार चालू असल्याचे स्थानिक नेते व त्या भागातील शेतकरी अविनाश महाजन यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here