नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी माजी प्राचार्य सुभाष देव भाजपचे संभाव्य उमेदवार ?
भाजपा सेना ही लोकसभा व विधानसभेसाठी युती झाली असली तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. रत्नागिरीचे शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी राजीनामा दिल्याने आता परत एकदा निवडणूक होत आहे. भाजप ही निवडणूक लढणार की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून ॲड.दीपक पटवर्धन यांनी धुरा हाती घेतल्यावर त्यांनी संघटना बळकट करण्यावर भर दिला असून ते विविध तालुक्याला भेटी देऊन भाजपच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत.
आगामी एक महिन्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने भारतीय जनता पक्षाने त्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्या दृष्टीने जिल्हाध्यक्ष व त्यांचे सहकारी शहराच्या प्रत्येक वॉर्डात सभा घेत आहेत मागील निवडणुकीत शिवसेनेने सुशिक्षित व पदवीधर उमेदवार म्हणून राहुल पंडित यांचे नाव पुढे केले होते त्यामुळे जनतेने त्यांना चांगल्या मताने निवडून दिले होते जर निवडणूक लढवायची झाली तर पक्षातर्फे चांगला सुशिक्षित उमेदवार देण्याचा भाजपचा मानस आहे त्यादृष्टीने माजी प्राचार्य सुभाष देव यांचे नाव पुढे येत आहे. वॉर्डांमध्ये होणाऱ्या सभांमध्येही देव यांचा सहभाग आहे. यामुळे वरिष्ठांनी मंजुरी दिली तर भाजप या नगराध्यक्षपद निवडणुकीत उडी घेणार आहे. शहरवासियांसमोर सुशिक्षित व पदवीधर प्रतिमा असलेला उमेदवार पुढे आणल्यास यश मिळू शकेल असा भाजपाला विश्वास आहे. त्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत.गेल्या वेळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप सेना युती नसल्याने भाजपने स्वतंत्र निवडणूक लढवली होती.
www.konkantoday.com