गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना खुशखबर,एसटीच्या २२०० जादा बस
मुंबई : (१९ जुलै )-गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे.किंबहुना एसटी,गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २२०० जादा बसेसची सोय केली आहे. या सेवेचा त्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन मा.परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री.दिवाकर रावते यांनी केले आहे.*
यंदा लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने २२०० बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत गणेश उत्सवाची पहिल्या टप्प्याची जादा वाहतूक करण्यात येणार असून, येत्या २७ जुलै (एक महिना अगोदर) पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे,यावर्षीपासून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील आरक्षण एकाचवेळी म्हणजे २७ जुलै पासून करता येणार आहे.
*२० जुलै पासून ग्रुप बुकींगला सुरूवात..*
गणपती उत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी मुंबईतील चाकरमानी गटागटाने बस आरक्षित करतात. मुंबईतल्या विविध उपनगरातील लोक एकत्र येऊन कोकणातील एकाच गावी किंवा सलग असणाऱ्या गावात जाण्यासाठी एसटीची बसआरक्षित करतात,हि बस त्यांना सोयीची ठरते. गेली कित्येक वर्ष एसटी या चाकरमान्यांना त्यांच्या मुंबईतल्या घरापासून ते कोकणातील त्यांच्या वाडी वस्ती व गावापर्यंत सुखरूप आणि सुरक्षितपणे नेऊन सोडत आली आहे.अशा गट आरक्षणाला (ग्रुप बुकिंगला) 20 जुलै पासून सुरुवात होत आहे .संबंधित लोकांनी ग्रुप बुकिंग साठी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा , असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात येत आहे.
*मुंबई व उपनगरातील १४ ठिकाणाहून जादा बसेस सुटणार..*
२८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील १४ बसस्थानके व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच परतीच्या प्रवासासाठी म्हणजेच ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत कोकणातील स्थानिक बसस्थानकावरून जादा बसेसची सोय करण्यात आली आहे.कोकणातील महामार्गावर ठीक-ठिकाणी वाहन दुरुस्ती पथके (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांना प्रवासात तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com