नवी दिल्ली- कोकण रेल्वे हे कोकणातील लोकांचे स्वप्न आहे, असे म्हणत खा. सुनिल तटकरे यांनी आज संसदेत कोकण रेल्वेसंबंधित मुद्द्यांवर आवाज उठवला. कोकण रेल्वे ५४ ट्रेन्सच्या माध्यमातून जवळपास ३४ लाख प्रवाशांना सेवा पुरवते. तरी केंद्रीय रेल्वेकडून कोकण रेल्वेसाठी पुरेसा निधी पुरवला जात नाही. त्यामुळे कोकण, गोवा आणि किनारी कर्नाटक भागातील लोक सुविधांपासून वंचित रहात आहेत. या अर्थसंकल्पात केवळ १७.६४ कोटींचे बजेट कोकण रेल्वेसाठी सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प म्हणून मंजूर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी, फूट ओव्हर ब्रीज, फलाटांची उंची वाढवणे तसेच इतर सोयीसुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला आहे. त्यासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाचा अतिरिक्त जवळपास रू. १५० कोटींचा बोजा कोकण रेल्वेवर पडत आहे. म्हणूनच अतिरिक्त निधीची आवश्यकता कोकण रेल्वेला भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने एकतर कोकण रेल्वेला केंद्रीय रेल्वेच्या अखत्यारित घ्यावे किंवा अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी खणखणीत मागणी त्यांनी सभागृहात केली.

रोहा आणि आपटा स्थानकांदरम्यानची जमीन कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात आली होती. पण तेथील प्रकल्पग्रस्तांना अद्याप भरपाई मिळत नाही. विद्युतीकरणाचे काम माझ्या कोलाडपासून वीरपर्यंत करण्यात आले, मात्र हे डबलिंगचे काम रत्नागिरीपर्यंत व्हावे, अशी मी माननीय मंत्र्यांना विनंती केली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. वीरपासून महाड या मोठ्या औद्योगिकीकरण झालेल्या क्षेत्रापर्यंत नवी डीपीआर टाकून नवी रेल्वे सुरू करावी, अशी मागणीही केली. पेण, माणगाव, खेड आणि चिपळूण या स्थानकांवर जनशताब्दी, मंगला एक्सप्रेस, वेरावले एक्सप्रेस, नागरकोईल-गांधीधाम,आपटा-निजामुद्दीन, मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा, अशीही मागणी आज सभागृहात केली. थळ येथे आरसीएफचा प्रकल्प आहे. पेण ते थळ हे अंतर २७ किमी. आहे. राज्य सरकारला विनंती करून एमएमआरडीएकडून निधी उपलब्ध करून घ्यावा व केंद्र सरकारने मागे घोषणा केल्याप्रमाणे पेण ते अलिबाग डीपीआर करावा, अशी मागणी तटकरे यांनी पुढे ठेवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here