जिल्हा परिषदेच्या शाळेचे छत कोसळले, सुदैवाने विद्यार्थी बचावले
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांची अवस्था जीर्ण असून त्याची तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे आहे. परंतु त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांना मृत्यूच्या छायेत रहावे लागत आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती यांनीही याबाबत आवाज उठविला होता परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले होते. चिपळूण तालुक्यातील कोसरे, कळमुंडी येथील जि.प. शाळेतील इमारतीचे छत शाळा सुरू असताना अचानक कोसळले. यावेळी वर्गात विद्यार्थी होते. मात्र छताचा मोठा आवाज झाल्याने छत कोसळत आहे हे शिक्षकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. त्यानंतर लगेचच छत कोसळले. शिक्षकांनी प्रसंगावधान दाखविल्याने वर्गातील १८ विद्यार्थ्यांचे प्राण बचावले आहेत. आता या घटनेची खबर शिक्षण विभागाला देण्यात आली आहे.