
काँग्रेसला हवा चिपळूण व राजापूर मतदारसंघ
मुंबई ः विधानसभा संघाचा आढावा घेण्यासाठी मुंबई टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या वेळी रत्नागिरी जिल्ह्यात कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी झाल्यास चिपळूण-संगमेश्वर व राजापूर लांजा हे दोन विधानसभा मतदार संघ कॉंग्रेसला हवे आहेत अशी मागणी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रमेशभाई कदम व त्यांच्या सहकार्यांनी केली आहे. यावेळी आता झाले ते गेले विसरून सर्वांनी एकदिलाने कामाला लागा, पक्ष वाढीसाठी प्रयत्न करा व विधानसभेत भरघोस यश मिळवा असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केले.
कोकणातील सर्व जिल्हानिहाय बैठक होती. रत्नागिरी जिल्हा बैठकीला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कोकण प्रभारी बी. एम. संदीप, खा. सुसेन दलवाई, प्रदेशचे सरचिटणीस माणिक जगताप उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्यातून जिल्हाध्यक्ष माजी आ. रमेशभाई कदम, सरचिटणीस सुरेश कातकर, नवीनचंद्र बांदिवडेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, दापोलीचे माजी आमदार चंद्रकांत मोकल, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते, तालुका प्रवक्ता वासूआप्पा मेस्त्री, जिल्हाध्यक्ष रतन पवार, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.