प्रवासी महिलेची पर्स लांबविणार्या दोन चोरट्यांना अटक, मुद्देमालही सापडला
खेड ः पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची पर्स लांबविणार्या दोन अट्टल चोरट्यांना आरपीएच्या जवानांनी कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यातील अंजनी येथील बोगद्यात मुद्देमालासह पकडले.
वलसम्मा स्यानियल (रा. केरळ) या एर्नाकुलम -पुणे एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. खेड तालुक्यातील अंजनी रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी काहीवेळ थांबली असता या महिलेची पर्स अज्ञात इसमांनी हिसकावून पळवली होती. त्या पर्समध्ये महागडा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि १० हजार रुपये रोख आणि महत्वाचे ओळखपत्र होते. स्नायुयल यांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी रत्नागिरी रेल्वे स्थानकात टीसीकडे आपली चोरीची तक्रार दाखल केली.
रेल्वे प्र्रशासनाने तात्काळ चिपळूण येथील आरपीएफच्या टीमला याबाबत खबर दिली. आरपीएफची तुकडी अंजनी रेल्वे स्थानकात दाखल झाली आणि त्यांनी सगळीकडे तपास सुरू केला. अंजनी आणि खेड रेल्वे स्थानकादरम्यान असणार्या बोगद्यामध्ये दोन इसम आढळले. ते नशापान करत असताना आरपीएफच्या जवानांनी त्यांना पकडून त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून रक्कम आणि चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला..