रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांचा अखेर राजीनामा, परत एकदा नगराध्यक्षपदाची निवडणूक

0
174

रत्नागिरी ः पाच वर्षासाठी जनतेतून निवडून आलेले राहुल पंडित यांना पक्षश्रेष्ठीनी दिलेल्या आदेशामुळे आपले नगराध्यक्ष पद सोडून द्यावे लागले आहे. आज त्यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा जिल्हाधिकार्‍यांकडे सुपूर्द केला. दोन वर्षापूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सुशिक्षित व सुसंस्कृत उमेदवाराला निवडून द्या म्हणून राहुल पंडित यांचे नाव शिवसेनेच्यावतीने नगराध्यक्षपदासाठी सुचविण्यात आले होते. त्याप्रमाणे जनतेने त्याला प्रतिसाद देवून राहुल पंडित यांना चांगल्या मताने निवडून दिले होते.

या पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते बंड्या साळवी हे इच्छूक होते. परंतु जनतेसमोर राहुल पंडित यांना उमेदवार म्हणून आणण्याचे पक्षाने ठरवले. नाराज झालेल्या साळवी यांना काही वर्षानी पद दिले जाईल असे सांगून त्यांची समजूत घालण्यात आली होती. दोन वर्षानंतर पंडित यांनी राजीनामा द्यावा यासाठी प्रयत्न सुरू होते. सुरूवातीला पंडित यांनी आपण पाच वर्षाची आपली कारकिर्द पूर्ण करणार असे जाहीर केले होते. परंतु अचानक त्यांनी भैरीच्या देवळात जावून आपला राजीनामा भैरीचरणी सादर केला होता. त्यावरून काही काळ राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. जर साळवी यांना नगराध्यक्ष पद द्यायचे झाल्यास त्यांना जाहीररित्या निवडणूक लढवून लोकांच्यातून यावे लागणार होते. यासाठी नगराध्यक्षाची निवडणूक घेणे भाग होते. दरम्याने लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती. त्यामुळे हा विषय काही काळ स्थगित ठेवण्यात आला होता. राहुल पंडित यांना लोकसभा निवडणुकीपूर्वी रजेवर पाठवून प्रभारी नगराध्यक्ष म्हणून बंड्या साळवी यांची निवड करण्यात आली होती. साळवी यांनी आपल्या काळात अतिक्रमणाविरूद्ध व फेरीवाल्यांविरूद्ध धडाकेबाज निर्णय घेतले होते. व नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीवर छाप उमटवली होती. नगराध्यक्षपदाची निवडणूक झाल्यास विरोधकांकडून सक्षम उमेदवार उभा राहण्याची भीती होती. या पदासाठी इच्छूक असलेले माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांचे अकाली निधन झाल्याने नगराध्यक्ष पदासाठी कोणीच प्रबळ उमेदवार विरोधकांकडे राहिला नव्हता. त्यामुळे पंडित यांनी राजीनामा द्यावा याकडे लोकसभेच्या निकालानंतर परत एकदा जोर पकडला होता. त्यानुसार पक्षश्रेष्ठींचा आदेश मानून पंडित यांनी अखेर राजीनामा दिल्याचे कळते. त्यामुळे रत्नागिरीकरांना परत एकदा नगराध्यक्ष निवडून द्यावा लागणार आहे.