विविध क्षेत्रातील कर्मचा-यांचा लोकनिर्माण सन्मान २०१९ ने सन्मानित

0
352

रत्नागिरी/प्रतिनिधी- १ मे महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या गुणवंत कामगारांना लोकनिर्माण सन्मान २०१९ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी साप्ताहिक लोकनिर्माण आणि जायंट्स गृप यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागातील कर्मचारी राजाराम आंबेकर, रत्नागिरी विभागीय राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचारी सौ. राजलक्ष्मी सुर्वे, डेरवण रूग्णालयात काम करणारे सचिन धुमाळ, मातृमंदीर संस्थेत काम करणाऱ्या कांचन जाधव, शिक्षण क्षेत्रातील सुरेंद्र कुळ्ये, सांदिपनी गुरुकुलाच्या गृहमाता प्रियंका चव्हाण यांना व्यासपीठावरील मान्यवरांकडून सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन पुरस्कारीत करण्यात आले. यावेळी साप्ताहिक लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार यांना सर्वोत्कृष्ट वर्तमानपत्र चालविणारे संपादक म्हणून इंडियन आयकाॅन पुरस्कार मिळाल्याबद्दल देवरूख मधील सर्व दैनिकांचे पत्रकार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
संपूर्ण जग हे कामगारांच्या कष्टावर अवलंबून असते. विविध क्षेत्रातील कर्मचारी आपली सेवा बजावत असताना कर्तव्याचे भान ठेवून नावापुरती सेवा न करता समाजसेवा करत असतात. अशा कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी साप्ताहिक लोकनिर्माण आणि जायंट्स गृप दरवर्षी कामगार दिनी लोकनिर्माण सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करत असते.
या वेळी लोकनिर्माणचे संपादक बाळकृष्ण कासार, सहसंपादक आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, नाम फाउंडेशनचे तालुका प्रतिनिधी भगवंतसिंग चुंडावत, राजू काकडे अॅकाडमी आणि जायंट्स गृपचे प्रकाश कारखानीस, सौ.ज्योती कारखानीस, सौ. शितल पंडीत, जायंट्स गृपचे अध्यक्ष संजय सुर्वे, उपाध्यक्षा रंजना कदम, जयदेव माने , देवरूख मधील सर्व वर्तमानपत्रांचे पत्रकार तसेच अनेक ठिकाणाहून आलेले मान्यवर उपस्थित होते.