कोंकणातील पुरातन वास्तूंतील सर्वात देखणे “कर्णेश्वर मंदिर”

0
518

– भूमीज शैलीतील मंदिर
– हजार वर्षांचा साक्षीदार
– “संगमेश्वर” तालुक्याची शान

रत्नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य.
‘कसबा’ या फारसी शब्दाचा अर्थ ‘वस्ती’. ‘संगमेश्वर’ गावाचे खरे नाव ‘नावडी’. इसवी सनापूर्वी महाराष्ट्रामध्ये जैन आणि लिंगायत धर्मीय राज्ये होती, त्यांपैकी जैन पंथीयांची राजधानी कपिलतीर्थ (कोल्हापूर) येथे होती, परंतु संगमेश्वर हे त्यांचे राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सूर्यवंशी घराण्याचे राज्य आले. त्यांच्यापैकी एका राजाची राजधानी संगमेश्वर येथे होती.
गुजरातचा चालुक्य (चौलुक्य) राजा कर्ण त्या ठिकाणी इसवी सन १०६४ च्या सुमारास राज्य करत होता. तो कदंब राजांचा जावई होता. त्याने त्या काळात दहा हजार सुवर्णमुद्रा खर्च करून तेथे शिवमंदिर बांधले. ते त्याच्या नावाने ‘कर्णेश्वर शिवमंदिर’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते मंदिर शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे. मंदिराची रचना हेमाडपंथीय असल्‍याचे म्‍हटले जाते. मात्र हेमाद्री तथा हेमाडपंडीत तेराव्‍या शतकातील आहे. त्‍यामुळे ते मंदिर हेमाडपंथी असू शकत नाही. प्रत्‍यक्षात ते भूमीज शैलीतील मंदिर आहे. श्रीकर्णेश्वर मंदिर सुमारे हजार वर्षांनंतरही सुस्थितीत पाहण्यास मिळते. सुमारे चारशे चौरस मीटर क्षेत्रात काळ्या पाषाणात कोरीव काम केलेले असे ते मंदिर कसब्याचे पौराणिक महत्त्व टिकवून आहे.
कर्णराजाने कर्णेश्वराच्या पूजाअर्चेच्या वेगवेगळ्या कामांसाठी सात गावे दिली होती. धर्मकार्यार्थ-धर्मपूर (धामापूर), सुपारीसाठी गुणवल्लिका, भेट म्हणून देवजी भूचल, तुपासाठी शिवनी (शिवने), यज्ञासाठी लवल (लोवले), फळांसाठी धमनी (धामणी), धर्मसेवकांसाठी करंबव (कळंबस्ते), निवासार्थ आम्रवल्ली (अंत्रवली). त्यां पैकी गुणवल्लिका आणि भूचल या गावांचे संदर्भ सापडत नाहीत. कर्णराजाने कर्णेश्वर मंदिराच्या निमित्ताने त्यावेळी तीनशेसाठ प्रासाद म्हणजे मंदिरे बांधली होती. त्यांतील काही मंदिरे त्या ठिकाणी पाहण्यास मिळतात. त्यांमध्ये कुंभेश्वर, सोमेश्वर, काशीविश्वेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नंदिकेश (संगम मंदिर) व कालभैरव यांचा समावेश आहे.
कोकण परिसरात वैष्णवपंथीयांचे प्रमाण अधिक आहे. त्यांनी नंतरच्या काळात कर्णेश्वर मंदिराला कळस चढवला असावा. कारण सबंध मंदिर एका दगडात आहे. कळस दगड, माती आणि विटा यांनी बांधलेला आहे. त्या काळात देवळे दगडात कोरली जात होती, त्यांचे कळस माती-विटांनी तयार झालेले नसत. वैष्णवपंथीयांनी बांधलेल्या देवळांना कळस उंच असतात. पण दक्षिणेकडील शैवपंथीयांनी बांधलेल्या मंदिरांना तसे उंच कळस नसतात. कर्णेश्वर मंदिरात पावसाचे पाणी गळत होते, म्हणून २००३-०४ या वर्षी मंदिराच्या तीन छोट्या कळसांमध्ये थोडी दुरूस्ती करण्यात आली. तेव्हा ते कळस दगडमाती, विटांचे आहेत आणि त्यांना गूळ आणि चुना यांचे प्लास्टर करण्यात आले आहे ही बाब स्पष्ट झाली.
कर्णेश्वर मंदिरात आतील बाजूच्या दगडात देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात. मंदिरावर जे चार कळस आहेत ते खालच्या बाजूने झुंबरासारखे कोरण्यात आले आहेत. मूळ मंदिर हे कळसरहित होते. नंतरच्या काळात कधीतरी त्यावर कळस चढवण्यात आले. त्यातून पावसाचे पाणी गळते, म्हणून त्या कळसांचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याखेरीज त्या मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याची वेळ आलेली नाही. ते मंदिर आहे तसेच सुबक दिसते. आता हे मंदिर पुरातत्व खात्यांतर्गत राज्य संरक्षित करण्यात आले आहे.

लेख- निबंध कानिटकर
विश्वस्त, कर्णेश्वर मंदिर-संगमेश्वर
———————————————-
https://www.facebook.com/viakonkan/
———————————–
*कोंकणातील* पर्यटन विषयक, सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आदी माहिती इत्यंभूत मिळवण्यासाठी *”Via Konkan व्हाया कोंकण”* च्या पेजला👉🏼
Pls *like* करा व अधिकाधिक *Share* करा…..