Monday, Jan 22nd

Headlines:

सिंधुदुर्ग

तिलारी घाटात सडलेले दोन मृतदेह

E-mail Print PDF
दोडामार्ग- दोडामार्ग व चंदगड तालुक्याला जोडणाऱया तिलारी घाटात अर्धवट सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. एका मृतदेहाचा चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्याचे निदर्शनास आले असून दुसऱयाचा सांगाडा सापडला आहे. यामागे घातपात असल्याचा संशय आहे. एक मृतदेह 30 ते 35 वयोगटातील तर दुसरा 40-42 वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले. चंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक ए. बी. पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत. सदर मृतदेह कोणाचे व ते तिलारी घाटात कसे आले, याचा शोध घेण्याचे आव्हान चंदगड पोलिसांसमोर आहे.

दोडामार्ग, गोवा व चंदगड तालुक्याला जोडण्याचे काम हा तिलारी घाटमार्ग करतो. या रस्त्यात भरदिवसा रहदारी असते. मात्र, महिनाभरापूर्वी हा घाटरस्ता दुरुस्तीसाठी वाहतुकीस बंद केला होता. सध्या चंदगड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काम सुरू आहे. सदर काम योग्यप्रकारे सुरू आहे की नाही, याची पाहणी करण्यासाठी मोर्ले गावचे माजी सरपंच गोपाळ गवस व मनसेचे तालुका उपाध्यक्ष मायकल लोबो व त्यांचे अन्य सहकारी तिलारी घाटात गेले होते. त्यावेळी त्यांना दरीतून कुजल्याचा वास आल्याने दरीत उतरून पाहणी केली. तेव्हा  हा वास एका मृतदेहाचा असल्याचे निदर्शनास आले. साधारण 100 फूट खोल दरीत हा मृतदेह निदर्शनास आला. याबाबत चंदगड पोलिसांना माहिती देताच सायंकाळी उशिरा हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाच्या बाजूला मोठा दगड होता व त्या दगडाला रक्ताचे डाग होते. मृतदेह कुजल्याने व चेहरा विद्रुप झाल्याने ओळख पटलेली नाही. या घटनेचा चंदगड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

गुरुवारी सापडलेल्या मृतदेहाच्या तपासासाठी शुक्रवारी दुपारी पोलीस पुन्हा घटनास्थळी गेले होते. तेथे काही धागेदोरे सापडतात का, याचा शोध सुरू असतांनाच पोलिसांना तेथूनच 50 मीटर अंतरावर दुसरा एक सांगाडा सापडला. पोलिसांनी हा सांगाडा ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठविला. सदरचा मृतदेह सुमारे 40 वर्षीय तरुणाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोन्ही मृतदेह सारख्याच अवस्थेत असल्याने एकाचवेळी घातपात झाल्याचा संशय आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे काम थांबू देणार नाही - सुरेश प्रभू

E-mail Print PDF

सावंतवाडी - जिल्ह्याला आदर्श ठरणाऱ्या सावंतवाडी टर्मिनसचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबू देणार नाही, असे आश्‍वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिल्याची माहिती भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी येथे दिली. ज्या प्रभूंनी कधीही होऊ न शकणारे टर्मिनस या ठिकाणी विशेष मान्यता घेऊन आणले आणि आपल्या मंत्री कोकण रेल्वेचा विकास केला त्यांच्यावर टीका होणे, दुर्दैवी आहे, असेही तेली यांनी सांगितले.

तालुका शिवसेनेच्यावतीने येथे पत्रकार परिषद घेवून प्रभू यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. तेली यांनी पत्रकार परिषद घेवून उत्तर दिले. श्री. तेली म्हणाले, ‘‘गेल्या पंचवीस वर्षांत कोकण रेल्वेकडे कोणीच लक्ष दिला नसताना सुरेश प्रभू यांच्या रूपाने कोकण रेल्वेत मोठा आमूलाग्र बदल पाहायला मिळाला. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसही त्यांच्यामुळे होत आहे. या आधीचे रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांनी सावंतवाडी रेल्वे टर्मिनस होणार नसल्याची भूमिका घेतली होती; मात्र श्री. प्रभू रेल्वे मंत्री होताच टर्मिनस मंजूर करून त्याचे कामही सुरू केले. हे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्याबाबत आपण प्रभूंचे लक्ष वेधले असता प्रभूंनी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे हे काम लवकरच सुरू होईल.’’

सिंधुदुर्गात आज दीपक केसरकर, नारायण राणे एकाच मंचावर

E-mail Print PDF

सिंधुदुर्ग : राज्यभरातले सुमारे दीड लाख शिक्षक आज सिंधुदुर्गात एकत्र आलेत. आजपासून सिंधुदुर्गात राजस्तरिय शिक्षक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात एक अनोखा योगायोग बघायला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्य मंत्री दीपक केसरकर, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे एकाच मंचावर येणार आहेत. तळकोकणात राणे-केसरकरांचं विळ्या भोपळ्याचं नातं सर्वश्रृत आहे. राणेंनी स्वतःचा पक्ष स्थापन केल्यावर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी कधी लागणार याविषय़ी अजूनही संभ्रमाचं वातवरण आहे.

राणे-मुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट

आता आज मुख्यमंत्री स्वतःच राणेंची पुन्हा एकदा भेट होतेय. आणखी एक योगायोग म्हणजे राणे-मुख्यमंत्र्यांची याआधीची भेट नागपुरात म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या शहरात झाली. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राणेंच्या शहरात येत आहेत.

वाहतूक नियंत्रणासाठी ‘कॅनव्हास मिरर’

E-mail Print PDF

मालवण : अरुंद रस्त्यामुळे वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यात रस्त्यालगत वाढलेली झाडीमुळे पर्यटनाचे केंद्रबिंदू असलेल्या देवबागमध्ये येणाऱया पर्यटकांना त्रासदायक प्रवास करावा लागत होता. रस्ता रुंदीकरणाची शक्यता तूर्त तरी कमी असल्याने वाहन चालकांना सोयीसाठी निर्मल सागर तट अभियानांतर्गत देवबाग ग्रामपंचायतीने या मार्गावर दहा ठिकाणी ‘कॅनव्हास मिरर’ बसविले आहेत. हे मिरर बसविण्यासाठी ग्रामसेवक युवराज चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते.
वारंवार पाठपुरावा करुनही बांधकाम विभागाकडून रस्त्यालगत वाढलेली झाडी साफ न केल्याने ग्रामस्थांनी श्रमदानातून झाडी साफ केली होती. मात्र, रस्त्याला अनेक ठिकाणी वळणे असल्याने पर्यटकांना समोरुन येणाऱया वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात व वाहतुकीची कोंडीची समस्या निर्माण होत होती. या समस्या टाळण्यासाठी देवबाग ग्रा. पं.ने रस्त्यावर दहा ठिकाणी मिरर बसविले आहेत.
देवबाग मधील रस्ते अरुंद आहेत. यामुळे निर्मल सागरतट अभियान राबविताना उपलब्ध झालेल्या निधीतून हे मिरर बसविण्यात आले. या मिररचे उद्घाटन उद्घाटन काशिनाथ केळुसकर व रमेश कद्रेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच तमास फर्नांडिस, नवनिर्वाचित सरपंच जान्हवी खोबरेकर, माजी सरपंच उल्हास तांडेल, ग्रामसेवक युवराज चव्हाण, प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. टोपणो, पं. स. सदस्या मधुरा चोपडेकर, मनोज खोबरेकर, भानुदास येरागी, रमेश कद्रेकर, बंदर अधिकारी अनंत गोसावी उपस्थित होते. बहिर्गोल मिरर स्टेनलेस स्टीलमध्ये बनवले जातात. वाहतूक आणि वाहतुकीसाठी बाहेरील भागाची माहिती चालकांना उपयुक्त असते. अचूक रहदारीचे आणि उच्च दृश्यमानता असणारे हे मिरर आहेत. या मिररमुळे वाहने कशी जात आहेत, याची माहिती समोरील वाहनचालकांना मिळते. या मिररमुळे वाहन चालकाला डाव्या आणि उजव्या या दोन्ही बाजूंना पाहता येते. त्यामुळे भविष्यात देवबाग येथील अपघात व वाहतूक कोंडीची समस्या सुटणार आहे.

नांदगाव-वाघाचीवाडी शाळा बंद करण्यास ग्रामस्थांचा विरोध

E-mail Print PDF

कणकवली : नांदगाव वाघाचीवाडी प्राथमिक शाळा बंद करण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. लोकसहभागातून या शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले असून शाळेत सध्या 11 पटसंख्या आहे. त्यामुळे ही शाळा बंद केल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होणार आहे. ही शाळा बंद करण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शवित सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांना निवेदन देत चर्चा केली. सौ. साटम यांनी या पूर्वी झालेल्या सर्व्हेनुसार या शाळेची पटसंख्या कमी दर्शविण्यात आली होती. मात्र, आता पटसंख्या वाढल्याने ही शाळा बंद करू नये, अशी शिफारस शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात येईल, असे आश्वासन साटम यांनी दिले.

नांदगाव-वाघाचीवाडी शाळेची पटसंख्या कमी असल्याने ही शाळा बंद करण्याच्या यादीत असल्याची बाब पं. स. च्या बैठकीत समोर आली होती. केंद्र प्रमुख व विस्तार अधिकाऱयांकडून मागविण्यात आलेल्या अहवालानुसार ही माहिती गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांनी दिली होती. मात्र, हा सर्व्हे केल्यानंतर शाळेच्या पटसंख्येत वाढ झाली होती. शिक्षण संचालकांकडून आलेल्या आदेशानुसार या पूर्वी कमी पटसंख्येच्या शाळांबाबत सर्व्हे करण्यात आला होता. त्यानंतर कमी पटसंख्येच्या यादीत येत असलेल्या वाघाचीवाडी व फोंडाघाट ब्रह्मनगरी या दोन्ही शाळांमध्ये सध्या 11 पट असल्याचे सौ. साटम यांनी सांगितले.

24 हजार शेतकऱयांना 33 कोटीची कर्जमाफी

E-mail Print PDF

सिंधुदुर्गनगरी : राज्य शासनाच्या सिद्धिसंकल्प कार्यक्रमातून सिंचनसाठी जलयुक्त शिवार योजनेमुळे 52 गावात 17 कोटी 29 लाख रुपये खर्च करून साडे चार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनखाली आले आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे 24 हजार 90 शेतकऱयांना 33 कोटी रुपये कर्जमाफीची रक्कम वाटप करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेतून दोन वर्षात नऊ हजार हेक्टर क्षेत्र फळझाड लागवडीखाली आणले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सिद्धिसंकल्प कार्यक्रमाची माहिती देण्याकरिता जिल्हाधिकाऱयांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. मेधा वाके, जिल्हा माहिती अधिकारी मिलिंद बांदीवडेकर आदी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहचवून त्या योजनेचा झालेला फायदा आणि भविष्यातील फायदा कशा पद्धत्तीने होणार याची माहिती होण्यासाठी फायदा कशा पद्धतीने होणार? याची माहिती होण्यासाठी सिद्धी संकल्प कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत गेली तीन वर्षे जलयुक्त शिवार ही योजना राबवताना आतापर्यंत या योजनेतून 58 गावामध्ये ही योजना राबविली असून त्यापैकी 52 गावात जलयुक्तची कामे पूर्ण होऊन 17 कोटी 29 लाख रुपये खर्च झाला आहे. त्यामुळे साडेचार हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या वर्षी आणखी 38 गावांची निवड केली असून या गावात कामे पूर्ण झाल्यावर आणखी 2900 हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार आहे.

सावंतवाडी महोत्सवाची दिमाखात सांगता

E-mail Print PDF

सावंतवाडी - सावंतवाडी नगरपालिकेच्या अकराव्या पर्यटन महोत्सवाची सांगता रविवारी रात्री उशिरा हजारो रसिक, पर्यटकांच्या उपस्थितीत झाली. यंदाच्या महोत्सवात पार्श्वगायक सुदेश भोसले वगळता आघाडीच्या कलाकारांचा सहभाग नव्हता. परंतु महोत्सवाला पाचही दिवस नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती दर्शविली. विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटण्याबरोबरच स्टॉलवरील विविध वस्तुंच्या खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती. यंदाच्या पर्यटन महोत्सवात स्वच्छतेचा संदेश देण्यावर जास्त भर देण्याचा प्रयत्न पालिकेकडून करण्यात आला.

सावंतवाडी पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन 27 डिसेंबरला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. आणि रविवारी सांगताही त्यांच्याच उपस्थितीत झाली. या महोत्सवाचे वैशिष्टय़ म्हणजे खाद्य महोत्सवाला मिळालेली खवय्यांची पसंती.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. त्यात स्मृतिरेखा दास यांचे ओडिसी नृत्य, खेळ पैठणीचा आदी कार्यक्रमांचा समावेश होता. दुसऱया दिवशी स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम, मालवणी सुरांच्या गजाली, संगीत रजनी असे कार्यक्रम झाले. तिसऱया दिवशी प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांचा गायनाचा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. चौथ्या दिवशी रंगारंग 
कार्यक्रम झाला. त्यात विविध कलाकारांचा सहभाग होता.

यंदाच्या पर्यटन महोत्सवात आघाडीच्या कलाकारांची रेलचेल नव्हती. परंतु पर्यटन महोत्सवाला हजारो लोकांनी उपस्थिती दर्शवित पर्यटन महोत्सवाचा आनंद लुटला. विशेषतः लोकांनी स्टॉलवरील खाद्यपदार्थांचा स्वाद लुटण्याबरोबर विविध खरेदीला पसंती दिली. त्यामुळे तीन मुशी ते विश्रामगृह परिसरापर्यंत पाचही दिवस तुडुंब गर्दी दिसत होती. महोत्सवावर नगराध्यक्ष बबन साळगावकर लक्ष ठवून होते. मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे तसेच पालिकेचे सर्व नगरसेवक, कर्मचारी महोत्सव यशस्वीतेसाठी अहोरात्र राबत होते. पर्यटन महोत्सवात माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर पाचही दिवस महोत्सवस्थळी उपस्थित होत्या.

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर

E-mail Print PDF

बांदा - सिंधुदुर्ग जिह्यातील राजकारण्यांच्या नाकर्तेपणामुळे आजपासून सिंधुदुर्गातील रुग्णांना गोवा बांबोळी येथे मिळणाऱया मोफत आरोग्य सेवेसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. गोवा सरकारने राज्याबाहेरील परप्रांतीय रुग्णांना शुल्क आकारण्याचा निर्णय घतेल्याने सिंधुदुर्गातील गोरगरीब जनतेचा आधारवडच कोलमडला आहे. जिल्हय़ातील सुमारे 80 टक्के जनता ही या आरोग्य यंत्रणेवर अवलंबून असते. त्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर  पर्रीकर यांनी दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. या कार्यवाहीबाबत सिंधुदुर्गातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला  सोयरसुतक नसल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटिलेटरवर राहिली आहे. येथील राजकीय  इच्छाशक्तीच्या अभावामुळे सुरुवातीपासूनच येथील आरोग्य यंत्रणेबाबत कोणीच गंभीर नसल्याचे यंत्रणेवरून दिसून येते. कधी यंत्रणा आहे तर कधी डॉक्टर नाहीत, असे विदारक चित्र गेली कित्येक वर्षे आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत जिल्हय़ाचे सुपुत्र असूनही त्या यंत्रणेत कोणतीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे कोणत्याही छोटय़ा-मोठय़ा आजाराला जिल्हय़ातील वैद्यकीय अधिकारी नेहमी गोवा बांबोळीला जाण्याचा सल्ला देतात. गोवा बांबोळी येथील वैद्यकीय अधिकाऱयांनी कोणताच दुजाभाव न करता येथील रुग्णांवर चांगले उपचार केले. गेली कित्येक वर्षे गोवा सरकार येथील रुग्णांना मोफत आरोग्य सेवा देत आहे.

काही महिन्यापूर्वी गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोव्याबाहेरील रुग्णांना सशुल्क सेवा देण्याचे जाहीर केले होते. गोवा शासनाने किमान पाच वर्षे गोवा येते वास्तव्य केलेल्या नागरिकांना दीनदयाळ स्वास्थ्य योजना लागू केली आहे. त्यातून राज्यातील कुठल्याही रुग्णालयात येथील रुग्ण मर्यादेनुसार उपचार घेऊ शकणार आहे. कुटुंबात तीन सदस्य असलेल्या रुग्णांना अडीच लाखापर्यंत तर त्यापेक्षा अधिक संख्या असलेल्यांना सात लाखापर्यंत मोफत उपचार दिले जाणार आहेत.

जीएसटीचा फायदा सर्वसामान्यांना ः सुरेश प्रभू

E-mail Print PDF
जीएसटीचा फायदा सर्वसामान्यांना ः सुरेश प्रभू
कुडाळ ः जीएसटीमुळे कर व्यवस्थेत मोठे बदल होणार असून त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. कुडाळ येथील बी.आर. इनिंग ऍकॅडमीच्या जीएसटी सेंटरचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
जीएसटीमुळे सर्वसामान्य माणूस किती कर भरतो ते स्पष्ट होणार असून अधिक चांगल्या सेवा निर्माण करण्यासाठी होणार आहे. त्या क्षमतेचा उपयोग, देशासाठी व्हावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटीमुळे कर रचनेत बदल होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांनाना होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठार जीएसटी संेंटर कोचीचे प्रमुख नेसन लुईस, चार्टर्ड अकौंटंट उन्मेश नार्वेकर, चार्टर्ड अकौंटंट अमोल खानोलकर, अटक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नुकूल पार्सेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुडाळ ः जीएसटीमुळे कर व्यवस्थेत मोठे बदल होणार असून त्याचा फायदा देशातील सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी केले. कुडाळ येथील बी.आर. इनिंग ऍकॅडमीच्या जीएसटी सेंटरचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.जीएसटीमुळे सर्वसामान्य माणूस किती कर भरतो ते स्पष्ट होणार असून अधिक चांगल्या सेवा निर्माण करण्यासाठी होणार आहे. त्या क्षमतेचा उपयोग, देशासाठी व्हावा म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. जीएसटीमुळे कर रचनेत बदल होणार असून त्याचा फायदा सर्वसामान्यांनाना होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठार जीएसटी संेंटर कोचीचे प्रमुख नेसन लुईस, चार्टर्ड अकौंटंट उन्मेश नार्वेकर, चार्टर्ड अकौंटंट अमोल खानोलकर, अटक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नुकूल पार्सेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Page 2 of 375