Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

आयशर टेम्पोतून २५ लाखाची गोवा बनावटीची दारु जप्त

E-mail Print PDF
कणकवली -ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग कणकवली यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी ११.४० वा. सुमारास सापळा रचून मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथील हॉटेल शिवमच्या समोर एका आयशर टेम्पोतून वाहतूक केली जाणारी २५ लाख ६२ हजार ६०० रु. किमतीची गोवा बनावट दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयाने १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या कारवाईत ९ लाखांचा टेम्पोही ताब्यात घेण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त अश्‍विनी जोशी, विभागीय उपायुक्त संगीता दरेकर, उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्गचे अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली व समवेत राज्य उत्पादन शुल्कचे कणकवलीचे निरीक्षक अमित पाडळकर यांनी ही कारवाई केली. या कारवाईकामी दुय्यम निरीक्षक के. बी. नडे, कुडाळचे दुय्यम निरीक्षक संजय साळवे, मालवण दुय्यम निरीक्षक सुनील सावंत, कणकवलीचे  सहायक दुय्यम निरीक्षक चंद्रकांत पवार, जवान गोपाळ लक्ष्मण राणे, सूरज चौधरी, स्नेहल कुवसेकर, रणजित शिंदे, हेमंत वस्त, प्रसाद माळी यांनी सहभाग घेतला.
तन्वीर इक्बाल शेख (१९, रा. माजगाव-सावंतवाडी), समीर शब्बीर शहा (२७, रा. झाराप- खान मोहल्ला) या दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

आंबोली पर्यटनाला आता ‘वेबसाईट’चे बळ

E-mail Print PDF
सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या आंबोली आता साहसी पर्यटनाबरोबर नाईट रायडींगसाठी विकसित केली जात आहे. वनौषधीसोबत विविध प्रजाती पाहण्याची संधी अनेक पर्यटकांना उपलब्ध होत आहे. यात भर म्हणून आंबोलीतील निर्णय राऊत या युवकाने आंबोली टुरीझम डॉट कॉम नावाची साईट तयार करुन देशासह विदेशातील पर्यटकांना पर्यटनांची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
इंटरनेटच्या एका क्लिकवर आंबोली, चौकुळ, गेळे या तिन्ही गावातील पर्यटनस्थळे तसेच वैशिष्ट्‌यांची माहिती संबंधितांना मिळणार आहे. स्थानिक युवकांना रोजगाराचे नवे दालन या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज या वेबसाईटचे उद्घाटन झाले.
जैवविविधतेने परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हटले की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे थंड हवेचे पर्यटनस्थळ डोळ्यासमोर येते. याठिकाणी लाखो पर्यटक दरवर्षी भेट देतात. याठिकाणच्या पर्यटनातील पावसाळा हा मुख्य वर्षा पर्यटन हंगाम म्हणून ओळखला जातो. येथे या हंगामात लाखो पर्यटक फक्त आंबोलीतील नयनरम्य पर्यटनस्थळे पाहत पावसात तसेच धबधब्यांखाली भिजण्यासाठी येतात. काही येथील शुद्ध थंडगार हवेसाठी येतात. आंबोली परिसर हा जैवविविधतेने परिपूर्ण असा भरलेला असल्याने निसर्गप्रेमी पर्यटक व अभ्यासक यांची हजारोंच्या संख्येने येथे ये-जा असते. असे असूनही आंबोली, चौकुळ व गेळे परिसरातील अनेक पर्यटनस्थळे, जैवविविधतेचे ठिकाणे, नयनरम्य देखावे व गावातील लोकांचे जीवन अनुभवणे, असे विविध पर्यटनास अनुकूल असलेल्या बाबी दुर्लक्षित आहेत. त्या पर्यटकांपर्यत पोहोचविण्याचे काम या वेबसाईटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. येथील बारमाही पर्यटनासाठी प्रयत्न आंबोली टुरिझमच्या माध्यमातून केले जाणार आहे.
हे संकेतस्थळ ऑनलाईन-ऑफलाईन उपलब्ध असून यावर तिन्ही गावांच्या माहितीबरोबरच हॉटेल बुकिंग, बेस्ट रेस्ट्रॉरन्ट, व्हिलेज टुरिझम, ट्रेकिंग, टेंट कॉंपिंग, सफारी, वाहतूक सेवा, नेचर कॅम्प, एडवेंचर स्पोर्ट, स्पेशल पॅकेज, इतर सहली आदीची माहिती आहे.
पालकमंत्री केसरकर यांच्या हस्ते या वेबसाईटचे आज उद्घाटन करण्यात आले. यावेळी आंबोली उपसरपंच विलास गावडे, चौकुळ माजी सरपंच विजय गावडे, गाववाले बहुउद्देशयिय पर्यटन संस्थेचे अध्यक्ष अरुण गावडे, सामाजिक कार्यकर्ते महेश पावसकर, नाना आवटे, रुपेश गावडे आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केसरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवलीपुरता मर्यादित : विक्रांत सावंत

E-mail Print PDF
सावंतवाडी - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काढलेला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष फक्त कणकवली पर्यंतच मर्यादित आहे. पक्ष स्थापन होऊन पंधरा दिवस उलटले तरी कोणी बडा नेता या पक्षात आलेला नाही. यावरून त्यांच्या प्रवृत्तीमुळे पक्षाच्या विचारांना कोणी साथ देत नाही हे दिसून आले, अशी टीका शिवसेनेचे विधानसभाप्रमुख विक्रांत सावंत यांनी येथे केली.
दरम्यान, राणेंच्या पक्षाला एनडीएत प्रवेश देण्यापूर्वी भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचा इतिहास तपासावा. आवश्यक असल्यास कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्याकडून माहिती घ्यावी, असाही टोला या वेळी सावंत यांनी लगावला. सावंत यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले, ‘‘राणेंनी पक्ष स्थापन करण्यापूर्वी आपल्यासोबत अनेक आमदार तसेच सर्व पक्षांतील बलाढ्य पदाधिकारी असल्याचे जाहीर केले होते; मात्र ज्यादिवशी त्यांनी आपला पक्ष जाहीर केला, त्या दिवशी माजी खासदार नीलेश राणे यांच्यासोबत संदीप कुडतरकरांना बाजूला बसवावे लागले हे त्यांचे दुर्दैव आहे. पक्ष जाहीर झाल्यानंतर अनेक पदाधिकारी प्रवेश करतील, असे त्यांनी सांगितले होते; मात्र सद्यःस्थिती लक्षात घेता कोणीही राणेंच्या पक्षात फिरकताना दिसत नाही. त्यामुळे त्यांचा पक्ष फक्त कणकवलीपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या प्रवृत्तीला कोणी साथ देत नाही हे आता उघड होत आहे.’’
ते पुढे म्हणाले, ‘‘राजकारणामुळे माजगाव विकासापासून मागे राहिले आहे. अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत; मात्र आता शिवसेनेच्या माध्यमातून गावाचा निश्‍चितच विकास केला जाणार आहे. त्या ठिकाणी देण्यात आलेले सर्व उमेदवार ग्रामस्थांशी चर्चा करुनच निवडण्यात आले आहे. सरपंचपदाचे उमेदवार दिनेश सावंत हे देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आहेत. आमच्याकडे पालकमंत्री, खासदार आहेत’’
सावंत पुढे म्हणाले, ‘‘वेंगुर्ले आणि दोडामार्गची जबाबदारी पक्षाने माझ्यावर दिली आहे. मात्र राणे समर्थकांचे पॅनल दुहेरी आकडा गाठू शकणार नाही तर सावंतवाडीत गाव पॅनलमधून आलेले सरपंच आपले असल्याचा दावा समर्थकांना करण्याची वेळ आली आहे.’’

सिंधुदुर्गातील निवासी भागातील फटाके विक्री दुकाने बंद

E-mail Print PDF
ओरोस - दिवाळी काही दिवसांवर आली असताना उच्च न्यायालयाने निवासी भागात फटाक्यांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. याचा परिणाम सिंधुदुर्गातील ३५ परवानाधारक फटाके विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर होणार आहे. ही ३५ दुकाने निवासी भागात असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होणार आहे.
सुरक्षेच्या कारणावरून निवासी भागात फटाक्यांची खुलेआम विक्री करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. नियम मोडणार्‍या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. फटाक्यांची विक्री करणारे अनधिकृत स्टॉल आणि निवासी भागातील फटाक्यांचे स्टॉल यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्वतंत्र लागू करण्यात येणार आहेत. बेकायदेशीर दुकानांवर कारवाई होणार आहे. त्यामुळे फटाके व्यावसायिक धास्तावले आहेत. फटाक्यांची जुनी दुकाने  अनेक ठिकाणी सुरू आहेत. फटाके व्यावसायिकांसमोर आर्थिक प्रश्‍न निर्माण होणार आहे.
पर्यावरणाचे संतुलन राखणे आणि निवासी भागात फटाक्यांमुळे होणारे परिणाम व नुकसानीमुळे न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम जाणवला आहे. आतापर्यंत फटाक्यांच्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. व त्यातून लाखो रुपयांची हानीही झाली.
गणेशोत्सव, दिवाळी आणि सणासुदीत हजारो फटाक्यांच्या माळा लावल्याने प्रदूषण निर्माण होते. दिवाळीच्या तोंडावर हा निर्णय झाल्याने परवानाधारकांना मोठी अडचण व आर्थिक परिणाम जाणवणार आहे.

तळवडे येथे सव्वा लाखाची दारू जप्त

E-mail Print PDF
बांदा - गोव्यावरुन सुझुकी कारमधून बेकायदा दारू वाहतूक करणाऱया न्हावेली-रेवटेवाडी येथील धनंजय मनोहर मयेकर (३७) याला तळवडे बाजार येथून राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ भरारी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून एक लाख १५ हजार २०० रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या दारुसह एक लाख ८० हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी रात्री उशिरा करण्यात आली. यातील संशयितावर दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखली संजय साळवे करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या कुडाळ भरारी पथकातर्फे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छुप्या पद्धतीने केल्या जाणाऱया गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कुडाळ विभागाने करडी नजर ठेवली आहे. आरोस, न्हावेलीमार्गे होणाऱया छुप्या दारू वाहतुकीबाबत पक्की खबर मिळाल्यामुळे कुडाळचे प्रभारी निरीक्षक अमित पाडळकर यांनी गस्त वाढविली होती. सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान सावंतवाडी वेगुर्ला हमरस्त्यावरील तळवडे बाजार येथे एमएच-३१ झेड, ५६८५ क्रमांकाची सुझुकी कार आली असता कारला थांबण्याचा इशारा करण्यात आला. मात्र कारचालक धनंजय मनोहर मयेकर (३७, रा. न्हावेली- रेवटेवाडी) याने कार त्याच गतीने पुढे नेली. त्यामुळे संबंधिताना संशय आला. कारच पाठलाग करून तळवडे बाजार येथे कार थांबऊन चेक केली असता कारमध्ये नॅशनल ब्रॅण्डी गोवा बनावटीच्या दारुचे ३६ बॅक्स सापडून आले. त्याची एकूण किंमत एक लाख १५ हजार २०० रु. व सुझुकी कार ८० हजार रु. मिळून एक लाख ८५ हजार २०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितावर मुंबई दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कच्या विभागीय उपआयुक्त संगिता दरेकर व संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार व जिल्हा अधीक्षक प्रदीप वाळूंजकर यांच्या मार्गदर्शनाखली कुडाळचे प्रभारी निरीक्षक राजा पाडाळकर, दुय्यम निरीक्षक संजय साळवे, जवान प्रसाद माळी, जवान वाहन चालक हेमंत वस्त यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक साळवे करीत आहेत.

महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची धडक

E-mail Print PDF
मालवण - वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अचानक सुरू केलेले भारनियमन, भरमसाट वीज बिले, वीज कर्मचार्‍यांची वानवा अशा विविध वीज समस्यांनी मालवणवासीय त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या संतापाची दखल घेत सोमवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी महावितरण कार्यालयावर धडक देत अधिकार्‍यांना जाब विचारला. अशोक सावंत व सुदेश आचरेकर यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी दूरध्वनीद्धारे संपर्क साधत, त्यांना खडेबोल सुनावले. दिवाळीपूर्वी वीज यंत्रणा सुरळीत न झाल्यास स्वाभिमान पक्ष जिल्हाभर तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशारा दिला. यावेळी वरिष्ठ अधिकार्‍यांकडून भारनियमन बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
मालवण तालुक्यात वीज समस्यांचा प्रश्‍न गंभीर बनल्याने स्वाभिमान पक्षाचे   शेकडो कार्यकर्ते व नागरिकांनी वीज अधिकार्‍यांना जाब विचारला. स्वाभिमानचे  अशोक सावंत, बाबा परब, बाळू कोळंबकर, महेश  जावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, नगरसेवक मंदार केणी,  दीपक पाटकर, जगदीश गावकर, ममता वराडकर, मोहन वराडकर,सभापती मनीषा वराडकर, उपसभापती अशोक बागवे,  राजू बिडये, अभय कदम आदी व इतर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
अशोक सावंत म्हणाले, मालवण सारख्या पर्यटन तालुक्यात वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने व्यावसायिक व व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. आता दिवाळी सण जवळ आला असताना अचानक भारनियमन सुरू झाल्याने या त्रासात आणखी भर पडली आहे. अचानक कमी व उच्च दाबाने  वीज पुरवठा होत असल्याने  अनेक ग्राहकांची विद्युत उपकरण निकामी झाली आहेत. तर तालुक्यात बर्‍याच ग्राहकांचे वीज मीटर खराब झाले असताना ते बदलण्याऐवजी चुकीच्या रीडिंगने भरमसाठ बिले काढण्यात येत असल्याने ग्राहकांना नाहक  आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे फॉल्टी मीटर त्वरित बदलून द्यावेत अशी मागणी   सावंत यांनी केली.
वीज खंडित झाल्यावर थेट कुडाळ लाईनवरून लाईट गेल्याची कारणे कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येतात. त्यामुळे ही वीज लाईन नवीन अथवा भूमिगत करावी. अतिरिक्त वीज कर्मचारी नेमावेत. मालवण वीज कार्यालयात रिक्त  जागी कायमस्वरूपी सक्षम अधिकारी द्यावा, आदी मागण्या या पदाधिकार्‍यांनी केल्या.

मेरीटाईम बोर्डाच्या अनधिकृत स्टॉल हटाव मोहिमेने व्यावसायिकांची धांदल

E-mail Print PDF
मालवण (प्रतिनिधी) - मालवण बंदरजेटी येथील अनधिकृत स्टॉल हटविण्याची कार्यवाही रविवारी मेरीटाईम बोर्डाच्यावतीने सुरू करण्यात आली. यात जेटी परिसरात व्यावसायिकांनी उभे केलेले अनेक स्टॉल हटविण्यात आले. अचानक राबविलेल्या या मोहिमेमुळे व्यावसायिकांची एकच धांदल उडाली. संबंधित व्यावसायिकांनी अधिकृत स्टॉल लावण्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी केली. त्यानंतर बंदर विभागाने दोन तासानंतर कारवाईची मोहीम थांबविली.
बंदरजेटी येथील बंदर विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेवर अनेक पर्यटन व्यावसायिकांनी अनधिकृतरीत्या स्टॉल उभारले होते. यात काहींनी तर कॉंक्रिट टाकून त्यावर लोखंडी पाईप टाकून स्टॉल उभारले आहेत. याची माहिती मिळताच बंदर विभागाच्यावतीने रविवारी सकाळपासून अनधिकृत स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली. अचानक सुरू केलेल्या या मोहिमेमुळे स्टॉलधारकांची एकच धांदल उडाली. यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संबंधित स्टॉलधारकांनी प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांची भेट घेत अधिकृत परवानगी घेण्यासाठी आठ दिवसांची मुदत द्यावी अशी मागणी केली. त्यानुसार श्री. तोपणो यांनी ही मागणी मान्य करत अनधिकृत स्टॉल हटविण्याची मोहीम थांबविली. बंदर जेटी परिसरात करण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी बंदर विभागाने आठ दिवसांची मुदत दिली आहे. अधिकृत परवानगी घेतल्याशिवाय कोणालाही स्टॉल उभारता येणार नसल्याचेही बंदर विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. आठ दिवसात अतिक्रमणे न हटविल्यास बंदर विभागाच्यावतीने सर्व अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रादेशिक बंदर अधिकारी अजित तोपणो यांच्या मार्गदर्शनाखाली बंदर निरीक्षक शेखर वेंगुर्लेकर, अमोल ताम्हणकर, सुषमा कुमठेकर, अनंत गोसावी, आर. जे. पाटील, विश्राम  घाडी, तुळाजी मस्के, साहेबराव आवळे, बंदर विभागातील कर्मचारी यांच्या पथकाने ही कारवाई केली. बंदर विभागाच्या कर्मचार्‍यांनी अनधिकृत बांधकाम केलेल्या तीन स्टॉलधारकांना स्वत:हून बांधकाम हटविण्यास सांगितले. त्यानुसार दोन स्टॉलधारकांनी बांधकाम हटविण्यास सुरुवात केली होती.
या घटनेची  माहिती  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकार्‍यांना मिळताच  पक्षाचे अशोक सावंत, बाबा परब, योगेश तोडणकर, भाई मांजरेकर, गणेश तोडणकर, दाजी सावजी, छोटू सावजी, बाबू तोडणकर, जॉनी फर्नांडिस यांनी बंदर जेटी येथे दाखल होत प्रादेशिक बंदर अधिकारी श्री. तोपणो यांच्याशी चर्चा केली. किनारपट्टीवरील स्टॉलधारकांनी बांधकाम करताना बंदर विभागाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामे हटविण्याची कारवाई करावी लागले असे बंदर अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या भाजपच्या अन्य पदाधिकार्‍यांनी बंदर जेटी येथे भेट देत बंदर विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व संबंधित स्टॉलधारक यांनी आठ दिवसांची मुदत मिळावी यासाठी बंदर विभागाच्या अधिकारी सुषमा कुमठेकर यांना निवेदन सादर केले.

दाम्पत्याची गळफासने आत्महत्या

E-mail Print PDF
मालवण - मसुरे-डांगमोडे येथील संतोष गंगाराम ठाकूर (३८) यांनी आपली गर्भवती पत्नी सौ. सानवी (२७) हिच्यासह राहत्या घरात लाकडी बाराला दोरीने गळाफास घेऊन आत्महत्या केली. मसुरे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. मृतदेह मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या शवागृहात ठेवले आहेत. पती-पत्नीने एकत्रित गळफास घेऊन आत्महत्या करण्याची मसुरेतील ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे गाव सुन्न झाला आहे.
शुक्रवारी संतोष हा पत्नी तीन महिन्यांची गर्भवती असल्याने तपासणीसाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात गेला होता.  त्या ठिकाणी दोघांचीही रक्त तपासणी केल्यानंतर सायंकाळी ते आपल्या डांगमोडे येथील घरी आले. नेहमीप्रमाणे सकाळी उठणारा काका खोलीबाहेर न आल्याने संतोष याचा पुतण्या त्यांना पाहण्यासाठी खोलीत गेला असता ही घटना समोर आली. संतोष याच्या खिशात पोलिसांना चिठ्ठी सापडून आली आहे.
आमच्या आत्महत्येस कुणासही जबाबदार धरू नये. आत्महत्येचे कारण टेबलवर असलेल्या डॉक्टरांच्या फाईलमध्ये पाहिल्यानंतर समजेल, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत होता. दरम्यान, वैद्यकीय रिपोर्ट पोलिसांनी पाहिले असता यामध्ये दोघांनाही दुर्धर आजार असल्याचे दिसून आले. कदाचित या नैराश्येतूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त होत आहे.संतोष ठाकूर याचे शिक्षण मसुरे येथील बागवे हायस्कूल येथे झाले होते. वेल्डींगचे काम शिकल्यानंतर तो गावातीलच एका फॅब्रिकेशनच्या दुकानात वेल्डींगचे काम करायचा. शांत व मनमिळावू स्वभावाचा संतोष गावातील सर्व कार्यक्रमात सहभागी व्हायचा. येथील नवतरूण मित्रमंडळाच्या सर्व कार्यक्रमांना उत्साहाने भाग घ्यायचा. फेब्रुवारी २०१७ मध्ये त्याचा विवाह झाला होता. संतोष याच्या पश्‍चात वडील, दोन भाऊ, भावजय, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.

आम्ही पक्ष काढला, केसरकरानी मित्रमंडळ काढून दाखवावे : निलेश राणे

E-mail Print PDF
सावंतवाडी - आगामी विधानसभा निवडणुकीत येथील मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा आमदार असणार आहे. दीपक केसरकर यांना घरी बसविणार आहोत, असा दावा करीत आम्ही पक्ष काढला, पालकमंत्री केसरकरांनी फक्त एक मित्रमंडळ काढून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नीलेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिले.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राणे यांनी येथे भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी संजू परब, मंदार नार्वेकर, दिलीप भालेकर, राजू बेग, पंकज पेडणेकर, सुधीर आडिवरेकर, पंढरीनाथ राऊळ, प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.
राणे म्हणाले, ‘‘आगामी काळात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज मी कणकवली, मालवण आणि सावंतवाडी याठिकाणी भेट दिली. या दौर्‍यात जिल्ह्यातील २८ ठिकाणी समर्थ विकास पॅनेलचे सरपंच बसले आहेत. सावंतवाडी तालुक्यात सहापैकी पाच सरपंच बिनविरोध झाले आहेत. यावरून पुन्हा एकदा जिल्ह्यात राणेंचीच ताकद आहे. आणि राणेंना कोणीच हरवू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे.’’
राणेंवर टीका केली, की प्रसिद्धी मिळते. विरोधकांनी कितीही टीका केली, तरी उत्तर देणार नाही, अशी भूमिका आम्ही घेतली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींत समर्थ विकास पॅनेलचे सरपंच बसणार आहेत, असा दावा राणे यांनी केला. येणार्‍या काळात आमदार आणि खासदार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे असणार आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘राणेंच्या विरोधात बोलले की प्रसिद्धी मिळते. आणि ती कात्रणे ‘मातोश्री’वर दाखविली, की शाबासकी मिळते, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने केसरकर टीका करीत आहेत.’’ भाजपने राणेंना नाकारल्याने त्यांना पक्ष काढावा लागला, अशी टीका केसरकर यांनी केली होती. त्याचा समाचार राणे यांनी घेतला. ते म्हणाले, ‘‘आम्हाला भाजपने नाकारले हे विचारण्यासाठी केसरकर हे अमित शहांकडे कधी गेले होते? ते ‘मातोश्री’वर मुश्किलीने पोचतात, ते शहांना काय भेटतील? राणेंनी पक्ष काढला, केसरकर यांनी एखादे मित्रमंडळ काढून दाखवावे.’’
या वेळी राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘राऊत यांना खासदारकीच्या काळात काहीच जमले नाही. माझ्या काळात जी कामे झाली, ती कामे आपण केली म्हणून सांगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मात्र, नव्याने कोणताही उद्योग अथवा कामे त्यांना आणले शक्य झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे.’’

Page 9 of 375