Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

श्री देव माऊलीच्या जत्रोत्सवाची तयारी सुरु

E-mail Print PDF
सावंतवाडी - सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीचा प्रसिद्ध जत्रोत्सव येत्या ५ नोव्हेंबरला होत आहे. या जत्रोत्सवासाठी भाविकांची होणारी गर्दी व वाहनांची संख्या लक्षात घेता पार्किंग संदर्भात येथील पोलिसांकडून मंदिर परीसराची व मंदिराकडे जाणार्‍या रस्त्याची पाहणी करण्यात आली.
लोटांगणाची जत्रा म्हणून सोनुर्ली माऊली देवीचा वार्षिक जत्रोत्सव प्रसिद्ध आहे. दक्षिण कोकणचे प्रति पंढरपूर म्हणूनही ख्याती आहे. जत्रोत्सवाच्या तयारीला कोजागरी पौर्णिमेपासून गावकरी मंडळी लागली आहेत. मंदिर परिसर साफसफाईपासून इतर आवश्यक गोष्टीसाठी नियोजन झाले आहे.
पोलिस प्रशासनानेही भाविकांची गर्दी व वाहतुक कोंडीबाबत नियोजन केले असून पोलिस निरीक्षक सुनिल धनावडे यांच्यासह कर्मचार्‍यांकडून मंदिर परिसर व आजूबाजूच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. दरवर्षी योग्य नियोजन करूनही रात्री उशिरा वाहतुक कोंडीची समस्या उद्भवते त्याकरिता यावर उपाय काढण्यासाठी धनावडे यांनी स्वत: मंदिरास भेट देऊन गावकर्‍यांशी चर्चा केली.
माऊली मंदिराकडे जाण्यासाठी न्हावेली मार्गे सोनुर्ली, निरवडे मार्गे सोनुर्ली व वेत्ये मार्गे सोनुर्ली अशा तीन ठिकाणावरून मार्ग आहेत; मात्र तिनही मार्ग अरूंद असल्याने व आजूबाजूला जागा नसल्याने समोरासमोर दोन वाहने आल्यास मोठी समस्या निर्माण होते. गेल्यावर्षी पोलिस निरिक्षक शंकर पाटील यांनी योग्य नियोजन केल्यामुळे काही अंशी वाहतूक कोंडीवर लगाम लावला होता. न्हावेली मार्गे सोनुर्ली मंदिरकडे जाणार्‍या रस्त्यावरून फक्त एसटी बसेस सोडता इतर चार चाकी वाहनावर बंदी घातली पाहिजे. इतर मॅजिक रिक्षा व मोटारींना निरवडे मार्गे सोनुर्ली असे पाठविले पाहीजे जेणेकरून मधल्या रस्त्यावर होणारी वाहतुक कोंडी यामुळे टळू शकते व निरवडे व वेत्ये रस्त्यावर जादा पोलिस कर्मचारी तैनात करणे आवश्यक आहे.
पार्किंगबाबत यावर्षी प्रश्न निर्माण होणार असून गेल्यावर्षी ज्या मोकळ्या जागेतून वाहतुक पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती त्या जागा मालकाने यावर्षी त्याठिकाणी काजू लावल्याने पार्किंगचा प्रश्न जटील बनला आहे. त्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करणे सोईचे होणार आहे. पार्किंगसाठी जागा उपलब्ध झाल्यास वाहतुक कोंडीचा प्रश्‍न सोडवू शकतो, असे धनावडे म्हणाले.
मंदिराकडे जाणारे अरुंद रस्ते व होणारी वाहतूक कोंडी हा प्रश्‍न जटिल आहे. तीनही रस्त्यांच्या बाजूंनी मोठी पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नसल्याने वाहतूक कोंडी होणार आहे. ती होऊ नये यासाठी आमचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी गावकर्‍यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक धनावडे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील ३०२ कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत; आंदोलनाचा इशारा

E-mail Print PDF
कुडाळ - जिल्ह्यातील महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे जूनपासूनचे सुमारे १ कोटी ४५ लाख रु. वेतन थकीत आहे. महावितरणने ऑगस्टमध्ये ६० लाखांचा खोटा चेक दाखवून या कामगारांची दिशाभूल केली, असा आरोप कामगारांचा आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारपासून महावितरणचे जिल्ह्यातील ३०२ कंत्राटी कामगार कामबंद  आंदोलन  छेडणार, असा इशारा कंत्राटी कामगार संघटनेने महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील यांना बुधवारी चर्चेअंती दिला.
महावितरणच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थकीत राहिल्याने या कामगारांनी ऑगस्टमध्ये कामबंद आंदोलन छेडले होते. यावेळी महावितरणने ६० लाख रुपयांचा चेक काढल्याचे कामगारांना दाखवले होते. मात्र, प्रत्यक्षात ३२ लाखच खात्यावर जमा करण्यात आले. याचा जाब कंत्राटी कामगारांनी अधीक्षक अभियंता यांना विचारला. यावेळी  कामगारांना मेहनत घेऊन आपल्या वेतनासाठी प्रत्येक सणाला महावितरणकडे भीक मागावी लागते. जिल्ह्यात अनेक कंत्राटी कामगारांना सेवेत घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना वर्कऑर्डर दिली जात नाही. महावितरणच्या वेतनाबाबतच्या या भूमिकेमुळे कामगार तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. यावेळी संघटनेचे अजय गावडे, नगरसेविका सौ. संध्या तेरसे व जिल्ह्यातील कंत्राटी कामगार उपस्थित होते.

संपामुळे सिंधुदुर्ग एसटीचे सव्वा कोटींचे नुकसान

E-mail Print PDF
कणकवली - सातव्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी महाराष्ट्र  एसटी कामगार संघटना आणि इंटक या प्रमुख संघटनांसह सहभागी संघटनांनी केलेल्या संपामुळे सिंधुदुर्ग एसटी विभागाचे सुमारे सव्वाकोटीचे नुकसान झाले आहे.
चार दिवस पूर्णपणे एसटीचा संप झाला. तर पाचव्या दिवशी संप मिटल्याने सकाळपासून गाड्या सुरू झाल्या तरी अनेक फेर्‍या कर्मचारी पोहोचेपर्यंत उशीर झाल्याने रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे या पाच दिवसात सिंधुदुर्ग एसटी विभागातील १४९५ र्फेया म्हणजेच ३ लाख ८४ हजार ३९३ कि.मी.चा प्रवास रद्द झाला. सिंधुदुर्ग एसटी विभागाला दर दिवशी २९ ते ३० लाखाचे उत्पन्न मिळते. त्यामुळे संप कालावधीत या विभागाचे मोठे नुकसान झाले. १७ ऑक्टोबरला सिंधुदुर्ग विभागाच्या २९५, १८ ऑक्टोबरला ३५६, १९ ऑक्टो. ३५७, २० ऑक्टो. ३५७, २१ ऑक्टोबरला १३० र्फेया अशा मिळून १४९५ र्फेया रद्द कराव्या लागल्या होत्या. संप कालावधीत एकही बस न सुटल्याने सर्वसामान्य जनतेचे मोठे हाल झाले. त्यामुळे खाजगी वाहनचालकांनी त्याचा फायदा घेतला. अनेक मार्गावरील सहासीटर, खाजगी बस चालकांनी दुप्पट, तिप्पट दर लावून भाडे आकारणी केली. त्यामुळे एसटी बसेसचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे.

पर्यटकांकडून हॉटेल मालकास मारहाण; पर्यटकांनाही चोप

E-mail Print PDF
कणकवली - गुजरातमधून गोवा येथे पर्यटनासाठी लक्झरी बसने जात असलेल्या पर्यटकांपैकी सात ते आठ पुरुष व महिला पर्यटकांनी वागदे-गोपुरी आश्रमानजीकच्या हॉटेलचालकासह दोघांना बेदम मारहाण केली. हॉटेलमध्ये दारू पिण्यास विरोध केल्याच्या रागातून पर्यटकांनी मारहाण केल्याचे हॉटेल मालकाने तक्रारीत म्हटले आहे. स्थानिक हॉटेल मालकाला झालेल्या मारहाणीमुळे तेथे जमा झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी संतप्त होऊन मारहाण करणार्‌या पर्यटकांनाही चोपले. यात पाच पर्यटकही जखमी झाले आहेत. दरम्यान, गंभीर जखमी झालेले हॉटेल मालक राजाराम ऊर्फ सचिन भागोजी ताटे (वय ३५) आणि विजय अंकुश पांगम (३४, दोन्ही रा. वागदे-सावरवाडी) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर कणकवलीत प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा-बांबोळी येथे हलविण्यात आले आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ३.३० वा. च्या सुमारास घडली.
गुजरातच्या भडोज-भावनगर परिसरातील २९ पर्यटक लक्झरी बसने पर्यटनासाठी गोवा येथे निघाले होते. यामध्ये २२ मोठी माणसे, तर ७ लहान मुले आहेत. सोमवारी सायंकाळी ३.३० वा. च्या सुमारास त्यांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वागदे दूध डेअरीसमोर लक्झरी थांबवली.  महिला पर्यटकांनी जेवण बनविण्याचे सामान गाडीतून बाहेर काढून जेवण बनविण्यास सुरुवात केली. दरम्यान, काही पुरुष पर्यटक हे तेथूनच शंभर फुटांवर असलेल्या पेट्रोलपंपासमोरील छोट्या हॉटेलात आले आणि त्यांनी थम्सअप घेतले व तेथील ग्लास घेऊन पीत बसले होते. मात्र, हॉटेल मालक सचिन ताटे यांना दारूचा वास आल्याने त्यांनी येथे दारू पिऊ नका, आम्ही कुणाला येथे दारू पिण्यास देत नाही, असे सांगितले. त्यानंतर ते पर्यटक तेथून जाण्यास निघाले असता ताटे यांनी त्यांना ग्लासेस धुवून ठेवण्यास सांगितले. ती पर्यटकांनी धुतलीही; मात्र त्या दरम्यान दोघांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. पर्यटक महिलाही  झारे, बादल्या घेऊन त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनीही हॉटेल मालक व कामगाराला मारहाण करण्यास सुरुवात केली.

कणकवलीतील रस्त्यात खड्डे बुजवण्याचे काम मालंडकर मित्रमंडळाकडून स्वखर्चाने

E-mail Print PDF
कणकवली - शहरातील टेंबवाडी म्हाळसाबाई भांडारकर ट्रस्ट हिंद छात्रालयासमोरील रस्ता हा शहरातील मुख्य रस्त्यापैकी एक. पण तो सध्या एवढा खराब झाला आहे, की त्यावरून वाहतूक करणेही कठीण. त्यामुळेच वैभव मालंडकर मित्रमंडळातर्फे तो स्वखर्चातून बुजविण्याचे काम सध्या करण्यात येत आहे.
दरम्यान, हा रस्ता महामार्गाला जोडणारा असून प्रशासन वा लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे स्वतः व येथील नागरिकांच्या पुढाकारातून या रस्त्याचे काम हाती घेतल्याचे मालंडकर यांनी सांगितले. गेली अनेक वर्षे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले आहे. या भागात मोठी वस्ती असून पादचारी तसेच वाहनचालकांना या रस्त्यातून येणे-जाणे जोखमीचे होत आहे. काही दिवसांपूर्वी एक वाहन-चालक खड्डयांचा अंदाज न आल्याने तो पडून जखमी झाला. नंतर या रस्त्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मात्र, संबंधित प्रशासनाची वाट न बघता मालंडकर मित्रमंडळाने रस्ता खड्डेमुक्त करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी अंकुश सावंत, सत्यवान राणे, नीलेश पवार, प्रथमेश परब, सुरज सुतार, दिनेश मांडवकर, नयन सुतार, बबलू पवार, परशुराम कट्टीमनी, अजित काणेकर, नागेश पुजारी, सोमनाथ पारगावकर, नयन यादव आदींनी मेहनत घेतली.

सिंधुदुर्गातील पस्तीसशे डंपर व्यावसायिक अडचणीत

E-mail Print PDF
सावंतवाडी - गोव्यात खाण व्यवसायातील वाहतूकदार संघटनांनी स्थानिक वाहनांनाच काम देण्याची अट लावून धरली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सरकारकडून हिरवा कंदील मिळाला असल्याने दरवर्षी गोव्यात व्यवसाय करणार्‍या सिंधुदुर्गातील सुमारे साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.
सिंधुदुर्गात साधारण सात-आठ वर्षांपूर्वी कळणे मायनिंगसह इतर प्रकल्प सुरू झाले. यामुळे खनिज वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रकची, डंपरची गरज भासू लागली. जिल्ह्यातील अनेकांनी लाखो रुपयांचे कर्ज करून डंपर खरेदी केले; मात्र पुढच्या काळात काही खाणी बंद झाल्या, तर काही खाणींमध्ये खनिज वाहतुकीचे प्रमाण कमी झाले. या तुलनेत डंपरची संख्या जास्त असल्याने त्यांनी काम कुठे मिळवायचे हा प्रश्‍न निर्माण झाला होता. गोव्यातील खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार डंपर गोव्यात वाहतुकीसाठी जोडले गेले.
जिल्ह्यातील व्यावसायिकांनी डंपर तेथील ठेकेदाराकडे सुपूर्द करायचे. त्या बदल्यात ठराविक रक्कम दिली जाणार असे डील यामागे असते.यावर्षी गोव्यातील खाण व्यवसाय १ ऑक्टोबरपासून सुरु झाला; मात्र तेथील उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनेने दर वाढवून मिळावा या मागणीसाठी असहकार पुकारला आहे. त्यामुळे अद्याप खाणीबाहेरील बंदरापर्यंतची वाहतूक सुरु झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने याच्या वाटाघाटी सुरू आहेत. यातच नुकतीच उत्तर आणि दक्षिण गोवा ट्रकमालक संघटनांचे प्रतिनिधी, खाण व्यावसायिक यांची बैठक मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या उपस्थितीत झाली. यात संघटनांनी स्थानिक वाहन मालकांनाच काम देण्याची अट घातली. ज्या मार्गावर खनिज वाहतूक चालते त्यावरील रहिवासी वाहनधारकांचीच वाहने वाहतुकीसाठी वापरावीत ही संघटनेची अट या बैठकीत मान्य करण्यात आली. यामुळे सिंधुदुर्गातील साडेतीन हजार डंपर व्यावसायिकांवर रोजगार गमावण्याची वेळ आली आहे.
डंपर व्यवसायातून महिन्याला लाखोंची कमाई होत असल्याचा भुलभुलैय्या मध्यंतरी निर्माण झाला. काहींच्या मते तो जाणीवपूर्वक केला गेला. त्यामुळे २०११ च्या हंगामापूर्वी कळणे-रेडी परिसरासह जिल्हाभरातून शेकडो जणांनी डंपर खरेदीला सुरवात केली. आश्‍चर्य म्हणजे एरवी प्रामाणिक शेतकर्‍याला पीक कर्ज देण्यासाठी अनेक अटी-शर्थी घालून शेतकर्‍याला हैराण करणार्‍या बँकांनीही आपली तिजोरी डंपर कर्जासाठी खुली केली. वर्षभरातच जिल्ह्यात शेकडो डंपर रस्त्यावर आले.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ओमनीच्या काचा व हेडलाईट फोडण्याची घटना

E-mail Print PDF
कुडाळ - मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब याच्यासह आठजणांनी भोईचे केरवडेचे उपसरपंच व राणे समर्थक राजन उर्फ राजू महादेव मल्हार यांच्या मारुती ओमनीचा पाठलाग करून अडवून लोखंडी शिगेनी ओमनीच्या काचा व हेडलाईट फोडल्याची घटना भोईचे केरवडे-मळेवाडी येथे रविवारी मध्यरात्री १.२५ च्या सुमारास घडली. याबाबत मल्हार यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर राजकीय वादातून ही घटना घडली आहे. या घटनेने निवडणुकीला गालबोट लागले.
दरम्यान, कुडाळ पोलिसांनी संशयित धीरज परब (३३, रा. पिंगुळी) याच्यासह विवेक विजयानंद परब (२६), विनित विजयानंद परब (२७), सुशांत सूर्यकांत परब (३२), संतोष मधुकर परब (३१), सुबोध सूर्यकांत परब (२५), सिद्धेश नारायण परब (२५) व सचिन राघो ठाकुर (३८, सर्व रा. भोईचे केरवडे) यांना सोमवारी दुपारी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून अटक केली. नंतर त्यांची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली.
मल्हार यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, काल रात्री ते आपल्या ताब्यातील मारुती ओमनीने कुडाळहून भोईचे केरवडे येथे जात होते. त्यांच्यासोबत गावातील बाबू उर्फ बाळकृष्ण सावंत होते. भोईचे केरवडे-जाधववाडी मोरीवर पावसामुळे पुराचे पाणी आले होते. त्यामुळे तेथे घरी जाण्यासाठी गावातील श्रावण अशोक बांदेकर व सचिन गुणाजी परब थांबले होते. त्यांना घरी सोडण्यासाठी ते आपल्या ओमनीमध्ये घेऊन मांडकुली-तुळसुली मार्गे जाण्यास निघाले. त्याचवेळी त्यांच्या ओमनीला सचिन ठाकुर हा मारुती ओमनी घेऊन ओव्हरटेक करून गेला.
तेथून दोन ते तीन किमी अंतरावर मल्हार ओमनीने गेले असता, समोरून एक स्विफ्ट डिझायर कार आली व ती त्यांच्या ओमनीच्या समोर आणून पुढे निघून गेली. आपल्या ओमनीतील सचिन परब व श्रावण बांदेकर यांना बोडदेवाडी येथे सोडून ते घरी जाण्यासाठी ओमनी वळवून निघत असताना सुबोध परब व सिद्धेश परब हे मोटारसायकलने आले आणि सिद्धेश याने आपल्या हातातील लोखंडी शिगेने ओमनीची समोरील काच फोडली. त्यानंतर धीरज परब, विवेक परब, विनित परब, सुशांत परब व संतोष परब हे स्विफ्ट डिझायर व दुचाकीने तेथे आले. त्यांनी लोखंडी शिगेने ओमनीच्या सर्व बाजूच्या काचा फोडल्या. तसेच ओमनीचा पत्रा व हेडलाईट फोडून नुकसान केले. ‘तू उद्या ग्रामपंचायतीकडे दिसलास तर याद राख’, अशी धमकीही त्यांना दिली.
या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १४७, १४३, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६, ३४१, ४२७ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) १३५ प्रमाणे धीरज परब याच्यासह आठहीजणांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या सर्वांची सायंकाळी जामिनावर मुक्तता करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डी. जी. बाकारे करीत आहेत.
१७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी प्रक्रिया असल्याने संशयित धीरज परब, विवेक परब व विनित परब या तिघांवर सीपीआर १५१ प्रमाणे कारवाई करण्यग्नात येणार आहे, असे बाकारे यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात समर्थ विकास पॅनेलकडे १५३ तर शिवसेनेकडे ७८ ग्रामपंचायती

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी - नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व राखले. त्यांनी २३८ ग्रामपंचायतींवर दावा केला असला तरी जवळपास १५३ ठिकाणी त्यांचे सरपंच बसले आहेत. त्यापाठोपाठ शिवसेनेने जागा मिळविल्या. भाजपनेही चांगली मुसंडी मारली. कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. मनसे आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एक जागा मिळवून अस्तित्व दाखवून दिले.
जिल्ह्यात ३२५ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. यातील २९ ठिकाणी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ४६ सरपंच आणि ९२६ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. आज निकालादिवशी अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्के बसले. राणेंच्या स्वाभिमान पक्षाने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व मिळविले. शिवसेना आणि भाजपनेही बर्‍यापैकी ताकद दाखविली. अनेक ठिकाणी पक्षीय राजकारणापेक्षा स्थानिक मुद्दे प्रभावशाली ठरले; मात्र राजकीय नेत्यांनी निकालानंतर त्याला पक्षीय लेबल लावले.
उशिरापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात समर्थ विकासला १५३, शिवसेनेला ७८, भाजपला ४०, युतीला २, गावपॅनेलकडे ४२, अपक्ष ३, तर राष्ट्रवादी व मनसेकडे प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचे नेतृत्व आले. कुडाळ तालुक्यातील सरंबळ ग्रामपंचायतीचा निकाल उशिरापर्यंत उपलब्ध न झाल्याने ३२४ ठिकाणचे हे चित्र पुढे आले. असे असले तरी सर्वच पक्षांनी यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींवर दावे केले आहेत. समर्थ विकासला कणकवली, मालवण आणि सावंतवाडीत चांगले यश मिळाले. कुडाळ आणि देवगडमध्येही त्यांनी ताकद दाखविली. शिवसेनेसाठी दोडामार्गमध्ये चांगले चित्र असून मालवणातही त्यांची ताकद दिसली. सावंतवाडीत भाजपने जोरदार मुसंडी मारली.

निधीअभावी कृषी योजनांना कात्री - रणजित देसाई

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेचा यावर्षीचा अर्थसंकल्प कमी निधीचा झाल्याने कृषी विभागाच्या योजनांना कात्री लागली आहे; मात्र आगामी अर्थसंकल्पीय बैठकीत कृषी विभागाला जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी मागणी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कृषी सभापती रणजीत देसाई यांनी सभेत दिली.
कृषी समितीची मासिक सर्वसाधारण सभा कृषी सभापती देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील बॅ. नाथ पै समिती सभागृहात झाली. या वेळी सदस्य वर्षा पवार, संजय नकाशे, अनुप्रिती खोचरे, अमरसेन सावंत, गणेश राणे, समिती सचिव तथा कृषी विकास अधिकारी एस. ए. चव्हाण यांच्यासह अधिकारी खातेप्रमुख उपस्थित होते.
जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची तरतूद यावर्षी कमी झाल्याने कृषी विभागाच्या बजेटला कात्री लागली आहे. परिणामी कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणार्‍या योजनाच्या तरतुदीत मर्यादा आली आहे असे सांगत आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषदेच्या सुधारित बजेटमध्ये वाढीव निधी मिळावा अशी मागणी करणार असल्याचे सभापती रणजित देसाई यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. ती संपताच जिल्ह्यातील लाभार्थींना ग्रासकटर, डिझेल इंजिन, औषध फवारणी पंप, ताडपत्री, भात कापणी यंत्र आदी साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकारी एस. ए. चव्हाण यांनी सभेत दिली. भातकापणी यंत्राची किंमत १ लाख ३५ हजार एवढी असून हे यंत्र शेतीसमूह गटांना वितरित करण्यात येणार अल्याचेही या वेळी कृषी अधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Page 8 of 375