Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

देवगड हापूसला पेटंट मानांकन मिळण्याच्या अडचणाीत वाढ

E-mail Print PDF
देवगड - देवगड हापूसला पेटंट (जी. आय.) मानांकन मिळण्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. देवगड हापूसचा दर्जा, वैशिष्टे व गुणवत्ता याचे वेगळेपण सांगणार्‍या अहवालावर सुनावणी झाल्यानंतर मानांकन मिळण्याच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला रत्नागिरी येथील एका बागायतदाराने हरकत घेतल्यामुळे याबाबतचा निर्णय आता लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील आंबा बागायतदारांमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया असल्याची माहिती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार ऍड. अजित गोगटे यांनी आज जामसंडे येथे पत्रकार परिषदेत दिली.
संस्था कार्यालयात ऍड. गोगटे यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. या वेळी देवगड तालुका आंबा बागायतदार व व्यापारी संघाचे अध्यक्ष पु. ज. ओगले, उपाध्यक्ष डी. बी. बलवान, राजेंद्र शेट्ये, सदाशिव भुजबळ आदी उपस्थित होते.
श्री. गोगटे म्हणाले, निर्णयाच्या अंतिम टप्प्यात आलेल्या प्रस्तावाला हरकत घेतली गेल्यामुळे बागायतदार नाराज आहेत. देवगड आणि रत्नागिरी आंब्याला मिळणार्‍या जीआय’ मानांकनाला विरोध दर्शवला आहे. सर्व ठिकाणचा हापूस एकच असून, देवगड, रत्नागिरीसह अन्य ठिकाणी उत्पादित होणार्‍या हापूस आंब्यामध्ये काहीच फरक नाही, असा अजब कांगावा याचिकाकर्त्याने केला आहे. त्यामुळे देवगड हापूस’ आणि रत्नागिरी हापूस’ या दोन्ही आंब्यांना मान्य झालेल्या जी.आय. मानांकनाला परत खीळ बसली आहे. २००८ पासून प्रलंबित असलेल्या मानांकन प्रकरणामध्ये एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या अखेरच्या सुनावणीत देवगड व रत्नागिरी हापूसला स्वतंत्र मानांकन देण्याचे जीआय रजिस्ट्रीने मान्य केले होते. तसा अध्यादेश काढण्याबाबतची रितसर जाहिरात त्यांनी काढली होती. त्यानुसार २३ जूनला देवगडच्या अर्जाला प्रसिध्दी देण्यात आली. त्यानंतर याबाबत कोणाच्या काही हरकती असल्यास त्या पुढील चार महिन्यांत नोंदवायच्या होत्या, मात्र हरकतीची मुदत संपण्याच्या अखेरीसच रत्नागिरी येथील एका प्रगतिशील बागायतदाराने चेन्नई येथील मानांकन बोर्डाकडे आपली हरकत नोंदवल्याने ही प्रक्रिया थांबली आहे. हरकतीमध्ये त्यांनी रत्नागिरीबरोबरच देवगड हापूसच्या प्रस्तावालाही हरकत घेतल्याने येथील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. रत्नागिरी हापूस मानांकनाबाबत त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्यांनी रत्नागिरीपुरती हरकत नोंदवणे अपेक्षित होते; मात्र तसे न करता त्यांनी देवगड हापूसलाही हरकत घेतल्याने कोकणातील आंबा बागायतदारच अडचणीत सापडला आहे. हा कोकणातील बागायतदारांचा विश्‍वासघात असून, त्याचा बागायतदार निषेध व्यक्त करीत आहेत.
ते म्हणाले, कोकणातील सर्व आंबा एकाच ब्रँडखाली आणण्याच्या प्रयत्नाला येथून विरोध होता. कोकणपासून कर्नाटकपर्यंत सर्वच आंबा एकच असल्याचे म्हटल्यास देवगड हापूसचे वेगळेपण राहणार नाही. येथील शेतकर्‍यांच्या दृष्टीने मानांकन मिळणे महत्त्वाचे आहे. देवगड हापूसचे बाजारात प्रस्तापित नाव असल्यामुळे तसेच त्याच्या एकूणच गुणधर्माचा विचार करता देवगड हापूसला स्वतंत्र जीआय मानांकन मिळू शकते, ही बाब तज्ज्ञांसोबत झालेल्या चर्चेत पुढे आल्यानंतरच याबाबत पुढे पाऊल उचलण्यात आले होते. त्याला यश आले असताना आता हरकतीमुळे ते लांबणीवर पडले आहे.’’

नारायण राणे यांनी मंत्रीपद मिळणार नाही; दीपक केसरकर यांचा दावा

E-mail Print PDF
सावंतवाडी - नारायण राणे यांची मनी लॉंडरिंग प्रकरणात इडी’कडून चौकशी सुरू आहे. त्यामुळे त्यांना कुणी कितीही मंत्रिपद देण्यास इच्छुक असले; तरी ते त्यांना मिळणे शक्य नाही. न्यायालयाने त्यांच्याबाबतचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश इडीला दिले आहेत,’ असा दावा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य अभियानात गोवा-बांबुळीच्या इस्पितळाचा (गोमॅको) समावेश करण्यात येणार असल्याने एक डिसेंबरपूर्वी जिल्ह्यातील रुग्णांच्या मोफत आरोग्य उपचारांचा प्रश्‍न सुटणार आहे. त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही श्री. केसरकर यांनी केले.
जिल्हा दौर्‍यावर असलेल्या श्री. केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मागील पत्रकार परिषदेत ईश्‍वरी संकेत असल्यामुळे राणेंना मंत्रिपद मिळणार नाही असे वक्तव्य केले होते. याबाबत छेडले असता ते म्हणाले,मनी लॉंडरिंग प्रकरणात राणेंची इडीमार्फत चौकशी सुरू आहे. संबंधित अहवाल तत्काळ सादर करा असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तीन वेळा यावर सुनावणी झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे आरोप असलेल्या व्यक्तीला मंत्रिपद मिळणे कठीण आहे. भाजप हा चांगल्या लोकांचा पक्ष आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपची आतापर्यंतची वाटचाल आहे. त्यामुळे कोणी कितीही राणेंना मंत्रिपद देणार असे जाहीर केले असले; तरी कोर्टाने त्यांना हिरवा कंदील दाखविल्याशिवाय ते मंत्रिपद मिळवूच शकत नाहीत, हेच इश्‍वरी संकेत आहेत.’’
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, स्वबळावर निवडणुका लढविणार; तसे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यांबाबत श्री. केसरकर यांना विचारले असता आगामी काळात निवडणुका आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. त्या घटनेचा राणेंच्या मंत्रिपदाशी कोणताही संबंध नाही असा दावा त्यांनी केला.

कोकण रेल्वेतून दारू जप्त

E-mail Print PDF
कणकवली - कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‌या गोवा संपर्क क्रांती व कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये आढळलेल्या बेवारस बॅगमधून दारू जप्त करण्यात आली. रेल्वे पोलिसांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत कणकवली स्टेशन दरम्यान दोन्ही गाडयांमधून ही दारू जप्त करण्यात आली.
कोकण रेल्वेतून होत असलेली दारू वाहतूक रोखण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून धडक कारवाई सुरु करण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस उपनिरिक्षक मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल राजेश कांदळकर व भूषण कोचरेकर यांनी मंगळवारी केलेल्या कारवाईत मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणार्‌या गोवा संपर्क क्रांती व कोकण कन्या एक्सप्रेसमधून ही दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या बॅगामध्ये गोवा बनावटीच्या १८० मिलीच्या १९५ बॉटल तर  एक लिटरच्या १६ बॉटल आहेत. जप्त केलेली दारू रेल्वे पोलिसांकडून उत्पादन शुल्क विभागाच्या ताब्यात देण्यात आली.

टेम्पोचा भीषण अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प

E-mail Print PDF
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावर असलदे पियाळी पुलावर टेंपोचा भीषण अपघात झाला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रसंगावधनामुळे पियाळी नदीमध्ये टेंपो कोसळला नाही. ही घटना गुरूवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान घडली.
सातारा येथून देवगडकडे कुरियरचे साहित्य घेऊन निघालेला टेंपोंचा असलदे पियाळी पूलावर अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये पुलाचा संरक्षण कठडा तुठला आहे. यामध्ये टेंपो दुसर्‌याला वाहनाला धडकून थांबल्याने मोठा अनर्थ टळला. टेम्पो चालक किरण दत्तात्रय कदम,( वय २८ रा. वसंतगड) कराड व कोल्हापूर वरून देवगडच्या दिशेने जात होते. पुलावर अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. दीड तासानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

मुंबईत नोकरी करणार्‍या तरुणाची गावातील घरी आत्महत्या

E-mail Print PDF
देवगड - नोकरीनिमित्त मुंबईमध्ये रहात असलेल्या मोंड येथील केदार प्रकाश भिडे (२६) या तरुणाचा मृतदेह गावातील घरानजीकच्या विहिरीत आढळून आला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वा. सुमारास घडली. याबाबत देवगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मोंड-भिडेवाडी येथील केदार भिडे हा नोकरीनिमित्त मुंबई-डोंबिवली येथे आपल्या आत्याकडे राहत होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरीवर गेला होता. सायंकाळी तो कामावरून मुंबई येथील आपल्या घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळी मोंड येथील त्यांच्या घरी आत्याने फोन करून केदार गावी आला आहे का? अशी चौकशी केली. मात्र केदार हा गावी आला नव्हता. त्याचे वडील प्रकाश भिडे यांनी त्याची शोधाशोध केली असता घराच्या बाहेरील खुंटीस त्याची बॅग आढळून आली. त्या बॅगेत त्याचा डबा व मोबाईल होता. त्यामुळे केदार हा गावी आला असल्याचे वडिलांच्या लक्षात आले. वडील व नातेवाईकांनी शोध घेतला असता घरानजीक असलेल्या विहिरीजवळ त्याची चप्पल आणि चष्मा आढळून आला.
त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता केदारचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. याबाबत वडील प्रकाश भिडे यांनी देवगड पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक पोवार, राजन पाटील, शामराव कांबळे घटनास्थळी रवाना झाले. रात्री उशिरापर्यंत पोलिस पंचनामा सुरू होता. केदार याच्या पश्‍चात वडील, सावत्र आई व भाऊ असा परिवार आहे. केदार भिडे हा नुकताच दिवाळीसाठी गावी येऊन गेला होता.

शॉर्टसर्किटने ऑईल विक्री सेंटरला आग

E-mail Print PDF
वेंगुर्ले - शहरातील ऑईल सेंटर व स्पेअर पार्टच्या दुकानाला मंगळवारी दुपारी २.१५ वाजता वायरींगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या दुर्घटनेत जवळपास २३ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऑईल, डंपर, दुचाकीचे स्पेअर पार्टस, टायर आदी मुद्देमाल पूर्णतः खाक झाला. आग विझविण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. पालिकेचा अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर उर्वरित आग विझवण्यात यश आले.  तहसीलदार शरद गोसावी यांनी भेट देत नुकसानीची पाहणी केली.
वेंगुर्ले-राऊळवाडा येथे उदय गावडे यांच्या या दुकानात ऑईल, मोठ्या गाड्यांचे स्पेअर पार्टस, दुचाकी, चारचाकी गाड्यांचे टायर आदी मुद्देमाल होता. मंगळवारी दुपारी २.१५ वा. च्या  सुमारास ते दुकान बंद करून घरी गेले. दरम्यान,  दुकानात शॉर्टसर्किट झाले. नंतर आगीने रौद्र रूप धारण केले. तहसील कार्यालयातील प्रीतम वाडेकर तेथून जाणारे पपू तांडेल यांनी दुकानांमधून बाहेर पडणारा धूर पाहून त्यांनी शेजार्‌यांना याची कल्पना दिली.  
आगीत उदय गावडे यांच्या दुकानातील विविध कंपन्यांचे  सुमारे ७ लाख रुपये किमतीचे २ हजार ली. ऑईल, विविध कंपनीचे ६० टायर जळून ३ लाख ५० हजार,  १३ लाखांचे स्पेअर पार्टस, दोन कॉम्प्युटर, एक प्रिंटर आदी मिळून २३ लाख ५० हजार रुपयांचे एकूण नुकसान झाले.

विद्यमान सरकारकडून जनतेची घोर निराशा : सुनील तटकरे

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी - ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून सत्तेवर आलेले शिवसेना-भाजपचे सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. जनतेच्या पदरी घोर निराशा आली आहे. शेतकऱयांची कर्जमाफी म्हणजे भुलभुलैय्या असून शेतकऱयांच्या तोंडाला  सरकारने पाने पुसली आहेत. सरकारविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न सोडवणार आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून पर्याय निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या सोमवारी येथे झालेल्या मेळाव्यात बोलताना केले.
शेतकरी कर्जमाफीप्रमाणे मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी, अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. सिंधुदुर्गात पक्ष संघटना मजबूत करून पक्ष एक नंबरला आणणार असल्याचे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष संघटना बांधणी कार्यक्रमानिमित्त येथील शरद कृषी भवनमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद इंदुराव, आमदार निरंजन डावखरे, पक्ष निरीक्षक विलासराव माने, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, जिल्हाध्यक्ष व्हीक्टर डॉन्टस, युवक प्रदेश उपाध्यक्ष अबीद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, युवक जिल्हाध्यक्ष विनोद जाधव, जि. प. सदस्या, अनिषा दळवी, नंदकुमार घाटे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, अमित सामंत, बाळ कनयाळकर आदी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱयांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने १९९९ पासून २०१४ पर्यंत सत्तेमध्ये राहून जनतेची विकासकामे केली. मात्र गेल्या तीन वर्षांत शिवसेना-भाजपच्या युती सरकारने काहीच केलेले नाही. जनधन खात्यामध्ये १५ लाख रुपये जमा होतील, असे केंद्र सरकारने जाहीर केले. मात्र १५ रुपये सुद्धा खात्यात जमा झालेले नाहीत. शरद पवार कृषीमंत्री असेपर्यंत भाताला प्रतिक्विंटल १५०० रुपयेपर्यंत दर मिळाला. परंतु गेल्या तीन वर्षांत काहीच वाढ झाली नाही. आपण अर्थमंत्री असताना सिंधुदुर्ग जिल्हयाचा वार्षिक आराखडा नऊ कोटीवरून ९० कोटीवर नेला. कोकण रेल्वे मधु दंडवते यांनी आणली. परंतु त्यामध्ये शरद पवार यांचेही मोठे योगदान आहे. ते मुख्यमंत्री असताना कोकण रेल्वेसाठी भूसंपादन करून दिले होते, हे विसरता येणार नाही.

जलसंधारण विभाग स्वतंत्र करण्याबाबत अद्याप कार्यवाही नाही

E-mail Print PDF
सिंधुदुर्गनगरी - कृषी विभागाकडून जलसंधारण विभाग स्वतंत्र करण्याचा निर्णय होऊन चार महिने झाले, कृषी विभागाकडील १० हजार कर्मचार्‍यांनीही आपण या विभागाकडे जाण्यास तयार असल्याचे विकल्प सादर केले, पण अजुनही हा विभाग स्वतंत्र झालेला नाही.
या विभागासाठी स्वतंत्र मंत्री आहेत. पण प्रत्यक्षात विभागाचे काम स्वतंत्रपणे सुरु नसल्याने हा विभागच बारगळण्याची शक्यता आहे. जमिनीची सुपीकता वाढवणे, त्यासाठी माती परीक्षणासह शेतकर्‍यांनी मातीची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन करणे यासाठी कृषी विभागांतर्गत कार्यरत असलेला जलसंधारण विभाग वेगळा करण्याचा निर्णय झाला.

नारळ दरवाढीने जेवण महागले

E-mail Print PDF
सावंतवाडी - जिल्ह्यात नारळाचे दर वाढल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांच्या खाद्यपदार्थ व जेवणाच्या दरात वाढ झाली आहे. ही वाढ काही ठिकाणी ५ ते १० रुपयांनी झाली आहे. नारळाच्या उत्पन्नात झालेली मोठी घट याला सर्वांत महत्त्वाची कारणीभूत ठरली आहे.
जिल्ह्यात सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नारळाच्या बागायती आहेत. गेल्या महिन्याभरापासून नारळाचा तुटवडा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. यंदाच्या हंगामात सुरवातीला २० नंतर २५ तर आता नारळाचा दर ३० ते ३२ रुपयांपर्यंत पोचला आहे. शहरातील, गावातील स्थानिक तसेच रास्त दुकानातही हे नारळ २५ च्या पुढेच उपलब्ध झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम आता गावासोबत शहरातील हॉटेल व्यवसायावर होताना दिसून येत आहे.नारळाच्या खेरीदीसाठी अधिक रुपये मोजावे लागत असल्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांना फायदा व आर्थिक समतोल साधण्यासाठी जेवण व खाद्यपदार्थांच्या दरात वाढ केला आहे.
सर्वच ठिकाणी नसली तरी शहर व ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी ही स्थिती निर्माण झाली आहे. एरवी सर्वसाधारणपणे चांगल्या मोठ्या आकाराचा २० ते २२ रुपयांपर्यत सहज उपलब्ध होणारा नारळाचा यंदाच दरात विक्रमी वाढला आहे.
चतुर्थीपर्यंत वीस रुपयांपर्यंत पोचलेला नारळ आता तिशीच्या पुढे गेला आहे. केरळ, कर्नाटकमधून दरवर्षी नारळाची आवक होते. यातही घट झाल्यामुळे यंदा स्थानिक नारळ बागायतदार विक्रेत्याच्या उत्पन्नावर बाजारपेठ अवलंबून होता. यंदा नारळाचे पीक खूपच कमी झाले आहे. साधारण दिवाळीनंतर स्थिती बदलेल अशी आशा होती मात्र अद्यापही तीच गत नाराळाच्या दराची आहे.
नारळ काढणीचा हंगाम झाल्यावरही स्थिती सुधारली नाही. परिणामी ग्रामीण भागाकडून नारळाची आवक घटल्याने आता शहरातील हॉटेल व्यावसायाकडून ५ ते १० रुपयांनी मोठ्या खाद्यपदार्थ व जेवणाचे दर वाढविण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे शहरात दाखल होणारा ग्राहक तसेच पर्यटकाला अधिक पैसे मोजण्याची वेळ आली आहे.

Page 7 of 375