Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

जमीन मोबदल्याची ४३ कोटी रक्कम भूसंपादन विभागाकडे पडून

E-mail Print PDF
कुडाळ - महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत कुडाळ विभागातील जमिनीच्या  १२५ मूळ मालकांचा भूसंपादन विभागाला अद्याप शोध लागला नसल्याने मोबदल्याची ४३ कोटी रक्कम भूसंपादन विभागाकडे पडून आहे. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणातील उर्वरीत ५० टक्के (१४६ कोटी) रक्कम कुडाळ भूसंपादन विभागाकडे प्राप्त झाली आहे. या रकमेसह कुडाळ विभागात आतापर्यंत ५ हजार खातेधारकांपैकी २ हजार ५०० खातेदारांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. दुसरीकडे आतापर्यंत कुडाळ विभागात ८०० जणांच्या हरकती प्राप्त झाल्या असून त्या हरकतींच्या निकालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती  भूसंपादन अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी यांनी दिली.
कुडाळ विभागात महामार्ग  चौपदरीकरणांतर्गत प्राथमिक टप्प्यात जून-जुलैमध्ये १४६ कोटी एवढी ५० टक्के रक्कम प्राप्त झाली होती. या सर्व रकमेचे वितरण ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. यानंतर कसाल व कुडाळसाठी ९५ कोटी रक्कम प्राप्त झाली. त्याचेही वितरण सुरू करण्यात आले आहे. यानंतर उर्वरीत ५० टक्के (१४६ कोटी) रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे  कुडाळ विभागासाठी आता ३८८ कोटी ६८ लाख रक्कम प्राप्त झाली आहे.  मात्र,  काही भूधारकांनी मोबदल्याबाबत केलेली अपिले व थ्रीडीमध्ये काही मालमत्ता चुकून राहिल्याने अशा मालमत्तेचा नवा थ्रीडी तयार करण्यात येणार आहे.

विजयदुर्गमध्ये जमीन खरेदीत मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर : प्रमोद जठार

E-mail Print PDF
सावंतवाडी - विजयदुर्ग येथे मुंबईस्थित एका व्यापार्‍याने सहाशे एकर जमीन खरेदी केली आहे; मात्र खरेदीदार म्हणून स्थानिक शेतकरी दाखविले गेले. यासाठी काळ्या पैशाचा वापर केला आहे. प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून बजावलेल्या नोटिसीतून हा प्रकार उघड झाला आहे. यात पंचवीसहून अधिक सहभागी आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी  येथे पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, प्राप्तिकर विभागाची आता जिल्ह्यातील अन्य करोडपतींवर नजर आहे आणि विशेष म्हणजे राजकारणात असले, तरी या चौकशीतून कोणी सुटणार नाही, असा टोलाही या वेळी त्यांनी लगावला. माजगाव येथील डी. के. टुरिझम सभागृहात आज भाजपच्या वतीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता.
या वेळी जिल्हाध्यक्ष जठार यांनी उपस्थित भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मेळाव्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रदेश सरचिटणीस राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष महेश सारंग, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहर अध्यक्ष आनंद नेवगी आदी उपस्थित होते.

गोवा बनावटीच्या दारूसह आठ लाख ४६ हजारांचा मुद्देमाल जप्त

E-mail Print PDF
बांदा - बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत १६ हजार ७०३ रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह आलिशान कार व दुचाकी असा एकूण ८ लाख ४६ हजार ७०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.
पहिली कारवाई बांदा पोलिस तपासणी नाक्यावर करण्यात आली. गोव्याहून कुडाळच्या दिशेने जाणार्‌या आलिशान क्रेटा कारला पोलिस हवालदार संजय कदम, महेंद्र बांदेकर, प्रदीप नाईक यांनी तपासणीसाठी थांबविले. या गाडीची तपासणी केली असता, गाडीत १० हजार ३४० रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आढळून आली. यात व्हिस्की आणि बीअरचा समावेश होता. याप्रकरणी आठ लाख रुपये किमतीची कारही जप्त करण्यात आली. कारचालक घनश्याम दिनेश नाडकर्णी (वय २५, सध्या रा. कुडाळ, मूळ रा. शिवडाव) याला अटक करण्यात  आली. या कारच्या दोन्ही नंबर प्लेट काढण्यात आल्या  होत्या.
दुसरी कारवाई बांदा-पत्रादेवी मार्गावर साईमंदिर जवळ करण्यात आली. गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणार्‍या पॅशन प्रो या दुचाकीची तपासणी करीत असताना दुचाकीस्वाराकडे ६ हजार ३६३ रुपये किमतीची दारू आढळली.  याप्रकरणी ३० हजारांची दुचाकीही जप्त करण्यात आली. दुचाकीस्वार सुजित विजय पिळगे (३६, रा. सावंतवाडी सबनीसवाडा) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.

खावटी कर्जधारकांचे १०० टक्के कर्ज माफ

E-mail Print PDF
कणकवली - तांत्रिक चुकांमुळे कुणीही कर्जमाफीपासून वंचित राहणार नाही, शेवटच्या कर्जदाराला जोपर्यंत कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. ज्यांना काही कारणास्तव कर्जमाफीच्या मागणीचे अर्ज अद्यापही भरता आले नाहीत, त्यांनाही पुन्हा संधी देऊन या प्रक्रियेत सामावून घेतले जाईल.
सिंधुदुर्गातील खावटी कर्जधारकांचे कर्जही १०० टक्के माफ होईल, अशी ग्वाही शेतकरी कर्जमाफीसंबंधी नियुक्त केलेल्या  मंत्रिगट समितीचे अध्यक्ष ना. चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीत दिली. सिंधुदुर्गातील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या प्रश्‍नांबाबत जिल्हा बँकेचे संचालक अतुल काळसेकर यांच्या पुढाकाराने मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या दालनात एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

देवगड किल्ला भागात युवकाचा मृतदेह

E-mail Print PDF
देवगड - देवगड किल्ला कड्याची धार येथील समुद्र किनार्‌यालगत  खडकमय भागात किल्ला येथील भीमसेन कृष्णा कोयंडे (३५) याचा मृतदेहाचे अवशेष कुजलेल्या स्थितीत आढळून आला. भीमसेन कोयंडे याला फीट्सचा येत होत्या.त्याला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
देवगड किल्ला येथील राजेश रमेश निकम हे आपल्या मित्रासमवेत मच्छीमारी बोट समुद्रातून आली नाही म्हणून पाहण्यासाठी सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास देवगड (किल्ला)  कडा याठिकाणी पाहावयास गेले होते. त्यांना खडकामध्ये एक सफेद रंगाचे कॅन, बाजुला काळपट झालेली चामडी, कवटी, कुजलेल्या स्थितीतील दोन हाडे दिसली.त्यापुढे काही कपडे, हाडे इतरत्र पडलेली दिसली.
पोलिस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी, पोलिस उपनिरीक्षक दाजी वारंग, स्वप्नील पोवार, पोलिस नाईक प्रशांत जाधव, राजन पाटील, दादा परब, अमोल बुरटे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेहाचे अवशेष, हाडे, कवटी,कपडे ताब्यात घेतले.
भीमसेन कोयंडे हा नौकेवरून मच्छीमारी करण्यासाठी जात असे.त्याला अधुनमधून घरातून बाहेर पडून देवदर्शनासाठी जाण्याची सवय होती.देवदर्शन करून तो घरी परत येत असे.गेले पंधरा दिवसापासून तो घरात नव्हता. नेहमीप्रमाणे बाहेर तो फिरायला गेला असावा, असा घरातील लोकांनी समज करून पोलिस स्थानकात तक्रार दिली नव्हती. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. तपास पोलिस निरीक्षक जयकुमार सूर्यवंशी करीत आहेत.

बेळणे पुलावरुन डंपर कोसळला

E-mail Print PDF
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावर बेळणे पूलावरुन भरधाव जाणारा डंपर लोखंडी संरक्षक कठडा तोडून १५ फूट खाली कोसळला. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. हा अपघात सोमवारी दुपारी १२.१५ वा. च्या सुमारास घडला.
नांदगाव रेल्वे स्टेशन येथे खडी उतरवून कणकवलीच्या दिशेने जाणारा हा डंपर बेळणे पूल येथे आला असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे  डंपर थेट डाव्या बाजूला रस्त्यालगत लावण्यात आलेला लोखंडी संरक्षक कठडा तोडून थेट १५ फूट खोल जावून साईटपट्टीलगत असणार्‌या गटारात कोसळला. यावेळी स्थानिकांनी मदतकार्य करत चालकाला बाहेर काढले.अपघाताचे दृश्य पाहता चालक सुखरूप बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्‍वास टाकला. मात्र अपघातात डंपरचे नुकसान झाले.

प्रतिबंधीत क्षेत्रात मासेमारी करणार्‍या तेरा पर्ससीन नौका पकडल्या

E-mail Print PDF
देवगड - विजयदुर्ग किल्ल्‌यासमोर समुद्रात पाच ते सहा वाव प्रतिबंधीत जलधी क्षेत्रात मासेमारी करणार्‌या १३ पर्ससीन नौका देवगड व  विजयदुर्ग पोलिसांनी  रविवारी सकाळी सागरी  जेरबंद केल्या. प्रतिबंधीत जलधी क्षेत्रात अनधिकृत  नौकांना  पकडण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच कारवाई  आहे.  
पोलिसांनी  यापैकी १० नौका व १२ नौकांवरील तांडेल यांना विजयदुर्ग बंदरात आणले आहे. तीन नौकांना रात्री उशिरापर्यंत आणण्याची कारवाई सुरू होती. पकडलेल्या  नौकांवर २६१ कर्मचारी होते. बंदरात येत असतानाच काही नौकांनी दंडात्मक कारवाई कमी होण्यासाठी नौकेवरील मासळी समुद्रात फेकली.
अनधिकृतपणे मच्छीमारी करीत असलेल्या पर्सनेट नौका स्वाभिमानचे युवक तालुकाध्यक्ष उत्तम बिर्जे व स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी ही बाब विजयदुर्गचे प्रभारी निरिक्षक अमोल चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार चव्हाण यांनी देवगड येथील सागरी पोलिस दलाशी संपर्क साधून पर्सनेट नौका पकडण्याची मोहीम हाती घेतली.
देवगड येथील स्पीड बोटींच्या सहाय्याने पोलिस उपनिरिक्षक जितेंद्र साळुंखे, पोलिस उपनिरिक्षक प्रभाकर शिवगण, पोलिस उपनिरिक्षक श्री. नेवसे, पो. कॉ. संदीप पाटील, कोयंडे, मनोज साळवी तसेच स्वाभिमानचे उत्तम बिर्जे व त्यांचे सहकारी यांच्यासमवेत जाऊन धडक कारवाई केली. यावेळी रत्नागिरी व मालवण येथील प्रत्येकी एक नौका व राजापूर नाटे येथील अकरा नौका अनधिकृत मच्छीमारी करताना आढळून आल्या.
विजयदुर्ग बंदरामध्ये आणण्यात आलेल्या १२ नौकांमध्ये नौका महम्मद कासीफ अब्दुल्ला (नौकामालक जुबेर पंगेरकर, नाटे) कर्मचारी १८, अब्दुल हमीद (नौकामालक सिकंदर अब्दुल हमीद गोवलकर ,नाटे) कर्मचारी १७, के. अब्दुल्ला (नौकामालक हनिफ कोतवडकर, नाटे) कर्मचारी २२, अल हसन (नौकामालक आदिल म्हसकर, नाटे) कर्मचारी २०, अल साकिब (नौकामालक दानीश हुना, नाटे) कर्मचारी २५, अल इब्राहीम(नौका मालक जहूर बोरकर, नाटे) कर्मचारी २५, एच् अब्बास(नौकामालक मूनाब होडेकर, रत्नागिरी) कर्मचारी २६, महम्मद सैफ (नौकामालक सैजाद कोतडकर,नाटे) कर्मचारी १७, हिमालिया (नौकामालक हाजीमिया हुन्ना, नाटे) कर्मचारी २२, जुनेद फैजान (नौकामालक इश्राफ भाटकर, नाटे) कर्मचारी २५, मोरयाराज (नौकामालक संतोष काशीनाथ चव्हाण, नाटे) कर्मचारी २६ व विक्रांत (नौकामालक गोपीनाथ भगवान तांडेल, मालवण) कर्मचारी १९ या नौकांचा समावेश आहे.

मुंबई-गोवा मार्गावर बसला अपघात; २६ जखमी

E-mail Print PDF
कणकवली - मुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटण-संभाजी नगर येथे विशाल ट्रॅव्हल्स या खासगी बसला अपघात झाला. रविवारी सकाळी सहाच्या दरम्यान झालेल्या अपघातात बसमधील २६ प्रवासी जखमी झाले आहेत.
खारेपाटण मध्ये सलग दुसर्‍या दिवशी अपघात झाला. शनिवारी रामेश्वर ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे बस प्रवाशांमध्ये खबराट पसरली आहे.
परेल-मुंबई येथून ही बस सावंतवाडी-बांदा येथे चाललेली होती. खारेपाटन प्रा. आ. केंद्रात जखमी प्रवाशांवर उपचार करण्यात आले. गंभीर ७ जखमी प्रवाशांना कणकवली येथील ग्रामीण रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

कोकणातही समुद्र किनार्‍यावर शॅक उभारण्याचा निर्णय

E-mail Print PDF
सावंतवाडी - गोव्यात ज्याप्रमाणे समुद्र किनार्‍यावर पर्यटकांना आराम करण्यासाठी किंवा बसण्यासाठी आरामखुर्ची व शॅक उपलब्ध असतात त्याचप्रमाणे कोकणातील ७२० किलोमीटर समुद्र किनार्‍यावर शॅक उभारण्याचा निर्णय महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने घेतला आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील किनारपट्टीनजीक असलेल्या नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
समुद्र किनार्‍यावर छोट्याशा झोपड्यात आराम खुर्चीत निवांत बसून विविध पदार्थांचा आस्वाद घेतात. त्यामुळे पार्टी किंवा पिकनिकसाठी पर्यटक गोव्याला जाणे पसंत करतात. याच धर्तीवर लवकरच महाराष्ट्रातील समुद्र किनार्‍यांवरही एमटीडीसीने ‘बीच शॅक’ धोरणाचा मसुदा तयार केला आहे.  किनार्‍यावर गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ सुरू करण्यासाठी एमटीडीसीचा परवाना बंधनकारक आहे. त्यासाठी व्यावसायिकांना अनेक नियमांचे पालन करणे अनिवार्य असेल. या ठिकाणी परदेशी नागरिकांना शॅक्सचा परवाना मिळणार नसल्याचे समजते. कोकणातील किनार्‍यावर किती शॅक असतील ते या धोरणाला अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर समजणार आहे.  दरम्यान, नागरिकांच्या काही सूचना असल्यास ५ नोव्हेंबरपर्यंत पाठविण्याचे आवाहन केले आहे.

Page 6 of 375