Tuesday, Jan 23rd

Headlines:

दापोली शहरात बेकरीला आग, १० लाखांचे नुकसान

E-mail Print PDF
दापोली ः तालुक्यात गेले दोन दिवस आगी लागण्याचे सत्र सुरू असून रविवारी १४ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत एका बेकरीसह फळांची वखार जळून खाक झाली असून सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झालेे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
याबाबत माहिती अशी की, मच्छिमार्केट येथे मजिद युसूफ घिवाला यांची स्वाद अय्यंगार नावाची बेकरी आहे. या दुकानाला पहाटे २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून दुकानातील फर्निचर, खाद्य पदार्थ, तीन फ्रीज, एक हॉटकेस, महत्वाची कागदपत्रे असे सुमारे १० लाखांचे नुकसान झाले आहे. घिवाला यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार, राज ठाकरे

E-mail Print PDF
रत्नागिरी : प्रकल्प रद्द होईपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार, राज ठाकरे यांची नाणारमधील प्रकल्पग्रस्ताना ग्वाहीरिफायनरी प्रकल्प रद्द करायचा असेल तर सर्वांनी एकत्र रहावे लागेल. प्रकल्प रद्द करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या कानात ही गोष्ट नीटपणे घालेन. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नाणार येथील ग्रामस्थांशी बोलताना दिली.

रिफायनरीबाबत शिवसेनेची भूमिका दुटप्पी ः राज ठाकरे

E-mail Print PDF
रत्नागिरी ः कोकणात होणार्‍या रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना आणि भाजपची भूमिका दुटप्पी असल्याचा घणाघाती आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानंतर आता न्यायपालिकेच्या कामातदेखील केंद्र सरकार हस्तक्षेप करत असल्याचे सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सामोरे आल्याची टीका करत देशाची वाटचाल अराजकतेकडे सुरू असल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरे हे शुक्रवारी रत्नागिरीत दाखल झाले. शनिवारी ते सागवे कात्रादेवी येथे जावून रिफायनरी प्रकल्पाबाबत तेथील जनतेचे म्हणणे ऐकून घेणार आहेत. रत्नागिरीत आल्यावर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपली रोखठोक मते मांडली.

उद्योजक बाळासाहेब पित्रे यांचे निधन

E-mail Print PDF
देवरूख ः गेली ५० वर्षे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले समाजसेवक, ज्येष्ठ उद्योजक वसंत मनोहर उर्फ बाळासाहेब पित्रे (९०) वर्षे यांचे शुक्रवारी निधन झाले. डिसेंबर महिन्यात पत्नी सौ. विमल पित्रे यांचे निधन झाले होते. पत्नी निधनाच्या धक्क्यामुळे बाळासाहेब महिनाभर आजारी होते. पुणे शहरातील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आज शहरातील स्मशानभुमित बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

वेळंब येथे बेकायदेशीर शस्त्रसाठा

E-mail Print PDF
गुहागर ः गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रत्नागिरीच्या गुन्हे अन्वेषण शाखेने टाकलेल्या धाडीत तयार झालेल्या तीन बंदुकांसह बंदुका बनविण्याचे साहित्य असा बेकायदेशीर मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शस्त्र बनविणार्‍या रमेश शंकर काताळकर यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
गुहागर तालुक्यातील वेळंब येथे रमेश शंकर काताळकर हे बंदुका दुरूस्त करणे, नवीन बंदुका व बंदुकीचे साहित्य तयार करत असल्याची गुन्हा अन्वेषण खात्याला कुणकुण लागली होती. त्यानुसार ११ जानेवारी रोजी गुन्हा अन्वेषण खात्याच्या पथकाने वेळंब येथे काताळकर यांच्या लोहार कामाच्या दुकानावर धाड टाकली व हा शस्त्रसाठा जप्त केला.

एमआयडीसी भूखंड वाटप प्रकरणी प्रादेशिक अधिकारी पाटील दोषी

E-mail Print PDF
राजापूर ः एमआयडीसीच्या रत्नागिरी, साडवली, गाणे-खडपोली, लोटे परशुराम, खेर्डी, चिपळूण या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटप प्रकरणात अनियमितता आणि त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणी तत्कालीन प्रादेशिक अधिकारी पी. एस. पाटील यांना दोषी ठरवत त्यांची विभागीय चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जावेद ठाकूर यांनी पत्रकारांना दिली.
याप्रकरणी ज्या उद्योजकांवर अन्याय झाला आहे त्यांच्या पाठीशे रत्नागिरी जिल्हा लघु उद्योजक संघटना उभी राहणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले. या प्रश्नी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. आमदार हुस्नबानू खलिफे यांनीही औचित्याचा मुद्याद्वारे शासनाचे लक्ष वेधले होते, असे ते म्हणाले.
तत्कालीन प्रादेशिक अधिकारी पी. एस .पाटील यांनी भूखंड वाटपात अनियमितता केली असल्याचे आढळून आल्याने त्यांचे विरूध्द म. ना. से. शिस्त व अपील नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. पाटील हे मूळ महसूल विभागाचे उपजिल्हाधिकारी संवर्गाचे अधिकारी आहेत. ते प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात कार्यरत होते. ते सध्या महसूल विभागांतर्गत कार्यरत असल्याने विभागीय चौकशी सुरू करण्याबाबत प्रधान सचिव महसूल यांना कळविण्यात आले असल्याचे उद्योगमंत्र्यांनी लेखी कळविल्याचे ठाकूर यांनी सांगितले.

Page 7 of 2713