Tuesday, Jan 23rd

Headlines:

मुंबई

...तर फेरीवालेही आत्महत्या करतील; हॉकर्स युनियनचा इशारा

E-mail Print PDF
मुंबई - राजकीय पक्ष कायदा हातात घेऊन फेरीवाल्यांना पिटाळून लावीत आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. फेरीवाल्यांचा घास हिरावून घेतल्यास त्यांचे आत्महत्या सत्र सुरू होईल, अशी चिंता महाराष्ट्र हॉकर्स युनियनने व्यक्त केली आहे.
सर्वेक्षण करून फेरीवाला धोरणाची तत्काळ अंमलबजावणी करा, अशी मागणी युनियनने केली आहे. फेरीवाल्यांना न्याय न मिळाल्यास पालिका आयुक्तांना घेराव घालण्याचा इशाराही युनियनने दिला आहे. एल्फिन्स्टन रोड येथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. रेल्वेस्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांविरुद्ध मनसेने कारवाई केली. फेरीवाल्यांवर कारवाई करताना राजकीय हस्तक्षेप झाल्यास मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी युनियनचे अध्यक्ष प्रद्युम्न वाघमारे यांनी केली आहे.
सरकारने फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी. प्रभागनिहाय फेरीवाला झोन तयार करावा. प्रभागनिहाय समित्यांची फेररचना करावी. या समित्यांवर फेरीवाला प्रतिनिधींना स्थान द्यावे. २०१४ मध्ये केलेले फेरीवाल्यांचे सर्वेक्षण रद्द करून नामांकित सामाजिक संस्थांकडून सर्वेक्षण करा. फेरीवाला संरक्षण कायद्यानुसार पात्र फेरीवाल्यांना विनाविलंब परवाना द्या आदी मागण्या युनियनने केल्या आहेत.

कुर्ला परिसरात गोदामाला भीषण आग

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईच्या कुर्ला परिसरात शनिवारी सकाळी एका गोदामाला भीषण आग लागली. एलबीएस रोडवर असलेल्या कल्पना टॉकीजजवळ हे गोदाम आहे. या परिसरात लाकडाची आणि कपड्यांची इतर अनेक गोदामे आहेत. त्यामुळे ही आग आणखी पसरण्याची शक्यता आहे. या गोदामापासून जवळच्या अंतरावर असलेल्या झोपडपट्टीत अनेक घरे आहेत. या आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या पाच गाड्या आणि पाच वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशामन दलाने ही दुसर्‍या श्रेणीची आग असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
दोन दिवसांपूर्वीच वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीलाही भीषण आग लागली होती. गरीबनगर येथील अतिक्रमित झोपडयांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या झोपडयांमधील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर रात्रीच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आले.

मुंबई पोलिसांच्या ट्रस्टला स्वीकारता येणार देणग्या

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई पोलीस दलाचे आधुनिकीकरण आणि पोलीस कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी आता मुंबई पोलिसांनी ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. गृह खात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाला मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे मुंबई पोलिसांना खासगी संस्था आणि उद्योग समुहांकडून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत निधी स्वीकारता येणार आहे.
परदेशात पोलीस दलाला देणग्या स्वीकारता येतात. याच धर्तीवर मुंबई पोलिसांनाही खासगी संस्था आणि उद्योग समुहांकडून देणग्या स्वीकारता याव्यात, यासाठी ‘मुंबई पोलीस फाऊंडेशन’ या ट्रस्टची स्थापना करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी गृह विभागाला ऑगस्टमध्ये केली होती.
पोलीस आयुक्तांच्या पत्राची दखल घेत गृहखात्याची जबाबदारी असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रस्ट स्थापन करण्यास परवानगी दिली. गृह खात्याने सशर्त परवानगी दिली आहे. देणगी स्वीकारताना हितसंबंध आड येणार नाहीत, विश्वासार्हता असलेल्या संस्था आणि व्यक्तींकडूनच देणग्या स्वीकारता येतील, तसेच निधी स्वीकारताना पोलीस दलाच्या कामाशी तडजोड करु नये, अशी अटही गृहखात्याने ठेवली आहे. ट्रस्टच्या नियमांची विधी विभागाने पडताळणी केल्यावरच ट्रस्टची नोंदणी करावी, असेही गृह विभागाने स्पष्ट केले.
निर्णयाची माहिती देताना पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर म्हणाले, ट्रस्टचा कारभार पारदर्शक असेल आणि तो सर्वसामान्यांसाठी त्याची महिती उपलब्ध असेल. तसेच देणार्‍या व्यक्ती किंवा संस्थेच्या विश्वासार्हतेवर शंका आल्यास देणगी नाकारण्याचे अधिकारही ट्रस्टला असतील. पोलीस कर्मचार्‍यांचे आरोग्य, गृहनिर्माण, कर्मचार्‍यांच्या मुलांचे शिक्षण यावर ट्रस्टचा भर असेल, असे त्यांनी सांगितले.

छेडछाडीच्या भीतीने विद्यार्थिनीची लोकलमधून उडी

E-mail Print PDF
मुंबई - छेडछाडीच्या भीतीने मुंबईत १३ वर्षांच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलमधून उडी मारली आहे. तिच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. पायल कांबळे असे या घटनेत जखमी झालेल्या मुलीचे नाव आहे.
रविवारी सकाळी ९.२९च्या लोकलने पायल सीएसएमटीहून करी रोडला टयॅशन्ससाठी निघाली होती. सीएसएमटीवरून ट्रेन निघत असतानाच एक युवक महिलांच्या डब्यात चढला. त्यावेळी पायल लेडीज सेकंड क्लासच्या मिडल कम्पार्टमेंटमध्ये एकटीच होती. युवकाने आपल्याला शांत राहण्याची वार्निंग दिल्याचे तिने सांगितले. घाबरून तिने अलार्म चेन खेचायला सुरूवात केली. ट्रेन थांबत नसल्याने तिचे प्रयत्न सुरूच होते. युवक तिला शांत बसण्याची वार्निंग देत जवळ जात होता. धीर एकवडून पायल ट्रेनच्या दरवाज्याजवळ गेली आणि उडी मारली.

मनसेचे एकमेव नगरसेवक तुर्डेंची एसीबीकडे तक्रार

E-mail Print PDF
मुंबई - मनसेतून बाहेर पडलेल्या मुंबईतील नगसेवकांना धडा शिकवण्यासाठी मनसे सज्ज झाली आहे. शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी मला रक्कम ऑफर झाली होती, असा दावा मनसेचे मुंबईतील एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी केलाय. त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तशी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
कुर्ल्यातील वॉर्ड क्रमांक १६६ चे नगरसेवक संजय तुर्डे यांनी एसीबीला पत्र लिहून ही माहिती दिली आहे. मनसेच्या सातपैकी सहा नगरसेवकांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. केवळ संजय तुर्डे हे फुटले नाहीत. मुंबई महापालिकेत मनसेची साथ न सोडलेले एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांनी आपण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी प्रामाणिक असल्याची प्रतिक्रिया दिली होती.
शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक दिलीप लांडे यांनी मला शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. भविष्यासाठी हा चांगला पर्याय असल्याचं लांडेंनी सांगितलं, असं संजय तुर्डे म्हणाले होते. गेल्या आठवड्यात मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

नगरसेवकांच्या विरोधात मनसेची याचिका दाखल

E-mail Print PDF
मुंबई - शिवसेनेचा झेंडा हाती घेतलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसेने कोकण आयुक्तांकडे याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय मनसे नगरसेवकांना शिवसेनेत दाखल करून घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांचे शिवसेना विलीनीकरण लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले.
मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला असला तरी, तांत्रिकदृष्ट्‌या ते अजून मनसेतच आहेत. त्यामुळे या सहाही नगरसेवकांना मनसेचा आदेश मानावा लागणार आहे. त्यामुळे मनसेने या नगरसेवकांचे पद रद्दबातल करावे, अशी याचिका कोकण आयुक्तांकडे याअगोदर दाखल केली होती. आता दुसर्‌यांना फुटीर नगरसेवकांना नगरसेवक फंड देण्यात येऊ नये, एवढेच नाही तर त्यांना पालिका सभागृहासह विविध समित्यांमध्ये सदस्य म्हणून बसण्यास परवानगी देऊ नये, अशी याचिकाही दाखल करण्यात आली असल्याचे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. कोणत्याही पक्षाचे दोन तृतीयांश आमदार फुटले तर त्यांना स्वतंत्र गट स्थापन करणे अथवा विलीनीकरण करता येते. स्थानिक स्वराज्य संस्थेला हा कायदा लागू पडत नाही. त्यामुळे पक्षाशी गद्दारी करणार्‌या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्दबातल झालेच पाहिजे, असेही देशपांडे यांनी सांगितले. दरम्यान मनसेच्या या याचिकेमुळे शिवसेनेचीच नाही तर फुटीर नगरसेवकांची डोकेदुखी वाढली आहे.
सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसेना नगरसेवकांची महापौर निवासस्थानी बैठक घेऊन, शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांसह मनसेच्या फुटीर नगरसेवकांची यादी कोकण आयुक्तांना सादर करण्याचा निर्णय घेतला. याबाबत सभागृह नेते यशवंत जाधव यांना विचारले असता, शिवसेनेने मनसे नगरसेवकांच्या विलीनीकरणाचे सर्व कायदेशिर बाबी पुर्ण केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा प्रवेश कोणीच रोखू शकणार नाही. कोकण आयुक्तांकडून पत्र आल्यानंतर पालिका सभागृहात सहाही नगरसेवकांच्या विलिनीकरणाची घोषणा करण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

मुंबई पोलिसांना लोकल प्रवास मोफत

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईकरांच्या रक्षणासाठी कार्यरत असलेल्या मुंबई पोलिसांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाकडून एक गोड भेट मिळाली आहे. विविध गुन्ह्यांचा तपास करीत असताना उपनगरीय रेल्वे (लोकल)मधून करण्यात येत असलेल्या प्रवासावेळी त्यांना आता तिकीट तपासणीसाबरोबर हुज्जत घालावी लागणार नाही. त्यांना लोकलमधून मोफत प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी गणवेष परिधान करणे अनिवार्य आहे.
रेल्वे पोलीस दलाने नुकताच हा निर्णय घेतला असून पश्चिम व मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापकांना त्याबाबत कळविण्यात आले आहे.
मुंबई पोलीस लोकलमधून विनातिकीट तसेच अपंगांसाठी आरक्षित असलेल्या डब्यातून सर्रासपणे प्रवास करतात, त्याबाबत‘टीसी’कडून कारवाई करताना वादावादीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत रेल्वेने अनेकवेळा मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून कळविले होते.
त्याच अनुषंगाने याबाबत दोन्ही घटकांतील अधिका-यांमध्ये ३० सप्टेंबरला बैठक झाली होती. त्यामध्ये तपासकामासाठी गणवेषावर प्रवास करणाजया पोलिसांना मोफत प्रवास करण्याची मुभा असावी, असा प्रस्ताव बनविण्यात आला. त्याला रेल्वे पोलीस दलाच्या महासंचालकांनी हिरवा कंदील दाखविला असल्याचे अधिकाजयाने एका परिपत्रकाद्वारे प्रशासनाला कळविले आहे. मात्र गणवेषाशिवाय प्रवास करणाजया पोलिसांनी आवश्यक तिकीट बाळगणे अनिवार्य असल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत; मनसेसह भाजपलाही चांगलाच धक्का

E-mail Print PDF
मुंबई - मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ७ पैकी ६ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे महापालिकेत आमचा महापौर बसवू, असा दावा करणार्‍या भाजपला सेनेने चांगलाच धक्का दिला आहे.
मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेचा महापौर आहे. संख्याबळाच्या तुलनेत सेनेकडे भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक नगरसेवक आहे. याशिवाय ४ अपक्ष सेनेसोबत आहेत. मात्र, भांडूप पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या जागृती पाटील यांनी जोरदार विजय मिळवला. त्यानंतर काही तासांतच भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई महापालिकेत आमचाच महापौर होईल, असे सेनेला आव्हान केले होते. त्यानंतर आज मनसेचे हे सहा नगरसेवक सेनेत जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, मनसेचे हे सहा नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयाकडे रवाना झाले असून, ते आता वेगळा गटाची नेंदणी करणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे महापालिकेत संख्याबळही वाढणार आहे. सेनेच्या या खेळीने भाजपसह मनसेलाही जबरदस्त धक्का बसला आहे.

२०१९मध्ये भाजपाचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरु

E-mail Print PDF
मुंबई - भांडुपमधील पोटनिवडणुकीतील विजयामुळे महापालिकेतील भाजपची संख्या एका सदस्याने वाढली असली तरी त्यांना शिवसेनेची बरोबरी करता येणार नाही. त्यामुळे कॉंग्रेसचे किमान १० नगरसेवक फोडण्याची कामगिरी भाजपमध्ये आलेल्या सिंहा’वर सोपवण्यात आली आहे. २०१९ मध्ये मुंबईत भाजपचा महापौर बसवण्याच्या हालचाली सुरू आहेत.
भांडुपमधील पोटनिवडणुकीमुळे भाजप नगरसेवकांची संख्या ८२ झाली आहे. माजी उपमहापौर शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे भाजपची एक जागा रिक्त झाली आहे. गिरकर यांच्या प्रभागात सहा महिन्यांत पोटनिवडणूक घ्यावी लागणार असून त्यात भाजपचा विजय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपची संख्या ८३ वर पोहचेल. दोन अपक्षांसह भाजपची संख्या ८५ होईल. मात्र, पालिकेत सत्तांतर घडवण्यासाठी ही संख्या अपुरी असल्याने कॉंग्रेसचे १० नगरसेवक फोडण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांच्याबरोबर चार ते पाच नगरसेवक कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ११ नगरसेवक आल्यास पोटनिवडणूक घेण्याची गरज भासणार नसल्याने सहा ते सात नगरसेवक फोडण्याची जबाबदारी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या एका हिंदीभाषिक नेत्यावर सोपवण्यात आली आहे. या नेत्याची मुंबई पालिकेत चांगली पकड असल्याने त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे समजते.

Page 7 of 168