Saturday, Sep 23rd

Headlines:

मुंबई

मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईहून गुजरातकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. स्लीपर बदलायला उशीर झाल्याने वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बोईसर, डहाणू, वापीला जाणार्‍या प्रवाशांची यामुळे गैरसोय झाली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतूक दीड तास उशिराने सुरू आहे.
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाच्या ११८ नंबर वरील भागात देखभाल दुरूस्तीसाठी शुक्रवारी उशिरा रात्री २ ते ४ वाजण्याच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जाणाऱया रेल्वे रूळाचे व स्लीपरचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम वेळीच पूर्ण न झाल्याने गुजरातच्या दिशेने जाणाऱया ट्रकवर गाडयांच्या लांब रांगा लागल्या आहेत. मुंबईहून गुजरातला जाणार्‍या आणि येणार्‍या सर्व गाडया ठप्प झाल्या आहेत. या खोळंब्यामुळे गुजरातला जाणार्‍या गाडया दीड ते दोन तास उशिराने धावत आहेत. काही गाडया रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही लांब पल्ल्याच्या गाडया उशिराने धावत आहेत. परिणामी चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

एसीमध्ये स्फोट होऊन इमारतीला आग

E-mail Print PDF
मुंबई - भिवंडीतील एका इमारतीला आग लागली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात आज सकाळी ही घटना घडली आहे. इमारतीमध्ये असलेल्या एसीमध्ये स्फोट झाल्यानंतर ही आग लागली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही इमारत भिवंडीतील उद्योजक निजामुद्दीन अन्सारी यांची आहे.
या आगीतून आठ ते दहा जणांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे. या इमारतीच्या शेजारी दोन पेट्रोलपंप आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही पेट्रोल पंप बंद करण्यात आली आहेत. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.

पहिल्या वातानुकूलित लोकलची चाचणी सुरु

E-mail Print PDF
मुंबई - एक वर्षांहून अधिक कालावधी होऊनही मुंबईत दाखल झालेली वातानुकूलित लोकल अद्याप प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली नाही. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावर या लोकलच्या चाचण्या घेण्यात येत असून साधारणपणे डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकल दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही लोकल सुरू होताच त्याच्या सुरुवातीला चारच फेर्‍या चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरीत) बनलेली वातानुकूलित लोकल साधारण एक वर्षांपूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाली. ही लोकल बनवण्यासाठी ५४ कोटी रुपये खर्च आला. बारा डब्यांची असलेल्या या लोकलच्या सुरुवातीला कुर्ला कारशेडमध्ये आणि कारशेडबाहेर कर्जतदरम्यान चाचण्या करण्यात आल्या. सहा ते सात महिने चाचण्या झाल्यानंतर वातानुकूलित लोकलची जादा असलेली उंची आणि सीएसटी ते कुर्लादरम्यान कमी उंचीचे पूल पाहता मध्य रेल्वेने एसी लोकल चालवण्यास नकार दिला. त्यामुळे वातानुकूलित लोकल चालवण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला. ही लोकल चालवण्यासाठी पश्चिम रेल्वेने रुची दाखवली आणि साधारण गेल्या तीन महिन्यांपासून वातानुकूलित लोकलच्या पश्चिम रेल्वे मार्गावर चाचण्या घेण्यात येत आहेत. चाचण्या घेतानाच रेल्वेच्या आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन ऍण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन)काही तांत्रिक मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्याची माहिती देतानाच दुसरीकडे चाचण्या घेण्याचे काम सुरूच आहे. चाचण्या पूर्ण होताच त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येईल आणि त्याची मंजुरी मिळताच डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकल चालवण्याचा प्रयत्न आहे.  यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मुकुल जैन यांनी सांगितले की, सुरुवातीला वातानुकूलित लोकलच्या चारच फेर्‍या चालवण्याचे नियोजन आहे. या लोकलला स्वयंचलित दरवाजे असल्याने ती स्थानकात थांबताच त्यासाठी वेळही लागू शकतो. तसेच प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊनच  फेर्‍या वाढवण्यावर भर दिला जाईल.

चेंबूर स्थानकात प्रवाशांचा रेल रोको!

E-mail Print PDF
मुंबई - गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्‍या मुसळधार पावसाने आज थोडी विश्रांती घेतल्याने मुंबईकरांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक गेल्या तीन दिवसांपासून बिघडल्याने प्रवाशांना याचा खूपच मनःस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यातच आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी चेंबूर रेल्वे स्थानकातून सुटणारी चेंबूर - सीएसटी लोकल रद्द केल्याने संतप्त प्रवाशांनी चेंबूर रेल्वे स्थानकात रेल रोको केले.
चेंबूरहून सीएसटीकडे जाणार्‍या सर्व लोकल पटरीवर उतरून संतप्त प्रवाशांनी थांबल्याने रेल वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. रेल्वे पोलिसांनी संतप्त प्रवाशांना शांत करून रेल्वे वाहतूक पूर्वव्रत सुरू केली. सध्या हार्बर मार्गावरील लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

मेट्रोचे काम रात्रीच्या वेळेत करण्यास परवानगी नाही

E-mail Print PDF
मुंबई - कुलाबा-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाच्या कामासाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री आणि त्यांची वाहतूक करणार्‍या वाहनांना दक्षिण मुंबईत रात्रीच्या वेळेस परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाला (एमएमआरसीएल) मंगळवारी नकार दिला. प्रकल्पाच्या कामामुळे लोकांना आधीच पूर्ण दिवस ध्वनी प्रदूषणाचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीला रात्री निदान सहा ते सात तास शांततापूर्ण झोपेची गरज असते. त्यामुळे त्या झोपेचा नागरिकांचा हक्क आम्ही हिरावून घेऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट करीत ‘एमएमआरसीएल’२ची मागणी मान्य करण्यास नकार दिला.
ध्वनी प्रदूषणाचे सगळे नियम व आदेश धाब्यावर बसवून रात्रीच्या वेळेस कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पाचे काम केले जाते. ही बाब याचिकाकर्त्यांने निदर्शनास आणून दिल्यानंतर, आवश्यक ती परवानगी मिळालेली नसतानाही हे काम सुरू असल्याची कबुली खुद्द ‘एमएमआरसीएल’ दिली. त्यावर रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत प्रकल्पाचे काम करण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. तर प्रकल्पासाठी दक्षिण मुंबईत सध्या भुयारी मार्गाचे खोदकाम सुरू आहे. त्यामुळे मातीचा ढिगारा उचलणारी यंत्रसामग्री आणि ती वाहून नेणारी वाहने दक्षिण मुंबईत आणणे आवश्यक आहे. मात्र अवजड वाहनांना सकाळी सात ते रात्री १२ पर्यंत दक्षिण मुंबईत आणण्यास वाहतूक पोलिसांनी एका परिपत्रकामुळे मनाई केली आहे. परिणामी प्रकल्पाचे काम करण्यात खूप अडचणी येत असल्याचा दावा करत मातीचा ढिगारा उचलणारी यंत्रसामग्री आणि तो वाहून नेणारी अवजड वाहने रात्रीच्या वेळी दक्षिण मुंबईत आणू देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एमएमआरसीएलतर्फे न्यायालयाकडे करण्यात आली होती.
मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळेस एमएमआरसीएलकडून काय अडचणी येत आहेत याचा पाढा वाचण्यात आला. मात्र याचिकाकर्त्यांकडून त्याला तीव्र विरोध करण्यात आला. एवढेच नव्हे, तर वाहतूक करणार्‍या या वाहनांचा आवाजही प्रचंड असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयानेही एमएमआरसीएलची मागणी फेटाळून लावत अशी सरसकट परवानगी देण्यास न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. प्रत्येक काम तुम्हाला सायंकाळनंतरच का करायचे आहे, तुमची प्रत्येक विनंती सरसकट मान्य करता येऊ शकत नाही. एकदा ती मान्य केली तर अशा अनेक विनंत्यांची रांग लागेल, असे सुनावताना प्रकल्पाच्या कामामुळे होणार्‍या ध्वनी प्रदूषणाची, त्याच्या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोण घेणार, असेही न्यायालयाने सुनावले.

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बालला अटक

E-mail Print PDF
मुंबई - बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला त्याच्या साथीदारांसह ठाणे खंडणीविरोधी पथकाने मुंबईतून सोमवारी रात्री अटक केली होती. यानंतर आज ठाणे पोलिसांच्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर हाच खंडणीचे रॅकेट चालवत होता. २०१३ पासून तो खंडणी उकाळत होता. यामध्ये त्याने ४ फ्लॅट आणि ३० लाख रुपये उकळल्याचे तपासात उघड झाले आहे. काल बिर्यानी खात असताना सोमवारी रात्री ९.१५ वाजता हसीना पारकरच्या घरातून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणात दाऊदचा सहभाग आहे का याची तपासणी सुरू आहे. कासकरसह ताब्यात घेण्यात आलेल्या इतर आरोपींच्यावर मोक्का लावण्याचा विचार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नगरसेवक, बडे नेते, बिल्डर कासकरच्या संपर्कात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनी लांड्रिंगचा प्रकार तपासात समोर आल्यास त्याची ईडीला माहिती देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

भुयारी गटारद्वार स्थानिक कार्यकर्त्यांनी उघडल्याचे सीसीटीव्ही चित्रण

E-mail Print PDF
मुंबई - मुंबईत २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आणि बॉम्बे हॉस्पिटलमधील पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर बेपत्ता झाल्याचे दुसर्‍या दिवशी लक्षात आले.  एल्फिन्स्टन जंक्शन परिसरातील भुयारी गटारद्वार (मॅनहोल) उघडे असल्यामुळे अमरापूरकर त्यात पडले. वरळी समुद्रकिनार्‍यावर त्यांचा मृतदेह सापडल्यामुळे कल्लोळ उडाला. भुयारी गटारद्वार उघडेच ठेवल्याबद्दल पालिकेवर ताशेरे ओढण्यात आले.  पालिका आयुक्तांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र आता एल्फिन्स्टन जंक्शन परिसरातील सनमिल कम्पाऊंडच्या आसपास काही स्थानिक कार्यकर्ते साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा म्हणून भुयारी गटारद्वारे उघडत असल्याचे सीसी टीव्ही कॅमेर्‍यातील चित्रण पालिकेच्या हाती लागले आहे. साचलेल्या पाण्याचा झटपट निचरा व्हावा या उद्देशाने या मंडळींनी ही झाकणे उघडली असली तरी पालिका अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अपरोक्ष ते करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत एल्फिन्स्टन जंक्शन आणि आसपासच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यांचे चित्रण तपासण्यास सुरुवात केली . २९ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे एल्फिन्स्टन जंक्शनजवळील सनमिल कम्पाऊंड आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे काही स्थानिक कार्यकर्ते सनमिल कम्पाऊंड परिसरातील भुयारी गटारद्वारे उघडत असल्याचे छायाचित्रण सीसी टीव्हीत आहे. पोलिसांना सीसी टीव्ही कॅमेर्‍यामधील छायाचित्रणात काही व्यक्ती  गटाराची झाकणे उघडत असल्याचे निदर्शनास आल्याची बाब पालिका अधिकार्‍यांच्या लक्षात आली. त्यामुळे हे छायाचित्रण पालिकेला मिळावे यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी चार-पाच दिवसांपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना पत्र पाठविले होते. या प्रकरणाबाबत सुरू असलेल्या चौकशीसाठी हे उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. पोलिसांना केलेल्या पत्रव्यवहारानंतर हे छायाचित्रण पोलिसांकडून पालिकेच्या ताब्यात आल्याचे समजते.
डॉ. अमरापूरकर यांचा मृतदेह वरळी येथे समुद्रकिनार्‍यावर सापडल्यानंतर पालिकेवर टीका झाली होती. न्यायालयानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी डॉ. अमरापूरकर दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना दिले. या प्रकरणाची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून येत्या दोन-तीन दिवसांमध्ये विजय सिंघल आपला अहवाल पालिका आयुक्तांकडे सादर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भिवंडी परिसरातील निवडणुकांत शिवसेनेला जोरदार धक्का

E-mail Print PDF
मुंबई - ठाणे जिल्ह्यासह भिवंडी परिसरात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. तालुक्यातील प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या कारिवली आणि कालवार ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी शिवसैनिकांसह भाजपमध्ये प्रवेश केला. परिणामी याचा ज्येष्ठ पदाधिकारी आणि जिल्हाप्रमुखांनी चांगलाच धसका घेतला आहे.
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत कारिवलीच्या सरपंच कविता गीतेश नाईक, शिवसैनिक गीतेश रामदास नाईक यांच्यासह कारिवलीतील शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे कार्यकर्ते संजय नाईक, लक्ष्मण पाटील, विजय नाईक आदींनी शिवसैनिकांच्या भाजपप्रवेशासाठी प्रयत्न केले. कारिवलीपाठोपाठ शिवसेनेच्याच कालवारच्या सरपंच अर्चना परशुराम म्हात्रे, शिवसैनिक परशुराम म्हात्रे, प्रकाश म्हात्रे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कारिवली आणि कालवार येथील ग्रामपंचायतींच्या सरपंचांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला. तालुक्यातील महत्त्वाच्या आणि मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये दोन्ही ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपची स्थिती आणखी मजबूत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भिवंडीत भाजपची मजबूत होणारी स्थिती रोखण्यासाठी शिवसेनेने तयारी सुरू केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपशी युती न करता इतर पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे यांनी सांगितले. शिवसेनेच्या महायुतीमुळे भाजपला कृषी उत्पन्न बाजार समितीत पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे भाजपने फोडाफोड्याच्या राजकारणाला सुरुवात केली. आगामी निवडणुकांत महायुतीचा पॅटर्न राबविल्यास भाजपसमोरील अडचणींमध्ये मोठी वाढ होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. खासदार कपिल पाटील यांनी तालुक्यातील अनेक गावांचा योजनाबद्ध पद्धतीने विकास सुरू केला. त्याचप्रकारे आमच्या गावाचाही विकास होईल, असा विश्‍वास आहे.

बुलेट ट्रेनमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रास विलंब

E-mail Print PDF
मुंबई - बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकासाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील ०.९ हेक्टर जमिनीवर आणि भूमिगत जागा देत असल्याने ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रा’च्या (आयएफएससी) इमारतीच्या पायाचे आणि भूमिगत पार्किंगचे काम रेल्वेने करून देण्याची अट राज्य सरकारने घातली आहे. त्यामुळे हे काम पूर्ण होईपर्यंत वित्तीय सेवा केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सुरू करणे अशक्य असल्याने हे केंद्र रखडण्याची भीती आहे. मात्र गुजरातमधील ‘गिफ्ट’ वित्तीय केंद्राची वाटचाल वेगाने होत असून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला त्याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे.
बुलेट ट्रेनसाठी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुजरातमधील साबरमती येथे गुरुवारी भूमिपूजन होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यास उपस्थित राहणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र व गुजरात सरकार प्रत्येकी २५ टक्के वाटा उचलणार असून केंद्र सरकारचा हिस्सा ५० टक्के आहे. या एक लाख १० हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पासाठी ८८ हजार कोटी रुपये जपानी वित्तसंस्था कर्जरूपाने उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने वांद्रे-कुर्ला संकुलातील वित्तीय सेवा केंद्र परिसरातील ०.९ हेक्टर जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वित्तीय सेवा केंद्राच्या इमारतीच्या खाली बुलेट ट्रेनचे भूमिगत स्थानक असणार आहे व पार्किंगचीही व्यवस्था राहणार आहे. त्यासाठी भूमिगत तीन-चार मजली बांधकाम केले जाणार आहे. मात्र हे बांधकाम आणि वित्तीय सेवा केंद्राच्या इमारतीच्या पायाचे बांधकाम रेल्वेने करून देण्याची अट राज्य सरकारकडून सामंजस्य करारामध्ये घालण्यात आली आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम २०२२ पर्यंत होणार आहे. वित्तीय सेवा केंद्राचा प्रकल्प आधीच अनेक वर्षे रखडला असून गुजरातमध्ये ‘गिफ्ट’ वेगाने कार्यरत होत आहे. मुंबईतील अनेक आर्थिक व्यवहार व व्यवसाय तेथून होत आहेत. केंद्र सरकारने मुंबईच्या वित्तीय सेवा केंद्राच्या मंजुरीस विलंब लावला आहे.

Page 1 of 160

  • «
  •  Start 
  •  Prev 
  •  1 
  •  2 
  •  3 
  •  4 
  •  5 
  •  6 
  •  7 
  •  8 
  •  9 
  •  10 
  •  Next 
  •  End 
  • »