Monday, Jan 22nd

Headlines:

विदेश

ड्रायव्हर आणि गार्डशिवाय रेल्वे धावली विरुध्द दिशेने

ढाका - बांगलादेशात रविवारी एका वैचित्र्यपूर्ण घटनेत एक रेल्वेगाडी इंजिन ड्रायव्हर किंवा गार्डशिवाय तब्बल २६ किलोमीटर उलटी धावली. राजबार्‍ही येथून फरीदपूरकडे जाणारी ही रेल्वे राजबार्‍हीच्या प्लॅटफॉर्मवर उभी होती. तिला सहा डबे होते आणि त्यात फक्त २३ प्रवासी होते. अचानक रेल्वे इंजिन ऑटो गिअरवर गेले आणि उलट्या दिशेने गाडी धावू लागली. ड्रायव्हर चहासाठी उतरला होता. गाडीत कुणी गार्डही नव्हता. अखेर एका टीसीने व्हॅक्युम ब्रेकचा पाइप सोडून गाडी थांबविण्यात यश मिळविले. या घटनेच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

भारताला १ कोटी ३९ लाख रुपये देण्याचा लंडन कोर्टाचा पाकिस्तानला आदेश

लंडन - हैदराबाद फंड वादात पाकिस्तानचे वर्तन अनुचित असल्याचे सांगून भारताला १ कोटी ३९ लाख रुपये देण्याचा आदेश लंडन कोर्टाने पाकिस्तानला दिला आहे. या वादात पाकिस्तानला हा मोठा दणका बसला असून, त्यामुळे हैदराबाद फंडातील सुमारे ३२६ कोटी रुपये परत मिळवण्याचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे.
हैदराबाद फंड वाद सुमारे ६७ वर्षे सुरू असून त्यात भारत, द नॅशनल वेस्टमिन्स्टर बँक आणि निजामाचे उत्तराधिकारी मुकर्रम जाह व मुफ्फखम जाह यांचा समावेश होता. पाकिस्तानचे या प्रकरणातील वर्तन अनुचित असल्याचे सांगत कोर्टाने पाकिस्तानचे लंडनमधील उच्चायुक्तांना तिन्ही पक्षकारांना मिळून चार लाख पौंड देण्याचा आदेश दिला. यात भारताला एक कोटी ३९ लाख ६१ हजार रुपये, द नॅशनल वेस्टमिन्स्टर बँकेला एक कोटी २२ लाख ८५ हजार ९०० रुपये आणि निजामाच्या वारसांना सहा लाख ४२ हजार रुपये देण्याचा आदेश दिला. पाकिस्तानला सार्वभौम संरक्षण देण्यास कोर्टाने नकार दिल्याने भारताला निजामाचे तीन कोटी पौंड (अंदाजे ३२६ कोटी रुपये) परत मिळवण्यासाठी कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

पाकिस्तानमध्ये लष्कराने ठार केले ८० दहशतवाद्यांना

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या पश्चिम प्रातांतील कबाइली परिसरात शनिवारी लष्कर आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या जोरदार धुमचक्रीत ८० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. यावेळी ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. ही माहिती पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्‌याने दिली आहे. पाकिस्तानी लष्कराने मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिम अधिक तीव्र केली आहे. आतापर्यंतच्या लढाईमध्ये पाकिस्तानी लष्काराला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मोठया प्रमाणात गोळीबार अद्याप सुरुच असून लष्कराने अनेक प्रदेश दहशतवाद्यांकडून मुक्त केले आहेत. यावेळी हवाई हल्ल्‌याचे प्रमाण वाढवले असून ते सुरुच राहणार आहेत. खैबर जिल्ह्यात जमिनी आणि हवाई हल्ले केल्याने ८० दहशतवादी ठार झाले असून १०० पेक्षा अधिक जखमी झालेले आहेत अशी माहिती पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते कंमाडर असिफ बाजवा यांनी दिली आहे.

पाकिस्तानमध्ये एकाच दिवशी १२ दहशतवाद्यांना दिली फाशी

इस्लामाबाद - दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी पाकिस्तान सरकारने कडक पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे मंगळवारी दिसून आले. १२ दहशतवाद्यांना फासावर लटकवण्यात आले. पाकिस्तानमध्ये सहा वर्षांनंतर मृत्युदंडावरील निर्बंध उठवण्यात आल्यानंतरची ही महत्त्वाची कारवाई आहे. दहशतवादी कारवाया आणि हत्येच्या प्रकरणात १२ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. त्या सर्वांना झांग, कराची, लाहोर, रावळपिंडी, मुलतान, मिआनवाली, फैसलाबाद आणि गुरानवाला येथील तुरुंगात फाशी देण्यात आली. १७ डिसेंबर रोजी तालिबानने पेशावरमधील लष्करी शाळेला लक्ष्य केले होते.

पाकिस्तानमधील ख्रिश्‍चन वसाहतीत बॉम्बस्फोट; १० नागरिक ठार

लाहोर - पाकिस्तानच्या योहानाबाद येथील ख्रिश्चनबहुल वसाहतीत दहशतवाद्यांनी आज बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यात १० नागरिक ठार; तर ५५हून अधिक जखमी झाले. ख्रिश्चन वसाहतीतील चर्चला लक्ष्य करून हे स्फोट घडविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानी तालिबान या संघटनेने हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली असून आत्मघाती बॉम्बर्सच्या मदतीनं हा हल्ला घडविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या ठिकाणाला वेढा घातला असून शोधमोहीम सुरू केली आहे.

भारतीय महिलेची हत्या वर्णद्वेषातून झाली नसल्याचा दावा

सिडनी/नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियात आयटी कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या प्रभा अरुण कुमार (४१) यांची हत्या वर्णद्वेषातून झाली नसल्याचा दावा येथील तपास अधिकार्‍यांनी केला आहे. हल्लेखोरांना लवकरात लवकर पकडण्यासाठी सिडनी पोलिसांनी विशेष गुप्तहेर पथक तयार केले आहे. दरम्यान, हल्ला होण्यापूर्वी प्रभा पॅरामेट्टा रेल्वे स्टेशनमधून मोबाइलवर बोलत जात असतानाचे सीसीटीव्ही फूटेज न्यू साउथ वेल्स पोलिसांनी प्रसिद्ध केले असून या घटनेशी संबि्‌ंधत काही माहिती असल्यास पोलिसांना देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. प्रभा यांच्यावरील हल्ला कोणत्याही उद्देशाशिवाय झाला असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे न्यू साउथ वेल्सच्या गुप्तहेर पथकाचे अधीक्षक मायकल विलिंग यांनी म्हटले आहे. ’आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. हल्ला झाला तेव्हा त्या परिसरात असलेल्यांनी पुढे येऊन पोलिसांशी बोलावे, असे आवाहन आम्ही करीत आहोत’, असेही विलिंग म्हणाले. प्रभा यांची हत्या वर्णद्वेषातून झाली नसल्याच्या पोलिसांच्या दाव्याला भारताचे सिडनीतील महावाणिज्य दूत संजय सुधीर यांनीही दुजोरा दिला आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय महिलेवर गुंडांचा खूनी हल्ला

मेलबर्न/बंगळुरू - ऑस्ट्रेलियातील सिडनीच्या माइंडट्री आयटी कन्सल्टंट प्रभा अरुणकुमार ऊर्फ अंकल (४१) यांची शनिवारी त्यांच्या घरापासून जवळच चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. प्रभा त्यांच्या वेस्टमिडस्थित घरालगतच्या पॅरामॅट्टा पार्कमधून पतीशी फोनवर बोलत जात होत्या. तेव्हा त्यांच्यावर हल्ला झाला. प्रभा यांनी फोनवरूनच पतीला घटना कळवली. पॅरामॅट्टाच्या या भागात गुंडांकडून लूटमारीच्या घटना घडतात. याबाबत प्रभा यांच्या एका मित्राने त्यांना सांगितले होते. दरम्यान, हल्ला किती जणांनी व का केला हे अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात भारतीयांविरोधात वर्णद्वेषातून बरेचदा हल्ले झाले होते. बंगळुरूतील प्रभा यांचे नातेवाईक त्रिजेश जयचंद्र यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाला त्या वेळी प्रभा पती अंकल यांच्याशी बोलत होत्या. प्रभा-अंकल दांपत्यास नऊवर्षीय मुलगी आहे. प्रभा एप्रिलमध्ये भारतात येणार होत्या. दरम्यान, अंकल ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाले आहेत.

बोट नदीत उलटून ४८ प्रवाशांचा मृत्यू

ढाका - बांगलादेशमध्ये जवळपास दीडशे प्रवाशांना घेऊन जाणाऱया एका बोटीला अपघात झाला. १५० प्रवाशांपैकी ४८ जणांचे मृतदेह हाती लागल्याचे स्थानिक पोलीस अधिकाऱयांनी स्पष्ट केले. बचाव पथकाने तात्काळ प्रवाशांचा शोध सुरू केला असून आतापर्यंत ३० प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. ही दुर्घटना राजधानी ढाकापासून ४० किलोमीटर उत्तर दिशेला असणाऱया पद्मा नदीमध्ये घडली आहे. एका मालवाहू जहाजाला टक्कर होऊन बोट पलटी झाली आहे. या अपघातात लहान मुलांसह ७ प्रवासी जागीच ठार झाले असून मोठया संख्येने प्रवासी बेपत्ता आहेत. पोलिसांनी बोट चालकासह एकाला अटक केली असून ही बोट राजबारी दौलतदियापासून पतुरियाच्या दिशेने जात होती. बचाव पथकाच्या अधिकाऱयांनी म्हटले की, बोट तब्बल २० फूट खोल पाण्यात बुडाली. त्यामुळे प्रवाशांना नदीपात्राकडे जाण्यात अपयश आले. रविवारी रात्रीपर्यंत नदीपात्रातून ४८ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. स्थानिक पोलीस प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.

दुबईतील सर्वात मोठ्या इमारतीला आग, सुदैवाने जिवीतहानी नाही

संयुक्त अरब अमिरातीच्या दुबईतील सर्वात मोठया ७९ मजली इमारतीला आज सकाळी भीषण आग लागली. या इमारतीमधील हजारो नागरिकांना सुखरूपस्थळी हलविण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे कळते. जगातील सर्वांत उंच निवासी इमारत असलेल्या टॉर्च टॉवरला आज पहाटे दोनच्या सुमारास आग लागली. हवेमुळे ही आग आणखी पसरली. स्काय स्क्रॅपर्स भागातील अनेक मजली इमारतींपैकी ही एक इमारत आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.

Page 2 of 24