Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

इराकमध्ये दहशतवाद्यांची आगेकूच, लष्कर पुरते हतबल

बगदाद - इराकमध्ये दहशतवाद्यांची आगेकूच सुरूच असून, त्यांना रोखण्यात तेथील लष्कर पुरते हतबल ठरत आहे. इराक दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्यापासून रोखण्यासाठी शक्य त्या सर्व पर्यायांचा विचार करण्यात येत असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. या घडामोडींमुळे इराकचे तीन तुकड्यांमध्ये विभाजन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तिक्रित शहराचा ताबा घेतल्यानंतर, सराना शहरावर ताबा मिळविण्यासाठी दहशतवाद्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. दहशतवाद्यांनी शुक्रवारी सकाळीही अनेक ठिकाणी हल्ले केल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. शहराच्या उत्तर, पूर्व आणि आग्नेय भागांमध्ये दहशतवाद्यांचे मोठे गट दिसून येत आहेत. तसेच, सैनिकांनी शांततेमध्ये शहर सोडण्याचे आवाहन दहशतवाद्यांनी केले होते. मात्र, लष्कराने हे आवाहन धुडकावून लावले आहे.

दहशतवाद्यांचे बगदाद शहरावर वर्चस्व मिळवण्यासाठी कूच

किरकूक- सुन्नी मुस्लिमांच्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लॅव्हंट (आयएसआयएल) गटाच्या दहशतवाद्यांनी निनेवेह, किरकूक आणि सलाहेदीन प्रांतासह मोसूल शहरावर वर्चस्व मिळवल्यानंतर त्यांनी बगदादवर नियंत्रण मिळवण्याचा मनुसबा आखला आहे. इराकच्या ढासळलेल्या सुरक्षा स्थितीत बगदादला वाचवण्यासाठी अमेरिका दहशवतवाद्यांविरुद्ध हवाई हल्ले करण्याच्या विचारात आहे. दरम्यान, अमेरिकी फौजांच्या माघारीनंतर उद्भवलेल्या स्थितीत आणीबाणी लागू करण्याबाबत पंतप्रधान, राष्ट्राध्यक्षांनी तातडीची बैठक बोलावली आहे.  आयएसआयएलच्या बंडखोरांनी सोमवारी रात्री सरकारविरोधात युद्ध पुकारले. उत्तरेतील निनेवेह, किरकूक आणि सलाहेदीनमध्ये त्यांनी हल्ले चढवले. येथून ९० कि.मी. अंतरावरील धुलियाह शहर ताब्यात घेतल्यानंतर मुतास्सम प्रदेशही पडला आहे. शिया पंथीयांची धार्मिक स्थळे असलेल्या बगदाद आणि करबला शहरांच्या दिशेने कूच करणार असल्याचा निर्धार आयएसआयएलचा प्रवक्ता अबू मोहंमद अल अदनानीने व्यक्त केला आहे.

ई-मेलवरुन बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी अमेरिकेत भारतीय नागरिकास १८ महिने तुरुंगवास

न्यूयॉर्क - एका महिलेला ई-मेलवरून बलात्काराची धमकी दिल्याबद्दल अमेरिकेतील एका भारतीय नागरिकाला अठरा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कार्तिकेयन नटराजन या २७ वर्षीय भारतीय तरुणाला संघराज्य कायद्याचा भंग केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने त्याला अठरा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याचे अमेरिकन वकील डेव्हिड हिक्टन यांनी सांगितले. न्यायालयाला देण्यात आलेल्या माहितीनुसार, कॅलिफोर्नियास्थित नटराजन याने मागील वर्षी एप्रिल महिन्यात एका महिलेला ई-मेल पाठवून बलात्काराची धमकी दिली होती. अमेरिकन जिल्हा न्यायाधीश नोरा बारी फिशर यांनी नटराजनला शिक्षा सुनावली.

ज्येष्ठ बलुच नेते नवाब मारी यांचे निधन

कराची - ज्येष्ठ बलूच राष्ट्रवादी नेते नवाब खैर बक्क्‌ष मारी (वय ८६) यांची कराचीतील एका स्थानिक रुग्णालयात दीर्घ आजारपणाने निधन झाले. मारी यांनी गेल्या आठवड्यात ब्रेन हॅमरेजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर मंगळवारी रात्री त्यांचे निधन झाले. १९२८ मध्ये जन्म झालेले मारी हे बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे (बीएलए) नेते होते. वेगळ्या बलुचिस्तानसाठी त्यांनी लढा दिला होता. काबुलमध्ये सरकारमध्ये सरकार स्थापनेचा निर्णय झाल्यानंतर ते पाकिस्तानमध्ये परतले होते. मारी यांनी सहा मुले, त्यातील सर्वांत मोठा मुलगा नवाब बलूच मारी याला २००७ मध्ये पाकिस्तान-अफगणिस्तान सीमेवर नाटो फौजांनी ठार मारले होते. मारी यांच्या निधनाने सिंध प्रांताचे मुख्यमंत्री सईद कईम अली शाम, एमक्यूएमचे प्रमुख अल्ताफ हुसेन आणि पीपीपीचे बिलावल भुत्तो झरदारी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

स्टेपल्ड व्हिसा धोरणाचे चीनकडून समर्थन

नवी दिल्ली - भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेशच्या नागरिकांना ‘स्टेपल्ड व्हिसा‘ देणे हे सकारात्मक धोरण असल्याचे सांगत अशा प्रकारच्या धोरणामुळे भारत चीन संबंधांवर परिणाम होणार नाही, असा दावा चीनने केला आहे. अरुणाचल प्रदेशमधील स्थानिक नागरिकांना प्रवास करण्यास अडचण येऊ नये, यासाठी येथील नागरिकांना स्टेपल्ड व्हिसा देण्याचे सकारात्मक धोरण चीनने अंगीकारले आहे. हे धोरण लवचिक आहे व येथील नागरिकांची अडचण होऊ नये, यासाठीच अवलंबिण्यात आले आहे. याचबरोबर, भारतास हे धोरण मान्य असेल, तर भविष्यातही हे धोरण सुरु ठेवता येईल. भारत चीन सीमारेषेच्या वादासंदर्भातील दोन देशांच्या भूमिकांवर या धोरणाचा कोणताही परिणाम होणार नाही,‘‘ असे चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले.

कराची विमानतळावरील हल्ला नरेंद्र मोदी यांनी घडवल्याचा हाफिज सईदचा आरोप

इस्लामाबाद - भारताविरोधात नेहमीच गरळ ओकणारा जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या, २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदनं कराची विमानतळावरील हल्ल्‌याचं खापर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडून पुन्हा खाजवून खरूज काढण्याचा प्रयत्न केलाय. कराची एअरपोर्टवरचा भीषण हल्ला हा पाकवरचा हल्ला आहे. त्यामागे नरेंद्र मोदी यांचं सुरक्षा पथकच आहे. पाकिस्तानातील जनतेला आपला खरा शत्रू पक्का ठाऊक आहे, असं प्रक्षोभक ट्विट हाफिज सईदनं आज पहाटे केलंय. पाक सरकारनं भारतासोबतची भेटींची देवाणघेवाण थांबवावी, असा इशाराही त्यानं दिला आहे. त्याचप्रमाणे, कराचीतील हल्ला हा मोदींचाच कट असल्याचा आरोप जमात उद दावाच्या ट्विटर अकाउंटवरूनही करण्यात आलाय.

कराची विमानतळावर दहशतवादी हल्ला, १० दहशतवाद्यांसह २४जण ठार

कराची - पाकिस्तानमधील कराची शहरातील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी मध्यरात्री सशस्त्र दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात हल्लेखोर दहा दहशतवाद्यांसह २४ जण ठार झाले आहेत. या हल्ल्‌याची जबाबदारी तेहरीक-ए-तालिबान या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. रविवारी मध्यरात्री हँड ग्रेनेड, बॉम्ब व बंदुका घेऊन विमानतळात घुसलेल्या या दहशतवाद्यांनी हल्ला केला. यातील काही दहशतवादी लष्कराच्या गणवेशात आले होते. हल्लेखोर सर्व दहा दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी कारवाई करत ठार केले आहे. सुमार सहा तास ही कारवाई चालली. आता लष्कराने विमानतळावर ताबा मिळविला आहे. दहशतवाद्यांसह ११ जवानांचाही मृत्यू झाला आहे. तर, तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.  घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात स्फोटके व बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत.

तालिबानी अतिरेक्यांच्या हल्ल्यात ७ पाकिस्तानी जवान ठार

पेशावर/ काबूल  - तालिबान अतिरेक्यांनी सीमेपलीकडून केलेल्या हल्ल्यात किमान सात पाकिस्तानी जवान ठार, तर दोन जखमी झाले. अफगाणिस्तानमध्ये भुसुरुंग निकामी करताना झालेल्या स्फोटात पोलिस प्रमुखासह पाच ठार झाले. येथील अन्य एका स्वतंत्र घटनेत लष्करी अधिकार्‍याला गोळा घालून ठार करण्यात आले.  पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील बाजौर आदिवासी जिल्ह्यातील तपासनाक्यांवर तालिबान्यांनी निशाणा साधला. अफगाणिस्तानच्या कुनार प्रांतातून बुधवारी सकाळी तालिबान्यांनी पाक सीमेत प्रवेश केला आणि मानो झांगल भागातील लष्करी नाक्यावर हल्ला चढवला. दुपारनंतर मोखा नाक्यावर निशाणा साधण्यात आला. दिवसभरातील गोळीबारात सात लष्करी जवान ठार झोले.  भुसुरुंग निकामी करत असताना पोलिसप्रमुख व दोन अधिकार्‍यांचा मृत्यू झाला. अन्य एका घटनेत दोन लष्करी अधिकार्‍यांना गोळ्या झाडून ठार करण्यात आले.

अमेरिकेतील प्रभावशाली व्यापार संघटनेच्या भारत विरोधी भूमिकेत बदल

वॉशिंग्टन - अमेरिकेतील उत्पादन क्षेत्रामधील प्रभावशाली संघटनेने भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या आपल्या भूमिकेमध्ये ‘यु टर्न‘ घेतल्याचे आज (गुरुवार) स्पष्ट झाले. मोदी व भारतविरोधासाठी ओळखल्या जाणार्‍या या संघटनेने मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे भारत- अमेरिका संबंधांवर सकारात्मक परिणाम होईल, असे मत व्यक्त केले आहे. भारत अमेरिका आर्थिक भागीदारी पुन्हा एकदा रुळावर आणण्याची संधी निर्माण झाली असल्याने अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रामधील व्यावसायिक आशावादी आहेत,‘‘ असे मत येथील राष्ट्रीय उत्पादक संघटनेचे (नाम) कार्याध्यक्ष जे टिमन्स यांनी व्यक्त केले आहे. भारताबरोबर संवादाचे समर्थन करताना टिमन्स यांनी भारतीय अर्थव्यवस्था अधिकाधिक विकसित झालेली पाहण्याची अमेरिकेतील उत्पादक व्यावसायिकांची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले आहे. याचबरोबर, टिमन्स यांनी विविध क्षेत्रांसंदर्भात भारतीय उद्योजकांसमवेत अमेरिकन व्यावसायिकांना काम करण्याची गरज असल्याचेही सांगितले.

Page 9 of 24