Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

इराकमधील दहशतवाद्यांनी घातक रासायनिक अस्त्रांवर ताबा मिळवल्याचा सरकारचा दावा

बगदाद - आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी आपल्या रासायनिक शस्त्र भांडारावर कब्जा केल्याचा दावा इराक सरकारने केला आहे. या भांडारात घातक रसायने भरलेले २५०० अग्निबाण आहेत.   संयुक्त राष्ट्रातील इराकचे राजदूत मुहंमद अली अल हकीम यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांना पत्र लिहून ही माहिती दिली आहे. दहशतवाद्यांनी ११ जून रोजी मुथन्ना परिसरावर कब्जा केला होता. तेथे त्यांनी इराकच्या सरकारी सैन्याकडून शस्त्रास्त्रे आणि अन्य लष्करी उपकरणे हिसकावून घेतली, असे हकीम यांनी माध्यमांना जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.   दहशतवाद्यांनी बंकर   क्रमांक १३ आणि बंकर क्रमांक ४१ ताब्यात घेतले आहे. संयुक्त राष्ट्राच्या २००४ च्या अहवालानुसार या बंकर्समध्ये सोडियम सायनाइड हे अत्यंत विषारी रसायन आहे. त्याचा वापर रासायनिक युद्धात मस्टर्ड गॅससोबत करण्यात येतो.

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती सार्कोजी यांना अटक

पॅरिस (फ्रान्स) - फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सार्कोजी यांना भ्रष्टाचार आणि पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सार्कोजी यांची तब्बल १५ तास कसून चौकशी केली होती. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली, असं वृत्त ’ली मोंडे’ वर्तमानपत्राने प्रकाशित केले आहे. एखाद्या गुन्ह्यात चौकशीनंतर अटक करण्यात आलेले सार्कोजी हे फ्रान्सचे पहिले माजी राष्ट्रपती ठरले आहे. सार्कोजी २००७ ते २०१२ या काळात फ्रान्सचे राष्ट्रपती होते. २००७ आणि २०१२च्या सार्वत्रिक निवडणुकांना लागणारा निधी मिळविण्यासाठी सार्कोजी यांनी पदाचा दुरुपयोग करून अनेक बेकायदेशीर करार करून ठेवले होते, असा त्यांच्यावर आरोप आहे. सार्कोजी यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना दहा वर्षाची जेल होऊ शकते.

विमानावर गोळीबार, महिलेचा मृत्यू

पेशावर- पाकिस्तानमधील पेशावर आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरत असताना बंदूकधारी व्यक्तीने गोळीबार गेला. यामध्ये विमानातील एका महिलेचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. विमान सौदी अरबवरून पेशावरमधील विमानतळावरील धावपट्टीवर उतरत होते. यावेळी एका बंदूकधारी व्यक्तीने विमानाच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विमानामध्ये यावेळी १७८ प्रवासी होते. गोळीबारामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती.

बांगलादेशातही दहशतवाद्यांच्या ४५ छावण्या

आगरताळा - सीमा सुरक्षा दलाचे आणि बॉर्डर गार्ड बांगलादेशचे सलोख्याचे संबंध असले, तरी बांगलादेशात ईशान्येकडील दहशतवाद्यांच्या ४५ छावण्या असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या एका अधिकार्‍याने दिली. यातील २१ छावण्या या ऑल त्रिपुरा टायगर फोर्स‘ (एटीटीएफ) आणि नॅशनल लिबरेशन ऑफ फ्रंट‘ (एनएलएफटी) यांच्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

इराकमधील १६ भारतीयांची सुटका

बगदाद - सुन्नी संघटनेच्या मोसूलमध्ये ताब्यात असलेल्या ४० पैकी एका भारतीयाला तावडीतून पळ काढण्यात यश मिळाले आहे. त्याचबरोबर हिंसाचार सुरू असलेल्या भागातील १६ भारतीयांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याचे केंद्र सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी परिस्थितीचा आढावा घेणारी बैठक झाली. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासूनच्या हिंसाचारामुळे इराकची परिस्थिती आणखी चिघळली.

अपहृत ४८ परदेशी नागरिकांची सुटका

किरकीत- इराकमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपहरण झालेल्या ४८ परदेशी नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये नेपाळ, बांगलादेश, तुर्कस्तान व अजरेबजानमधील नागरिकांचा समावेश आहे. इराकमधील आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने त्यांचे अपहरण केले होते. अपहरण झालेल्यांमध्ये सर्वजण परदेशी नागरिक होते. ते येथील एका रुग्णालयामध्ये काम करत होते. सर्वांना सुखरूप त्यांच्या देशांमध्ये पाठविण्यासाठी मदत केली जाणार आहे, असे पोलिस अधिकारी मेजर नजरल तोरहान अब्दुल रहमान यांनी सांगितले. दरम्यान, दहशतवाद्यांनी ४० भारतीय नागरिकांचे अपहरण केले आहे. यापैकी एकाने सुटका करून घेतली आहे. अन्य भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.

महिला खासदाराचा गोळीबारात गंभीर जखमी होऊन मृत्यू

लाहोर- पाकिस्तानमध्ये दोन दिवसांपूर्वी गोळीबार झालेल्या महिला खासदाराचा आज (शुक्रवार) सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासदार तहिरा असिफ या दोन दिवसांपूर्वी संसदेमध्ये जाण्यासाठी मोटारीमधून निघाल्या होत्या. इक्बाल गावामधून जात असताना एका मोटारसायकवरून आलेल्या बंदूकधारी व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला होता. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा आज सकाळी मृत्यू झाला. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

इराकमध्ये ४० भारतीय नागरिकांचे दहशतवाद्यांकडून अपहरण

नवी दिल्ली - इराकमधील काही शहरांमध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला आहे. मोसूल शहरात एका प्रोजेक्टसाठी काम करणार्‍या ४० भारतीय नागरिकांचे अपहरण झाल्याचे वृत्त आहे. हे अपहरण आयएसआयएसने (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट) केल्याची शंका व्यक्त केली जात आहे. एका वृत्तावाहिनीच्या वृत्तानुसार, भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने अपहरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला असून ४० भारतीय नागरिकांशी संपर्क होत नसल्याचे मान्य केले आहे.  इंग्रजी दैनिक टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, मोसूल येथील भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असताना त्यांचे अपहरण झाले आहे. मोसूल हे तेल विहीरींनी संपन्न शहर आहे. यावर सुन्नी जिहादींनी ताबा मिळवला होता. मात्र, येथील स्थानिक कुर्द नागरिकांनी आयएसआयएस दहशतवाद्यांना पिटाळून लावत या शहरावर ताबा मिळविला आहे.

वझिरीस्तानमध्ये हवाई हल्ल्यात ५० दहशतवादी ठार

इस्लामाबाद - उत्तर वझिरीस्तानातील आदिवासी भागात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हवाई हल्ल्यात ५० दहशतवादी ठार झाले असून, यात प्रामुख्याने उझबेक दहशतवादी आणि कराची विमानतळावर हल्ला करणार्‍या दहशतवाद्यांचा समावेश आहे. देगान आणि दट्टा खेल भागामध्ये आज पहाटे बॉंबवर्षाव करण्यात आला. कराची विमानतळावर हल्ला करणारे दहशतवादी याच भागात दबा धरून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये कराची विमानतळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड ठार झाल्याचे डॉन‘ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. तर, पाकमधील अन्य काही माध्यमांनी ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या शंभर असल्याचे म्हटले आहे.

Page 8 of 24