Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

मुलांना जिवंत ठेवण्यासाठी यझिदी पाजतात स्वत:चे रक्त

बगदाद - इराकमध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या दहशतीने सिंजरच्या डोंगरात लपून बसलेल्या यझिदींनी तहान-भुकेने व्याकूळ आपल्या कच्चा-बच्चांना स्वतःचे रक्त पाजून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला होता.  येथील ८००० लोकांच्या दारुण अवस्थेची माहिती ते डोंगर रांगातून सुरक्षीत बाहेर पडल्यानंतर झाली. सिंजरच्या डोंगरावर लपून बसलेल्या आणि सुरक्षीत राहिलेल्या एकाने स्वतःच्या हाताने अन्न - पाण्यावाचून तडफडत जीव सोडलेल्या आपल्या चार मुलांना काळजावर दगड ठेवून दफन केले.  डोंगरावर त्यांना दफनविधीसाठी जागा देखील नव्हती. त्यामुळे त्याने स्वतःच्या मुलांच्या मृतदेहावर अक्षरशः दगडरचले आणि त्यांना त्याखाली दफन केले. एकाने सांगितले, की अन्न-पाणी नसल्याने मुलांची अवस्था केवलवाणी झाली होती. ते पाहून एका पालकाने स्वतःचा हात कापून आपले रक्त मुलांना पाजले.

हायकोर्टाच्या विरोधानंतरही इम्रान खान आझादी मोर्चा काढणारच

इस्लामाबाद - पाकिस्तानात २०१३ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अफरातफर केल्याचा आरोप करणारे तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान आज ’आझादी मार्च’ काढणार आहेत. लाहोर हायकोर्टाने इम्रान खान आणि पाकिस्तान अवामी तहरीक (पीएटी) पक्षाचे डॉ. ताहिर उल कादरी यांच्या मोर्चावर बंदी घातली असताना कार्यकर्ते मोर्चा काढणारच यासाठी अडून बसले आहेत. पीटीआय आझादी मार्च तर, पीएटी इन्कलाब मार्च काढणार आहे. या मोर्चांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इस्लामाबादमधील अनेक रस्त्यांवर कंटेनर टाकून रस्ते बंद केले गेले आहेत. मोबाईल सेवा अनिश्चित काळासाठी ब्लॉक करण्यात आली आहे.

इराकमधील दहशवताद्यांविरोधात अमेरिकेची हवाई मोहीम सुरु

वॉशिंग्टन - अमेरिकेने इस्लामी स्टेटच्या विरोधात शुक्रवारी उघडलेल्या हवाई मोहिमेत दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आले. अतिरेक्यांना कुर्द राजधानी इर्बिलमध्ये घुसण्यापासून रोखण्यासाठी ही धडक कारवाई करण्यात आली. सिंजार भागातील सुरुवातीच्या बॉम्बहल्ल्‌यात ५५ अतिरेक्यांचा खात्मा झाला, तर ६० जखमी झाले. अमेरिकेने पहिल्या टप्प्यात  लढाऊ विमानांचा उपयोग केला तर दुसर्‍यांदा ड्रोन या मानवरहित विमानांच्या मदतीने बॉम्ब टाकण्यात आले. अमेरिकेच्या दोन एफए-१८ विमानांनी ५०० पौंड (सुमारे २२७ किलो) वजनाचा लेझर गाइडेड बॉम्ब इर्बिल परिसरात डागला. इर्बिलचे संरक्षण करणार्‍या कुर्द सैन्यांवर येथील वाहनांकडून हल्ला करण्यात येत होता. त्याअगोदर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकच्या उत्तरेकडील सुन्नी अतिरेक्यांच्या विरोधातील हल्ल्‌यास गुरुवारी मंजुरी दिली. मानवी दृष्टिकोनातून येथील नागरिकांना अन्नपदार्थांची मदत करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यानुसार राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याअगोदरच अमेरिकेचे हवाई दल सक्रिय झाले होते. सी-१७, सी-१३० विमानामार्फत ६० लिटर स्वच्छ पाण्याच्या बाटल्या आणि भोजनाची ८ हजार पाकिटे रवाना झाली होती.

उत्तर इराकमध्ये हवाई हल्ले करण्याचा बराक ओबामा यांचा आदेश

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी उत्तर इराकमधील दहशतवाद्यांविरोधात आवश्यकता वाटल्यास‘ हवाई हल्ले करण्याचे आदेश अमेरिकन सैन्यास दिले आहेत. शिया सुन्नी पंथांच्या संघर्षामुळे जर्जर झालेल्या इराकमध्ये अमेरिकेच्या सैन्याचा प्रभाव यामुळे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचबरोबर, ओबामा यांनी दहशतवाद्यांचे लक्ष्यस्थान बनलेल्या इराकमधील अल्पसंख्यांकांसाठी मदत पाठविण्याचेही निर्देश सैन्यास दिले आहेत. अमेरिका इराकच्या मदतीकरता येत आहे,‘‘ अशी घोषणा त्यांनी व्हाईट हाऊसमधून केली. इराकमधील सरकारच्या मदतीच्या आवाहनानंतर ही मदत धाडली जात असल्याचे ओबामा यांनी स्पष्ट केले. इराकमधील डोंगराळ भागांमध्ये अन्न पाण्याशिवाय अडकलेल्या हजारो ‘याझिदीं‘साठी अन्न पाण्याची पाकिटे हवाई मार्गाने पाठविण्यात आली. याझिदी समुदाय हा झरतृष्ट्राच्या (झोरॅस्ट्रीयन) शिकवणीशी साम्य असणार्‍या पुरातन धर्माचे पालन करणारा समुदाय आहे. दहशतवाद्यांनी इस्लाम स्वीकारा, इतर धर्म पाळत असल्याबद्दल दंड द्या, स्थलांतर करा; अथवा मृत्युस सामोरे जा, असा निर्वाणीचा संदेश दिल्यानंतर याझिदींनी घरादाराचा त्याग करुन डोंगराळ भागामध्ये पलायन केले होते.

अमेरिकेतील जॉर्जिया शहरात हिंदू मंदिराची तोडफोड

वॉशिंग्टन - अमेरिकेतील धर्मांध लोकांचा फटका हिंदूंच्या मंदिराला बसला असून काही समाजकंटकांनी जॉर्जियातील एका मंदिरात तोडफोड केल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर मंदिरात असलेल्या भगवान शंकराच्या मूर्तीवर काळा रंग ओतला आहे. यामुळे भारतीयांची मने दुखावली गेली आहेत. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार ’मोनरोए’ शहरात विश्व भवन मंदिराच्या सदस्यांना मंदिरात तोडफोड झाल्याचे लक्षात आले. तसेच स्प्रे पेंटने अनेक संदेश मंदिरांच्या भिंतीवर लिहिण्यात आले होते. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

गाझा पट्टीतील संघर्ष प्रकरणी ब्रिटनच्या परराष्ट्र राज्यमंत्री सईदा वारसी यांचा राजीनामा

लंडन - गाझा पट्टीवर सुरु असलेल्या इस्त्रायली आक्रमणाच्याविरोधात ब्रिटनने ठाम भूमिका न घेतल्याच्या निषेधार्थ ब्रिटनच्या वरिष्ठ परराष्ट्र राज्यमंत्री सईदा वारसी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. बहुसांस्कृतिक असलेल्या ब्रिटनच्या मंत्रिमंडळातील त्या एकमेव मुस्लिम चेहरा होत्या. वारसी यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा ट्विटरवरुन केली. ’इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये गाझा प्रश्नावरून सुरू असलेल्या युद्धामध्ये ब्रिटन सरकारचे धोरण न पटल्याने मंत्रिपद सोडत आहे,’ असे वारसी यांनी म्हटले आहे. ’गाझाप्रश्नी सरकारच्या धोरणाला मी यापुढे पाठिंबा देऊ शकत नाही. त्यामुळे अत्यंत खेदाने मी आज सकाळी मी पंतप्रधानांकडे मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे,’ असे वारसी यांनी म्हटले आहे.

इराकमध्ये १५ सुन्नी मुस्लिमांना भर चौकात फाशी

बगदाद - सुन्नी आणि शिया मुस्लिमांमधील वर्चस्व वादामुळे अराजकाच्या गर्तेत बुडालेल्या इराकमध्ये शिया मुसलमानांच्या एका गटाने १५ सुन्नी मुसलमानांना भर चौकात फाशी दिल्याची घटना घडली आहे. त्यामुळे इराकमधील संघर्ष आणखी भडकण्याची चिन्हे आहेत. बगदादपासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबुका शहरात सुन्नी आणि शिया पंथीयांची संमिश्र वस्ती आहे. याच ठिकाणी बुधवारी ही घटना घडली. इस्लामिक स्टेटला (आयसीस) सुन्नींचा पाठिंबा आहे. त्यास विरोध म्हणून दर्शवण्यासाठी शिया मुसलमानांनी हे निर्घृण कृत्य केले. केवळ फाशी देऊनच शिया मुस्लिम थांबले नाहीत तर त्यांनी सुन्नींचे मृतदेह भर चौकात विजेच्या खांबाला लटकवून ठेवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, इराकमधील सदर शहरातील शियाबहुल भागात एका कार बॉम्बच्या स्फोटात १६ लोक ठार झाले आहेत, तर राजधानी बगदादच्या अमीन भागात ५ ठार झाले आहेत.

गाझा पट्टीतील संघर्ष झाला तीव्र

गाझा/जेरूसलेम - आंतरराष्ट्रीय समुदायाने केलेल्या शस्त्रसंधीच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करून इस्रायल आणि हमास यांनी मंगळवारी गाझा पट्टीतील संघर्ष आणखी तीव्र केला. गाझा पट्टीत तीन आठवड्यांहून अधिक काळ सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत एक हजार ८८ पॅलेस्टिनी; तसेच ५६ इस्रायली नागरिक ठार झाले आहेत. पॅलेस्टाइनने केलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलने गाझा पट्टीत हवाई हल्ले सुरू केले आहेत. या भागातील लोकांनी आपली घरे रिकामी करावीत, असा इशाराही देण्यात आला आहे. गाझावर नियंत्रण असलेल्या हमास संघटनेला इस्रायलने लक्ष केले आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत गाझातील वीज निर्मिती प्रकल्पाचेही नुकसान झाले आहे. इस्रायली विमानांनी हमासचा गाझामधील वरिष्ठ नेता इस्माइल हनिया याच्या घरालाही लक्ष्य केले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १ हजार ८८ पॅलिस्टिनी नागरिक ठार झाले आहेत, तर ६ हजार ४७० नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २५२ लहान मुले आहेत, अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली. दरम्यान, गाझा पट्टीतील संघर्षात सोमवारी इस्रायलचे दहा सैनिक ठार झाले. पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हा दुःखदायक दिवस असल्याचे सांगितले.

पेशावरमधील दिलीपकुमार यांचे घर राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्याचा पाकिस्तान सरकारचा निर्णय

पेशावर - ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या पेशवरमधील घराचे रूपांतर संग्रहालयात तातडीने करण्यात यावे, अशी मागणी पेशावरमधील ना्‌गरिकांनी केली आहे. पेशावरमधील घराचे संग्रहालयामध्ये रूपांतर करणे अव्यवहार्य असल्याचे पुरातत्व विभागाने सांगितल्यानंतर तेथील स्थानिकांनी ही मागणी केली आहे. पेशावरमधील सरहद कॉनव्हर्सेशन नेटवर्कचे प्रमुख अदिल झरिफ म्हणाले, ’दिलीपकुमार यांचे घर राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्याची नवाझ शरीफ यांनी केलेली घोषणा निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र, यासाठी आवश्यक प्रशासकीय पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे.’ पेशावरमध्ये दिलीपकुमार यांचे १३० चौरस मीटर आकाराचे घर आहे. दिलीपकुमार यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानाची दखल घेत हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून जतन करण्याचे पाकिस्तान सरकारने ठरविले आहे.

Page 7 of 24