Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

हवाई हल्ल्यात आयएसआयएस दहशतवादी संघटनेचे प्रमुख बगदादी गंभीर जखमी?

लंडन - इराक आणि सिरियाच्या सीमेवर एका वस्तीत बैठकीसाठी एकत्र आलेल्या दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या बड्या नेत्यांवर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी गंभीर जखमी झाल्याचे सांगितल्या जात आहे. इंग्रजी वेबसाईट डेलीमेलने स्थानिक सरकारी सुत्र आणि दोन प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितले आहे की, ज्या घरात आयएसआयएसचे नेते एकत्र आले होते, तेथे या गटाचे सर्वात वरीष्ठ कमांडर अबू अल बगदादीसुध्दा उपस्थित होते. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात अनेक लोक ठार झाले आहेत. हल्ल्यानंतर स्थानिक आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी रस्त्यांवर लाऊडस्पीकरच्या साह्याने जखमींसाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक सुत्रांनी असे ही सांगितले की, या हल्ल्यात हाय प्रोफाईल आयएसआयएसने त्यांच्यावरील उपचारासाठी संपूर्ण रुग्णालयाला खाली करण्यात आले आहे.

इम्रान खानकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक

इस्लामाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांचा परदेशी बँकात असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पाकिस्तानचे विरोधी पक्षनेते इम्रान खान यांनी कौतुक केले आहे. तसेच ’तुम्ही मोदींविषयी बाकी काहीही म्हणा, पण ते एक विश्वासू व्यक्ती आहेत, यात काही शंका नाही,’ असे इम्रानने म्हटले आहे. भारताप्रमाणेच पाकिस्तानने परदेशातील काळा पैसा परत आणण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणीही त्यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ चीन दौर्‍यावर रवाना

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ चीन दौर्‍यावर शुक्रवारी रवाना होत आहेत. या भेटीत उभय देशांत ऊर्जाविषयक करारांवर भर देण्यात येणार आहे. सप्टेंबरमध्ये शरीफ यांची चीन भेट रद्द झाली होती. बीजिंग येथे ८ नोव्हेंबर रोजी शरीफ हे चीनने आयोजित केलेल्या शेजारील देशांच्या नेत्यांच्या परिषदेत सहभागी होतील. १० नोव्हेंबर रोजी सुरू होणा-या आशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन (अपेक) परिषदेच्या पार्श्वभूमीवर शरीफ यांची बीजिंग भेट आयोजित करण्यात आली आहे. या चीन भेटीत शरीफ चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व पंतप्रधान ली केगिआंग यांच्याशी चर्चा करतील.

रशियाचे अध्यक्ष पुतिन जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्ती

न्यूयॉर्क - रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी सलग दुसर्‍या वर्षी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना मागे टाकत जगातील सर्वांत प्रभावशाली नेत्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. फोर्ब्स‘ने प्रसिद्ध केलेल्या या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षात युक्रेनमधील क्रिमिया प्रांत रशियाने आपल्याला जोडून घेतला. तसेच चीनबरोबर अब्जावधी डॉलरच्या गॅस पाइपलाइनच्या प्रकल्पाबाबत करार केला. हा जगातील सर्वांत मोठा बांधकाम प्रकल्प असल्याचे सांगत फोर्ब्स‘ने पुतीन यांना अव्वल स्थान दिले. यामुळे ओबामा यांना प्रथम स्थान गमवावे लागल्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. दोन वेळा पुतीन आणि एकदा चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांनी ही किमया केली आहे. या यादीमध्ये ७२ नेत्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षीच्या यादीतील पहिले पाच नेतेच या वेळीही सर्वोच्च पाचांमध्ये आहेत.

स्विस बँकांमध्ये पैसे ठेवणार्‍यांची नावे जाहीर करण्यावरुन भारत- स्वित्झर्लंडमध्ये मतभेद

वॉशिंग्टन - स्वित्झर्लंडमध्ये करचुकवेगिरी हा गुन्हा ठरत नसल्याने स्विस बँकांमध्ये पैसे ठेवलेल्या भारतीय नागरिकांची नावे जाहीर करण्याबाबत काही मुद्यांवरून भारताशी मतभेद आहेत, अशी माहिती स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍याने मंगळवारी दिली.  स्वित्झर्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाचे कायदेशीर सल्लागार व्हॅलेंटिन झेलवेगर म्हणाले, भारतातील नव्या सरकारने काळा पैशाच्या प्रश्‍नाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे भारताशी असलेले मतभेद लवकरच दूर होण्याची आशा आहे. बेकायदेशीर गोष्टींबाबत बोलायचे झाल्यास बँकिंग गुप्तता पाळण्याची गरज नाही. दुसर्‍या देशांकडून विनंती करण्यात आल्यास माहिती देण्यात येईल. आमच्याकडे बँकिंगबाबत कोणतीही गोपनीयता नाही. मात्र, ग्राहकांबद्दलचे कायदे अतिशय कडक आहेत. भारत सरकारशी केवळ करचुकवेगिरीबाबत चर्चा सुरू असून, अन्य बेकायदेशीर कृत्यांचा यात समावेश नाही.‘

दिवाळीनिमित्त सरकारी सुट्टी देण्याची पाकिस्तानातील हिंदूंची मागणी

इस्लामाबाद - पाकिस्तानात वास्तव्यास असलेल्या हिंदू कुटुंबांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याकडे दिवाळीनिमित्त देशात सरकारी सुटी जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. आम्ही देशभक्त पाकिस्तानी हिंदू आहोत. त्यामुळे ही सुटी आमचा अधिकार आहे, असे हिंदू कौन्सिलचे सदस्य व सत्ताधारी पीएमएलचे खासदार रमेशकुमार वंकवानी यांनी म्हटले आहे.  हिंदू सण-उत्सव साजरे करण्यासाठी सुटी मिळणे हा घटनात्मक अधिकार असून हा मुद्दा आपण संसदेत जोरकसपणे मांडणार असल्याचे वंकवानी म्हणाले. या देशात अल्पसंख्याकांचे प्रश्न मांडण्यासाठी एकही राजकीय पक्ष गांभीर्याने विचार करत नसल्याची टीकाही त्यांनी केली.

बगदादमध्ये कार बॉम्बस्फोटात १५जणांचा मृत्यू

बगदाद - इराकची राजधानी बगदाद येथील शियाबहुल परिसरात भीषण कार बॉम्बस्फोटात १५ जणांचा मृत्यू झाला, तर कमीत कमी ४४ जण जखमी झाले.शनिवारी रात्री हा स्फोट घडवण्यात आला. एका पोलिस अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, आत्मघातकी हल्लेखोराने शौलाजवळील जास्त गर्दीच्या बाजारात स्वत:च्या कारमध्ये स्फोट घडवला. या शक्तिशाली स्फोटात कमीत कमी १५ जणांचा मृत्यू झाला. याच बाजारात अर्धा तास आधी मोठा स्फोट झाला होता. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला, तर १८ जण जखमी झाले.

नवाझ शरीफ यांच्याविरोधात हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण पंतप्रधान व  त्यांच्या मंत्रिमंडळामधील काही मंत्री, उच्चस्तरीय सरकारी अधिकार्‍यांविरोधात हत्येच्या आरोपाखाली बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामाबादमध्ये सरकारविरोधी आंदोलन करणार्‍या निदर्शकांची  हत्या करण्यात आल्यासंदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.    शरीफ व इतरांविरोधात आंदोलकांची हत्या केल्यासंदर्भातील तक्रार नोंदवण्याचा आदेश येथील जिल्हा न्यायाधीशांनी दिल्यानंतर ही तक्रार नोंदवण्यात आली. शरीफ यांच्याविरोधातील हत्येची ही दुसरी  तक्रार आहे. ही तक्रार नोंदवण्यासाठी पाकिस्तान अवामी तेहरिक पक्षाचे नेते मौलवी ताहिर-उल- कादरी  यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली  होती.  यासंदर्भात पाकिस्तानी कायद्यानुसार हेतुपूर्वक हत्या व दहशतवादविरोधी कायद्यामधील कलमही शरीफ यांच्याविरोधात लावण्यात आले आहे. सोमवारी जिल्हा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली

आणखी एका अमेरिकन पत्रकाराचा आयएसआयएस संघटनेकडून शिरच्छेद

वॉशिंग्टन - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने आणखी एका अमेरिकन पत्रकाराचे शीर कापल्याचा दावा केला आहे. मंगळवारी एका सोशल साइटवर पत्रकार स्टीव्हन सॉटलॉफचे शीर कापण्याचा व्हिडिओ जारी केला. ‘अ सेकंड मॅसेज टू अमेरिका’ असे शीर्षक असलेल्या या व्हिडिओमध्ये दहशतवादी सॉटलॉफचे शीर कापताना दाखवण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये सॉटलॉफचा देशाच्या नावाने संदेश दाखवण्यात आला आहे. इराकमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाची किंमत आम्हाला मोजावी लागत असल्याचे, सॉटलॉफ या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. ४० वर्षीय स्टीव्हन नोव्हेंबर २०१३ मध्ये सीरियामधून बेपत्ता झाला होता. जेम्स फॉले याच्या हत्येच्या व्हिडिओमध्येच स्टीव्हनच्या हत्येची धमकी देण्यात आली होती. इराकमध्ये हल्ले बंद केले नाही तर पुढल्या वेळी सॉटलॉफरचीही हत्या केली जाईल अशी धमकी अमेरिकेला देण्यात आली होती. ओबामांच्या पुढच्या पावलावर स्टीव्हनचे भवितव्य अवलंबून असल्याचेही व्हिडिओमध्ये म्हटले होते.

Page 6 of 24