Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

ओसामा बिन लादेनच्या नातेवाईकांची कंपनी बांधणार आफ्रिकेतील सर्वात उंच इमारत

रबात - खात्मा करण्यात आलेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या नातेवाइकांची कन्स्ट्रक्शन कंपनी आफ्रिकेतील सर्वात उंच इमारत बांधणार आहे. आफ्रिकेतील मोरोक्को देशाची आर्थिक राजधानी कासाब्लँका येथे ही कंपनी ५१४ मीटर उंचीची इमारत बांधेल. सौदी अरबचा अलतुर्की होल्डिंग ग्रुप या प्रकल्पावर ९७ अब्ज ५० कोटी रुपये खर्च  होईल.

अभिनेत्री वीणा मलिकला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या एका प्रतिष्ठीत मीडिया ग्रुपचे मालक आणि बॉलिवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री वीणा मलिक व तिच्या पतीला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जियो टीव्हीचे मालक शकील उर रहमानसह वीना व तिच्या पतीला दहशतवादविरोधी कोर्टाने ईशनिंदे प्रकरणी दाखल खटल्यात दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली आहे. जियो टीव्हीवर हा आक्षेपार्ह कार्यक्रम मे महिन्यात प्रसारित झाला होता. त्यात एक धार्मिक गाणे प्रसारित करण्यात आले होते. न्यायाधिश शाबाज खान यांनी टीव्ही होस्ट शाइस्ता वाहिदी हिला देखील २६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याशिवाय सर्व दोषींना पाकिस्तानी १३ लाख रुपये दंड ठोठावला आहे. दंड भरला नाही, तर त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.

अवामी लीग पक्षाचे माजी नेते मुबारक हुसेन यांना सुनावली फाशी

ढाका - बांगलादेशमधील अवामी लीग पक्षाचे माजी नेते मुबारक हुसेन (वय ६४) यांना आज येथील विशेष लवादाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. १९७१ ला पाकिस्तानविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्ययुद्धात ३३ सामान्य नागरिकांचा बळी घेतल्याबद्दल आणि युद्धगुन्हा केल्याबद्दल त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्यांना सत्ताधारी अवामी लीग पक्षातून निलंबित करण्यात आले होते.  मुबारक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या पाच आरोपांपैकी दोन आरोपांमध्ये ते दोषी आढळल्याचे लवादाने म्हटले आहे. २२ ऑगस्ट १९७१ ला ३३ नागरिकांची हत्या केल्याबद्दल त्यांना फाशी, तर युद्धकाळात खून, अपहरण, लूटमारी या आरोपांखाली त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. युद्धकाळात पाकिस्तानने तयार केलेल्या रझाकारांच्या एका गटाचे मुबारक हुसेन हे प्रमुख होते. बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध असणार्‍या जमात ए इस्लामी या मूलतत्त्ववादी गटाशी ते संबंधित होते. मात्र, पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर त्यांनी अवामी लीगमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी युद्धकाळात केलेले गुन्हे उघड झाल्यानंतर पक्षाने दोन वर्षांपूर्वी त्यांना निलंबित केले होते.

भारतीय नेत्यांशी काश्मीरच्या मुद्यावर चर्चा करण्याचा नवाज शरीफ यांचा ओबामा यांच्याकडे आग्रह

इस्लामाबाद - पुढच्या वर्षी भारत दौर्‍यावर येत असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी, भारतात आल्यानतंर काश्मीर मुद्दा उपस्थित करावा, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. ओबामा भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. शुक्रवारी त्यांनी भारताचे निमंत्रण स्विकारले आहे. त्यानंतर शरीफ यांना फोन केला आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सांगितले, की ते भारत दौर्‍यावर जाणार आहेत, त्यामुळे सध्याच ते पाकिस्तानला येऊ शकत नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, ओबामा यांनी शरीफ यांना फोन करुन भारत दौर्‍याची माहिती दिली. ओबामा शरीफ यांना म्हणाले, मी भारताच्या दौर्‍यावर जात असल्यामुळे नजीकच्या काळात पाकिस्तान दौरा करु शकत नाही. त्यामुळे सध्याच पाकिस्तानला येणे शक्य नाही.

इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून आणखी एका अमेरिकन नागरिकाचा शिरच्छेद

बैरूत -सिरियामधून अपहरण केलेल्या एका अमेरिकी मदत पथकातील सदस्य पीटर कसिग याचा शिरच्छेद केल्याचा दावा इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने एका चित्रफितीद्वारे केला आहे. या चित्रफितीमध्ये एकूण १८ जणांना एकत्रित शिरच्छेद केल्याचे दाखवण्यात आले असून यातील बहुतांश सिरियाच्या लष्करातील जवान आहेत. सामूहिक हत्याकांडाची ही सर्वांत भयंकर चित्रफित मानली जाते. चेहरा झाकलेल्या एका दहशतवादी या चित्रफितीमध्ये पीटर एडवर्ड कसिग याच्याबद्दल माहिती देत असल्याचे दाखवण्यात आले असून तो एका धड नसलेल्या शिराजवळ उभा आहे. हे शीर कसिगच्या चेहर्‌याशी मिळतेजुळते आहे. कसिग अमेरिकी नागरिक असल्याचा स्पष्ट उल्लेख हा दहशतवादी करतो. यापूर्वी दोन अमेरिकी पत्रकार आणि दोन ब्रिटिशांचाही शिरच्छेद झाला होता.

पंतप्रधान मोदींसमोर सादर करण्यात आला भारताचा वादग्रस्त नकाशा

ब्रिस्बेन - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याची शुक्रवारी वादग्रस्त सुरुवात झाली. क्वीन्सलँड तंत्र विद्यापीठात पंतप्रधानांच्या समोर झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये भारताचा वादग्रस्त नकाशा दाखवण्यात आला होता. त्यात जम्मू-काश्मीर प्रदेश गायब होता. त्यानंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर आयोजकांनी आपल्या कृतीबद्दल माफी मागितली. दरम्यान, पाच दिवसांच्या दौर्‍यात मोदी जी-२० देशांच्या शिखर बैठकीत काळ्या पैशांचा मुद्दा जोरकसपणे मांडणार आहेत. परराष्ट्र सचिव सुजाता सिंह यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यानंतर आयोजकांनी प्रेझेंटेशनमधील वादग्रस्त नकाशा बाजूला काढला. ही माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांना दिली.

परदेशी बँकांत दडवलेला काळा पैसा भारतात आणण्यासाठी इतरही देशांशी करार

संयुक्त राष्ट्रे - परदेशातील बँकांत दडवण्यात आलेला काळा पैसा भारतात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून भारताने गुरुवारी कॅरेबियन बेटांवरील सेंट किट्टस आणि नेविस या देशांसोबत माहितीचे आदान-प्रदान करण्यासंदर्भातील करार केला. हे दोन्ही देश परदेशात बेकायदा पैसे ठेवण्यासाठी सुरक्षित ठिकाण म्हणून ओळखले जातात. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे कायम प्रतिनिधी अशोक कुमार मुखर्जी आणि सेंट किट्टस नेविसचे संयुक्त राष्ट्रांतील कायम प्रतिनिधी देलानो फ्रँक बार यांनी येथील भारतीय दूतावासामध्ये या करारावर स्वाक्षर्‍या केल्या. हा करार कर माहिती आदानप्रदानाच्या अन्य करारांसाराखाच असून त्याच्या कक्षेत दोन्ही देशांनी लागू केलेले कर येतील. त्यात दोन्ही देशांतील करविषयक स्थानिक कायद्यांची अंमलबजावणी, कर दावे आणि खटल्यांसंदर्भातील माहिती आदींचा समावेश आहे. या करारात बँकिंग व्यवहारांची माहिती, कंपन्यांच्या मालकीबाबतची माहिती तसेच दोन्ही देशांतील स्थानिक कायदे व करांच्या अंमलबजावणी संबंधित माहितीचाही अंतर्भाव असेल, अशी माहिती भारतीय दूतावासाने एका पत्रकाद्वारे दिली.

व्हाईट विडो नावाने कुख्यात महिला दहशतवादी ठार झाल्याचा रशियाचा दावा

लंडन - दहशतवादी संघटना आयएसआयएससाठी लढणारी ब्रिटीश महिला दहशतवादी समांथा ल्यूथवेट मारली गेल्याचा दावा रशियाच्या वृत्तसंस्थेने केला आहे. समांथाला रशियाचा स्नायपरने मारल्याचे त्यात वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ब्रिटनच्या मोस्ट वॉंटेड यादीतील ३० वर्षीय समांथा ’व्हाइट विडो’ नावाने कुख्यात होती.  वृत्तसंस्थेने दावा केला आहे, की ज्या स्नायपरने समांथाला ठार केले आहे, त्याला रशिया सरकारने १० लाख डॉलर देण्याची घोषणा केली आहे. ’व्हाइट विडो’ने दोन महिन्यांपूर्वी आयएसआयएस (इस्लामिक स्टेट) जॉइन केले आहे. सीरियामध्ये महिला आत्मघाती पथकाला प्रशिक्षण देण्याची महत्त्वाची जबाबदारी तिला देण्यात आली आहे. ब्रिटनची वेबसाइट डेली मेल च्या वृत्तात ’व्हाइट विडो’ इस्लामिक स्टेटचे मुख्यालय रक्कामध्ये महिलांना प्रशिक्षण देतानाचे छायाचित्रात दाखविले होते. आयएसआयएस जॉइन केलयनंतर या दहशतवादी संघटनेतील उच्चपदस्थ नेत्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून ब्रिटन, अमेरिका आणि केनिया येथील सुरक्षा यंत्रणा तिचा शोध घेत होते.

पाकिस्तानमध्ये सुरु आहे मलालाचा निषेध

इस्लामाबाद - तालिबानचा दहशतवाद झुगारून पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करणारी नोबेलविजेती छोटी समाजसेविका युसूफझाई मलाला हिच्याविरोधात पाकिस्तानातील शाळांमध्ये सोमवारी ’मलाला दिन’ पाळण्यात आला. ’आय ऍम नॉट मलाला’ अशा घोषणा शाळांमधून दिल्या गेल्या. तालिबानी दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन वर्षांपूर्वी मलाला जखमी झाली होती. मरणाच्या दारातून परतल्यानंतरही मलालाने तालिबानच्या विरोधाला न जुमानता पुन्हा स्वत:च्या आणि अन्य मुलींच्या शिक्षणासाठी काम सुरू केले होते. यासाठी तिला यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. त्यानंतर जगभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच पाकिस्तानात मलालाचा निषेध सुरू झाला आहे.

Page 5 of 24