Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार लख्वीला पुन्हा न्यायालयीन कोठडी

इस्लामाबाद - मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार झकी उर रेहमान लख्वी या दहशतवाद्याला येथील न्यायालयाने अफगाणिस्तानच्या नागरिकाचे अपहरण केल्याप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगातच पुन्हा पाठविण्यात आले आहे. लख्वीला येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सर्व बाजूंनी टीका झाल्याने पाकिस्तान सरकारने त्याची सुटका होण्याआधीच त्याला सुरक्षितता कायद्यांतर्गत ताब्यात घेतले होते. मात्र, इस्लामाबाद उच्च न्यायालयाने ही अटक नियमबाह्य ठरवत लख्वीला सोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, सरकारने लख्वीने सहा वर्षांपूर्वी केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांतर्गत त्याला अटक करत आपल्याच ताब्यात ठेवले. त्याला आज न्यायालयासमोर सादर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली असून, पुढील सुनावणी १५ जानेवारीला होणार आहे. महंमद अन्वर खान या अफगाणी व्यक्तीचे लख्वीने अपहरण केल्याचा त्याच्यावर आरोप असून, तसा गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार लख्वीने खान याच्यावर जिहादी होण्यासाठी दबाव आणला होता. मात्र, खानने यास नकार दिल्यावर लख्वीने त्याचे अपहरण केले, असा खानच्या भावाने आरोप केला आहे.

अपघातग्रस्त विमानातील एका मृतदेहावर लाइफ जॅकेट आढळल्याने गूढ

जाकार्ता/सिंगापूर - इंडोनेशियाहून सिंगापूरला जाणार्‍या एअर एशियाच्या अपघातग्रस्त विमानातील एका मृतदेहाच्या अंगावर लाइफ जॅकेट आढळले आहे. त्यामुळे विमान समुद्रात कोसळताना अखंड होते की त्याचे तुकडे झाले होते, याचे गूढ वाढले आहे. या मृतदेहाच्या शरीरावर जॅकेट असल्यामुळे, विमान कोसळताना किंवा कोसळल्यानंतर प्रवाशांना काही काळ मिळाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, विमानाचे अवशेष समुद्राच्या तळाशी असल्याचे शोधकार्यात समोर आले आहे. अवशेषांसह मृतदेह शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, खराब हवामानामुळे या कामात अडथळे येत आहेत.

चीनची युवती बनली सर्वात कमी वयाची अब्जाधीश

बीजिंग - चीनच्या २४ वर्षांची युवती १.३ अब्ज डॉलर संपत्तीसह जगातील सर्वात कमी वयाची अब्जाधीस बनली आहे. नुकतेच फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत तरुण वर्गाची यादी प्रसिध्द केली आहे. पेरेन्ना के या तरुणीने  फेसबुकचे सहसंस्थापक डस्टिन मोस्कोवित्झचे स्थान घेतले आहे. एका अहवालानुसार चीनचे रिअल इस्टेट डेव्हलपर लोगान प्रॉपर्टीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी हॅपेंगची कन्या पेरेन्ना के कंपनीची बाह्य कार्यकारी संचालक आहे. १.३ अब्ज डॉलर संपत्तीसह कंपनीमध्ये पेरेन्नाची ८५ टक्के भागभांडवल आहेत.पेरेन्ना लंडन विद्यापीठाची पदवीधर आहे. ती हॉंगकॉंगमध्ये राहते.

एअर एशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध सुरु, समुद्रात कोसळल्याचा अंदाज

जाकार्ता - इंडोनेशियातील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर रविवारी सकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानाचा अद्याप नेमका ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, हे विमान समुद्रात कोसळल्याचा अंदाज इंडोनेशियाने व्यक्त केला असून त्यादृष्टीनं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. मलेशियन विमान कंपनी असलेल्या ’एअर एशिया’चे क्यूझेड ८५०१ हे विमान रविवारी पहाटे ५.२० वाजता सिंगापूरसाठी रवाना झाले होते. सिंगापूरच्या चंगी विमानतळावर ते सकाळी ८.३० वाजता उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर ४२ मिनिटांतच ते बेपत्ता झाले. खराब हवामानामुळे पायलटने विमानाचा नियोजित मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर विमानाचा रडारशी संपर्कच तुटला होता. तब्बल ३० तास उलटल्यानंतरही विमानाच्या ठावठिकाण्याबद्दल केवळ शंकाकुशंकाच व्यक्त होत आहेत. इंडोनेशिया सरकारने कालपासूनच विमानाच्या शोधाचं काम सुरू केलं आहे.

अमेरिकेत आणखी एका कृष्णवर्णीयाची हत्या

बर्कली - अमेरिकेत आणखी एक कृष्णवर्णीय तरुण मंगळवारी रात्री सेंट लुईस येथे पोलिस गोळीबारात मारला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ऍन्टोनिओ मार्टिन (१८) असे त्याचे नाव आहे. या घटनेनंतर बुधवारी शेकडो निदर्शकांनी घटनास्थळी निदर्शने केली. सेंट लुईसमधील गॅस स्टेशनजवळ गस्त घालत असताना पोलिसांना दोन व्यक्ती दिसल्या. त्यांच्याजवळ जाताच दोघांपैकी एक असलेल्या मार्टिनने पोलिसांवर गन रोखली. त्यावेळी बजावासाठी केलेल्या गोळीबारात तो तरुण ठार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, मार्टिन त्यावेळी आपल्या मैत्रिणीसोबत होता, असा दावा त्याच्या आईने केला आहे.

लिंट कॅफेतील दहशतवादी नाट्याची अखेर; दहशतवादी ठार

सिडनी - ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये मध्यवस्तीत असलेल्या ’लिंट कॅफे’मध्ये सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास हॅरॉन मोनिस या सशस्त्र इराणी अपहरणकर्त्याने सुमारे १५ लोकांना ओलिस ठेवल्याने सुरू झालेला थरार हॅरॉनला कंठस्नान घातल्यानंतर तब्बल १७ तासांनी संपला. ओलिसांमध्ये इन्फोसिसमध्ये काम करत असलेल्या आंध्र प्रदेशच्या सॉफ्टवेअर इंजिनीअरसह आणखी एका भारतीयाचा समावेश होता. हॅरॉन मोनिस हा १९९६ पासून ऑस्ट्रेलियात शरणार्थी म्हणून राहत होता. स्वयंघोषित धर्मगुरू असल्याचा दावा करणार्‍या मोनिसवर त्याच्या माजी पत्नीच्या खुनाचा आणि सात महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. परदेशात मृत्युमुखी पडलेल्या ऑस्ट्रेलियातील सैनिकांच्या कुटुंबीयांना धमकीची पत्रे लिहिण्याची त्याला सवय होती. त्याने सोमवारी सिडनीतील कॅफेमधील उपस्थितांना ओलिस ठेवून सिडनीमध्ये दहशतवादाचा थरार घडवून आणला. त्याने हे कृत्य का केले, त्याचा नेमका हेतू काय, याबद्दल अजूनही काहीही स्पष्ट झालेले नाही.

मुलाला जन्म देण्यासाठी माता गेली मृत्यूला सामोरी

बीजिंग - पोटातील गर्भाच्या जिवासाठी चीनमधील एका महिलेने कर्करोगावर केमोथेरपीचे उपचार न घेता मृत्यूला सामोरे जाणे पसंत केले आहे. एका दूरचित्रवाणी वाहिनीवर निवेदक असलेल्या या महिलेच्या त्यागाने लाखो लोक भारावून गेले आहेत.  क्वि युआनयुआन (वय २६) असे त्या महिलेचे नाव आहे. त्या महिलेने अर्भकाला जन्म दिल्यानंतर शंभर दिवसांनी तिचा मृत्यू झाला. हेनानच्या मध्य प्रांतातील झेंगझू येथे ही घटना घडली आहे. क्वि ही झेंगझू दूरचित्रवाणी वाहिनीवर बुद्धिबळ गेम शोची निवेदक होती. तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले. कर्करोग शेवटच्या टप्प्यात असतानाही गर्भवती असल्याने गर्भाला धोका होऊ नये यासाठी तिने केमोथेरपी न घेण्याचा निर्णय तिने घेतला. त्यामुळे कर्करोग आणखी बळावला. तिची प्रकृती खालावल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिचा मुलगा निआनियन याचा जन्म झाला. यानंतर तिने कर्करोगासाठी शस्त्रक्रिया केली; परंतु त्यासाठी उशीर झाला होता. तब्बल वीस दिवस केमोथेरपीचे उपचार घेऊनही ती जगण्याची शक्यता फारशी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे तिला घरी सोडण्यात आले. चीनमध्ये मुलाच्या जन्मानंतर शंभर दिवसांनी धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. शुक्रवारी हा कार्यक्रम झाल्यानंतर क्वि हिचा मृत्यू झाला.

कैलास सत्यार्थी यांना शांततेचे नोबेल पारितोषिक प्रदान

ओस्लो (नॉर्वे) - नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे झालेल्या शानदार सोहळ्यात आज भारतासह आशिया खंडात बालहक्कांसाठी झटणारे कैलाश सत्यर्थी तसेच पाकिस्तानातील शिक्षण हक्क कार्यकर्ती मलाला युसुफजई यांना शांततेचे ’नोबेल’ प्रदान करण्यात आले. भारत आणि पाकिस्तानातील दोन व्यक्तींना एकत्रपणे असा सर्वोच्च सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याचवेळी मलालानेही सर्वात कमी वयात या पुरस्कारावर नाव कोरण्याची किमया केली आहे. नोबेल पुरस्कार वितरण सोहळ्यात भारत आणि पाकिस्तानचे अनेक अर्थाने मनोमिलन पहायला मिळाले. भारताची शान असलेले सरोदवादक उस्ताद अमजद अली खान यांचे सरोदवादन आणि पाकिस्तानातील दिग्गज गायक राहत फतेह अली खान यांची कव्वाली या सोहळ्याचे खास आकर्षण ठरले. सोहळ्यात प्रथम कैलाश सत्यर्थी यांना तर त्यांच्यानंतर मलाला हिला नोबेल प्रदान करण्यात आले.

दहशतवादी संघटनेचा नेता हाफीज सईदचे ट्विटर अकाऊंट कंपनीकडून बंद

नवी दिल्ली - भारता विरोधात कायम गरळ ओकणार्‍या आणि मुंबईच्या २६/११ हल्ल्यातील मुख्य आरोपी हाफीज सईदचे ट्विटर अकाउंट बंद करण्यात आले आहे. कंपनीने असे पाऊल उचलल्याने ट्विटरची पारदर्शकता आणि विश्वासार्हता वाढली आहे. कंपनीने घेतलेल्या या भूमिकेचे जगभरातून कौतुक होते आहे. पाकिस्तानातील जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा नेता हफीझ सईद हा कायम भारता विरोधी चिथावणीखोर ट्विट करत होता. वादग्रस्त विधाने करून भारताविरोधी वातावरण तापवायचे, स्वतंत्र काश्मीरचा मुद्दा कुरवाळायचा, असे प्रकार हाफीज करत होता. बांगलादेश युद्धाचा बदला पाकिस्तान नक्की घेईल आणि काश्मीरला स्वतंत्र करेल, असे ट्विट त्याने काही दिवसांपूर्वी केले होते. या ट्विटवरून प्रचंड टिका झाली. अशा ट्विट्समुळे ट्विटरच्या प्रतिमेलाही सतत धक्का लागत असल्याने अखेर हाफीजचे अकाउंट बंद करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला.

Page 4 of 24