Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

मंगळ मोहिमेत तीन भारतीयांचा समावेश

लंडन - मंगळावर २०२४मध्ये मानव पाठविण्याच्या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेल्या १०० जणांमध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे. यामध्ये भारताच्या दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. या शंभर जणांपैकी ४० जणांची अंतिम मोहिमेसाठी निवड करण्यात येणार असून, त्यांना कायमस्वरूपी मंगळावर पाठविण्यात येणार आहे. नेदरलँडमधील ’मार्स वन ऍस्ट्रोनट सिलेक्शन प्रोसेस’ या संस्थेने ही मोहीम आखली आहे. यासाठी सुरुवातीला दोन लाख दोन हजार ५८६ जणांचे अर्झ आले होते. विविध पातळ्यांवर चाचण्या घेतल्यानंतर यातील ५० पुरुष आणि ५० महिलांची निवड करण्यात आली आहे. अंतिम फेरीमध्ये निवड झालेल्या व्यक्तींना सात वर्षे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या १०० जणांमध्ये अमेरिकेतील ३९, युरोपातील ३१, आशियातील १६, आफ्रिकेतील ७ आणि ऑस्ट्रेलिया व परिसरातील सात जणांचा समावेश आहे. तरनजीतसिंग भाटिया, रितिका सिंह आणि श्रद्धा प्रसाद या भारतीय व्यक्तींचा या यादीमध्ये समावेश आहे.

आयसिसच्या दहशतवाद्यांनी जाळले जॉर्डनच्या पायलटला

अम्मान - दोनच दिवसांपूर्वी जपानी पत्रकाराचा शिरच्छेद करणार्‍या ’आयसिस’च्या दहशतवाद्यांनी आज जॉर्डनच्या एका पायलटला जिवंत जाळलं. तसा व्हिडिओच आयसिसनं प्रसिद्ध केल्यामुळं खळबळ उडाली आहे. आयसिसच्या या राक्षसी कृत्याला तत्काळ प्रत्युत्तर देत जॉर्डननं त्यांच्या ताब्यातील आयसिसच्या दोन दहशतवाद्यांना फासावर लटकवलं आहे. पृथ्वी हादरून जाईल, असा बदला घेण्याची धमकीही जॉर्डन सरकारनं दिली आहे. आयसिसनं प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये हत्यारबंद दहशतवादी विकट हास्य करत जॉर्डनच्या पायलटला पकडून कुठेतरी घेऊन जाताना दिसत आहेत. त्यानंतर त्याला एका बंदिस्त पिंजर्‍यात उभं दाखवण्यात आलं असून पिंजर्‍याच्या आजूबाजूला आग दिसत आहे. जिवंत जाळली गेलेली व्यक्ती नेमकी कोण होती, याविषयी सुरुवातीला साशंकता होती. मात्र, ही व्यक्ती आमचीच असल्याचं जॉर्डननं स्पष्ट केलं आहे.

संयुक्त राष्ट्रांत दहशतवादाच्या मुद्यावर रशिया आणि चीन भारताच्या बाजूने

बीजिंग - संयुक्त राष्ट्रांत दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानच्या विरोधात एका प्रस्तावावर रशिया आणि चीन भारताच्या बाजुने असणार आहेत. चीन पाकिस्तानच्या अधिक जवळचा मानले जाते. त्यामुळे हा पाऊल भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. भारत संयुक्त राष्ट्रांत एक प्रस्ताव सादर करणार आहे. त्यात २६/११ च्या हल्लेखोरांना मदत आणि आश्रय देणार्‍यांच्या विरोधात कारवाई आणि निषेध प्रस्तावाची मागणी केली जाणार आहे.
सोमवारी जेव्हा हा प्रस्तात संयुक्त राष्ट्रांत दाखल करण्यात आला त्यावेळी समर्थकांमध्ये चीन आणि रशियाचाही समावेश होता. दहशतवादाच्या विरोधात जागतिक प्रयत्नांच्या दिशेने दोन्ही देशांचे हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. भारताच्या दृष्टीनेही ते अत्यंत चांगले संकेत आहेत. चीनच्या दौर्‍यावर असलेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी हे पाऊल अत्यंत सकारात्मक आणि भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे यश असल्याचे म्हटले आहे. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर सुषमा यांनी ही प्रतिक्रिया दिली.

युरोपीय देशांत आंबा निर्यातीचा मार्ग मोकळा

लंडन - भारताने वनस्पती आरोग्य नियंत्रण व प्रमाणपत्र प्रक्रियेत लक्षणीय सुधारणा केल्यामुळे युरोपीय संघाने मंगळवारी भारतीय आंब्याची आयातबंदी उठविली. युरापीय संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे २८ सदस्य देशात मार्चपासून भारतीय आंबा येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे कोकणसह देशातील शेकडो आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. वनस्पती आरोग्यासंदर्भात नियामक समितीच्या बरोबर ‘मेंबर्स स्टेट एक्स्पर्ट’च्या झालेल्या चर्चेमध्ये भारतातील आंबा आयातबंदी उठविली असल्याची घोषणा करण्यात आली. सप्टेंबर २०१४ मध्ये आयोगाच्या अन्न आणि पशुवैद्यकीय कार्यालयाच्या अहवालात आंबा मान्यता प्रमाणपत्र प्रणालीमध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे दिसून आले. १ मे २०१४ पासून भारतीय आंब्यावर तात्पुरती आयातबंदी घालण्यात आली होती. ही बंदी डिसेंबर २०१५ पर्यंत कायम करण्यात आलेली होती. युरोपियन समितीच्या बैठकीनंतर भारत कीटकनाशक मुक्त आंबा फळे निर्यात करण्याची खात्री असल्याचे युरोपने म्हटले आहे. मार्च २०१५ मधील आंबा हंगाम सुरू होण्यापूर्वी आयातीची परवानगी देण्यात आली आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. युरोपियन आयोगाने प्रकाशित केलेला अहवालास कायदेशीर मान्यता मिळणे आवश्यक आहे.

मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंडला भारताकडे सोपवण्याचा अमेरिकेचा पाकिस्तानला इशारा

लाहोर/इस्लामाबाद - मुंबई हल्ल्यातील मास्टरमाइंड झकीउर रहमान लख्वीला भारताकडे सोपवण्याचा इशारा अमेरिका आणि ब्रिटनने पाकला दिला आहे. भारतात लख्वीवर स्वतंत्र खटला चालवता येईल, यामुळे भारत-पाकदरम्यानचे संबंधही सुधारतील, असे दोन्ही देशांनी म्हटले आहे. सोमवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांनी लख्वी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. न्यायालयाने दोन्ही देशांची नावे स्पष्ट केली नव्हती, मात्र नंतर गृहमंत्रालयाकडून पत्रकारांसमोर ती उघड करण्यात आली. सरकारी वकिलांना उत्तर देताना हायकोर्टाचे जज शौकत अजिज सिद्दिकी म्हणाले, ‘सरकारला घाई असल्यास हे प्रकरण लष्करी न्यायालयात वर्ग करावे. तसेही लख्वीला दुस-या देशाकडे सुपूर्द करणे हा धोरणात्मक मुद्दा आहे. यावर सरकारला विचार करायचा आहे. कोर्टाचे या प्रकरणाशी फार देणे-घेणे नाही.’ २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या मुंबई हल्ल्याचा कट रचणे तसेच हल्लेखोरांना प्रशिक्षण आणि मदत करण्याचा आरोप लख्वीवर आहे. या हल्ल्‌यात अमेरिकन नागरिकांसह १६६ जणांचा बळी गेला होता. डिसेंबर २००८मध्ये लख्वीला अटक झाली होती.

अमेरिकेला पाकिस्तानला भरला सणसणीत दम

वॉशिंग्टन - प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर येत असतानाच, या दौर्‍यादरम्यान सीमेवरून कोणतीही दहशतवादी कारवाई किंवा तसा प्रयत्नही होता कामा नये, असा सणसणीत दम अमेरिकेने पाकिस्तानला भरला आहे. अशा हल्ल्‌याचा संबंध पाकिस्तानशी असल्याचे समोर आले, तर गंभीर ’परिणाम’ होतील, असा गर्भित इशाराही अमेरिकेने दिला आहे, अशी माहिती येथील सूत्रांनी दिली. ओबामा २५ जानेवारीला येथे दाखल होत असून, प्रजासत्ताक दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ते पहिलेच अमेरिकी अध्यक्ष ठरणार आहेत. राजपथावर २६ जानेवारीला होणार्‍या सोहळ्यात ते तब्बल दोन तास खुल्या व्यासपीठावर विराजमान होणार असल्याने भारतीय, तसेच अमेरिकी सुरक्षा यंत्रणा या दौर्‍यासाठी कमालीची दक्षता बाळगत आहेत.

श्रीलंकेत सत्ता परिवर्तन, मैथ्रीपाल सिरीसेना नवे राष्ट्राध्यक्ष

कोलंबो - भारताच्या शेजारील राष्ट्र श्रीलंकेत सत्ता परिवर्तन झाले आहे. विरोधी पक्ष न्यू डेमोक्रॅटिक फ्रंटचे (एनडीएफ) नेते मैथ्रीपाल सिरीसेना हे देशाचे नवे राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांनी महिंदा राजपक्षे यांना हरवले. एएफपीच्या वृत्तानुसार, सिरिसेना शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊ शकतात. निवडणूक मतमोजणीत मागे पडल्याने महिंदा राजपक्षे यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. आतापर्यंत ३२ लाख ६० हजार मतांची मोजणी झाली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यात सिरसिेना यांना ५१.३, तर राजपक्षे यांना ४६.९ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्राध्यक्ष पदावर राहिलेले राजपक्षे यांनी दोन वर्षे बाकी असताना निवडणुका घेतल्या. परंतु या निर्णयाचा पूर्ण फायदा सिरिसेना यांना मिळाले.

पॅरिस येथील साप्ताहिकाच्या कार्यालयावर दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी शरण

पॅरीस - पॅरिस येथील ’चार्ली हेब्डो’ या व्यंग साप्ताहिकाच्या कार्यालयावर हल्ला करून १२ लोकांचा जीव घेणार्‍या तीन दहशतवाद्यांपैकी एकाने स्वत:हून पॅरिस पोलिसांपुढं शरणागती पत्करली आहे. बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तो पोलिसांपुढे हजर झाला, असे वृत्त एएफपीने दिले आहे. एएफपीच्या वृत्तानुसार, शरण आलेला दहशतवादी अवघा १८ वर्षांचा असून हमीद मोराद असं त्याचं नाव आहे. त्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. उरलेल्या दोन हल्लेखोरांना पकडण्यासाठी फ्रान्स पोलिसांनी युद्धपातळीवर शोध सुरू केला आहे. या हल्लेखोरांची ओळख पटल्याचा दावा फ्रान्स पोलिसांनी केला आहे. रॉयटर्सच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, सईद क्वाची आणि शेरीफ क्वाची अशी या दोघांची नावे आहेत. यातील एक यापूर्वीच्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही सामील होता. फ्रान्सच्या उत्तर पूर्व भागातील रिएम्स शहरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. संशयित हल्लेखोर येथीलच रहिवाशी असल्याचा पोलिसांचा कयास आहे. ’चार्ली हेब्डो’च्या कार्यालयावर बुधवारी रॉकेट लॉंचर्स आणि बंदुकीच्या सहाय्याने गोळीबार केला होता. त्यात साप्ताहिकाच्या संपादकांसह १० पत्रकारांचा मृत्यू झाला होता, तर दोन पोलिसांनाही प्राण गमवावे लागले होते.

टिव्ही अँकर रेहाम खान हिच्याशी विवाह केल्याचे इम्रान खान याने केले मान्य

लंडन - क्रिकेटपटू ते राजकीय नेते असा प्रवास केलेले पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पार्टीचे नेते इम्रान खान यांनी टिव्ही अँकर रेहाम खान हिच्याशी विवाह केल्याचे मान्य केले आहे. मंगळवारी इस्लामाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत यासंदर्भात ते अधिकृत माहिती देऊ शकतात. इम्रानने लंडन एअरपोर्टवर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेहामबरोबर विवाह केल्याचे मान्य केले आहे. आता लपवण्यासारखे काहीही राहिले नसल्याचे इम्रान म्हणाले. इम्रान खान शनिवारी लंडनला त्यांची पहिली पत्नी जेमिमा आणि मुलांना भेटण्यासाठी गेले होते. इम्रानने हा विवाह करण्यापूर्वी जेमिमा यांची परवानगी घेतल्याची माहिती मिळते आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यातही इम्रान खानचा रेहामबरोबर विवाह झाल्याच्या अफवा उठल्या होत्या. पण त्यावेळी इम्रानने हे वृत्त फेटाळले होते.

Page 3 of 24