Tuesday, Jan 23rd

Headlines:

विदेश

सऊदी अरब येथे कोकण प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धा

रत्नागिरी ः सऊदी अरब येथील रियाद शहराच्या एका भव्य पटांगणावर कोकण कमिटी (ऐएचआर) तर्फे कोकण प्रिमिअर लीग (केपीएल) क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सऊदी अरब या देशात राहणार्‍या विविध शहरामधील एकूण १६ संघांनी भाग घेतला होता.00_kl
दिवसभर चाललेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यांचे जुबेल संघानी दमाम संघावर मात करीत यश खेचून आणले. सामने पाहण्याकरिता दर्शकांनी मोठी गर्दी केली होती. या क्रिकेट स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ ज्येष्ठ पत्रकार अलिमियॉं काझी, कुंदनलाल, अब्दुल रशीद, अजीज शेख, मजीद देशमुख, सैफ दलवाई, मुबीन बगदादी, रफीक देशमुख, मनोजकुमार मल्होत्रा, तादीर अमीन, अब्दुल मनान मुजीबुल्ला दस्ते आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शाही थाटात पार पडला.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जे कोकणी बांधव नोकरीनिमित्त सऊदी अरबमध्ये राहतात ते मागील सात वर्षे रियादसह विविध शहरात क्रिकेट स्पर्धा भरवित आहेत. कोकण प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत रियाद, दमाम, जुबेल, मक्का, मदीना, आभा, अलखोबर या शहरात राहणार्‍या संघानी भाग घेतला. ही क्रिकेट स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी तजमुल्ल पागारकर, मुन्नवर पठाण, आबीद इमाम खावर, फैज मालीम, साजीद सुर्वे, नजीर मुकादम, आरीफ पठाण, अब्दल्ला हुनेरकर आदींनी खूप परिश्रम घेतले. क्रिकेट स्पर्धेचे समालोचन नौशीन काझी यांनी केले तर बक्षिस समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्फराज मुकादम यांनी केले.
ही क्रिकेट स्पर्धा मन्सुर गीते, जावेद डीमटीमकर, कुंदन लाल, अजीज शेख, मजीद देशमुख, सैफ दलवाई, सुहेल खान, किफायत फिरफिरे, रफिक देशमुख, मनोजकुमार मल्होत्रा, मोअज्जम दरेखान, ताहीर हमीन, रहहमतुल्ला, अब्दुल मनान कौचाली, समीउल्ला, नासीर खान दलवाई, बशीर धर्मे यांनी कोकण प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेला प्रायोजत्व देवून सहकार्य केले.

इंग्रजाळलेली ‘दीन’ मराठी!

ही माझी अमेरिकन आई. माझ्या आईची मी शेजारच्या मेरीशी ओळख करुन दिली तेव्हा  प्रश्न पडला की आई आता हिच्याशी कसं बोलेल? इंग्रजी समजलं तरी बोलण्याची सवय नाही आणि प्रयत्न केला तरी तिचं बोलणं उच्चारामुळे मेरीला समजणार कसं? पण आई तिच्याशी मराठीतच बोलली. खूप बोलली. आमच्या मुलीच्या बारशाला फक्त कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या हे घोकून घोकून शिकलेल्या मेरीचं मराठीचं ज्ञान इतकंच. त्यामुळे आई बोलली त्यातलं मेरीला काय समजलं असेल अशा संभ्रमात मी असतानाच मेरी माझ्याकडे पाहून हसली. म्हणाली,
युअर मॉम इज हॅपी दॅट आय अम हिअर फॉर यू.  अँड शी इज नॉट वरीड अबाऊट यू नाऊ. इज दॅट राईट? माझी आई जे काही बोलली त्याचं भाषांतर करायची आवश्यकताच भासली नाही. ४० शी पार केलेल्या मुलीची काळजी घ्यायला सांगणार्‍या आईकडे आणि ती घेण्याची हमी देणार्‍या मेरीकडे मी डोळ्यातले अश्रू आवरत पाहत राहिले. आईच्या आत्मविश्चासाचंही अमाप कौतुक वाटलं. तिला हिंदी, इंग्रजी समजत असलं, येत असलं तरी बोलायची सवय नव्हती पण त्यामुळे तिचं पार साता समुद्राकडे येऊनही अडलं नाही. या आधीही तसं ते कधीच कुठे अडलं नाही हे आधी कधी जाणवलं नव्हतं इतक्या प्रकर्षाने त्या क्षणी जाणवलं. तिला काय म्हणायचं ते ती व्यवस्थित मराठीतच बोलून समोरच्यापर्यंत पोचवायची आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल कुठलाही न्यूनगंड न बाळगता.
आम्हा भावंडाचं लहानपण मात्र आम्हाला इंग्रजी माध्यमात घाला म्हणून  आई - वडिलांच्या मागे लागण्यात गेलं. वडिलांची नोकरी बदलीची. जिथे जाऊ तिथे इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतीलच असं नाही त्यामुळे ते शक्यच नव्हतं आणि असतं तरी त्यांनी घातलं असतं की नाही कुणास ठाऊक.  इंग्रजी माध्यमातून शिक्षण झालं नाही याची खंत बाळगत आता चाळीशीच्या आसपास असणारी एक अख्खी पिढी मोठी झाली.  आपल्याला नाही जमलं ते पोटच्या गोळ्यांना करायला लावावं या अलिखित नियमाचं पालन करत मुलांना आवर्जून आम्ही इंग्रजी माध्यमात शिकवलं. घरी बोलतातच की मराठी निदान शाळेत तरी शिकू देत इंग्रजी,  स्पर्धेच्या जगात मागे पडायला नको, उत्कर्ष कसा होईल, मुलांना ’व्यवहाराची’ भाषा आलीच पाहिजे हाच ध्यास आमच्या पिढीने जोपासला. मराठीची कास मुलांच्या हाती लागू दिलीच नाही.  आमच्या सारखे पालक बरेच आहेत  हे कळलं तेव्हा वेळ टळून गेली होती.  इंग्रजी माध्यमात न शिकल्याने काही फरक पडत नाही हे कळायलाही खूप काळ गेला.  पण हे लक्षात येईपर्यंत तसं खूप नुकसान आमचं आम्ही केलंच भरीला आमच्या मुलांचंही.  आम्ही शिकलो, नोकर्‌यांना लागलो, मराठी तर येतच होतं पण इंग्रजीही उत्तम जमायला लागलं.  इतकंच नाही तर मराठी आणि इंग्रजी, दोन्ही साहित्याचा उत्तम आस्वादही आमची पिढी घेऊ शकते ह्या गोष्टीचं महत्त्व आता समजतंय.  इंग्रजी माध्यमांच्या मुलांची ओढ इंग्रजी साहित्याकडे झुकलेली दिसते. मराठी साहित्य वाचण्याकडे त्यांचा कल कमी आढळतो. पण आमच्यासारखे पालक मुलांना इंग्रजी माध्यमात घालून खूश होते. आता मुलांची उत्तम प्रगती होईल, आत्मविश्वासामुळे यशाचं शिखर गाठतील, आमच्यासारखी खंत बाळगावी लागणार नाही याच आनंदात आम्ही मशगूल होतो. ज्यांच्या पालकांना इंग्रजी येत नव्हतं  ते तर आपल्या मुलांचं इंग्रजी ऐकताना हुरळून जात होते. पण नुसती इंग्रजी  भाषा येऊन यशाचं शिखर गाठता येत नाही किंवा आयुष्य सार्थकी लागत नाही हे कळलंच नाही कुणाला. मुलांना इंग्रजीतूनच शिकवायचं ह्या विचारसरणीची चूक आधी घराघरांना भोवली मग समाजाला. घरी बोलतातच की मराठी असं म्हणताना, घरातही मराठी बोलताना इंग्रजी शब्दांमध्ये अधूनमधून चवीला काजू, बेदाणे असल्यासारखे मराठी शब्द यायला लागले.  घरोघरच्या ह्या चुकीची  फळं समाजाला भोगायला लागली. वास्तवाचं भान येईपर्यंत मराठी शाळा हळूहळू बंदही पडायला लागल्या. ज्या चालू आहेत त्यांची परिस्थिती गंभीर आहे. या परिस्थितीत मुलांना मराठी शाळांमध्ये घालायचं म्हटलं तरी अवघड परिस्थिती झाली. त्यामुळे शिक्षणाचं माध्यम इंग्रजीच झालं.  मराठी बोलायचं तर इंग्रजीतून विचार करुन त्याचं भाषांतर व्हायला लागलं.  कुणाला जपून राहा असं सांगण्याऐवजी काळजी घे असं टेक केअरचं शब्दश: भाषांतर सर्रास वापरात आलं. मराठीचं स्वरुपच बदललं. राडा होईल घरी अशी वाक्य मालिकांमधून सर्रास ऐकायला लागली, जीव तळमळण्याऐवजी तडफडायला लागला. प्रसारमाध्यमांनी इंग्रजी मिश्रित मराठी आणि चुकीचं मराठी रुढ केलं. तेच दैनंदिन जीवनात वापरलंही जाऊ लागलं. भावना पोचल्याशी कारण, भाषेच्या शुद्धतेचं काय इतकं ही विचारसरणी बळावली. अखेर मराठीचा, मराठीचा योग्य वापर करण्याचा आग्रह धरणार्‍यांनी शरणागती पत्करली.  काळाबरोबर बदललेल्या मराठीशी जुळवून घ्यायला हवं असं म्हणत चुकीचं, इंग्रजी मिश्रित मराठी मनातल्या मनात सुधारुन घ्यायला ही माणसं शिकली.
आणि एक वेळ अशी आली की मराठी नष्टच होणार की काय अशी भिती मनात निर्माण व्हायला लागली, वाढली. इतकी वाढली की  ती मराठी ’दिन’ झाली.  दिवस साजर्‍या करण्याच्या आपण सुरु केलेल्या नवीन प्रथेत  एक दिवस ’मराठी’ ला मिळाला. राज्यसरकारही यासाठी पुढे सरसावलं आणि तो दिवस ठरला २७ फेब्रुवारी!  जागतिक मराठी भाषा दिन. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी  २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात यायला लागला. कोण हे कुसुमाग्रज आणि जयंती म्हणजे? असा  इंग्रजी माध्यमातल्या मुलांना प्रश्न पडला. तो सोडविण्याची जबाबदारी तर आता आपण उचलायलाच हवी. नाही का? इथे अमेरिकेत आमच्यासारखी अनेकजण आपली मातृभाषा मुलांना यावी, ती त्यांनी टिकवावी, वापरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे मराठी शिकायला येणार्‍या विद्यार्थ्यांना मराठी दिनाबद्दल सांगितलं तेव्हा असा दिवसही असतो याचंच नवल वाटलं मुलांना. कुसुमाग्रज ठाऊक नव्हते पण त्यांच्याबद्दल प्रचंड उत्सुकता मात्र होती. त्या उत्सुकतेमुळे माझ्या  आशा पल्लवित झाल्या आहेत.  मराठी भाषा दिन म्हणजे आपली भाषा समजणं, बोलता येणं इतका मर्यादित अर्थ नाहीच. नसावा. मुलांना कुसुमाग्रजांच्या कवितांची ओळख करुन द्यायची, त्यांचं साहित्य वाचून दाखवायचं असं ठरवून टाकलं. कदाचित यातून मराठी साहित्याबद्दल त्यांची उत्सुकता वाढेलही. आवड निर्माण होईल. व्यक्त होण्यासाठी मराठी लेखन प्रपंचही मांडतील कदाचित कुणी एखादं त्यातलं. होईल खरंच असं? की भ्रामक आशावाद?  आपल्याच हातून दुसरीकडे वळलेली ही वासरं  येतील पुन्हा कळपात? आमच्या पिढीने मुलांना जसं इंग्रजीकडे वळवलं तसंच पुन्हा मराठीकडे आणण्याचं कामंही आम्हीच करु शकतो हे नक्की. आपापल्या पिलांना मराठीच्या मार्गावर आणायचं घेईल कुणी मनावर? जमेल? नक्कीच. मनात आणलं तर होऊ शकतं हे आणि शेवटी कितीतरी गोष्टी आपल्याच हातात असतात. नाही का?

मोहना प्रभुदेसाई - जोगळेकर
Emil : mohanajoglekargmail.com

तालिबान प्रमुखपदी मुल्ला मन्सूर याची नेमणूक वादग्रस्त

इस्लामाबाद - तालिबानचा प्रमुख मुल्ला ओमर याच्या मृत्यूनंतर त्याच्या जागेवर मुल्ला अख्तर मन्सूर याची नेमणूक करण्याबाबत अफगाण तालिबानच्या सर्वोच्च परिषदेशी (सुप्रीम कौन्सिल) सल्लामसलत करण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे त्याच्या जागी नवा नेता नेमला जाऊ शकतो, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
तालिबान या दहशतवादी संघटनेचे नेतृत्व करण्यासाठी मुल्ला मन्सूर याची निवड करण्यात आली असली, तरी त्याला ’सर्व तालिबान्यांनी’ नेमलेले नसून हे शरिया कायद्याच्या विरुद्ध आहे, असे तालिबानच्या एका प्रवक्त्‌याने बीबीसीला सांगितले. संघटनेची प्रभावी अशी सर्वोच्च परिषद नवा नेता निवडण्याकरता बैठक आयोजित करेल असेही तो म्हणाला.

हल्ले रोखण्यासाठी चीनमधील डॉक्टरांची ऑनलाइन मोहीम

बीजिंग - पेशंट आणि त्यांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्याची मागणी चीनमधील डॉक्टरांनी केली आहे. ग्वांदांग प्रांतात बुधवारी (१५ जुलै) एका पेशंटने महिला डॉक्टरवर हल्ला केला होता. त्यानंतर डॉक्टरांनी या हल्ल्यांविरोधात ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. लिओ नावाचा पेशंट डोके दुखत असल्याने लॉंगमेन हॉस्पिटलमध्ये डॉ. ओऊ यांच्याकडे गेला होता. मात्र ड्युटीवर नसल्याचे कारण सांगून ओऊ यांनी त्यास दुसर्‍या डॉक्टरकडे जाण्यास सांगितले. त्यावर चिडून लिओने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यात त्या जखमी झाल्या आहेत. जून महिन्यात चीनमध्ये डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या १२ घटना घडल्या आहेत.

अमेरिकेतील वणव्यात महामार्गावरील मोटारी पेटल्या

वॉशिंग्टन - अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यात सुमारे ५०० एकर जंगलाची राखरांगोळी झाली असून, परिसरातून जाणाऱया महामार्गालाही या वणव्याचा फटका बसला आहे. महामार्गावर जवळपास २० मोटारींनी पेट घेतल्याची माहिती मिळाली आहे.
दक्षिण कॅलिफोर्निया ते लास वेगास दरम्यानच्या महामार्गाला या भीषण वणव्याची झळ बसली. वणव्यात महामार्गावरून जाणाऱया २० मोटारीत जळून खाक झाल्या. त्याचबरोबर ठिकठिकाणी वाहतूक मोठया प्रमाणात विस्कळीत झाली. आग विझविण्यासाठी विमानांचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान, वेगाने पसरणाऱया वणव्यावर नियंत्रण मिळविताना प्रशासनाची दमछाक होत आहे.

श्रीलंकेच्या नौदलाकडून १५ भारतीय मच्छीमारांना अटक

रामेश्वरम - सागरी सीमेचे हद्द ओलांडणार्‍या १५ भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने आज (मंगळवार) अटक केली. कच्छथेवू येथून १५ भारतीय मच्छिमारांना त्यांच्या ३ बोटींसह ताब्यात घेतले आहे. सोमावारी रात्री ७३४ मच्छिमार आपल्या बोटी घेऊन मच्छिमारीसाठी गेले होते. त्यातील काही जणांनी सागरी सीमेचे उल्लंघन करत श्रीलंकेच्या हद्दीत प्रवेश केला. भारतीय मच्छिमारांना कच्छिथेवू येथे मच्छिमारी करण्यास परवानगी नाही. श्रीलंका नौदलाच्या जवानांना भारतीय मच्छिमार आपल्या हद्दीत मच्छिमारी करत असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तत्काळ कारवाई करत यांना ताब्यात घेतले. या सर्व मच्छिमारांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

बसवरील गोळीबारात ४७जण ठार

कराची - पाकिस्तानची आर्थिक राजधानी कराची येथे तीन बाइकवरुन आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी ९ मिमि पिस्तुल आणि एके-४७ रायफल अशा शस्त्रांचा वापर करुन इस्मायली समुदायाच्या प्रवासी बसवर गोळीबार केला. या गोळीबारात ४७ जण ठार झाले आहेत. ही घटना डो मेडिकल कॉलेज जवळ सफोरा चौरंगी भागात घडली. गोळीबाराचे कारण अद्याप समजलेले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जण बाइक चालवत होते आणि अन्य ३ जणांनी बसच्या दिशेने गोळीबार केला. हल्लेखोरांनी गोळीबार करतच बस अडवली आणि बसमध्ये जाऊन तुफान गोळीबार केला. या गोळीबारात १६ महिलांसह ४७ जण ठार झाले. फक्त ४० प्रवाशांची क्षमता असलेली बस ६० पेक्षा जास्त प्रवाशांमुळे खच्चून भरलेली होती. बसमध्ये काही लहान मुलेही होती जी गोळीबारात जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना जवळच्या जीन्ना हॉस्पिटल, आगा खान हॉस्पिटल आणि मेमन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हल्लेखोरांना शोधण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. गोळीबाराचे स्वरुप पाहता मृतांच्या संख्येत वाढ होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनेकडून क्षेपणास्त्राची चाचणी

इस्लामाबाद - तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केल्याचा दावा केला आहे. तालिबानने या क्षेपणास्त्राला उमर-१ हे नाव दिले आहे. मात्र या क्षेपणास्त्राच्या रेंजची माहिती देण्यात आलेली नाही. पाकिस्तानमधील पख्तूनख्वा हा भाग तालिबान्यांचा गड मानला जातो. येथून भारतीय सीमा ६०० किलोमीटरवर आहे. पाकिस्तानी फौजांशी लढत असलेल्या टीटीपीने एक पत्रक जारी करुन उमर-१ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाल्याचा दावा केला आहे. त्यासोबतच एक व्हिडिओ जारी केला आहे. यात क्षेपणास्त्र तयार केले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. टीटीपीचा प्रवक्त मुहम्मद खुरासनी क्षेपणास्त्राबद्दल म्हणतो, ’गरजेनुसार क्षेपणास्त्राची केव्हाही जोडणी करता येऊ शकते. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट याचे डिझाइन आहे.’

हाफीज सईदची पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ

इस्लामाबाद - मुंबईवरील दहशतवादी हल्ल्‌याचा मास्टरमाइंड आणि जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. पेशावरमध्ये भारत विरोधी काढण्यात आलेल्या रॅलीला संबोधून बोलताना सईदने, ’भारत नंबर एकचा शत्रू’ असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे ’जमात-उद-दवा’वर पाकिस्तानात बंदी असतानाही सईदच्या रॅलीमध्ये सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ गट) या पक्षाचे खासदार दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Page 1 of 24

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »