Saturday, Jan 20th

Headlines:

देश

नेट न्यूट्रॅलिटी हा प्रत्येक तरुणाचा अधिकार : राहुल गांधी

नवी दिल्ली - केंद्र सरकार इंटरनेटलाही मोठमोठ्या उद्योजकांना वाटण्याच्या प्रयत्नात आहे. नेट न्यूट्रॅलिटी हा प्रत्येक तरुणाचा अधिकार आहे, असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत व्यक्त केले.
देशभरात चर्चेत असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्यावर आपल्याला लोकसभेत बोलायचे आहे, असे आज सकाळी राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर त्यांनी स्थगन प्रस्ताव आणत प्रश्नोत्तराच्या काळात बोलण्यास परवानगी मागितली होती. आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच राहुल गांधी यांनी या मुद्यावर आपले म्हणणे स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘इंटरनेट न्यूट्रॅलिटी हा खूप अवघड शब्द असून, नेटचा अधिकार अशी त्याची सोपी व्याख्या करता येईल. प्रत्येक युवकाला नेट वापरण्याचा अधिकार आहे.  माझी सरकारला अशी विनंती आहे, नेट न्यूटॅलिटीचा अधिकार सर्वांना दिला पाहिजे. नेट न्यूट्रॅलिटीवर कायदा करण्याची गरज आहे.‘‘

राहुल गांधी यांचा लोकसभेत आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सक्रिय राजकारणात परतलेल्या राहुल गांधी यांनी रामलीला मैदानापाठोपाठ सोमवारी लोकसभेचेही मैदान मारले! अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची बाजू मांडताना राहुल यांनी ’शेतकरी आणि शेतमजुरांच्या व्यथेकडे काणाडोळा करणारे तुमचे सरकार हे उद्योगपतींचे, मोठ्या लोकांचे, सुटाबुटातील लोकांचे सरकार आहे,’ अशा उपरोधिक भाषेत मोदी सरकारचा समाचार घेतला. सोळाव्या लोकसभेत प्रथमच बोलताना राहुल यांनी आपल्या २१ मिनिटांच्या आणि वारंवार व्यत्यय आलेल्या निवेदनादरम्यान मोदी सरकारला शेतकरी आणि भूसंपादनाच्या मु्‌द्यावर पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरात झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली, तेव्हा भाजप सदस्यांनी बँकॉक, थायलंड आणि म्यानमारचे टोमणे लगावून त्यांच्या निवेदनात व्यत्यय आणणे सुरू केले. पण, राहुल बिचकले नाहीत. टोमणेबाजीचा त्यांनी शांतपणे सामना केला आणि कुरघोडीची एकही संधी न सोडता, जशास तशी उपरोधिक टोलेबाजी केली.

‘लिव्ह इन’मधील जोडपे विवाहित दाम्पत्यच : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली  - ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये दिर्घकाळ एकत्र राहणाऱया स्त्राी आणि पुरूष जोडप्यालाही विवाहित दाम्पत्याचा दर्जा मिळू शकतो. तसेच, जोडिदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपत्तीत हक्क सांगण्याचा अधिकारही एकत्र राहणाऱया स्त्रीला किंवा पुरूषाला प्राप्त होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायाधीश एम. वाय. इक्बाल आणि अमितवा रॉय यांच्या पीठाने हा निकाल दिला. दिर्घकाळ एकत्र राहणाऱया स्त्री-पुरूषांना पती-पत्नीचा दर्जा मिळू शकतो. हे जोडपे ऐकमेकांच्या संपत्तीवर अधिकारही सांगू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या जोडप्यांना आपल्या संपत्तीत जोडीदाराला हक्क द्यायचा नसल्यास त्यासाठी सबळ पुरावा सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने हा पुरावा मान्य केल्यानंतर त्यांना कायदेशीर अधिकारातून सूट मिळू शकतो, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली - ’जब जब फूल खिले’, ’नमक हलाल’, ’दिवार’, ’कभी कभी’ यांसह शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शशी कपूर यांना चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा मानाचा ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोमवारी जाहीर करण्यात आला. सुवर्णकमळ, १० लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेले शशी कपूर हे घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. सध्या आजारपणामुळे व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या ७७ वर्षीय शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीला फाळके पुरस्काराच्या रूपाने सलाम करण्यात आला आहे.

हुंड्यासाठी छळ केल्याच्या १० टक्के तक्रारी खोट्या, कायद्यात बदल करणार

नवी दिल्ली - देशभरात दरवर्षी हुंड्यासाठी छळ झाल्याप्रकरणी नोंदवलेल्या सुमारे एक लाख तक्रारींपैकी १० हजार तक्रारी खोट्या असता,, असे उघड झाले आहे. त्यामुळे हुंडाविरोधी कायदा देशातील वादग्रस्त कायदा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर या कायद्यात बदल करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. त्यानुसार भारतीय दंड संहितेतील ४९८ (अ) हे कलम ’तडजोडयोग्य’ बनवले जाईल, अशी शक्यता आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात तडजोडीची आणि जामिनाची तरतूद नाही. त्यामुळे तक्रार नोंदवली जाताच तक्रार करणार्‍या स्त्रीचा पती व सासरच्या मंडळींना त्यांचे निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत अटकेत ठेवले जाते. भा. दं. संहितेतील कलम ४९८ (अ)मध्ये दुरुस्ती करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक केंद्रीय कॅबिनेटकडे पाठवला आहे. यापूर्वी विधी आयोग आणि न्या. मलिमठ कमिटीनेही हा हुंडा कायदा तडजोडयोग्य करण्याची शिफारस केली होती. तक्रार खोटी आढळल्यास सध्या एक हजार रुपयांचा दंड केला जातो. नव्या कायद्यात ही रक्कम १५ हजार रुपये करण्यात येणार असल्याचे समजते.

आम आदमी पार्टी राष्ट्रीय स्तरावर विस्तार करणार

नवी दिल्ली - दिल्लीत विक्रमी बहुमताने सत्ता मिळवणार्‍या आम आदमी पार्टीने आता राष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी, आता पाच वर्षे फक्त दिल्लीवरच फोकस राहील असे जाहीर केले होते. मंगळवारी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी संपूर्ण देशात काम सुरु करण्याचे सुतोवाच केले आहे. संजय सिंह म्हणाले, ’दिल्लीतील विक्रमी विजयानंतर पक्षाला जनतेचे प्रेम आणि पाठबळ वाढत चालेले आहे. त्यामुळे पक्षाने आता राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.’

इतर मागास वर्गाीयांमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांच्या आधी इतर मागास वर्गीयांमध्ये (ओबीसी) जाट समाजाला आरक्षण देण्याचा संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारने घेतलेला निर्णय आज (मंगळवार) सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे.  सर्वोच्च न्यायालयाने आज हा महत्त्वपूर्ण निर्णय देताना जातीनिहाय आरक्षण देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. ओबीसींमध्ये जाट समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱी याचिका ओंमकार सिंह यांनी दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना न्यायाधीश रंजन गोगोई व न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय सुनाविला. न्यायालयाने यापूर्वी या प्रकरणावरून सरकारला फटकारले होते. जाट समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अधिसूचना कशाप्रकारे काढण्यात आली, याची तपासणी करण्याची गरज आहे. या प्रकरणाशी निगडित कागदपत्रे आणि सर्व फायली सामाजिक न्याय मंत्रालयाने न्यायालयासमोर सादर कराव्यात. त्यांची आम्ही पूर्णपणे तपासणी करू, असे यापूर्वी न्यायालयाने म्हटले होते.

सौर ऊर्जेवर उडणारे विमान भारतात दाखल

अहमदाबाद - विमान कंपन्या ते विमान प्रवाशांचे अर्थकारण ठरवणार्‍या जेट इंधनाला पर्याय देण्याचा पहिला प्रयोग सोमवारी अबुधाबी ते मस्कतच्या आकाशात यशस्वी ठरला. आतापर्यंत केवळ महागड्या इंधनावर अवलंबून असणार्‍या हवाई क्षेत्राला सोलर इम्पल्स या विमानाने सौरऊर्जेच्या पर्यायाचे किरण दाखवले. स्वच्छ ऊर्जेचा संदेश घेऊन जगप्रदक्षिणेवर निघालेल्या या विमानाने संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबी ते ओमानमधील मस्कतचा प्रवास यशस्वी केला. आज, मंगळवारी अहमदाबादमध्ये ते दाखल होत असून चार दिवसांच्या मुक्कामानंतर ते वाराणसी गाठणार आहे.

फुटीरतावादी नेता मसरत आलम याला सोडल्याने भाजपने नोंदवला तीव्र निषेध

जम्मू - फुटीरतावादी नेता मसरत आलम याला सोडण्याच्या मुख्यमंत्री मुफ्ती महंमद सईद यांच्या वादग्रस्त निर्णयाचा सत्तेतील सहकारी पक्ष असलेल्या भाजपने तीव्र निषेध केला आहे. पक्षाचे सर्व मंत्री आणि आमदार यांची या संदर्भात लवकरच बैठक बोलावून पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.  मसरतला सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी सईद यांनी भाजपशी चर्चाही केली नव्हती, असा आरोप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जुगलकिशोर शर्मा यांनी केला आहे. ते म्हणाले, सईद यांच्या या निर्णयाला भाजपची मान्यता नाही. निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आम्हाला विचारले नाही आणि विचारले असते तरी आम्ही मान्यता दिली नसती. मसरतसारखे लोक देशाच्या विरोधात विष पसरवितात, त्यामुळे त्याला सोडण्याचा निर्णय चुकीचा आहे.‘‘ पीडीपी आणि भाजपमध्ये सत्ता स्थापन करताना मान्य करण्यात आलेल्या समान धोरणांमध्ये या निर्णयाचा समावेश नसल्याचेही शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे लवकरच राज्यातील भाजप नेते आणि आमदारांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. जम्मू काश्मीरच्या विकासाच्या मुद्द्यावर पीडीपीशी युती केली असली तरी भाजप त्यांच्यावर अवलंबून नसल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केले. अद्याप तरी सत्तेतून बाहेर पडण्याइतपत परिस्थिती बिघडलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

Page 2 of 30