Saturday, Jan 20th

Headlines:

देश

गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता

नवी दिल्ली - रेल्वे भाडेवाढीनंतर नरेंद्र मोदी सरकार लवकरच जनतेला दुसर्‍या कठोर निर्णयाचा डोस देण्याची शक्यता आहे. नैसर्गिक गॅसच्या दरांमध्ये झालेल्या वाढीमुळे सरकार याच आठवड्यात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केली. तीन दिवसांतली ही त्यांची दुसरी भेट होती. मोदींनी शुक्रवारी देशातील वीजेच्या परिस्थितीबाबत सुमारे पाच तास चर्चा केली होती. त्यानंतर रविवारी त्यांनी पुन्हा एकदा प्रधान यांना बोलावणे पाठवले. अर्थमंत्री अरुण जेटली यांचाही बैठकीत समावेश होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत नैसर्गिक गॅसचे दर ठरवण्याच्या मुद्यावर तत्काळ निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे या क्षेत्रावर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढवला जाऊ शकतो, असेही मत व्यक्त करण्यात आले. सरकार मात्र दर वाढवण्याबाबत द्विधा मनस्थितीमध्ये आहे. मात्र, दर वाढवले नाही तर त्याचा परिणाम गॅस उत्पादन आणि एफडीआयवर पडू शकतो. त्यामुळे सीएनजीचे दर किलोमागे २.८१ रुपयांनी तर पाइपद्वारे पुरवठा करण्यात येणा-या स्वयंपाकाच्या गॅसचे दर १.८९ रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरम एवढे वाढतील.

रेल्वेच्या प्रवासी व मालवाहतुकीच्या भाड्यात वाढ

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शुक्रवारी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात अभूतपूर्व अशी १४.२ टक्के, तर मालवाहतुकीच्या भाड्यात ६.५ टक्के वाढ केली आहे. यामुळे रेल्वेच्या मासिक पासात तब्बल १०० टक्के आणि उपनगरी तिकिटांच्या दरात १० टक्के वाढ होणार आहे. परिणामी सेकंड क्लासचा पास दुपटीने महागणार आहे; तर फर्स्ट क्लासचा पास सेकंड क्लासच्या चारपट होणार आहे. उपनगरी गाड्यांसह मेल/एक्स्प्रेस/पॅसेंजरच्या तिकीटदरांतही १० टक्के वाढ होणार आहे. ही भाडेवाढ येत्या बुधवारी, २५ जूनपासून अमलात येणार आहे.

५० औषधे मोफत देण्याचा आरोग्य मंत्रालयाचा विचार

नवी दिल्ली - नागरिकांना अत्यावश्यक अशी जवळपास ५० जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार केंद्रीय आरोग्य मंत्रालयामार्फत करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला याबाबत माहिती दिली आहे. ’जवळपास ७५ टक्के आजारांना लागू पडतील, अशी ५० अत्यावश्यक जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू आहे. त्यामध्ये इन्फेक्शन, उच्चरक्तदाब, मधुमेह आदी औषधांचा समावेश असेल. या मोफत औषध योजनेची अनेक टप्प्यांमध्ये अंमलबजावणी करण्यात येईल. सुरुवातीला देशातील काही निवडक हॉस्पिटलमध्ये ही योजना लागू करण्यात येईल. त्यानंतर सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये ती अंमलात आणली जाईल,’ असे डॉ. हर्ष वर्धन म्हणाले.

लष्करे तोयबाच्या पाकिस्तानी कमांडरला अटक

श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागामध्ये लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीरमध्ये पोलिस व सुरक्षादलाने दहशतवाद्यांविरोधात संयुक्तपणे शोधमोहिम सुरू केली होती. यावेळी पोलिसांनी लष्करे तोयबाचा जिल्ह्यातील म्होरक्या मोहम्मद नावीद जत उर्फ छोटू उर्फ अबू हनझल्ला (रा. मुलतान, पाकिस्तान) याला अटक केली. त्याने जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला होता. मात्र, जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत त्याला ताब्यात घेतले. गेल्या दोन वर्षांपासून लष्करे तोयबाने काश्मीरमध्ये कार्यरत झाला होता. काश्मीरमध्ये मोहम्मद नावीद हा विविध गुन्हे घडवून आणत होता. पोलिस त्याच्या मागावर होते, अखेर तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

रुग्णावरील हृदय शस्त्रक्रियेसाठी काही मिनिटांसाठी चेन्नई झाले स्तब्ध

चेन्नई - आजच्या धकाधकीच्या काळात चेन्नई सारखे शहर काही मिनीटांसाठी स्तब्ध झाले होते. चेन्नईच्या ज्या रस्त्यावरून सायंकाळी गर्दीच्या वेळी १२ किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा ते पाऊनतास लागतो ते अंतर सोमवारी एका  ऍम्बुलन्सने केवळ १४ मिनीटांत कापले. त्याचे कारण होते एक ह्रदय दुसर्‍याला द्यायचे होते. त्यासाठी डॉक्टरांसह वाहतूक पोलिसांची मोठी मदत झाली.
एक ह्रदय दुसर्‍याला देण्याचा हा घटनाक्रम सुरु झाला सोमवारी सकाळी पाच वाजून ४५ मिनीटांपासून. पहाटे पावणेसहा वाजता फोर्टीस मलार हॉस्पिटलचा फोन खणाणला. चेन्नईच्या सरकारी हॉस्पिटलमधून तो फोन होता. एका रुग्णाला व्हेंटिलेटरवरुन काढण्यात येणार होते मात्र, त्याचे ह्रदय, लिव्हर आणि किडनी दुसर्‍याला देता येणार होते. फोर्टीस हॉस्पटलचे डॉक्टर लगेच कामाला लागले. गरजू रुग्णाचा शोध सुरु झाला आणि मुंबईची २१ वर्षीय वोवी मिनोचरचोमजी भाग्यवान ठरली. तिचा रक्तगट आणि वजन दोन्ही मृत दात्याला जुळणारे होते.  यानंतर दोन्ही हॉस्पिटलमध्ये एकाच वेळी ह्रदयप्रत्यारोपणाची तयारी सुरू झाली. सायंकाळी पाच वाजता रुग्णाच्या शरीरातून ह्रदय काढण्यात आले आणि दुसर्‍या रुग्णाचीही ऑपरेशनची तयारी करण्यात आली.
धडधडणारे ह्रदय एका शरीरातून दुस-या शरीरात रोपण करण्यासाठी केवळ चार तासांचा अवधी असतो.  दोन्ही हॉस्पिटलमधील अंतर हे १२ किलोमीटरचे आणि सायंकळच्या वेळी रस्त्यातील ट्रॅफिकमुळे हे अंतर कापण्यास अर्ध्या तासहून अधिक वेळ लागण्याची शक्यता लक्षात घेऊन डॉक्टरांनी चेन्नईच्या वाहतूक शाखेच्या सहाय्यक आयुक्तांना रस्ता मोकळा करण्याची विनंती केली आणि एका ह्रदयासाठी त्यांनीही तत्काळ कारवाईचे चक्र फिरवत तो १२ किलोमीटरचा रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनीही सहकार्य केले. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी चन्नईतील त्या मार्गावर एकही वाहन नव्हते.
सायंकाळी सहा वाजून ४४ मिनीटांनी डॉक्टरांचे एक पथक ह्रदय घेऊन निघाले. त्यांनी ते धडधडणारे ह्रदय ४ डिग्री अंश सेल्सिअस तपमानात एका कंटनेरमध्ये ठेवले होते. ताशी १०० वेगाने ऍम्बूलन्स निघाली आणि फक्त १३ मिनीट २२ सेकंदात फोर्टिस मलार हॉस्पिटलमध्ये पोहोचली. पुढील ऑपरेशनही सुरळीत पार पडले आणि ओवीचे ह्रदय धडधडू लागले.
फोर्टिस मलार हॉस्पिटलचे ह्रदयरोद तज्ज्ञ डॉ. के.आर.बालकृष्णन म्हणाले, ’ह्रदयप्रत्यारोपण झालेली ओवीची प्रकृती सुधारत आहे. तिच्या कुटुंबियांचा आनंद शब्दांच्या पलिकडचा आहे.’  ते म्हणाले, की एखाद्या ब्रेन डेड रुग्णाचे ह्रदय काढल्यानंतर चार तासांच्या आत त्याचे प्रत्यारोपण होणे गरजेचे आहे. हे काम वाहतूक पोलिस आणि संवेदनशील चेन्नईच्या नागरिकांच्या सहकार्याशिवाय होणे शक्य नव्हते.

रामदेव बाबांना ब्लॅकमेल करुन उमेदवारी मिळवल्याचा दावा

आसानसोल - येथून विजयी झालेले भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी यासाठी योगगुरू रामदेव बाबा यांना ब्लॅकमेल केले होते. सुप्रियो यांनी स्वतःच याबाबत खुलासा केला आहे. आनंदबाजार पत्रिका या बांग्ला वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या सुप्रियो यांच्या एका लेखामध्ये याबाबत उल्लेख आहे. सुप्रियो यांच्या लेखाचा पहिला भाग रविवारी प्रकाशित झाला असून दुसरा भाग पुढील रविवारी प्रकाशित होणार आहे. सुप्रियो यांच्यासाठी कोलकात्यात स्वतः नरेंद्र मोदींनी निवडणूक काळात सभा घेतली होती.
सुप्रियो यांनी लिहिलेल्या या लेखानुसार २८ फेब्रुवारी रोजी रामदेव बाबा एका विमानातून प्रवास करत होते. त्यावेळी ते कोणाबरोबर तरी तिकिट वाटपासंदर्भात चर्चा करत होते. त्यावेळी बाबुल सुप्रियोही त्या ठिकाणी होते. त्यांनी दोघांची चर्चा ऐकली आणि ते रामदेव बाबाला म्हणाले, बाबा मलाही तिकिट हवे आहे. तुम्ही जर मला तिकिट मिळवून दिले नाही तर, तुम्ही कशा प्रकारे लोकांना तिकिट वाटत आहात, हे मी मिडियाला सांगून देईल. हे ऐकताच रामदेव बाबा तयार झाले आणि त्यांनी आपल्या सेक्रेटरीला माझा नंबर लिहून घेण्यास सांगितले असा दावा या लेखात करण्यात आला आहे.

निवडणुका होऊन ‘आप’चे सरकार येईल असे वाटले होते : अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली - ’मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना वाटलं होतं, पुन्हा निवडणुका झाल्या तर दिल्ली आम आदमी पक्षाचं सरकार बहुमताने येईल. पण आमचा अंदाज चुकला,’ अशी खंत ’आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. प्रस्थापित पक्षांना आव्हान देणार्‍या केजरीवाल यांच्याकडून दिल्लीच्या जनतेला अपेक्षा होत्या. प्रत्येक गोष्ट लोकांना विचारून करण्याची घोषणा करून केजरीवालांनी या अपेक्षा वाढवून ठेवल्या. मात्र, दिल्लीचे मुख्यमंत्रीपद मनमानीपणे सोडून त्यांनी लोकांच्या अपेक्षावर पाणी सोडले. त्याचा जोरदार फटका आम आदमी पक्षाला लोकसभा निवडणुकीत बसला. त्यामुळे हादरलेल्या केजरीवाल यांनी आता दिल्लीकरांच्या नाकदुर्‍या काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीतील काली बाडी मोहल्ल्‌यात घेतलेल्या सभेत बोलताना केजरीवाल यांनी आपल्या अनाकलनीय निर्णयांचे स्पष्टीकरण दिले. ’मीडियाने माझ्या राजीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकही संतापले, पण आमच्याकडे पर्याय नव्हता. पुन्हा निवडणूक झाल्यास बहुमतात सरकार येईल असे वाटले. पण सत्ता सोडल्यानंतर निवडणुका झाल्याच नाहीत. हे आम्हाला अपेक्षित नव्हतं, असं ते म्हणाले.

सरकारी बाबूंना मोदी सरकारचे शिस्तीचे धडे

नवी दिल्ली - केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून सरकारी बाबू व कर्मचार्‍यांसाठी ’कामाचे’ दिवस आले आहेत. मोदीमंत्रा जपत सरकारमधील मंत्र्यांनीही कर्मचार्‍यांचा मागे तगादा लावण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांनी कामाचा प्रत्येक दिवस सकाळी नऊच्या ठोक्यालाच सुरू करावा, अशा सूचना केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी दिल्या आहेत. व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी अचानक निर्माण भवन येथे जाऊन सरकारी कार्यालयांतील परिस्थितीचा आढावा घेतला. कार्यालयाची वेळ टळून गेल्यानंतरही अनेक केबिन्स नायडू यांनी रिकामी दिसली. अनेक ठिकाणी इलेक्ट्रिकच्या वायर व अन्य वस्तू इतस्तत: पडलेल्या दिसल्या. उपहारगृहाची अवस्थाही वाईट होती. त्यामुळे नायडू नाराज झाले.

बदायूँमधील बलात्कार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील बदायूँमध्ये घडलेल्या दोन दलित मुलींवरील सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस महानिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली २० अधिकार्‍यांचे पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले आहे. सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल करून घेतली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारने व विविध राजकीय पक्षांनी या घटनेचा तपास सीबीआयच्या माध्यमातून केला जावा, अशी शिफारस केली होती. अखेर आज या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे. या प्रकरणातील पाचही संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. यात दोघा पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. सर्वेश यादव, छत्रपाल आणि त्यांचे तिघे भाऊ पप्पू यादव, अवधेश यादव आणि उर्वेश यादव अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणावरून राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा यांनी, अखिलेश यादव यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

Page 10 of 30