Saturday, Jan 20th

Headlines:

देश

आवश्यक संख्याबळ नसल्याने कॉंग्रेसला विरोधी पक्षनेतेपदाचा हक्क नाही; ऍटनी जनरलचे मत

नवी दिल्ली - आवश्यक संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिल्याची एकही घटना पहिल्या लोकसभेपासून घडली नसल्याने लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदावर हक्क असल्याचा दावा कॉंग्रेसला करता येणार नाही, असे ऍटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी आज सांगितले. या पदासाठी जोरदार प्रयत्न करणार्‍या कॉंग्रेसला यामुळे मोठा धक्का बसला आहे.  या पदासाठी ५५ सदस्य असणे आवश्यक असताना कॉंग्रेसकडून फक्त ४४ सदस्यांच्या आधारावर या पदावर दावा सांगितला जात होता, त्यामुळे या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सभापती सुमित्रा महाजन यांनी कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेत रोहतगी यांच्याकडे मत मागितले होते. राजीव गांधी यांच्या काळात कॉंग्रेसला चारशेहून अधिक जागा मिळाल्या असताना त्यांनीही याच कारणावरून तेलगू देसम पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देण्यास नकार दिला होता, हे रोहतगी यांनी निदर्शनास आणून दिले. संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणून निवडणूक लढविली असल्याने एकत्रित ६० जागांच्या आधारावर हे पद देण्याचा कॉंग्रेसचा युक्तिवादही रोहतगी यांनी खोडून काढला. पहिले लोकसभा सभापती ग. वा. मावळंकर यांच्या काळापासून असे कधी केल्याचा इतिहास नसल्याचेच कारण त्यांनी या वेळी दिले.

स्कूल बस- रेल्वे अपघातात १५ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू, जमाव संतप्त

हैदराबाद-  नांदेड-हैदराबाद पॅसेंजरला पाहताच रेल्वेचालकाने करकचून ब्रेक दाबले; परंतु स्कूल बस एवढी वेगात होती की धडकल्यानंतर ती चेंडूसारखी हवेत उंच उडाली, अशी माहिती या गाडीतून प्रवास करणार्‌या नांदेडच्या प्रवाशांनी दिली.  अपघातानंतर संतप्त लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. कामारेड्डी-हैदराबाददरम्यान असलेल्या मसाईपेठ रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना सकाळी ९.२० वाजता घडली. अपघातस्थळाच्या बाजूलाच निझामाबाद-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्याला समांतर असाच रेल्वे ट्रॅक आहे. या क्रॉसिंगवर गेट नाही. गेटमन तर दूरच. मसाईपेठ व आजूबाजूच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस समोर आल्यानंतर रेल्वेच्या इंजिनचालकाने करकचून ब्रेक दाबले, परंतु तरीही स्कूल बस चेंडूसारखी उंच उडाली. जवळपास १५ पेक्षा जास्त मुलांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर आजूबाजूच्या गावांतील हजाराहून अधिक लोकांचा जमाव रेल्वेच्या दिशेने आला. या संतप्त लोकांनी रेल्वेतील प्रवाशांना खाली उतरायला सांगितले. त्यानंतर रेल्वेवर दगडफेक केली. प्रवासी बाजूलाच असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर आले व तिथून मिळेल त्या वाहनाने हैदराबादकडे रवाना झाले. रेल्वेचालकाला मारण्यासाठी लोक धावले, परंतु तो अपघातानंतर लपून बसला. तो हाती लागला नाही. जवळपास ५०० तरुणांनी पोकलेनच्या साहाय्याने इंजिन रुळावरून फेकण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला.

दिल्लीत सरकार बनवण्यासाठी केजरीवाल भेटणार राज्यपालांना

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये सरकार बनविण्याच्या घडामोडींना वेग आला असून, आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल आज दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांना भेटणार आहेत. भाजप नेत्यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. केजरीवाल यांनी ट्विटरवरून म्हटले आहे, की मी आज राज्यपालांना भेटणार आहे. तसेच आपचे सर्व आमदारांची आज बैठक होणार आहे. राज्यपालांकडून येणार्‍या प्रतिसादाची आम्हाला प्रतिक्षा आहे. केजरीवाल यांनी नुकतेच भाजपकडून घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर आज प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी भाजप असे कधीच करत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांनी दिल्लीत ४९ दिवस सरकार चालविल्यानंतर १४ फेब्रुवारीला राजीनामा दिला होता.  भाजपचे दिल्लीचे अध्यक्ष सतीश उपाध्याय यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत भाजप सरकार बनविण्याचा विचार करत असल्याचे म्हटले होते.

संसदेत महागाईवर चर्चा सुरु असताना राहुल गांधींनी घेतली डुलकी?

नवी दिल्ली - कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या एका व्हिडिओवरुन वादंग सुरु झाला आहे. बुधवारी लोकसभेतील कामकाजादरम्यानचा हा व्हिडिओ असून यात राहुल गांधी डोळे लावलेले दिसत आहेत.  प्रथमदर्शनी ते डुलकी घेताना वाटत आहेत. त्यावेळी सभागृहात महागाईवर चर्चा सुरु होती. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर कॉंग्रेसने राहुल गांधी झोपलेले नव्हते, असे स्पष्टीकरण दिले आहे. कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे, ही फार शुल्लक गोष्ट आहे. यावरुन विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. राहुल गांधींचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. सोशल साइट्सवर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

इराकमधील ४६ भारतीय परिचारिका केरळमध्ये परतल्या

नवी दिल्ली - इराकमध्ये सुन्नी कट्टरपंथीय बंडखोरांच्या (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया) ताब्यात असलेल्या ४६ भारतीय परिचारिका आज (शनिवार) अखेर भारतात परतल्या. शुक्रवारी त्यांची सुटका झाली होती. विशेष विमानाने आज त्यांचे कोची येथे आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी त्यांचे स्वागत केले. शुक्रवारी सुटका झाल्यानंतर स्वायत्त कुर्दीस्तानची राजधानी इरबिल शहरात त्यांना आणण्यात आले होते. तेथून त्यांना एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारताकडे पाठविण्यात आले. मुंबईत प्रथम आल्यानंतर तेथून त्यांना कोचीकडे रवाना करण्यात आले. या परिचारिकांची सुटका झालेली असली, तरी अजूनही बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या ३९ भारतीयांचा प्रश्‍न सुटलेला नाही. परिचारिकांच्या सुटकेबद्दल चंडी यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

बिहारमध्ये सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांत चकमक

जमुई/पटना - जमुईच्या खैरा आणि चरकापत्थर परिसरातील लखारी गावात असणा-या जंगलामध्ये नवादाकडून कोम्बिंग ऑपरेशन करत पुढे येणा-या सीआरपीएफ जवानांची शुक्रवारी सकाळी नक्षलवाद्यांची चकमक उडाली. यामध्ये सीआरपीएफच्या ७ व्या बटालीयनचे डेप्युटी असिस्टंट कमांडंट हीरा झा शहीद झाले. ही चकमक अजुनही सुरुच असल्याची माहिती मिळाली आहे. येथे शेकडोच्या संख्येने नक्षलवादी असल्याची माहितीही मिळाली आहे. सध्या याठिकाणी सीआरपीएफचे अतिरिक्त जवान आणि पोलिस पाठवण्यात येत आहेत.

कांदा आणि बटाट्याचा समावेश जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये

नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात महत्त्वाचे स्थान असलेल्या कांदा-बटाट्याला महागाईच्या आचेपासून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली असून बुधवारी केंद्र सरकारने कांदा आणि बटाट्याचा जीवनावश्यक वस्तू कायद्यामध्ये समावेश केला आहे. केंद्राने व्यापार्‍यांनी करावयाच्या कांदे-बटाट्याच्या साठ्याची मर्यादा निश्चित करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. कांदा आणि बटाट्याला कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातून एक वर्षासाठी बाहेर काढण्याचा निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. या निर्णयामुळे आता कांदे आणि बटाटे कुठेही विकण्याची शेतकर्‍यांना मुभा असेल. राज्यांनी साठेबाजांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशही केंद्राने दिले आहेत.

राजधानी एक्सप्रेस रुळावरुन घसरली, ४ प्रवासी जागीच ठार

पटना - नवी दिल्लीहून डिब्रूगढला जाणारी नवी दिल्ली-डिब्रूगढ राजधानी एक्सप्रेस (१२२३६) छपराच्या जवळ पटरीवरून घसरल्याने झालेल्या अपघातात ४ प्रवासी जागीच ठार झाले आहेत. तर ८ प्रवासी जखमी आहेत. जखमी प्रवाशांना उपचारासाठी छपरा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेलवे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार यांनी या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. नक्षल्यांनी या भागात बंद पुकारलेला होता. त्यामुळे या घातपातामागे नक्षलवाद्यांचा हात असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहेत. रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये, गंभीर जखमींना एक लाख रुपये आणि किरकोळ जखमींना २० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे.

रेल्वे भाडेवाढ टप्पाटप्प्याने करण्याबाबत केंद्राचा विचार सुरु

नवी दिल्ली - लांब पल्ल्याच्या गाड्यांसह उपनगरीय रेल्वेची भाडेवाढ करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय गेल्या शुक्रवारी रेल्वेमंत्र्यांनी घेतला आणि ते आकडे पाहून सामान्य रेल्वे प्रवाशांचे डोळेच फिरले. देशभरात त्यावरून संतापाची लाट उसळली.  रेल्वे भाडेवाढीवरून देशभरात जनक्षोभ उसळल्यानंतर केंद्र सरकार आपल्या निर्णयाचा फेरविचार करत असून प्रवाशांवर एकदम एवढा भार टाकण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं तिकीटदर वाढवण्याचा प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन असल्याचं समजतं. रेल्वे भाडेवाढ उद्यापासून लागू होत असल्यानं त्याबाबत आजच काही घोषणा होते, की ८ जुलैच्या रेल्वे बजेटमध्ये रेल्वेमंत्री दिलासा देतात, हे नक्की कळू शकलेलं नाही.

Page 9 of 30