Saturday, Jan 20th

Headlines:

देश

वडीलांचे शरण येण्याचे आवाहन धुडकावणारा दहशतवादी चकमकीत ठार

श्रीनगर - सुरक्षा जवानांनी सोमवारी रात्री पुलवामाच्या हजानमध्ये जैश-ए-मोहंमदच्या तीन दहशतवाद्यांना जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांना शस्त्र टाकण्याचे आवाहन करण्यात आले. एक दहशतवादी शौकतच्या वडिलांना बोलावण्यात आले. त्यांनी मुलाला शरण येण्यास सांगितले, मात्र त्याने नकार दिला. अखेर १८ तासांच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. अल्ताफ अहमद राथर, फारुक अहमद तसेच शौकत अहमद अशी अतिरेक्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एसएलआर रायफल्स जप्त करण्यात आल्या. ज्या घरात त्यांनी आसरा घेतला होता, त्या परिसरात दाट वस्ती होती. सुरक्षा जवानांनी रात्री दहशतवादी शौकतच्या वडिलांना घटनास्थळी बोलावले होते. त्यांनी मुलास शरण येण्यास सांगितले. शस्त्र खाली टाकणार असेल तर प्राण वाचू शकतात, अशी हमी जवानांनी त्याला दिली. वडील रात्रभर विनवणी करत राहिले, मात्र त्याला त्याने प्रतिसाद दिला नाही. यानंतर सकाळच्या चकमकीत तीन दहसतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेसाठी डमी ताफ्याचा वापर

नवी दिल्ली- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर आहेत. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मार्गात ऐनवेळी बदल केला जात असल्याचे एका सुरक्षा अधिकारीने सांगितले.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवाद्यांकडून मोठा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या सुरक्षेसाठी मोठी सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. मोदींच्या सुरक्षेसाठी आधीच दोन मार्ग निश्चित केले जातात. विशेष म्हणजे मोदींच्या ताफ्यासोबत एक डमी ताफाही असतो. सुरुवातीला दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद केली जाते. ऐनवेळी नरेंद्र मोदींच्या ताफ्याचा मार्ग बदलला जातो. याबाबत कमालीची गोपनियता पाळली जाते. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपतर्फे (एसपीजी) नरेंद्र मोदी यांना सुरक्षा पुरवली जाते.

भारत- बांगलादेशमधील सीमारेषा बदलण्यासाठी मोदी सरकार घेणार संसदेची मंजुरी

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी सरकारने आता भारत-बांग्लादेशमधील सीमारेषाच बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या १६ डिसेंबरपर्यंत यासाठी संसदेची मंजुरी घेण्याचा निर्धार पंतप्रधान मोदी यांनी केला आहे. भारताने १९७१ साली झालेल्या युद्धात पाकिस्तानी सैन्याची धूळधाण उडवून बांग्लादेश निर्मितीला हातभार लावला होता. तेव्हापासून जगाच्या नकाशावर आलेल्या बांग्लादेशचा भारताशी सीमेवरून वाद आहे. हा वाद सोडविण्याबाबतच्या सामंजस्य करारावर २०११ मध्ये दोन्ही देशांच्या सह्या झाल्या आहेत. मात्र, ममता बॅनर्जींसह पश्चिम बंगालमधील अन्य पक्षांचा विरोध असल्यामुळे अद्याप या संदर्भातील विधेयकाला भारतीय संसदेची मंजुरी मिळालेली नाही.

राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता प्रियंका वड्रा यांनी फेटाळली

नवी दिल्ली -प्रियंका वड्रा या कॉंग्रेसमध्ये मोठे पद स्वीकारणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी मात्र हे वृत्त आधारहीन असल्याचे म्हटले आहे. कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका सक्रिय राजकारणात उतरणार नसून याबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला जावा, अशी त्यांची इच्छा आहे. कॉंग्रेसमध्ये मी पद स्वीकारणार असल्याच्या बातम्या सातत्याने येणे आणि संधी पाहून हा मुद्दा चर्चेत आणणे, हे चुकीचे आहे, असे प्रियंका म्हणाल्या. अशा प्रकारच्या अफवांना प्रोत्साहन देण्यास थांबविले तर मी फार आभारी असेन, असेही त्या म्हणाल्या. काही राज्यांमध्ये पुढील काही काळात होणार असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रियंका वद्रा राजकारणात येणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते.

जसवंतसिंह यांच्या डोक्याला इजा झाल्याने अतिदक्षता विभागात दाखल

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे पूर्वाश्रमीचे नेते जसवंतसिंह हे त्यांच्या निवासस्थानी घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली असून, त्यांना लष्कराच्या (आर्मी रिसर्च अँड रेफरल) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ७६ वर्षीय जसवंतसिंह त्यांच्या निवासस्थानी घसरून पडले. त्यानंतर त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी जसवंतसिंह यांचे चिरंजीव मानवेंद्रसिंह यांच्याशी बोलून त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली.

आता गंभीर गुन्ह्यांत बालगुन्हेगारांवर खटला चालवता येणार

नवी दिल्ली - खून आणि बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेल्या १६ ते १८ वर्षांदरम्यानच्या बालगुन्हेगारांवर खटले चालवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील बालगुन्हेगारी कायद्यातील सुधारणांना मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. या सुधारणांनुसार संबंधित बालगुन्हेगारास सुधारगृहात पाठवायचे की त्याच्यावर नियमित कोर्टात खटला चालवायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार आता ज्युवेनाईल जस्टीस बोर्डांना मिळणार आहे. सुधारित विधेयक अंतिम मंजुरीसाठी संसदेत पाठवण्यात येणार आहे. सुधारित कायद्यानुसार बालगुन्हेगारावर नियमित कोर्टात खटला चालवला गेला तरीही त्याला जन्मठेप अथवा फाशीची शिक्षा देण्यात येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अशा गुन्हेगारांना तुरुंगवास देणे शक्य होणार आहे.

लोकसभा सभागृहातील पहिल्या रांगेत कॉंग्रेसला फक्त दोन जागा

नवी दिल्ली - पाच दशकांहून अधिक काळ देशाच्या संसदेत सत्ताधारी बाकांवर वर्चस्व गाजवणार्‍या कॉंग्रेसवर १६व्या लोकसभेत भलतीच नामुष्की ओढवली आहे. कॉंग्रेसचं संख्याबळ पाहता, त्यांना पहिल्या रांगेतील फक्त दोनच जागा मिळू शकणार आहेत आणि इतरांना डावे, छोटे पक्ष आणि ’आप’ खासदारांच्या आजूबाजूला बसावं लागणार आहे. ५४३ सदस्यांच्या लोकसभेत कॉंग्रेसचे फक्त ४४ जण निवडून आलेत. म्हणजेच, विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक संख्याबळही त्यांच्याकडे नाही. हे पद मिळवण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असतानाच, सभागृहातील त्यांच्या उरल्यासुरल्या प्रतिष्ठेलाही धक्का बसलाय. लोकसभेतील आसनव्यवस्थेविषयी तज्ज्ञांशी सल्लामसलत करून, संख्याबळाचं गणित मांडून सभापती सुमित्रा महाजन यांनी ’जागावाटप’ निश्चित केलंय. त्यानुसार, कॉंग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी आणि पक्षाचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खर्गे या दोघांनाच विरोधी बाकांवरील ’फ्रंट रो’मध्ये बसता येणार आहे. त्यामुळे त्यांची पत अधिकच घसरली आहे. कारण, लोकसभेतील स्थान हे ’स्टेटस-सिम्बॉल’ मानलं जातं.

संसदेतील निकृष्ट जेवणामुळे जया बच्चन पडल्या आजारी

नवी दिल्ली - महाराष्ट्र सदनातील निकृष्ट दर्जाच्या जेवणाविरोधात शिवसेनेच्या खासदारांनी आवाज उठवल्यानंतर संसदेत आरडाओरड करणार्‍या उत्तरेतील अनेक खासदारांचा ’आवाज’ संसद भवनातील जेवणामुळे आपोआप बंद झाला आहे. संसदेच्या कँटिनमधील निकृष्ट जेवणामुळे सपाच्या खासदार जया बच्चन व रामगोपाल यादव आजारी पडले आहेत. या घटनेनंतर तरी आमच्या वेदना सर्वांना कळतील, अशी अपेक्षा मराठी खासदार व्यक्त करीत आहेत. संयुक्त जनता दलाचे खासदार केसी त्यागी यांनी बुधवारी राज्यसभेत हा मुद्दा मांडला. संसदेच्या कँटिनमधील जेवण घेतल्यानंतर रामगोपाल यादव यांनी चार दिवस खाट धरली होती. त्यांना तब्येत बिघडली. जया बच्चनसुद्धा या जेवणामुळे आजारी पडल्या असल्याचे त्यागी यांनी निदर्शनास आणले. हा मुद्दा चर्चेला आल्यामुळे जया बच्चन यांनीही आपला अनुभव सांगितला. जया बच्चन म्हणाल्या, ’मला याबद्दल बोलण्याची इच्छा नव्हती. मात्र, विषय निघाल्यामुळे बोलावे लागत आहेत. येथील जेवणामुळे मला प्रचंड त्रास झाला. कँटिनमध्ये शिळं जेवण दिलं जातं. चार-पाच वर्षांपासून असं जेवण दिलं जातंय, असंही जया बच्चन यांनी सांगितलं.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मिळू लागले मराठमोळे जेवण

नवी दिल्ली - शिवसेना खासदारांनी केलेल्या ’चपाती राड्या’नंतर आता दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात मराठमोळे जेवण मिळण्यास सुरुवात झाली आहे. महिला बचत गटाकडे हे काम सोपवण्यात आले असून सदनात सुग्रास जेवण मिळू लागल्याने शिवसेनेचा लढा यशस्वी झाल्याची चर्चा आहे. दिल्लीतल्या आधीच्या महाराष्ट्र सदनात उत्तम दर्जाचं जेवण मिळत असे. त्याची ख्याती संपूर्ण राजधानीत होती; परंतु, नव्या महाराष्ट्र सदनात कँटीनची सूत्रे ’आयआरसीटीसी’कडे सोपवण्यात आली आणि खासदारांचे जेवणाचे हाल सुरू झाले. त्यांना चविष्ट सोडाच, पण खाण्यायोग्य जेवणही मिळेनासे झाले. सन्मानजनक वागणूक नाही आणि त्यात भर म्हणून ’रबरी’ पोळ्या खायला लागल्याने शिवसेना खासदारांच्या रागाचा उद्रेक झाला आणि त्यांनी आपल्या ’स्टाइल’ने आंदोलन केले. त्यांच्या या ’चपाती राड्या’मुळे देशभरात गहजब झाला असला, शिवसेनेवर टीकेची झोड उठली असली, थोडीशी धार्मिक तेढ निर्माण झाली असली, तरी त्यांच्या या लढ्याला चांगलेच यश आले आहे.

Page 8 of 30