Saturday, Jan 20th

Headlines:

देश

मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण मंत्रालय तर सुरेश प्रभूंकडे रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आज पार पडल्यानंतर रात्री उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आले. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे संरक्षण, तर सुरेश प्रभूंकडे रेल्वे मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्याऐवजी त्यांच्याकडे आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार असेल. जे. पी. नड्डा यांना आरोग्यमंत्री करण्यात आले असून डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालय असेल.

कॉंग्रेसच्या विविध मंत्रालयांशी संबंधित सात समित्या स्थापन

नवी दिल्ली - मोदी सरकारच्या कामकाजावर नजर ठेवून दोन्ही सभागृहांमध्ये मुख्य विरोधी पक्ष म्हणून प्रभावी तसेच विधायक भूमिका बजावण्यासाठी कॉंग्रेसने विविध मंत्रालयांशी संबंधित सात समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, अशोक चव्हाण आणि राजीव सातव या मराठी नेत्यांचा समावेश आहे. कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मात्र या सातपैकी कोणत्याही समितीत नाहीत! अर्थ, वाणिज्य, परराष्ट्र तसेच माहिती व प्रसारण मंत्रालय - वीरप्पा मोईली, आनंद शर्मा आणि ज्योतिरादित्य शिंदे. गृह, संरक्षण आणि विधी व न्याय मंत्रालयावरील समिती - ए. के. अँटनी, अश्विनीकुमार आणि राजीव सातव. कृषी, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाशी संबंधित समिती - दिग्विजय सिंह, अशोक चव्हाण आणि निनांग एरिंग. रेल्वे आणि कामगारविषयक समिती - मल्लिकार्जुन खरगे, ऑस्कर फर्नांडिस आणि रंजीता रंजन.

एचएसबी बँकेने दिलेल्या खातेदारांच्या यादीतील २८९ खात्यांत रक्कमच नसल्याचे उघड

नवी दिल्ली - स्वित्झर्लंडच्या एचएसबीसी बँकेने दिलेल्या यादीतील २८९ खात्यात छदामही जमा नसल्याचे एसआयटीला आढळले. स्विस बँकेकडून भारताला मिळालेल्या ६२८ जणांच्या यादीत १२२ नावे दोनवेळा लिहिण्यात आल्याचेही समोर आले. एचएसबीसीच्या  जिनेव्हा शाखेतील कर्मचार्‍याकडून ही यादी २००६ मध्ये मिळाली होती. फ्रान्सने जून २००१ मध्ये ती भारताला दिली. सूत्रांनुसार प्राप्तिकर खाते ३०० खातेदारांविरुद्ध खटला चालवणार आहे. या प्रकरणी एसआयटीने ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टात प्राथमिक अहवाल दिला. स्विस बँकेतील खाती कधी उघडली, त्यात कधी व किती देवाणघेवाण झाली, हा तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे काळ्या पैसेवाल्यांविरुद्ध कारवाईत अडचण येणार आहे.

हरियाणात भाजपची सत्ता येताच रॉबर्ट वढेरा कंपन्या बंद करण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली - रियल इस्टेट उद्योगामध्ये शिखरे पादाक्रांत करण्याची इच्छा बाळगून हरियाणा आणि राजस्थानात ६ कंपन्या सुरू करणारे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा आता या कंपन्या एकापाठोपाठ एक बंद करत आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये सत्तापालट होऊन कॉंग्रेस सत्तेबाहेर गेली आहे.  हरियाणामध्ये डीएलएफबरोबरच्या जमीन व्यवहारामुळे वादात अडकलेल्या वढेरांच्या विरोधात चौकशी करण्याची घोषणा नव्या सरकारने केली होती. त्यानंतर नुकतेच वढेरा एका पत्रकाराबरोबर गैरवर्तन केल्यानेही वादात अडकले आहेत. इंग्रजी वृत्तपत्र डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार वढेरांनी बंद केलेल्या चार कंपन्यांमध्ये लाइफलाइन ऍग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड, ग्रीनवेव्ह ऍग्रो प्रायवेट लिमिटेड, राइटलाइन ऍग्रीकल्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि प्राइम टाइम ऍग्रो प्राइवेट लिमिटेड यांचा समावेश आहे. त्या शिवाय फ्यूजर इन्फ्रा ऍग्रो आणि बेस्ट सीझन्स प्रायवेट लिमिटेड या कंपन्याही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व कंपन्या २०१२ मध्ये सुरू करण्यात आल्या होत्या. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्सने दिलेल्या माहितीनुसार या सर्व कंपन्या कृषीसंबंधित किंवा जमीनीच्या व्यवहारांशी संबधित आहेत. वढेरा या सर्व कंपन्यांचे एमडी आहेत.

परदेशी बँकांमध्ये खाते असणार्‍या ६२७जणांची यादी सुप्रीम कोर्टात सादर

नवी दिल्ली - परदेशी बँकांमध्ये खाते असलेल्या सुमारे ६२७ खातेधारकांची यादी सरकारने सुप्रीम कोर्टात सादर केल्याची माहिती मिळत आहे. सरकारने एका बंद पाकिटात ही यादी कोर्टात सादर केल्याची माहिती मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर केंद्र सरकारने ही यादी कोर्टात सादर केली आहे.  ऍटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी कोर्यात यासंबंधी सकागदपत्रे सादर केली. या यादीतील नावे लोकांसमोर जाहीर करायची अथवा नाही, याचा निर्णय सुप्रीम कोर्टाला घ्यायचा असून सरकारमधील कोणीही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न करत नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे.

परदेशात काळा पैसा लपवणार्‍यांची नावे केंद्र सरकार उघड करणार

नवी दिल्ली - परदेशी बँकांमध्ये काळा पैसा लपविणार्‍या काही खातेधारकांची नावे सर्वोच्च न्यायालयात उघड करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ज्यांच्या विरोधात चौकशी सुरू आहे, अशांची नावे जाहीर केली जातील, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाला सांगितल्याचे समजते. विदेशी बँकांतील काळा पैसा हा भाजपने लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा बनविला होता. भाजपचे सरकार आल्यानंतर विदेशातील काळा पैसा परत आणला जाईल, असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, संबंधित देशांशी झालेल्या करारानुसार, काळा पैसा ठेवणार्‍या खातेधारकांची नावे जाहीर करता येणार नाहीत, असे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच न्यायालयात सांगितले. त्यावरून कॉंग्रेसने भाजप सरकारला घेरले. मोदी सरकार देशवासीयांची फसवणूक करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला.

आंध्रप्रदेश, ओरिसा राज्यांच्या किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा, दूरसंचार व्यवस्था कोलमडली

विशाखपट्टणम - ‘हुदहुद’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश व ओडिशाच्या किनारपट्टीवर दुपारी बाराच्या सुमारास धडकले. विशाखापट्टणम शहराच्या परिसराला या वादळाचा पहिला तडाखा बसला. सहा तास वादळाचा जोर होता. आंध्रातील तीन सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि ताशी १८०किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते. ओडिशालाही चक्रीवादळाचा असाच तडाखा बसला असून दोन्ही राज्यांत पाच लोकांचा मृत्यू झाला आहे. ओडिशात एके ठिकाणी दरडी कोसळल्या असून वीज व दूरसंचार व्यवस्था कोलमडली आहे. सायंकाळी सहानंतर या वादळाचा जोर कमी कमी झाला असला तरी याच्या प्रभावामुळे तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेने म्हटले आहे. चक्रीवादळामुळे आंध्र, ओडिशाच्या किनारपट्टीवर ताशी १७० ते १८० कि.मी. वेगाने वादळी वारे वाहत होते. त्यामुळे झाडे उन्मळून पडली, झोपड्या व अनेक घरांवरील पत्रे उडून गेली, भिंती कोसळल्या. श्रीकाकुलम व विजयनगरम जिल्ह्याला वादळाचा मोठा फटका बसला.

पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात ५जणांचा मृत्यू

नवी दिल्ली- पाकिस्तानच्या सैनिकांनी जम्मू-काश्मीरमधील अर्निया भागात जोरदार गोळीबार केला. यामध्ये पाच नागरिकांचा मृत्यू झाला असून, अन्य २६ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या सैनिकांनी मध्यरात्री पासून भारतीय जवानांच्या दिशेने व नागरी भागांवर जोरदार गोळीबाराला सुरवात केली. या गोळीबारात पाच स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असून, अन्य २६ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज सकाळपर्यंत गोळीबार सुरू होता. भारतीय जवानांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लष्करी अधिकाऱयांनी सांगितले की, ‘पाकने मध्यरात्रीपासून जोरदार गोळीबाराला सुरवात केली. भारतीय जवांनानीसुद्धा त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सकाळी आठ वाजेपर्यंत दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. यामध्ये भारतीय जवान जखमी झालेले नाहीत. तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

भारत- चीन दरम्यान तीन करारांवर सह्या

अहमदाबाद - चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या बहुचर्चित भारत दौर्‍याला बुधवारी गुजरातमधून सुरुवात झाली. चीनच्या अध्यक्षांनी प्रथमच राजधानी दिल्लीऐवजी एखाद्या राज्याला भेट देऊन दौर्‍याची सुरुवात केली. अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच जिनपिंग यांनी गुजरातच्या विकासाला हातभार लावणार्‍या तीन करारांवर सह्या केल्या. व्यापार, गुंतवणूक क्षेत्रात संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याने जिनपिंग यांच्या दौर्‍याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. श्रीलंकेचा दौरा आटोपून जिनपिंग यांचे बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर पत्नी पेंग यांच्यासह आगमन झाले. दोन्ही देशांदरम्यान, तीन करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. यात उद्योग, आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांच्या क्षेत्रात चीन गुजरातला मदत करण्यावर सहमती झाली. सायंकाळी सात नंतर पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग विमानाने दिल्लीला रवाना झाले.

Page 7 of 30