Saturday, Jan 20th

Headlines:

देश

सहारा समूहाच्या ऑफीसमधून १३५ कोटी रुपयांची रोकड जप्त

नवी दिल्ली - करचुकवेगिरी प्रकरणी प्राप्तिकर विभागाने सहारा समूहाच्या दिल्ली आणि नोएडा येथील ऑफिसवर छापा मारून १३५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. सुमारे एक कोटी रुपयांचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत. आजवर प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत सापडलेली ही सर्वांत मोठ्या रोख रकमेपैकी ही एक आहे. ही सर्व रक्कम एका सार्वजनिक बँकेच्या शाखेत भरण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, २२ नोव्हेंबरला ही कारवाई करण्यात आली. ठिकठिकाणी बेहिशेबी रोकड पडून असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती,’ असे प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या कारवाईत पकडलेल्या रोकड रकमेची माहिती सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) देणे प्राप्तिकर विभागावर बंधनकारक आहे. हवाला व्यवहारांच्या चौकशीसाठी ही माहिती द्यावी लागते. ’या बाबतचा अहवाल काळ्या पैशाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) आधीच पाठविण्यात आला आहे,’ असेही अधिकार्‍यांनी सांगितले.

सिलेंडरवरील सबसिडीचा लाभ यापुढे श्रीमंतांना मिळणार नाही : अरुण जेटली

नवी दिल्ली - ‘स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरवर मिळणारे अंशदान हे खर्‍या गरजूंनाच मिळायला हवे. त्यामुळे श्रीमंतांना अंशदानित सिलिंडर न देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. अनुदानासंदर्भात यापुढील निर्णय घेताना हे अनुदान केवळ गरजूंनाच मिळेल अशा पद्धतीने निर्णय घ्यावा लागेल,‘‘ असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज येथे केले. इंधनाच्या बाबतीत केंद्र सरकारने काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये सरकारने डिझेलचे दर विनियंत्रित केले आहेत. त्याचप्रमाणे देशांतर्गत तयार होणार्‍या गॅससाठी नवी दरपद्धतीही लागू केली आहे. आता सरकार स्वयंपाकाच्या गॅसवरील अंशदानाचा फेरविचार केंद्र करणार आहे. माझ्या सारख्यांना आता पुढील काळात अंशदान देण्यात यावे का, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. आपल्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा निर्णय गरजेचा आहे. सरकारच्या कार्यक्रमपत्रिकेवरही हा विषय आहे,‘‘ असे ते म्हणाले.

बुलेट ट्रेन प्रकल्याबाबत रेल्वेमंत्र्यांचे महत्वाचे निर्देश

नवी दिल्ली - ताशी तीनशे किमीपेक्षा अधिक वेगाने धावणार्‍या बुलेट ट्रेनच्या सर्व सहाही मार्गांचे काम एकाचवेळी हाती घेण्यात यावे आणि गरज पडल्यास प्रत्येक मार्गासाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात यावी, असे आदेश गुरुवारी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पांची जबाबदारी सांभाळत असलेल्या रेल विकास निगमच्या अधिकार्‍यांना दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दाखविलेले बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविण्यासाठी रेल विकास निगमने केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रभू यांनी रेल भवनात सर्व बड्या अधिकार्‍यांची बैठक बोलविली. या बैठकीचे रेल्वे मंडळाच्या सदस्यांना निमंत्रण नव्हते. मात्र, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा बैठकीला उपस्थित होते. एका मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर दुसर्‍याचे काम हाती घेण्याचा रेल निगमचा प्रस्ताव प्रभू यांनी अमान्य केला आणि एकाचवेळी सर्व मार्गांची कामे सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा कालापव्यय टळेल, असा तर्क त्यांनी दिला. हे सहाही प्रकल्प सुरू करण्यासाठी कोणकोणत्या देशांकडून गुंतवणूक मिळविता येईल, याची चर्चाही त्यांनी अधिकार्‍यांशी केली.

किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरु

नवी दिल्ली - ठराविक कालावधीत निश्चित आणि चांगला परतावा मिळवून देणार्‍या योजनांना गुंतवणूकदारांचा चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशीच काहीशी लोकप्रियता केंद्र सरकारच्या ’किसान विकास पत्र’ योजनेला मिळाली होती. डिसेंबर २०११मध्ये बंद झालेल्या या योजनेचे मंगळवारी पुनरुज्जीवन करण्यात आले. ’किसान विकास पत्र’ ही केंद्र सरकारचे पाठबळ लाभलेली गुंतवणूक योजना आहे. योजनेमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून जमा होणारा निधी केंद्र सरकारच्या विविध विकासकामांमध्ये वापरला जाणार आहे. गुंतवणूकदारांना १०००, ५,०००, १०,००० आणि पन्नास हजार रुपये किंवा त्यापटीत गुंतवणूक करण्याची मुभा आहे. कमाल गुंतवणूक किती असावी, यावर मर्यादा नाही.

काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार

श्रीनगर - जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाबाहेर तैनात एका सुरक्षा रक्षकाने गोळीबार केला आहे. बीएसएफच्या या जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडल्या, यानंतर त्याला अब्दूल्लांच्या निवासस्थान सुरक्षेतून काढून टाकण्यात आले आहे. गोळी झाडणार्‌या या जवानाला अटक करण्यात आली आहे. ज्यावेळी त्याने गोळीबार केला तेव्हा अब्दुल्ला घरात नव्हते. दरम्यान, उमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन सांगितले आहे, की त्यांचा त्यांच्या सुरक्षा रक्षकांवर पूर्ण विश्वास आहे. सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान जवानाने सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून चार-पाच गोळ्या झाडण्याचा आवाज आला. आवाज येताच त्याच्यासोबत तैनात असलेले इतर जवान सतर्क झाले आणि त्यांनी त्याला पकडले. या जवानाने फायरिंग का केली हे अद्याप समजू शकलेले नाही.

१४ महिलांच्या मृत्यूप्रकरणी महिलांना दिलेल्या औषधात झिंक फॉस्फाईड केमिकलचा अंश

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात संततीनियमन शस्त्रक्रिया शिबिरात ऑपरेशन केल्यानंतर झालेल्या १४ महिलांच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलांना देण्यात आलेल्या औषधात, उंदीर मारायच्या औषधात मिसळल्या जाणार्‍या झिंक फॉस्फाइड केमिकलचा अंश सापडल्यानं राज्याच्या आरोग्य विभागाच्या अब्रूचे धिंडवडेच निघाले आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारनं बिलासपूरमधील पेंडरी गावात संततीनियमन शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केलं होतं. त्यात लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. आर. के. गुप्ता यांनी अवघ्या काही तासांमध्ये ८३ महिलांचं ऑपरेशन केलं होतं. त्यानंतर अचानक सुमारे ४९ महिलांची प्रकृती खालावल्यानं गोंधळ उडाला होता. त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं, पण उपचारादरम्यान ११ महिलांचा मृत्यू ओढवला होता.

शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांचा आत्महत्येचा प्रयत्न

कोलकाता - तृणमूल कॉंग्रेसचे निलंबित खासदार आणि शारदा चिटफंड घोटाळ्यातील आरोपी कुणाल घोष यांनी तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना कोलकात्याच्या एसएसकेएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. झोपेच्या ९८ गोळ्या खावून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. घोटाळ्यात सहभागी असलेल्यांविरोधात तीन दिवसाच्या आत सीबीआयने कारवाई केली नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकी कुणाल घोष यांनी सोमवारी दिली होती. तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही शारदा चिटफंड घोटाळ्यात सामील आहे. या घोटाळ्यात आपण प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कुणाचा फायदा केला असेल तर त्या ममता बॅनर्जी आहेत, असं घोष यांनी सांगितलं.

शस्त्रक्रियेनंतर महिलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी डॉक्टरला अटक

विलासपूर (छत्तीसगड) - छत्तीसगडमधील विलासपूर येथे महिलांच्या नसबंदी शिबिरातील शस्त्रक्रियेनंतर आठ महिलांचा मृत्यु झाल्या प्रकरणी डॉक्टर आर. के. गुप्ता यांना अटक झाली आहे. या शिबिरामध्ये गुप्ता यांनी पाच तासांच्या कालावधीत ८० हून अधिक शस्त्रक्रिया केल्या होत्या. गुप्ता यांना मंगळवारी निलंबित करण्यात आले होते आणि त्यांच्याविरोधात ‘एफआयआर‘ दाखल करण्याचे आदेशही मुख्यमंत्री रमणसिंह यांनी दिले होते. गुप्ता यांनी शस्त्रक्रिया केलेल्या ८० महिलांपैकी ११ महिला ७२ तासांमध्ये मृत्युमुखी पडल्या. उर्वरित महिलांची प्रकृतीही गंभीर आहे. दरम्यान, या शिबिरातील शस्त्रक्रियेनंतर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १३-झाली असून आणखी एका महिलेची प्रकृती नाजूक आहे. या शिबिरामधील शस्त्रक्रियांसाठी वापरण्यात आलेल्या सहा औषधांवरही सरकारने बंदी घातली आहे.

अलिगड विद्यापीठातील भव्य ग्रंथालयात विद्यार्थिनींना प्रवेशबंदी

अलिगढ - मुलींकडे मुले आकर्षित होऊ शकतात आणि ग्रंथालयातील मुलांची गर्दी चारपटीने वाढेल, असा वादग्रस्त युक्तिवाद करत अलिगड विद्यापीठात विद्यार्थिनींना ग्रंथालयात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. तथापि, यामागे तसे कारण नसून ग्रंथालयात बसण्यासाठी जागा पुरत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची सारवासारव नंतर करण्यात आली आहे. विद्यापीठाचे मौलाना आझाद हे भव्य ग्रंथालय असून या ठिकाणी हजारो विद्यार्थ्यांना अभ्यास करता येण्याची सुविधा आहे. विद्यापीठाच्या महिला महाविद्यालयातील मुलींना या ग्रंथालयाचे सदस्यत्व दिले जात नाही. मुलींना १९६० पासूनच ग्रंथालयात प्रवेश नसल्याचे कुलगुरू जमीरुद्दीन  शहा यांनी म्हटले आहे.

Page 6 of 30