Tuesday, Jan 23rd

Headlines:

देश

अटलबिहारी वाजपेयी, पं. मदनमोहन मालवीय यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याची घोषणा

नवी दिल्ली - अमोघ वक्तृत्व लाभलेले भारतीय जनता पक्षाचे धुरीण, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देशातील पहिले कॉंग्रेसेतर पंतप्रधान अशी ओळख असलेले अटलबिहारी वाजपेयी आणि स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रचेतनेची ज्योत प्रज्ज्वलित करणारे स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. वाजपेयी यांचा ९०वा वाढदिवस आणि पं. मालवीय यांची जयंती आज, गुरुवारी असून त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे, बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली.

झारखंडमध्ये भाजपाला बहुमत तर काश्मीरमध्ये पीडीपी खालोखाल सर्वाधिक जागा

श्रीनगर/रांची - लोकसभेसह महाराष्ट्र, हरियानाच्या विधानसभा निवडणुकीतील करिष्म्यानंतर आता जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लहर असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या चौदा वर्षांपासून एकही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन न करू शकलेल्या झारखंडमध्ये भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. तर, जम्मू-काश्मीरमध्ये भाजपने पीडीपी खालोखाल सर्वांधिक जागा मिळविल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये एकूण ८७ जागांसाठी मतदान झाले होते. फुटीरवादी आणि दहशतवाद्यांच्या बहिष्काराच्या आवाहनानंतरही १९८७ नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणात मतदान झाले. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मुफ्ती महंमद सैद यांच्यासह सुमारे ८२१ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय आज झाला. झारखंडमध्येही नक्षलवाद्यांचा धोका असताना ८१ जागांसाठी सरासरी ६६ टक्के मतदान झाले होते.

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी मनमोहन सिंग यांचीही चौकशी होणार

नवी दिल्ली - कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अखेर माजी पंतप्रधान आणि कोळसा मंत्री मनमोहन सिंग हेही चौकशीच्या फेर्‍यात अडकले आहेत. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला कोळसा खाण बहाल केल्याप्रकरणी अधिक चौकशीची आवश्यकता अधोरेखित करताना कोर्टाने मनमोहन यांचा जबाब नोंदवण्याचे निर्देश सीबीआयला दिले. विशेष न्यायालयाने हिंदाल्को प्रकरणात तपास संस्थेने दिलेला क्लोजर रिपोर्ट आज फेटाळून लावला. हिंडाल्कोप्रकरणी कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख व संबंधितांची आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे तसेच या खाणवाटपावेळी कोळसा मंत्री राहिलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही जाब नोंदवण्यात यावा, असे न्यायालयाने नमूद केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार आहे. २००५ मध्ये बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला ओडिशात तालाबीरा दोन आणि तीन अशा दोन खाणींचे वितरण करण्यात आले. त्यावेळी कोळसा खात्याचा प्रभार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होता. त्यामुळेच या प्रकरणात मनमोहन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

इसिस या दहशतवादी संघटनेची भारताला धमकी

बंगळुरू - इराक व सिरियाच्या काही भागांवर ताबा मिळवून इस्लामिक स्टेट स्थापन करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या दहशतवादी संघटनेने आता भारतालाही धमकी दिली आहे. बंगळुरूमधून या संघटनेचे ट्विटर अकाऊंट ऑपरेट होत असल्याचे ब्रिटिश माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर पोलिसांनी मेंहदी या युवकास अटक केली आहे. या अटकेनंतर आयएसने या अटकेचा बदला घेऊ, अशी धमकी ट्विटरवरूनच दिली आहे. ‘आमच्या भावाला तुमच्या हाती पडू देणार नाही. आम्ही बदला घेऊ. वाट पहा,’ अशा शब्दांत ही धमकी देण्यात आली आहे. आयएसचे अकाऊंट चालवणार्‍या मेंहदी मसरुरू याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिस उपायुक्त (गुन्हे) अभिषेक गोयल यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. यांनतर काही वेळातच धमकी देणारे ट्विट करण्यात आले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जानेवारीपासून सुरु होणार

हैदराबाद - केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पाचे काम जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती केंद्रीय नगर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली आहे. आंध्रप्रदेशमधील तिरुपती मंदिरात आयोजित एका समारंभात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, देशभरात विविध ठिकाणी १०० स्मार्ट शहरे उभारण्यात येतील. पायाभूत सुविधांसह या शहरांमध्ये काही आधुनिक सोयीसुविधाही उपलब्ध होतील, असेही यावेळी नायडू यांनी सांगितले. तसेच देशातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसे राष्ट्रीय महामार्ग तसेच मुख्य मार्ग वाढवून त्यांचा विकास करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले.  या प्रकल्पावर खर्च होणार्‍या निधीतून सर्व समाजघटकांना नागरी सुविधा, सार्वजनिक सेवा आणि हातावर पोट असणार्‍यांसाठी रोजगार संधी निर्माण झाल्या, तर ही शहरे स्मार्ट शहरे होतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही

नवी दिल्ली - आत्महत्या करण्याच्या प्रयत्नाला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढण्याचा निर्णय केंद्र सरकार घेत आहे. या संदर्भात भारतीय दंड विधानातील (आयपीसी) ३०९ हे कलम रद्द करणार असल्याचे सरकारने बुधवारी राज्यसभेत सांगितले. गृहराज्यमंत्री हरिभाई पराथीभाई चौधरी यांनी सांगितले की, १८ राज्ये व ४ केंद्रशासित प्रदेशांनी कलम ३०९ रद्द करण्यास सहमती दर्शवली. विधी आयोगाने आपल्या २०१ व्या अहवालात ३०९ वे कलम (आत्महत्येचा प्रयत्न) मानवतेच्या दृष्टिकोनातून गैर असल्याचे सांगत ते वगळण्याची शिफारस केली होती. आत्महत्येचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर मानसिक त्रास सहन करणार्‍यांना कायद्याच्या जंजाळात अडकून नवा त्रास होऊ नये, असा हे कलम रद्द करण्याचा उद्देश आहे.

बलात्काराच्या घटनेनंतर उबर या अमेरिकन टॅक्सी कंपनीवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत उबर या अमेरिकन टॅक्सी कंपनीच्या ड्रायव्हरने शुक्रवारी रात्री बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करणार्‍या तरुणीवर केलेल्या बलात्कारानंतर या टॅक्सी सेवेवरच बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी दिल्ली सरकारने घेतला. केंद्र सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून ही टॅक्सीसेवा देशभरातच बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. बलात्कारी ड्रायव्हर शिवकुमार यादव याला रविवारी मथुरा येथून अटक करण्यात आली असून, सोमवारी त्याला तीन दिवसांची कोठडी देण्यात आली. शिवकुमार याला यापूर्वीही बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली होती. त्यानंतरही त्याला दिल्ली पोलिसांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात चारित्र्याचे प्रमाणपत्र बहाल केले होते! या घटनेनंतर उबर टॅक्सीविरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. संबंधित कंपनीने आपले गुरगावचे कार्यालय बंद केले असून, आरोपीला योग्य शिक्षा मिळावी यासाठी सर्व सहकार्य करण्याची तयारीही कंपनीच्या व्यवस्थापनाने दाखविली आहे. मात्र, या प्रकरणी गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा केल्याबद्दल आणि गुन्हेगाराला प्रोत्साहन दिल्याबद्दल उबरविरोधातही एफआयआर नोंदवण्याचा दिल्ली पोलिसांचा विचार आहे.

पाच पक्ष एकत्र येऊन समाजवादी जनता दल स्थापन करण्याच्या हालचाली सुरु

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढत्या राजकीय ताकदीला आव्हान देण्यासाठी मुलायम सिंह यादव, लालू प्रसाद यादव आणि नीतिश कुमार यांच्या नेतृत्वाखाली पाच पक्ष एकत्र येऊन ’समाजवादी जनता दल’ या नव्या पक्षाची स्थापना करण्याच्या तयारीत आहेत. याच संदर्भात गुरुवारी दिल्लीत मुलायम सिंह यादव यांच्या बंगल्यावर पाच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत मुलायम सिंह यादव यांचा समाजवादी पक्ष, लालूंचा राष्ट्रीय जनता दल, ओम प्रकाश चौटालांची इंडियन नॅशनल लोकदल पार्टी, शरद यादव आणि नीतिश कुमारांची जनता दल युनायटेड पार्टी तसेच देवेगौडांची जनता दल सेक्यलुर पार्टी सहभागी होणार आहे.

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीत ७० टक्के मतदान

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील मतदारांनी मोठ्या संख्येत उतरून मतदान केल्याने राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १५ मतदारसंघांसाठी मंगळवारी ७० टक्के मतदान नोंदवले गेले. मतदान संपण्याच्या वेळी केंद्रात हजर असलेल्या मतदारांना मतदानाची परवानगी दिल्याने हा आकडा आणखी दोन-तीन टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. एकही अनुचित घटना न घडता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या प्रचंड मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. हुर्रियन कॉन्फरन्स आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट आदी फुटीरतावादी संघटनांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. मात्र काश्मिरी मतदारांनी मोठ्या संख्येत मतदान करून त्यांना चपराक दिल्याचे मानले जात आहे.

Page 5 of 30