Saturday, Jan 20th

Headlines:

देश

मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाच्या प्रदर्शनास संमती दिल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्ड अध्यक्षांचा राजीनामा

नवी दिल्ली - डेरा सच्चा साहिब या पंजाबमधील धार्मिक व समाजिक संस्थेचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग हे मुख्य भूमिका साकारत असलेल्या ‘मेसेंजर ऑफ गॉड‘ या चित्रपटास चित्रपट लवादाकडून प्रदर्शनाची संमती मिळाल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा चित्रपट आज  प्रदर्शित होणार होता. या प्रकरणी सॅमसन यांनी थेट प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटास फॅक्टने प्रदर्शनाची परवानगी दिल्याप्रकरणी अद्याप अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. मी असे ऐकले आहे. मात्र यासंदर्भात लिखित स्वरुपात अद्याप काहीही कागदपत्रे मिळालेली नाहीत. माझा राजीनामा देण्याचा निर्णय अंतिम आहे व मी यासंदर्भातील माहिती माहिती प्रसारण मंत्रालयास कळविली आहे, असे सॅमसन म्हणाल्या.

रेपो रेट कमी केल्याने शेअर बाजारात तेजी

मुंबई - देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी रेपो रेट कमी करा, अशी सूचना खुद्द केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेली असतानाही, गेल्या महिन्यांत हे दर ’जैसे थे’च ठेवणार्‍या रिझर्व्ह बँकेनं आज सकाळी अचानक रेपो रेट ०.२५ टक्क्यांनी कमी करून संक्रातीच्या मुहूर्तावर कर्जदारांना जणू व्याजदरकपातीचा तिळगूळच वाटला आहे. या दरकपातीमुळे ईएमआय कमी होण्याची शक्यता असल्यानं कर्जदारांच्या खिशात महिनाअखेरीस थोडे जास्त पैसे शिल्लक राहणार आहेत. रेपो रेट कपातीचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला असून सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्स ६०० अंशांनी झेपावला. बँकांच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्याचं चित्र आहे. त्याशिवाय, रिअल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर कंपन्यांचे शेअरही चांगलेच वधारलेत.

कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणी

नवी दिल्ली- सातत्याने उलटसुलट विधानांमुळे चर्चेत राहणारे कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी आज पुन्हा नेतृत्व बदलाचा मुद्दा उकरून काढला आणि राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेसचे पूर्ण नेतृत्व सोपविले जावे, अशी मागणी केली. कॉंग्रेसधील वरिष्ठांनी त्यांच्या या वक्तव्यावर टिप्पणी करताना माध्यमांमध्ये बोलण्याऐवजी थेट सोनियांना भेटून मागणी करावी‘, असा उपरोधिक सल्ला दिला. राहुल गांधींकडे कॉंग्रेसचे अध्यक्षपद देण्याची मागणी दिग्विजयसिंह यांनी गेल्या काही काळापासून चालविली आहे. लोकसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या पराभवानंतरही त्यांनी ही मागणी लावून धरली होती. कॉंग्रेसमध्ये सदस्य नोंदणी अभियान आणि संघटनात्मक निवडणूक प्रक्रिया सुरू असून, मे महिन्यात अध्यक्षपदासाठी निवडणूक होईल. अर्थात, सर्वसंमत उमेदवार असल्यास अध्यक्षपदासाठी निवडणुकीची गरज नसल्याचे कॉंग्रेसतर्फे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्षपदी पुन्हा सोनिया गांधी की राहुल गांधी याची चर्चा सुरू आहे. अशात राहुल गांधींकडे पक्षनेतृत्व देण्याची मागणी दिग्विजयसिंह यांनी पुन्हा एकदा पुढे केली आहे.

भारत सुरु करणार स्वत:ची ग्लोबल पोझिशनींग सिस्टीम

चेन्नई  - इस्त्रो या वर्षी आणखी काही उपग्रहांच्या प्रक्षेपणाची तयारी करत आहे. यात आयआरएनएसएस १-डीचा समावेश असून यामुळे भारत स्वत:ची दिशासूचक प्रणाली सुरू करू शकणार असून ती अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या बरोबरीची असेल.  इस्रोच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, आयआरएनएसएस १-डीचे प्रक्षेपण अभियान १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. दोन महिन्यांच्या आत इस्रोच्या इतर प्रयोगशाळांमधील सर्व उपकरणे श्रीहरिकोटाला घेऊन जाण्याचे कठीण आव्हान आहे. १५ मार्चनंतर या उपग्रहाचे प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे.

भारतीय चौक्या आणि गावांवर पाकिस्तानी सैन्याचा पुन्हा गोळीबार

जम्मू - पाकिस्तानी सैन्याकडून सोमवारी रात्रभर आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक भारतीय चौक्या आणि गावांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक आज जम्मूतील गोळीबाराने प्रभावित झालेल्या भागांचा दौरा करणार आहेत. पाकिस्तानी रेंजर्सकडून सोमवारी झालेल्या गोळीबारात एक बीएसएफचा जवान जखमी झाला होता. जम्मूतील सांबा आणि हिरानगर सेक्टरमधील भारतीय चौक्यांना पाककडून लक्ष्य करण्यात येत आहे. पाकिस्तानी सैन्याकडून सतत होत असलेल्या गोळीबारामुळे सांबा आणि हिरानगर सेक्टरमधील गावांतील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या भागातील अनेक शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक परीक्षा रखडल्या आहेत. कठुआ जिल्हा प्रशासनाने सीमेजवळील सर्व गावांतील शाळा, महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद केली आहेत. सीमेनजीक गावांना याचा मोठा फटका बसला आहे.

स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर भाजपामध्ये अंतर्गत मतभेद

नवी दिल्ली - विदर्भाचे वेगळे राज्य करण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि राज्यातील नेतृत्व यामध्ये विसंवाद असल्याचे चित्र समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्यासारखी मंडळी वेगळा विदर्भ होणारच अशा घोषणा करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर चौकशी करता भाजपच्या उच्चस्तरीय वर्तुळातील नेत्यांनी वेगळ्या विदर्भाबाबत अद्याप काही ठरविण्यात आलेले नाही,‘ असे आज अनौपचारिकपणे सांगितले.
फडणवीस किंवा गडकरी आणि इतर नेते महाराष्ट्रात सातत्याने विदर्भाचे वेगळे राज्य होणारच, वेगळा विदर्भ झाल्याखेरीज राहणार नाही, योग्य वेळी निर्णय केला जाईल वगैरे घोषणा करीत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील सरकार आणि मुख्यमंत्री हे विदर्भाचे आहेत की काय अशी शंका उत्पन्न होऊ लागली आहे, अशी टिप्पणी केली असता या उच्चस्तरीय नेत्याने हसत म्हटले, ते म्हणतात ते खरे आहे. योग्य वेळी निर्णय केला जाईल. परंतु तो वेगळ्या विदर्भाचा असेल याची हमी आहे काय? तसे कोणी अद्याप निश्‍चित केलेले आहे काय? भाजपने अद्याप याबाबत काही ठरविलेले नाही.‘

यापुढे नियोजन आयोग नीती आयोग म्हणून ओळखला जाणार

नवी दिल्ली - कालबद्ध व नियोजनबद्ध विकासासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर स्थापण्यात आलेला नियोजन आयोग गुंडाळण्यास केंद्र सरकारने सुरुवात केली आहे. यापुढे नियोजन आयोग ’नीती आयोग’ म्हणून ओळखला जाणार आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता आहे. नियोजन आयोगाची उपयुक्तता संपली असून त्याजागी नवी यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात बोलून दाखवली होती. मात्र, कॉंग्रेसने केंद्र सरकारच्या या भूमिकेला जोरदार विरोध दर्शवला होता. ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉंग्रेसनेही याप्रश्नी सरकारवर टीका केली. मात्र, मोदी सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून नियोजन आयोगाचे नामांतर करून त्यांनी याची चुणूक दाखवली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.

भारतविरोधी प्रचार करणार्‍या ३२ वेबसाईटवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली - भारतविरोधी मजकूर पसरवत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून ३२ वेबसाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.  इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (इसिस) यासारख्या दहशतवादी संघटनांकडून भारताविरोधात या वेबसाईट्सवरून प्रचार होत असल्यामुळे सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याने आम्ही या वेबसाईट्स बंद करत असल्याचे, सरकारने निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या डेलिमोशन, व्हिमिओ यासारख्या वेबसाईट्स आज नेटिझन्स सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना वेबसाईट्स सुरूच होत नव्हत्या. भारतात इंटरनेट सेवा पुरविणार्‍या सर्व प्रमुख कंपन्यांना या वेबसाईट्स बंद घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या ३२ वेबसाईट्समध्ये अनेक लोकप्रिय वेबसाईट्स आहेत.

बेंगळूरमधील बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट

नवी दिल्ली - बेंगळुरूमध्ये झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले असून इसिसचा ट्विटर हँडलर मेहंदी मसरूर बिस्वास याच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केल्याने या स्फोटाचे गांभीर्य वाढले आहे. नाताळ आणि थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर ’आयबी’ने सर्व राज्यांना सतर्कतेचे आदेश दिले असतानाही बेंगळुरू स्फोट रोखता न आल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून या घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय सुरक्षा संस्था, गुप्तचर संघटनेचे प्रमुख आणि गृह सचिवांना बोलवून घेतले आहे. त्याचवेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी हा स्फोट दहशतवाद्यांनी घडवल्याचे नमूद करताना गरज पडल्यास तपास ’एनआयए’कडे देण्यात येईल, असे सांगितले. याबाबत अंतिम निर्णय गृहमंत्री राजनाथ घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Page 4 of 30