Tuesday, Jan 23rd

Headlines:

देश

गॅस सिलींडरवरील अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होणार

नवी दिल्ली - थेट अनुदान हस्तांतर योजनेंतर्गत गॅस सिलिंडरवरील अनुदान ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ मेपासून २० जिल्ह्यांमध्ये सिलिंडरवरील अनुदानवाटप केले जाणार आहे. मात्र, सिलिंडरधारक लाभार्थींची अद्ययावत यादी पेट्रोलियम मंत्रालयाकडे तयार असल्यास त्यात आणखी जिल्हे जोडले जातील, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज येथे केली. पुढील वर्षी ३१ मार्चअखेरपर्यंत देशातील सर्व सिलिंडर ग्राहकांचा यात समावेश करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. थेट अनुदान हस्तांतर योजनेच्या विस्ताराबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खाद्यान्न आणि गॅस सिलिंडरवरचे अनुदान वाटप थेट अनुदान हस्तांतर योजनेमार्फत देणे शक्य नसल्याचे सरकारतर्फे वारंवार सांगितले गेले होते. मात्र, पुढील वर्षी मेमध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ३१ मार्चपर्यंत अनुदान योजना अंमलबजावणीची घोषणा ही राजकीय लाभासाठी असल्याचे मानले जात आहे.

ब्रिटीश महिला पर्यटकाचा खून

श्रीनगर- दाल लेकमधील हाऊसबोटमध्ये एका ब्रिटिश महिला पर्यटकाचा मृतदेह शनिवारी आढळून आला. या महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सारा एलिझाबेथ असे या पर्यटक महिलेचे नाव आहे. आज सकाळी हाऊसबोटमधील तिच्या खोलीत तिचा मृतावस्थेत आढळून आला. यावेळी तिचे कपडेही फाटले होते. बलात्कार करून तिचा खून करण्यात आला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या हाऊसबोटमधील तिच्या खोलीशेजारी राहणारा डच पर्यटक दावित रिचोर्ड (वय ४३) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याने पळण्याचा प्रयत्न केल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे.

साखर उद्योग अंशत: नियंत्रणमुक्त

नवी दिल्ली - देशातील तब्बल ८० हजार कोटींचा साखर उद्योग अशंतः नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला . आता साखरेचे दर केंद्र सरकार नव्हे तर, खुल्या बाजारातील परिस्थितीनुसार ठरतील. ही नवी पद्धत स्थिरस्थावर होईपर्यंत साखरचे दर काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात नेमलेल्या रंगराजन समितीने गेल्या वर्षीच साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याची शिफारस केली होती. खुल्या बाजारात साखर विक्री करण्याचा पूर्ण अधिकार साखर कारखान्यांना देण्यात आला आहे. खुल्या बाजारातील साखर विक्रीचा कोटा, त्याचे दरही केंद्र सरकार ठरवून देत असे. आता साखर विक्रीसाठी खुली करण्यावर सरकारचे नियंत्रण राहणार नाही.

विद्यार्थी नेत्याच्या मृत्यूवरून ममता गोत्यात, बंगाल तापले

कोलकाता/नवी दिल्ली - माकपप्रणीत विद्यार्थी संघटना स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) २२ वर्षीय विद्यार्थी  नेत्याच्या मृत्यूवरून पश्चिम बंगालमध्ये तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी मात्र हा अपघाती मृत्यू ठरवला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ द. कोलकात्यात गुरुवारी १२ तासांचा बंद पुकारण्यात आला आहे. सुदीप्तोच्या मृत्यूनंतर बंगालमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोलकात्यात विद्यार्थी संघटनांनी बुधवारी उग्र निदर्शने केली.दिल्लीतही जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यानी ममता सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. बुधवारी एसएसकेएम रुग्णालयाबाहेर सुदीप्तोचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आला त्या वेळी विद्यार्थ्यांची गर्दी उसळली होती.  पोलिसांनी सुदीप्तोच्या डोक्यावर मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

राष्ट्रपतींनी पाच दयेचे अर्ज फेटाळले

नवी दिल्ली- दयेचे अर्ज निकाली लावण्याचा सपाटा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी लावला आहे. राष्ट्रपतींनी आणखी पाच दयेचे अर्ज फेटाळले असून दोन गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेप बजावली आहे. बलात्कार प्रकरणी जामिनावर मुक्तता करण्यात आल्यानंतर पाच जणांची निर्घृण हत्या करणार्‍या गुन्हेगारासह पाच जणांची फाशीची शिक्षा राष्ट्रपतींनी कायम ठेवली आहे. परंतु, दोन गुन्हेगारांची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेप बजावण्याचा निर्णय राष्ट्रपतींनी घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींना नऊ दयेचे अर्ज पाठविले होते. त्यापैकी मुंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्‌यातील दहशतवादी अजमल कसाब आणि संसदेवरील दहशतवादी हल्ल्‌यातील प्रमुख आरोपी अफजल गुरू यांचे अर्ज राष्ट्रपतींनी आधीच फेटाळले आहेत. उरलेले सात अर्ज राष्ट्रपतींनी आज निकाली काढले.

पेट्रोल ८५ पैसे, तर अंशदानित सिलिंडर एक रुपयाने स्वस्त

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय पातळीवरील किमतीत घट झाल्याने आजपासून पेट्रोल ८५ पैशांनी, तर विनाअंशदानित सिलिंडर मुंबईत साडेसात रुपयांनी व अंशदानित सिलिंडर एक रुपयाने स्वस्त झाला आहे. त्यामुळे महागाईत होरपळणार्‍या ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. दर महिन्याला बदलणार्‍या गॅसच्या दरात एप्रिल महिन्यात तेल कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतींमध्ये घसरण झाल्यामुळे तेल कंपन्यांनी गॅसचा दर कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे अंशदानित नऊ सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर खरेदी कराव्या लागणार्‍या विनाअंशदानित सिलिंडरची किंमत आजपासून ९०१.५० रुपयांवर आल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (आयओसी) जाहीर केले.

इटली खलाशी प्रकरण चौकशीसाठी राष्ट्रीय तपास पथकाकडे

नवी दिल्ली - वादग्रस्त इटली खलाशी प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास पथकाकडे (एनआयए) वर्ग करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय जाहीर केला. या प्रकरणाची सुरवातीपासून चौकशी करून त्याचा अहवाल एनआयए’च्या विशेष न्यायालयात सादर करणार आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये केरळच्या समुद्र किनारपट्टीजवळ इटलीच्या मास्सीमिलीआनो लाट्टोरे आणि सॅलवेटोरे गिरोनी या खलाशांनी दोघा भारतीय मच्छीमारांची हत्या केल्याचा संशय आहे. या दोघांना सर्वोच्च न्यायालयाने मतदानासाठी इटलीला जाण्याची अनुमती दिली होती. मात्र, त्या दोघांनी भारतात परतण्यास नकार दिला होता. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या दबावानंतर दोघे दिलेल्या मुदतीत भारतात परतले.

Page 30 of 30