Saturday, Jan 20th

Headlines:

देश

महत्वाची माहिती पंतप्रधानांपर्यंत पोहचण्याआधीच मिळतेय खासगी कंपन्यांना

नवी दिल्ली - पेट्रोलियम मंत्रालयातील माहिती चोरीचे प्रकरण उघड झाल्यापासून दररोज चकित करणारी माहिती समोर येत आहे. सरकारच्या योजनांबाबतची माहिती पंतप्रधानांकडे पोहोचण्यापूर्वीच ती खाजगी कंपन्यांना मिळत होती, असा पोलिसांचा दावा आहे. तसेच आरोपींकडे असलेल्या काही महत्त्वाच्या कागदपत्रांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येण्याची भीतीही एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केली. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून हस्तगत केलेली कागदपत्रे आणि इतर महत्त्वाच्या ऐवजांवरून ही बाब स्पष्ट झाली आहे. आतापर्यंत अनेक महत्त्वाची कागदपत्रे मिळाली आहेत. त्यातील काही कागदपत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहोचलीच नाहीत, असे तपास यंत्रणेतील तज्ज्ञांनी सांगितले.

मंत्रालयातील गोपनीय माहिती चोरी प्रकरणी पाच कंपन्यांच्या अधिकार्‍यांना अटक

नवी दिल्ली - पेट्रोलियम मंत्रालयातील गोपनीय दस्तावेज चोरीच्या प्रकरणाने अत्यंत गंभीर वळण घेतले असून अटक केलेल्या आरोपींकडे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पावरील अर्थमंत्र्यांच्या प्रस्तावित भाषणाचे अंश सापडल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला. दरम्यान, रात्री उशिरा रिलायन्सचे शैलेश सक्सेना, रिलायन्स एडीएजीचे ऋषी आनंद, एस्सारचे विनय कुमार, र्केन्सचे के. के. नाईक, ज्युबिलंट एनर्जीचे सुभाष चंद्र यांनाही अटक केल्याने या घोटाळ्याचा संबंध बड्या कंपन्यांपर्यंत पोहोचला आहे. पेट्रोलियम मंत्रालयासह वीज आणि कोळसा मंत्रालयातील गोपनीय दस्तावेजांचीही चोरी होत असल्याचे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींकडे सापडलेल्या तीन डायर्‍यांमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.येत्या २८ फेब्रुवारीला संसदेत मांडल्या जाणार्‍या अर्थसंकल्पाच्या भाषणाचेही काही अंश आरोपींकडे सापडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

देशभरात अडीच महिन्यांत ५८५जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश, उत्तरांचलसारखा बर्फाच्छादित प्रदेश, राजस्थानसारखा वाळवंटी प्रदेश, मध्य प्रदेशमधील जंगली भाग तसेच महाराष्ट्र-गुजरातसारखा किनारपट्टी भाग अशा संपूर्ण देशालाच स्वाइन फ्लूने वेढा घातला आहे. या आजाराचा भीषण चेहरा समोर आला असून अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइनच्या आजाराने देशभरात ५८५ जणांचा मृत्यू ओढवला आहे. यापैकी १०० जण अवघ्या तीन दिवसांत दगावल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे सोमवारी जाहीर करण्यात आली. सध्या ८४२३ जणांवर स्वाइन उपचार सुरू आहेत. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला स्वाइन फ्लूचा सर्वाधिक फटका बसला असून या राज्यांत आतापर्यंत अनुक्रमे १६५, १४४, ७६, ५८ जणांचा मृत्यू ओढवला आहे. १५ फेब्रुवारीच्या एका दिवसात राजस्थानात १५ तर मध्य प्रदेश व गुजरातमध्ये आठ पेशंटांना जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये स्वाइन पेशंटची सर्वाधिक संख्या असली तरी या आजाराविषयीची जागरूकता व उत्कृष्ट आरोग्य सेवेमुळे मृतांची संख्या मात्र कमी आहे. मात्र पंजाबमध्ये उलट परिस्थिती आहे. येथील ६८ पेशंटपैकी तब्बल २५ जणांना जीव गमवावा लागला.

पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत पुन्हा कपात

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती उतरत असल्यामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात नव्याने कपात करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर २.४२ रुपयांनी, तर डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासूनच ही दरकपात लागू होईल. मुंबईमध्ये एक लिटर पेट्रोल आता ६६.३६ रुपयांऐवजी ६३.९० रुपयांना मिळेल. डिझेलसाठी ५५.४७ ऐवजी ५२.९९ रुपये द्यावे लागतील. याआधी १ आणि १५ जानेवारी रोजी पेट्रोल, डिझेलची दरकपात झाली होती.

माओवादी नक्षलवाद्यांचा गस्त घालणार्‍या पोलिसांवर हल्ला, पोलीस कॉन्स्टेबल शहीद

कांकेर - छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातल्या बांदे पोलिस स्टेशनच्या हद्दीत माओवादी नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पोलिस स्टेशन प्रमुख (एसएचओ) आणि कॉन्स्टेबल शहीद झाले. या हल्ल्यात पाच पोलिस आणि दोन नागरिकही जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. नक्षलवादी हल्ल्याचे वृत्त कळताच घटनास्थळी पोलिसांची अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, बारा दुचाक्यांवरुन २४ पोलिस जवान गस्तीवर निघाले असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला. कांकेर जिल्ह्यातल्या हवलपरस गावाजवळ डोंगराळ भागात बांदे पोलिस स्टेशनच्या हद्दीत नक्षलवाद्यांनी योजनाबद्धरित्या हा हल्ला केला. या हल्ल्यात एसएचओ (स्टेशन हाऊस ऑफिसर) अविनाश शर्मा आणि कॉन्स्टेबल सोनू शहीद झाले. पोलिस दलाचे शुक्ला, मिचू मंडावी आणि सीमा सुरक्षा दलाचे ३ जवान जखमी झाले. नक्षलवाद्यांच्या गोळीबारात कार्तिक मंडल आणि रानू पडदा हे नागरिकही जखमी झाले.

धार्मिक वाद टाळल्यास भारत वेगाने प्रगती करेल : बराक ओबामा

नवी दिल्ली- धर्माच्या नावावर होणारी विभागणी टाळली गेली तर भारत निश्चितपणे वेगाने प्रगती करील, असा सल्ला  अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍याच्या समारोपप्रसंगी दिला. भारत अमेरिकेचा भक्कम आणि उत्तम सहकारी आहे. दोन्ही देश भविष्यातील आव्हानांचा एकत्रितपणे मुकाबला करतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी बोलून दाखवला. सौदी अरेबियाला रवाना होण्यापूर्वी सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये त्यांनी अमेरिकन शैलीत टाउन हॉल मीटिंग घेतली. दोन हजार लोक या वेळी उपस्थित होते. ओबामा यांच्याशिवाय एकही भारतीय नेता मंचावर नव्हता. ओबामांचे ३५ मिनिटांचे भाषण जोशपूर्ण होते. त्यांनी भाषणाची सुरुवात ‘नमस्ते’ने केली तर ‘जय हिंद’ने शेवट केला. ओबामा यांनी शाहरुख खान, मिल्खा सिंग, एम. सी. मेरी कोम आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांचाही उल्लेख केला. भारताला सर्व धर्मांतील लोकांचा अभिमान आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला.

कोळसा घोटाळा प्रकरणी झाली पंतप्रधानांची चौकशी

नवी दिल्ली - देशभरात गाजलेल्या हजारो कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळा प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे. ही चौकशी रविवारी झाल्याचे वृत्त आहे. मात्र, ते आतापर्यंत गुप्त ठेवण्यात आले होते. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी मनमोहनसिंग यांच्या निवासस्थानी जाऊन सुमारे १ तास त्यांना प्रश्न विचारले, असे समजते. या चौकशीतून काय निष्पन्न झाले हे समजू शकलेले नाही. सीबीआयने त्यासंदर्भात मौन पाळले आहे. तथापि, ही चौकशी जुजबी स्वरूपाची होती असेही बोलले जात आहे. मात्र यामुळे मनमोहनसिंग हे एखाद्या घोटाळयाच्या प्रकरणात चौकशी झालेले पहिले माजी पंतप्रधान ठरले आहेत, अशी चर्चा आहे. हिंडाल्को या कंपनीच्या व्यवहारांसंदर्भात ही चौकशी होती. या कंपनीवर कोळसा घोटाळा प्रकरणी आरोप आहेत. या कंपनीला तालाबिरा येथील कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या. त्यावेळी कोळसा खाते प्रत्यक्ष मनमोहनसिंग यांच्याच हाती होते. त्यामुळे त्यांचीही चौकशी करण्याचा आदेश दिल्लीतील सीबीआय न्यायालयाने गेल्या महिन्यात दिला होता. माजी पंतप्रधानांच्या चौकशीनंतर आता सीबीआयचे पुढचे पाऊल कोणते असेल हे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

आता युरिया खताच्या दरावरील सरकारी नियंत्रण हटवणार

मुंबई - पेट्रोल आणि डिझेल ही इंधने सरकारी दरनियंत्रणातून बाहेर काढल्यानंतर आता केंद्रातील भाजप सरकारने युरिया खतालाही सरकारी दरनियंत्रणातून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे विनियंत्रण चटकन होणार नसून ते तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.  युरियाच्या दर विनियंत्रणाचा कालबद्ध कार्यक्रम आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच वेळी तीन वर्षांत दरवर्षी २० टक्के याप्रमाणे कमाल विक्री किमतीत वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ खरिपाच्या वेळी १० टक्के आणि रब्बीच्या वेळी १० टक्के अशी करण्याचाही विचार सरकार करत आहे. यामुळे युरियाची विक्री किंमत विनासबसिडी स्वरूपात प्रतिटन ९ हजार ५०० रुपये किंवा ५० किलोच्या गोणीसाठी ४७५ रुपये होईल.

कर्मचार्‍यांना मिळणार सर्वंकष असे स्मार्ट कार्ड

मुंबई - केंद्र सरकारच्या विविध समाज कल्याणकारी योजनांचा लाभ घेता यावा यासाठी कर्मचार्‍यांना सर्वंकष असे एकच स्मार्ट कार्ड देण्याचा केंद्रीय कामगार मंत्रालयाचा विचार आहे. या स्मार्ट कार्डचा वापर करून देशातील कर्मचार्‍यांना पेन्शन, भविष्यनिर्वाह निधी आणि आरोग्य विमा यांसारख्या सुविधांचा लाभ घेता येईल. अशाप्रकारे बहुउद्देशीय स्मार्ट कार्ड लवकरात लवकर देता यावे, यासाठी कामगार मंत्रालय युद्धपातळीवर काम करत आहे. त्यासाठी कर्मचार्‍याचा युनिव्हर्सल पीएफ खाते क्रमांक, कर्मचारी राज्य विमा, आधार, पॅन, बँक खाते क्रमांक यांच्याबरोबरच आयएफएससी क्रमांक यांची माहिती कर्मचारीनिहाय संकलित केली जात आहे. या स्मार्ट कार्डअंतर्गत सामाजिक सुरक्षितता योजनाही कर्मचार्‍यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या कार्डाचा वापर कर्मचार्‍याची ओळख पटवून घेण्यासाठी, त्याचे वय, पत्ता, बँक खाते आणि त्याच्यावर अवलंबून असणारे कुटुंबातील सदस्य यांची माहिती किंवा पडताळा घेण्यासाठी केला जाणार आहे. यानंतर संबंधित कर्मचार्‍याला कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) व कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) या एजन्सींकडून मिळणारे लाभ देण्यासाठीही या कार्डाचा उपयोग होणार आहे. युनिव्हर्सल पीएफ खाते क्रमांक (यूएएन) वितरीत झाल्यानंतरच स्मार्ट कार्डे देण्यात येणार आहेत.

Page 3 of 30