Thursday, Nov 23rd

Headlines:

देश

दहशतवाद्यांना फाशी न देता त्यांना आजीवन कारागृहात डांबावे : माजी मंत्री शशी थरुर

तिरुअनंतपुरम/कोची  - मुंबईतील साखळी बॉंबस्फोटातील एक आरोपी याकूब मेमनला फाशी दिल्यानंतर त्याला फाशी देणे योग्य की अयोग्य, याबाबत वाक्‌युद्ध सुरू आहे. कॉंग्रेसचे माजी मंत्री शशी थरूर यांनीही दहशतवाद्यांना फाशी देण्यास आपला विरोध असून, त्यांना कधीच पॅरोल न देता आजीवन कारागृहात डांबावे, असे म्हटले आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनीही थरूर यांच्या सुरात सूर मिसळला आहे. दहशतवाद्यांना फाशी देऊ नये, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे.
‘ट्री वॉक‘ पर्यावरण संघटनेने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात थरूर बोलत होते. ते म्हणाले, एखाद्या गुन्हेगाराने जर खून केला असेल तर त्याला फाशी दिली जात नाही. तर त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली जाते. याकूबच्या फाशीसंदर्भात मी जे ट्विट केले होते त्यावरून प्रचंड टीका झाली होती. मात्र, याकूबला शिक्षा देण्यास माझा कधीच विरोध नव्हता; तर मी फाशीविरोधात माझे मत मांडले होते. कोणत्याही गुन्हेगाराला फाशी देऊ नये, असे आजही माझे मत आहे. केवळ मीच नव्हे तर भाजपचे खासदार वरुण गांधी, शत्रुघ्न सिन्हा, डी. राजा, सीताराम येचुरी, द्रमुकच्या कनिमोळी आदी नेत्यांनीही फाशीच्या शिक्षेस विरोध दर्शविला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

भारतीय नौदलाचे शक्तीप्रदर्शन

नवी दिल्ली - सतत आक्रमक पवित्रा घेणार्‍या आणि विविध मार्गाने भारतावर दडपण आणण्याचा प्रयत्न करणा-या चीनला इशारा देण्यासाठी भारतीय नौदल हिंदी महासागरात शक्तीप्रदर्शन करणार आहे. मोदी सरकारने या शक्तीप्रदर्शनासाठी अमेरिका आणि जपानशी करार केला आहे. या करारानुसार भारत, अमेरिका आणि जपानचे नौदल ऑक्टोबर महिन्यात युद्ध सराव करणार आहेत. मलबार असे या युद्ध सरावाचे नामकरण करण्यात आले आहे.
युद्ध सरावाची आखणी करण्यासंदर्भात भारत, अमेरिका आणि जपानच्या अधिका-यांची टोकियो येथे एक बैठक झाली. या बैठकीत भारत, अमेरिका आणि जपानचे नौदल मलबार युद्ध सराव करेल असा निर्णय झाला. मात्र या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भूसंपादन विधेयकाचा पराभव करणार : राहुल गांधी

जयपूर - ’संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भूसंपादन विधेयकाचा पराभव केल्याखेरीज आम्ही राहणार नाही’, असा इशारा देत, ’येत्या सहा महिन्यांत देशातील नागरिक मोदी सरकारला धडा शिकवतील’, असे उद्गार कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी येथे काढले.
राजस्थान दौर्‍यावर आलेले राहुल यांनी शुक्रवारी येथील जाहीर सभेत मोदी सरकारवर बोचरी टीका केली. ’भूसंपादन कायद्यासाठी मोदी सरकारने तीन वेळा वटहुकूम काढला. आता पावसाळी अधिवेशनात त्याचे विधेयक मांडण्यात येईल. पण ते आम्ही मंजूर होऊ देणार नाही. मग मोदी यांची ५६ इंची छाती ५.६ इंची झालेली दिसेल’, असा टोला राहुल यांनी हाणला. ललित मोदी प्रकरणाच्या संदर्भाने राहुल यांनी वसुंधराराजे सरकारला धारेवर धरले. ’या सरकारचा रिमोट कंट्रोल लंडनमध्ये आहे’, असा टोला त्यांनी लगावला. ललित मोदी सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहेत, याचा संदर्भ राहुल यांच्या विधानास होता. ’ललित मोदी हे आर्थिक घोटाळे करणारे, फरार गृहस्थ आहेत. देशाच्या कायद्यांची पायमल्ली करणार्‍या माणसाला वसुंधराराजेंनी मदत केली’, अशी टीका राहुल यांनी केली.

स्टेट बँकेची महिलांसाठी सवलतीच्या दराने नवीन वाहनकर्ज योजना

मुंबई - स्टेट बँक ऑफ इंडिया‘ने महिलांसाठीच्या खास योजनेमध्ये वाहनकर्जावर सूट देणारी नवी ‘हर घर हर कार‘ नावाची योजना सादर केली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) अलिकडेच नवीन योजना सादर केल्या आहेत. महिलांना बळ देऊन त्यांना सक्षम करण्याच्या हेतूने एसबीआयने अलिकडेच महिलांसाठी ‘हर घर‘ नावाची योजना आणली होती. या योजनेत गृहकर्जदरात ०.२५ टक्के सूट देण्यात आली होती. त्यामुळे महिलांना केवळ १० टक्के व्याजदराने गृहकर्ज उपलब्ध झाले होते. आता एसबीआयने या योजनेत सहभागी झालेल्या महिलांसाठी हर घर हर कार‘ ही योजनाही सादर केली आहे. या योजनेमध्ये महिलांना १० टक्के कर्जदराने वाहनकर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेशिवाय वाहनकर्ज घेणार्‍या महिलांना १०.२५ टक्के व्याजदराने वाहनकर्ज उपलब्ध आहे.

राम मंदिर उभारणीच्या गप्पा मारणं थांबवा : शंकराचार्य

नवी दिल्ली - राम जन्मभूमी, राम मंदिराची उभारणी याबाबत गप्पा मारणं पुरे करा. आमचं आम्हीच राम मंदिर उभारू, तुमच्या मदतीची गरज नाही, असा आक्रमक पवित्रा घेत द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरलंय. राज्यसभेत बहुमत नसल्यानं संसदेत राम मंदिराबाबतचा प्रस्ताव आणणं जरा कठीणच दिसतंय, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केल्यानं हिंदू संतमहंत चांगलेच खवळलेत.
दिल्लीच्या रामलीला मैदानावर आयोजित हिंदू धर्म संसदेत शंकराचार्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. अयोध्या ही रामजन्मभूमीच आहे. या जागेशी बाबरचं नाव राजकीय फायद्यासाठीच जोडण्यात आलंय. बाबर या ठिकाणी कधीही आला नव्हता, हे कोर्टानंही मान्य केलंय. त्यामुळे या खटल्यात आता सुप्रीम कोर्टाचा निकाल लवकर आल्यास कुठल्याही राजकीय पक्षाच्या मदतीशिवाय आम्ही संतच राम मंदिर उभारू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. राम मंदिराबाबत चर्चा करणं तुम्ही सोडून द्या, आम्हाला तुमचा पैसा नको, जनता पैसा देईल आणि आम्ही मंदिर बांधू, असं त्यांनी ठणकावलं.

नेट न्यूट्रॅलिटी हा प्रत्येक तरुणाचा अधिकार : राहुल गांधी

नवी दिल्ली - केंद्र सरकार इंटरनेटलाही मोठमोठ्या उद्योजकांना वाटण्याच्या प्रयत्नात आहे. नेट न्यूट्रॅलिटी हा प्रत्येक तरुणाचा अधिकार आहे, असे मत कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत व्यक्त केले.
देशभरात चर्चेत असलेल्या नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्यावर आपल्याला लोकसभेत बोलायचे आहे, असे आज सकाळी राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावर त्यांनी स्थगन प्रस्ताव आणत प्रश्नोत्तराच्या काळात बोलण्यास परवानगी मागितली होती. आज सकाळी लोकसभेचे कामकाज सुरू होताच राहुल गांधी यांनी या मुद्यावर आपले म्हणणे स्पष्ट केले.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘इंटरनेट न्यूट्रॅलिटी हा खूप अवघड शब्द असून, नेटचा अधिकार अशी त्याची सोपी व्याख्या करता येईल. प्रत्येक युवकाला नेट वापरण्याचा अधिकार आहे.  माझी सरकारला अशी विनंती आहे, नेट न्यूटॅलिटीचा अधिकार सर्वांना दिला पाहिजे. नेट न्यूट्रॅलिटीवर कायदा करण्याची गरज आहे.‘‘

राहुल गांधी यांचा लोकसभेत आक्रमक पवित्रा

नवी दिल्ली - दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर सक्रिय राजकारणात परतलेल्या राहुल गांधी यांनी रामलीला मैदानापाठोपाठ सोमवारी लोकसभेचेही मैदान मारले! अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकर्‍यांची बाजू मांडताना राहुल यांनी ’शेतकरी आणि शेतमजुरांच्या व्यथेकडे काणाडोळा करणारे तुमचे सरकार हे उद्योगपतींचे, मोठ्या लोकांचे, सुटाबुटातील लोकांचे सरकार आहे,’ अशा उपरोधिक भाषेत मोदी सरकारचा समाचार घेतला. सोळाव्या लोकसभेत प्रथमच बोलताना राहुल यांनी आपल्या २१ मिनिटांच्या आणि वारंवार व्यत्यय आलेल्या निवेदनादरम्यान मोदी सरकारला शेतकरी आणि भूसंपादनाच्या मु्‌द्यावर पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे देशभरात झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली, तेव्हा भाजप सदस्यांनी बँकॉक, थायलंड आणि म्यानमारचे टोमणे लगावून त्यांच्या निवेदनात व्यत्यय आणणे सुरू केले. पण, राहुल बिचकले नाहीत. टोमणेबाजीचा त्यांनी शांतपणे सामना केला आणि कुरघोडीची एकही संधी न सोडता, जशास तशी उपरोधिक टोलेबाजी केली.

‘लिव्ह इन’मधील जोडपे विवाहित दाम्पत्यच : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली  - ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये दिर्घकाळ एकत्र राहणाऱया स्त्राी आणि पुरूष जोडप्यालाही विवाहित दाम्पत्याचा दर्जा मिळू शकतो. तसेच, जोडिदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपत्तीत हक्क सांगण्याचा अधिकारही एकत्र राहणाऱया स्त्रीला किंवा पुरूषाला प्राप्त होणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायाधीश एम. वाय. इक्बाल आणि अमितवा रॉय यांच्या पीठाने हा निकाल दिला. दिर्घकाळ एकत्र राहणाऱया स्त्री-पुरूषांना पती-पत्नीचा दर्जा मिळू शकतो. हे जोडपे ऐकमेकांच्या संपत्तीवर अधिकारही सांगू शकते, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या जोडप्यांना आपल्या संपत्तीत जोडीदाराला हक्क द्यायचा नसल्यास त्यासाठी सबळ पुरावा सादर करावा लागणार आहे. न्यायालयाने हा पुरावा मान्य केल्यानंतर त्यांना कायदेशीर अधिकारातून सूट मिळू शकतो, असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार

नवी दिल्ली - ’जब जब फूल खिले’, ’नमक हलाल’, ’दिवार’, ’कभी कभी’ यांसह शंभराहून अधिक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका करणारे ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते शशी कपूर यांना चित्रपटसृष्टीत मोलाची कामगिरी केल्याबद्दल दिला जाणारा मानाचा ’दादासाहेब फाळके पुरस्कार’ सोमवारी जाहीर करण्यात आला. सुवर्णकमळ, १० लाख रुपये आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वडील पृथ्वीराज कपूर आणि बंधू राज कपूर यांच्यानंतर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळालेले शशी कपूर हे घराण्यातील तिसरे सदस्य आहेत. सध्या आजारपणामुळे व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या ७७ वर्षीय शशी कपूर यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ कारकिर्दीला फाळके पुरस्काराच्या रूपाने सलाम करण्यात आला आहे.

Page 1 of 30

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »