Tuesday, Jan 23rd

Headlines:

महाराष्ट्र

तिसर्‍या दिवशी एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरुच

मुंबई -  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. कर्मचारी संघटना सातव्या वेतन आयोगावर ठाम असून कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक सुरू होती. कर्मचारी संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारल्याने गुरूवारी तिसर्‍या दिवशीही एसटीचा संप सुरूच राहणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे आजही लाखो प्रवाशांना याची झळ पोहोचणार आहे. दरम्यान, शासनाकडून २.५७ हजार कोटींचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु, संघटना साडेचार हजार कोटींच्या प्रस्तावावर अडून बसल्याचे सांगण्यात येते. रावते यांनी कर्मचारी संघटनांना संप मागे घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, आज पुन्हा होणार्‍या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एसटी संपामुळे खासगी वाहनांतून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरु

मुंबई - वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) कर्मचार्‌यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरुवात झाली आहे. ऐन सणासुदीत राज्यभर लालपरीची चाके थांबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असतानाच, राज्य सरकारने संपकाळात सर्व खासगी प्रवासी बस, शालेय बस, खासगी बस व मालवाहू गाड्यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली. जवळपास ४,००० हून अधिक खासगी गाड्यांतून प्रवासी वाहतूक करण्यात आली. तर, एसटीने मुंबई आगारातून २०१८ व पुणे आगारातून २५० खासगी बस सोडल्याने काही प्रवाशांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, कर्मचारी हजर न झाल्यास कारवाईचा इशारा परिवहन प्रधानसचिवांनी दिला आहे.
संप अटळ असल्याचे लक्षात येताच राज्य शासनाने मंगळवारी सकाळपासून पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भल्या पहाटेच राज्यातील आरटीओंना खासगी वाहने पुरविण्याचे आदेश देण्यात आले होते.
त्यानुसार एसटीच्या विभागीय वाहतूक अधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. विभागीय वाहतूक अधिकारी श्रीनिवास जोशी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत आणि खासगी वाहतूकदार संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. संपामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून खासगी वाहतूकदारांनी बसेसला संरक्षण मिळण्याच्या अटीवर गाड्या पुरविण्याचे मान्य केले. त्यानुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत पुणे विभागातून सुमारे साडेचारशे खासगी वाहने आगारातून सोडण्यात आली. त्यात ३४५ बसेस आणि १०३ इतर वाहनांचा समावेश होता.  तसेच अन्यही शंभर वाहने विभागातून सोडण्यात आली. त्यात टाटा मॅजिक, कॅब, स्कूल व्हॅन अशा वाहनांचाही समावेश होता. या वाहनांनी बसच्या तिकीट दरानुसारच तिकीट आकारावे, असे आदेश देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी दिली.

आजपासून एसटी कर्मचार्‍यांचा संप

मुंबई - एसटी कर्मचर्‌यांना सातवा वेतन आयोग लागू करावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने १७ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.  सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी कामगार संघटनेकडून महामंडळाकडे करण्यात आली आहे.
दि. १६ रोजी मध्यरात्रीपासून हा संप सुरू होणार आहे. या संपात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना (मान्यताप्राप्त), महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना, संघर्ष ग्रुप आदी सहयोगी संघटना सहभागी होणार आहेत.

कोल्हापूर- मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी एअर इंडियाबरोबर चर्चा

कोल्हापूर - कोल्हापूर -  मुंबई विमानसेवा  सुरू करण्याच्या हालचालीना वेग आला आहे. या विमानतळावरून विमानाचा परवाना जरी अन्य कंपनीला मिळाला असला तरी त्यांच्याकडून ही सेवा सुरू करण्यात होणारा  उशीर  टाळण्यासाठी एअर इंडिया अशी विमानसेवा उपलब्ध करून देण्यास तयार आहे का? यासंदर्भात राज्याचे महसुलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री  चंद्रकांत पाटील यांनी एअर इंडियाच्य अधिकार्‌यांंसमवेत बैठक घेतली. त्यावेळी एअर इंडियाच्या अधिकार्‍यांनी असा प्रस्ताव दिल्लीला मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूरला विमानतळ असला  तरी तेथून विमानसेवा सुरू नाही. औद्योगिक नगरी असलेल्या कोल्हापूरची  आता शैक्षणिक व हेल्थ हब म्हणून ओळख निर्माण झाली आहे.अंबाबाई मंदिर , जोतिबा मंदिर, नृसिंहवाडी, खिद्रापूर यामुळे धामिर्क पर्यटकांची संख्या मोठी आहे.  तर कोल्हापूर ही  चित्रनगरी आहेच.  मात्र विमानसेवा नसल्याने कोल्हापूरच्या विकासात मोठा अडसर निर्माण झाला आहे. विशेषत: उद्योजकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे  उद्योजकांची विमानसेवेची मागणी आहे. त्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यामागच्या अडचणी संपत नाहीत अशी परिस्थिती आहे.
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू करण्यातील  या सर्व अडचणी संपविण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनात बैठक घेतली. सध्या कोल्हापूरला  विमानतळाचा परवाना नाही. हा परवाना तातडीने मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून येत्या काही दिवसांत हा परवाना मिळेल याची ग्वाही मंत्री पाटील यांनी या बैठकीत दिली. त्यामुळे विमानसेवा सुरू करण्यातील पहिला अडथळा दूर झाला आहे.
या बैठकीला राज्याच्या विमानचालन विभागाच्या  प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, एअर इंडियाच्या पश्‍चिम विभागाचे  महाव्यवस्थापक रवि बोदडे, सह महाव्यवस्थापक विनायक कुलकर्णी, एमएबी एव्हीएशनचे कार्यकारी संचालक मंदार भारदे आदी उपस्थित होते.

कुठेही पळा, अटक अटळ; विश्वास नांगरे- पाटील यांचा उदयनराजेंना इशारा

कोल्हापूर - कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे पुन्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत आमने-सामने येण्याच्या तयारीत आहेत.
खा. उदयनराजे भोसले आणि आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात झालेल्या राड्याप्रकरणी, नांगरे-पाटील यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यात आणेवाडी टोलनाक्याच्या कंत्राटावरुन राडा झाला होता. याप्रकरणी पोलिसांकडून अटकसत्र सुरु आहे.
प्रत्येकाचा गुन्ह्यातील सहभाग पाहून कठोर कारवाई करु, मग तो कोणीही असो कायदा सर्वांना समान आहे, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले. इतकेच नाही तर या राड्यात सहभागी असणारे आरोपी पळून पळून कुठे पळतील?, कुठेही पळाले तरी त्यांना अटक करणारच, असा थेट इशारा नांगरे पाटील यांनी दिला. यावेळी नांगरे पाटील यांनी पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांचे आणि सातारा पोलिसांचे कौतुक केलं. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिस दुपारपासून अलर्ट होते. एसपी संदीप पाटील हे वायरलेसवरुन सातत्याने पोलिसांच्या संपर्कात होते. पण मध्यरात्री असा प्रकार घडेल असा अंदाज नव्हता, पण तरीही पोलिसांनी परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली असे नांगरे पाटील म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनीही थर्ड पार्टी म्हणून गुन्हा दाखल केला आहे. घटनेदिवशी फायरिंग झाले असून दोन पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे, तर या राड्यात अनेक जण जखमी झाले आहेत. ते गुपचूपपणे उपचार घेत आहे. मात्र पोलीस त्यांचा शोध घेऊन, त्यांना अटक करतील, असंही नांगरे पाटील यांनी सांगितले.

पेट्रोल प्रतिलीटर २ रुपये तर डिझेल १ रुपयांनी स्वस्त

मुंबई - केंद्र सरकारपाठोपाठ आता राज्य सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धीत कर (व्हॅट) कमी केला असून यामुळे पेट्रोल प्रतिलिटर २ रुपये तर डिझेल प्रति लिटर १ रुपयांनी स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने देशभरात संतापाचा आगडोंब उसळला होता. केंद्र सरकारने हा आगडोंब शमविण्यासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी केला होता. राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलवरील कर कमी करावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते.
गुजरातपाठोपाठ मंगळवारी राज्य सरकारनेही पेट्रोल- डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल- डिझेलचे दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे. आज (मंगळवारी) मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. पेट्रोल लिटरमागे २ तर डिझेल लिटरमागे १ रुपयांनी स्वस्त होणार आहे.
भारतात महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवर सर्वाधिक व्हॅट आहे. सोमवारीच राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल- डिझेल दरकपातीची घोषणा केली होती. मात्र अधिभार कमी करायचा की व्हॅट कमी करायचा बाबात निर्णय झाला नव्हता. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात पेट्रोलवर २५ टक्के तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आहे. तर इतर ठिकाणी पेट्रोलवर २६ टक्के आणि डिझेलवर २२ टक्के व्हॅट आहे.

महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ : शरद पवार

मुंबई - महाराष्ट्रातील राजकारण प्रगल्भ आहे. पक्षीय मतभेद विसरून लोक एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होतात. देशात अन्य कोणत्याच राज्यात ही परंपरा पाहायला मिळत नाही. संसदेतही असे चित्र दिसत नाही. महाराष्ट्र हे सुसंस्कृत लोकांचे राज्य आहे. राजकीय विरोधातही व्यक्तिगत सलोखा जपला जातो, असे उद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी येथे काढले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणाजया ‘समग्र’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा सोहळा सोमवारी रवींद्र नाट्यमंदिरात झाला. शिवसेना वगळता सर्वच राजकीत पक्षांच्या दिग्गजांनी लावलेली हजेरी, उपस्थित
नेत्यांच्या राजकीय कोपरखळ्‌या, मिश्किल शेरेबाजीत तटकरे यांच्या राजकीय वाटचालीच्या कौतुकाचा हृदय सोहळा राजकीय, सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला. पवार कुटुंबीयांचे राजकारणातील विरोधक म्हणून ओळखले जाणारे मंत्री महादेव जानकर आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत व्यासपीठावर उपस्थित होते.
एरवी, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना राजकीय टोमणे मारणारे शरद पवार सोमवारी त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले होते. तर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यामध्ये ‘एनडीए’त सहभागी झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे हास्यविनोदात रंगल्याचे चित्र होते.
रायगड जिल्ह्याच्या राजकारणात तटकरेंचे कट्टर स्पर्धक शेकापचे जयंत पाटील यांनीही कोपरखळ्या मारत तटकरेंना शुभेच्छा दिल्या. जातीचे संख्याबळ सोबत नसतानाही, ताकदवान नेत्यांची परंपरा असणाजया रायगड जिल्ह्यात तटकरे यांनी स्वत:चे स्थान निर्माण केले. एका लहान कुटुंबातून पुढे येऊन जिल्ह्यातील लोकांच्या मनावर राज्य केले. यातच त्यांच्या कर्तृत्वाची प्रचिती मिळते. तटकरे यांच्या कौतुकासाठी जमलेल्या विविध पक्षातील नेत्यांमुळे हे व्यासपीठ राज्याच्या सुसंस्कृतपणाचे आणि सलोख्याचे प्रतिक वाटत असल्याची भावना शरद पवार यांनी व्यक्त केली.

कोळशाचा स्टॉक का केला नाही? : शरद पवार

मुंबई : कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ ऑगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. पण सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असे सांगत नियोजनाअभावीच राज्यात आठ-आठ तासांचे भारनियमन सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.
राष्ट्रवादीच्या लीगल सेलने आयोजित केलेल्या अधिवक्ता परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ वाढत आहे. सरकार कर्जमाफीसाठी ऑनलाइन पद्धतीने २० कॉलमचा फॉर्म भरण्याची सक्ती करत आहे. एखाद्या लहानशा चुकीमुळेसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले.
पंतप्रधान म्हणतात, १५ दिवस आधीच दिवाळी आली. पण ती कुठेच कशी दिसत नाही, असा सवाल करून खा. पवार म्हणाले, जीएसटीसाठी कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून मी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र्र मोदी यांनी जीएसटीच्या विरोधात सर्वांत जास्त आक्रमक भाषण केले होते. आज त्यांनीच जीएसटीचा कर २८ टक्क्यांवर नेला, अशी टीका पवार यांनी केली.

महाराष्ट्राला अंधारात ढकलणार्‍यांनो आता तरी ‘दिवे’ लावा- शिवसेना

मुंबई - विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणार्‍या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.
राज्यात सुरू असलेल्या भारनियमनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेने भाजपला चांगलेच फैलावर घेतले आहे. काळोखात बुडालेला महाराष्ट्र पाहता ते गेले आणि हे आले, पण काय बदलले? असा प्रश्न जनतेला पडू लागला आहे. ‘विकासविकास’ म्हणून खूप ऊर बडवला, पण तो तर कुठेच दिसत नाही. म्हणून लोडशेडिंगचा अंधार केला जात आहे काय, असा सवाल लोक राज्यकर्त्यांना विचारत आहेत. महाराष्ट्राला अंधारात ढकलणाऱयांनो, कोळसा उगाळणे थांबवा आणि आता तरी ‘दिवे’ लावा, अशी खरमरीत टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.
पूर्वाश्रमीची सगळीच सरकारे आणि राज्यकर्ते तद्दन नालायक होते. राज्य कारभार कशाशी खातात हेच त्यांना ठाऊक नव्हते. आता आम्हीच काय तो या महाराष्ट्राचा आणि देशाचा उद्धार करू, अशा गमजा मारणार्‍या मंडळींचे बुरखे दररोजच टराटरा फाटत आहेत. विकासापासून ते ‘अच्छे दिन’पर्यंत, ‘मेक इन इंडिया’पासून ते महागाईपर्यंत आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांपासून महाराष्ट्राला अंधारात लोटणार्‍या लोडशेडिंगपर्यंत प्रत्येक आघाडीवर राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेचे वस्त्रहरण होत असल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.
कोळशाचा नियमित पुरवठा होत नसल्यामुळे वीजनिर्मितीत अडथळे येत असल्याचा दावा सरकारी वीज कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, वीजनिर्मितीसाठी कोळसा आवश्यक आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर कोळशाचा पुरेसा साठा करून का नाही ठेवला? टंचाई-टंचाई म्हणून तोच तो कोळसा किती दिवस उगाळत बसणार? पुन्हा कितीही उगाळला तरी शेवटी कोळसा तो कोळसाच! त्यामुळे तेच ते रडगाणे जनतेला ऐकवण्यापेक्षा एवढ्या दिवसांत कोळशाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न का नाही केलेत? केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे तुम्हीच सत्तेवर आहात. मग अडचण कसली? कोळशाचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यात तुम्ही चुकला असाल, कमी पडला असाल तर तसे जाहीर करून लोडशेडिंगचे चटके सहन करणार्‍या महाराष्ट्रातील जनतेची माफी मागा, अशी मागणी शिवसेनेने केली.

Page 4 of 153