Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

उरणचे शेतकरी पुन्हा भूमिहीन होणार; १८ गावांत भूसंपादनाचा निर्णय

E-mail Print PDF
उरण - महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई लगत असलेल्या उरणमधील जमिनी संपादित केल्या जात असून, विकासाच्या नावाखाली शेतकर्‍यांना भूमिहीन करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये संतापाची लाट पसरली असून आमच्याच जमिनी का, असा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून १९६०ला राज्य सरकारने या परिसराचा विकास करण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सिडको महामंडळाची स्थापना करून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आली. त्यासाठी उरणमधील १८ गावांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. त्यानंतर २००१च्या दरम्यान पुन्हा एकदा उरण पनवेल तालुक्यातील २३ गावांच्या विकासासाठी खोपटा विकास प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली. यात उरणच्या पूर्व विभागातील जमिनींचा समावेश आहे. तर २००५ मध्ये उरणच्याच जमिनींवर महामुंबई सेझच्या खासगी प्रकल्पाची घोषणा झाली. त्यासाठी भूसंपादन करताना संघर्षही झाला. तरीही २०१० ला पुन्हा एकदा नैना प्रकल्पाची घोषणा करताना यातही उरणच्याच शेतजमिनींचा समावेश आहे. शिवाय याच जमिनींवर एमएमआरडीएने देखील प्रारूप विकास आराखडा घोषित केलेला आहे.

नैना प्रकल्पासाठी रायगड जिल्ह्यातील दुसरा विकास आराखडा तयार

E-mail Print PDF
अलिबाग - नवी मुंबई विमानतळ प्रभावित क्षेत्रातील (नैना) शेतकरी सिडकोला एकत्रित साडेसात हेक्टर जमीन देण्यास तयार नसतानाही सिडकोने रायगड जिल्ह्यातील २०१ गावातील ४७४ हेक्टर जमिनीचा दुसरा विकास आराखडा तयार केला आहे. शेतकर्‍यांनी साडेसात हेक्टर जमीन दिल्यानंतर सिडको त्या बदल्यात त्यांना १.७ वाढीव एफएसआय देणार आहे. सिडकोचे हे प्रलोभन पनवेल तालुक्यातील एकही शेतकर्‍याने स्वीकारलेले नाही. पनवेल, उरण, पेण, तालुक्यांतील शेतकरी सिडकोला जमीन देण्यास तयार नाहीत.
सिडकोच्या बैठकीत शुक्रवारी नैना क्षेत्रातील दुसर्‍या टप्प्यातील विकास आराखडयाला मंजुरी देण्यात आली. हा आराखडा यानंतर राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यापूर्वी सिडकोने पनवेल तालुक्यातील २३ गावांच्या ३७ हेक्टर जमिनीवरील ग्रीन सिटी प्रकल्पाचा विकास आराखडाला तयार केला आहे. या ३७ हेक्टर जमिनीवरील शेतकर्‍यांनी सिडकोच्या स्वेच्छाविकासाला संमती दिलेली नाही. सिडकोने येथील शेतकर्‍यांकडून साडेसात हेक्टर जमीन (सुमारे २५ एकर) मागितली असून त्या बदल्यात या शेतकर्‍यांना १.७ वाढीव एफएसआय देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यानंतर सिडको ६० टक्केजमीन शेतकर्‍यांना परत करणार आहे. ४० टक्के जमिनीवर पायाभूत सुविधा पुरविणार आहे. यात गृहनिर्माण प्रकल्पांचाही समावेश आहे. या सर्व सुविधांवर सिडको टप्प्याटप्प्याने साडेसात हजार कोटी रुपये खर्च करणार आहे. हा खर्च सिडको ४० टक्के जमिनीतील १५ टक्के जमीन विकून वसूल करणार आहे.
शेतकर्‍यांकडे इतक्या मोठया प्रमाणात जमीन नाही आणि जी आहे, ती बडया विकासकांनी विकत घेतली आहे. त्यामुळे सिडकोच्या आवाहनाला प्रतिसाद मिळालेला नाही. जमीन संपादन करणे आता पूर्वीप्रमाणे सोपे न राहिल्याने सिडकोने ही देवघेवची शक्कल लढवली आहे. प्रतिसाद मिळत नसताना सिडकोने दुसर्‍या टप्प्यातील २०१ गावांतील ४७४ हेक्टर जमिनीसाठी आराखडा मंजूर केला आहे. सिडकोवर रायगडमधील ६० हजार हेक्टर जमिनीचा विकास करण्याची आहे.

अलिबाग समुद्रकिनारी फिरायला गेलेेल्या दोघांचा बुडून मृत्यू

E-mail Print PDF
अलिबाग - येथील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या रसायनीच्या होमडेकोर कंपनीतील पाच कामगारांपैकी दोघांचा समुद्राला आलेल्या भरतीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह समुद्राच्या भरतीच्या पाण्यात बेपत्ता झाले असून, हे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सौरभ खान (२३), वृषभ सिवा (३५) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे असून, ही घटना आज दुपारी पावणेतीनच्या सुमारास घडली. या दोघांसह पाचजण रसायनीच्या होमडेकोर कंपनीतून आज अलिबागला फिरायला आले होते. या पाचजणांपैकी दोघेजण अलिबागच्या किनार्‍यावर बसून राहिले, तर सौरभ खान (२३), वृषभ सिवा (३५) आणि सुरेश स्वामी (५६) हे तिघेजण अलिबागच्या समुद्रातील कुलाबा शिवकालीन किल्ल्‌यात फिरायला गेले होते.
परतीच्या वेळी समुद्राला भरती सुरु झाल्याने किल्ल्‌यातील काही नागरिकांनी त्यांना जाऊ नका असे सांगितले. परंतु या तिघांनी त्याकडे दुर्लक्ष करीत किनार्‍याकडे येण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी भरतीचे पाणी अधिक वाढल्याने या भरतीच्या पाण्यात तिघेही सापडले. पैकी सौरभ खान आणि वृषभ सिवा हे दोघे बुडू लागताच पोहता येत असलेल्या सुरेश स्वामीने त्यांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु मोठ्या भरतीच्या लाटेत हे दोघेही वाहून गेले आणि सुरेश स्वामी यांनी पोहत किनारा गाठला. त्याने किनार्‍यावरील आपल्या अन्य दोन सहकार्‍यांना ही बातमी सांगताच किनार्‍यावरील लाईफगार्डच्या माध्यमातून वाहून गेलेल्या दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरु झाला. अलिबाग पोलिसांना ही माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डी.बी. निघोट, अलिबागचे पोलिस निरिक्षक सुरेश वराडे आणि त्यांचे सहकारी तसेच अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर बोटीच्या माध्यमातून बेपत्ता दोघांना शोधण्याचा प्रयत्न सुरु केले, परंतु समु्‌द्राला असलेल्या मोठ्या भरतीमुळे दोघांचेही मृतदेह हाती लागले नाहीत. त्यामुळे हे मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याचे अलिबागचे पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांना सांगितले.

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात सहा प्रवासी जखमी

E-mail Print PDF
महाड - महाडनजीक महामार्गावरील गांधारपाले गावचे हद्दीत तीन वाहनांचा विचित्र अपघात होऊन सहा प्रवासी जखमी झाले. सोमवारी दुपारी तीन वाजता हा अपघात झाला.
कार चालक एम.एच. ०४/ ३८२९ ही गाडी घेऊन मुंबईकडे जात असताना गांधारपाले गावाजवळ समोरून येणाजया कार नं. एम.एच. ०५ सी.एच. ४४७८ ला धडक दिली. त्यानंतर याच कारने मुंबईकडून येणाजया एम.एच. ०४ जी.जे. ७५८० कारला धडक दिली. या झालेल्या विचित्र अपघातामध्ये तिन्ही कारमधील मिळून एकूण सहा प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामध्ये गुंजन गीत, राजेश गीत ( दोघे रा. कल्याण), अरुणा राव, विशाल कुदर, आशा सिंग, जहान खान या प्रवाशांचा समावेश असून या जखमी प्रवाशांवर खासगी रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच महाड शहर पोलीस, वाहतूक पोलीस, महामार्ग वाहतूक पोलीस त्वरित घटनास्थळी दाखल होऊन जखमींना रु ग्णालयात पाठवून क्रे नच्या सहाय्याने तिन्ही वाहने अपघात स्थळावरून बाहेर काढली. वाहतुकीसाठी महामार्ग खुला करण्यात आला आहे. मात्र पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आलेली नाही.

नवी मुंबईतील जमिनी भाडेपट्टामुक्त करण्याचा सिडकोचा निर्णय

E-mail Print PDF
नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील राज्य शासन संपादित सर्व जमीन भाडेपट्टा मुक्त (फ्री होल्ड) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत शुक्रवारी घेण्यात आला. नवी मुंबईच्या इतिहासात हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात असून येथील सिडको निर्मित घरांमध्ये राहणार्‍या लाखो रहिवाशांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे. सिडकोने निर्णय घेऊन त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी अनुकूल आहेत.
राज्य सरकारने मार्च १९७० रोजी नवी मुंबई, पनवेल, उरण भागातील १६ हजार हेक्टर खासगी जमीनीसह एकूण ३४४ चौरस किलोमीटर जमीन नवी मुंबई शहर प्रकल्पासाठी संपादित करुन ती सिडकोकडे हस्तांतरित केली आहे. शासकीय जमीन असल्याने या जमिनीवर उभी राहणारी घरे, भूखंड, वाणिज्यिक वापर हा साठ वर्षांच्या भाडेपट्टयाने दिला जात होता. त्यामुळे येथील घरे व दुकाने हस्तांतरण करताना तसेच पुनर्बाधणी प्रकल्पांसाठी सिडकोचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. याशिवाय पुनर्बाधणी करताना सिडकोला लाखो रुपयांचे अतिरिक्त विकास शुल्क भरणे क्रमप्राप्त होते. बाजार भावाने विकत घेतलेल्य जमिनी साठ वर्षांच्या भाडेपट्टयाने दिल्या जात असल्याने नागरिकांच्यात असंतोष होता. या जमिनी सिडकोने भाडेपट्टा मुक्त करण्यात याव्यात अशी अनेक वर्षांची मागणी होती. त्यानुसार सिडकोने शुक्रवारी एक प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविला आहे. यात भाडेपट्टयाने असलेल्या जमिनी भाडेपट्टा मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महामार्गावर एसटीची ट्रकला धडक

E-mail Print PDF
महाड - महाड तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत एसटीची धडक लागून ट्रक पलटी झाला. हा अपघात गुरु वारी सकाळी ९.१५ वाजता घडला. यावेळी महामार्गावरून शाळेत जाणारे विद्यार्थी सुदैवाने बचावले.
शिवथर खेड-मुंबई ही बस (एमएच ४० एन ९७२३ ) पोलादपूरकडून महाडकडे येत असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे बुद्रुक गावाच्या हद्दीत आली, त्या वेळी एसटीची धडक लागून ट्रक (एमएच ४६ बीबी २८९५ ) पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीच्या पुढील भागाचे नुकसान झाले आहे तर माल वाहतूक ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. ट्रक चालक महेश पांडुरंग खैरे (४०, रा.पॉटनेरे, इंदापूर,ता. माणगाव) यांनी महाड एमआयडीसी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवली आहे.यावेळी रस्त्याच्या बाजूने जाणारे शाळेचे विद्यार्थी मात्र बचावले आहेत. या ठिकाणी साइडपट्टी नसल्याने हा अपघात झाल्याचे स्थानिक ग्रामस्थ रफीक पानसरे यांनी सांगितले आहे.
महामार्ग पोलीस सागर गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक महादेव म्हस्के, पोलीस कर्मचारी एस. बी. दाभाडे, बिट मार्शल महेश मढवी यांनी मदत करून वाहतूक सुरळीत केली. एसटी बस चालक आर.एम. मुंडे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालविल्याने एसटी बसमधील ३३ प्रवासी व रस्त्याने जाणाजया शालेय विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच महाड आगाराचे वाहतूक नियंत्रक शिवाजी जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्याला मारहाण

E-mail Print PDF
पाली - सुधागड तालुक्यातील ग. बा. वडेर हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी बुधवारी पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास सुएसोच्या जे.न. पालीवाला महाविद्यालयात राष्ट्रवादी आयोजित मंगळागौरीचा कार्यक्र म सुरु असताना ढोलकीचा आवाज झाल्याने १० वीच्या वर्गात बसलेला प्रणीत महेश शिंदे याच्या अंगात येण्याचा प्रकार घडला. अंगात आल्याने तो बसलेल्या ठिकाणी लोळू लागला. हा प्रकार मुख्याध्यापक अजय पाटील यांना कळला असता त्यांनी दहावीच्या वर्गात येऊन प्रणीत शिंदे याला मारहाण करण्यास सुरु वात केली व ही अंधश्रद्धा असून असले थोतांड बंद कर असे सांगितले. मारहाण केलेला विद्यार्थी हा त्याच अवस्थेत घरी गेला असता त्याला वेदना होऊ लागल्याने त्याने दवाखाना गाठला. यानंतर विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी पाली पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे पालक व नातेवाइकांनी अंगात येणे हे जर अंधश्रद्धा असेल किंवा नसेल, मात्र विद्यार्थ्याला मारण्याचा अधिकार मुख्याध्यापकाला कोणी दिला असा संतप्त प्रश्न केला आहे.

मराठा मूक मोर्चासाठी नवी मुंबईत वाहनांच्या पार्किंगची सोय

E-mail Print PDF
पनवेल - राज्याच्या कानाकोपर्‍यातून मराठा मूक मोर्चासाठी मुंबईत आलेल्या मोर्चेकर्‍यांसाठी नवी मुंबईने भल्या मोठया वाहनतळाची भूमिका बजावली. शहरातील विविध रेल्वे स्थानके, वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार आणि अन्य लहान-मोठया मैदानांत पार्किंगची सोय करण्यात आली होती. नवी मुंबईतच वाहने पार्क करण्याचे आणि रेल्वेने मुंबईला जाण्याचे आवाहन अन्य जिल्ह्यांतून आलेल्या मोर्चेकर्‍यांना करण्यात आल्यामुळे रस्त्यांवरील भार काहीसा हलका झाला. पार्किंगची योग्य व्यवस्था, पोलीस व वाहतूक विभागाचे अचूक नियोजन आणि मोर्चेकर्‍यांची शिस्तबद्धता यामुळे कोंडीची समस्या न उद्भवता आणि कोणतीही अनुचित घटना न घडता,मोर्चा मुंबईत रवाना झाला. पनवेलसह मानसरोवर, खांदेश्वर, कामोठे, खारघर, सीवूड्स, नेरुळ, वाशी, सानपाडा, एपीएमसी बाजार या ठिकाणी वाहने पार्क करण्यात आली होती. पुणे व सोलापूर या जिल्ह्यांतून येणार्‍यांची सोय खारघरमधील सेंट्रल पार्कमध्ये आणि खारघर रेल्वे स्थानकात करण्यात आली होती. सेंट्रल पार्क येथे २० वाहने तर इतर रेल्वे स्थानकांत ४०० छोटी वाहने पार्क करण्यात आली होती. सातारा, सांगली, कोल्हापूरवरून येणार्‍यांची सोय वाशीच्या एपीएमसी बाजारात करण्यात आली होती. कांदा-बटाटा बाजारात ५०० तर मसाला बाजारात १०० वाहने पार्क करण्यात आली होती. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गतील वाहनांची सोय ही सीवुड्स, नेरुळ, तांडेल मैदानात करण्यात आली होती. तांडेल मैदानात ४० बस, ४५ कार, तर आगरी कोळी भावन येथे  ४० बस, ४५ कार तसेच तेरणा मेडिकल कॉलेजमध्ये २५० वाहने पार्क करण्यात आली होती. अहमदनगर येथील एक बस खांदेश्वर येथे पार्क केली होती. औरंगाबाद येथील २ बस, ५ ट्रक, १९० कार मानसरोवर रेल्वे स्थानकात उभ्या करण्यात आल्या होत्या. बीडमधील वाहने सानपाडा येथे पार्क केली होती. वाशीत परभणी येथील महाराष्ट्र सदनाच्या परिसरात ४ बस, १६ कार अशी २० वाहने पार्क केली होती. त्याव्यतिरिक्त भारती विद्यापीठ कॅम्पसमध्ये ६ बस, ४ टेम्पो आणि २६५ कार उभ्या करण्यात आल्या होत्या. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर १२ कार आणि ७ दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या.

पनवेलच्या झोपडीधारकांचे १४ हजार घरांमध्ये पुनर्वसन होणार

E-mail Print PDF
पनवेल - एमएमआरडीएने विविध ठिकाणी राबवलेल्या भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेतील लाभ पनवेलच्या झोपडपट्टी पुनर्वसनासाठी होणार आहे. पनवेलमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शासनाने एमएमआरडीएच्या साहाय्याने विकासकांसोबत करार करून भाडेतत्त्वावर गृहनिर्माण योजना राबविली आहे.
योजनेतील मूळ लाभार्थींना घरांचे वाटप करून उर्वरित घरे पनवेल महानगरपालिकेला हस्तांतरित केली जातील, अशी माहिती पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत दिली होती. यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाचा तिढा कायमस्वरूपी सुटण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या वतीने पनवेलमध्ये सुमारे १४ हजार घरे बांधण्यास सुरुवात झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनेचा लाभ पनवेलमधील झोपडपट्टीवासीयांनाही मिळणार आहे.
कोन येथील इंडियाबुल्स गृहनिर्माण प्रकल्प, पळस्पे येथील मॅरेथॉन प्रकल्प, सुकापूर येथील गृहनिर्माण प्रकल्प आणि रोहिंजन गावाजवळ बांधकामाची सुरुवात झालेले पाच प्रकल्प यामुळे पालिकेला ५० टक्के घरांचा कोटा प्राप्त होणार आहे. या घरांमध्ये मुंबईच्या मिल कामगारांना व काही अत्यल्प उत्पन्न गटातील लाभार्थींना शासनाने पंतप्रधान आवास योजनेतून घरे देण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.
पनवेलमधील झोपड्यांचे पालिका नव्याने सर्वेक्षण करणार आहे. निवासी वापराच्या झोपड्यांचा वाणिज्य वापर होत असल्याने झोपड्यांचा नव्याने सर्व्हे होणार आहे.
पनवेल महानगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपा नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी यासंदर्भात लक्षवेधी मांडली होती. पनवेलमधील गृहप्रकल्पावरुन राजकारण देखील केले जात असल्याची चर्चा सभागृहात यावेळी रंगली होती. आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी यावेळी सभागृहात या गृहप्रकल्पाची माहिती दिली होती.
जोपर्यंत झोपडीधारकांचे पुनर्वसन करीत नाही तोपर्यंत एकाही झोपडीला पालिका हात लावणार नसल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. पनवेलमधील वाल्मीकी नगर व लक्ष्मीनगर या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे सर्वप्रथम पुनर्वसन केले जाणार आहे.

Page 10 of 266