Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

उरण परिसरात काळा पाऊस पडल्याने भीतीचे वातावरण

E-mail Print PDF
उरण - गेल्या दोन दिवसांपासून उरण शहर आणि परिसरातील काही भागांत काळा पाऊस पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तीन दिवसांपूर्वी संध्याकाळच्या सुमारास कोसळलेल्या पावसामुळे उरणजवळच्या बुचर आयलॅण्डवरील तेल साठ्यांच्या टाक्यांवर वीज कोसळली होती. यामुळे तेथील भीषण आगीत २०० कोटींचा तेलसाठा जळून खाक झाला. त्यानंतर शनिवारी आणि रविवारी संध्याकाळनंतर उरण परिसरातील काही भागांत काळा पाऊस पडल्याची घटना घडली आहे. उरण शहर आणि नजीकच्या नागाव, केगाव आणि इतर परिसरातील गावांत कोसळलेल्या काळ्या पावसामुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आहेत.
उरण परिसरात कोसळलेल्या काळ्या पावसाचा संबंध बुचर आयलॅण्डवर तेलाच्या टाकीला लागलेल्या भीषण आगीशी जोडला जाऊ लागला आहे. कारण या भीषण आगीतील काळ्या धुराचे लोळ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळत होते. तीन दिवस हवेत मिसळलेल्या, पसरलेल्या त्या धुरामुळे वातावरणात बदलाची शक्यताही व्यक्त होऊ लागली आहे. मात्र याआधीही रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी काळा पाऊस पडल्याच्या घटना घडल्याचेही उघडकीस आले आहे.
दोन दिवसांपूर्वी बुचर आयलॅण्ड येथील तेलटाकीवर वीज पडली होती. त्या वेळी निर्माण झालेल्या ‘हेवी स्मोक’चे प्रमाण अधिक असणारा धूर परिसरात होता. वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण या दिवसांत अधिक असल्याने हे कार्बन कण पावसाबरोबर खाली आल्याने पावसाचे पाणी काळे दिसत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष असल्याचे रायगड जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी सांगितले.

अलिबाग शहरातील बंद पडलेली सिग्नल यंत्रणा कार्यान्वीत होणार

E-mail Print PDF
अलिबाग - शहरात वाहतुकीचे योग्य नियमन व्हावे, यासाठी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतूकचालकांना लगाम बसणार आहे. काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली होती. मात्र, ती फेल ठरली होती. आता पुन्हा नव्याने ती बसवण्यात आली आहे.
अलिबाग नगरपालिकेच्या प्रस्तावानंतर जिल्हा नियोजन मंडळाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी सुमारे २० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. यानुसार शहरातील महावीर चौक आणि अशोका सेंटर येथील चौक या दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा सौरविजेवर कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याबाबतच्या प्राथमिक चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत.
लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या तंत्रज्ञांकडून या यंत्रणेची पाहणी केल्यानंतर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. जिल्ह्याचे मुख्यालय असणाजया अलिबागमध्ये हजारो वाहने येत असतात. शनिवारी, रविवारी पर्यटकांच्या वाहनांची भर पडते. अरुंद रस्ते आणि वाहनांची संख्या जास्त असल्याने वाहतूककोंडीची समस्या निर्माण होते. बेशिस्त वाहन चालकांमुळे आणि सहाआसनी रिक्षाने यात अधिक भर पडते. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक नियमनच्या दृष्टिकोनातून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करून वाहतूक पोलिसांच्या ताब्यात दिली जाणार आहे. यानंतर वाहतुकीचे योग्य नियमन होत आहे की नाही, यावर पोलीस देखरेख करणार आहेत. या सिग्नल व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होईल. वाहतुकीचे योग्य नियमन होईल, असा विश्वास अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी व्यक्त केला.

उरणमधील किनार्‍यांवर जेली फिश आढळल्याने सावधानतेचा इशारा

E-mail Print PDF
उरण - अलिबाग आणि उरणमधील किनार्‍यांवर मोठया प्रमाणात विविध प्रकारचे मासे आढळल्यानंतर आता अलिबागमधील रेवस व मांडवा तसेच उरण परिसरात जेली फिश दिसू लागले आहेत. या माशांचा दंश अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे किनार्‍यावरील रहिवासी आणि मासेमारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. समुद्रातील बदलत्या वातावरणामुळे हे मासे किनार्‍यावर आले असावेत, असे मत मत्स्य विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे. किनारपट्टीवरील रहिवाशांना आणि पर्यटकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईच्या समुद्रकिनार्‍यावर मोठया प्रमाणात जेल फीश येतात. त्यांचा उपद्रव माणसांना होऊ नये, म्हणून शासकीय यंत्रणा उपाययोजना करते. अशाच प्रकारचे जेली फिश सध्या रायगड जिल्ह्यातील अलिबागच्या मांडवा, रेवस आणि उरणच्या करंजा परिसरात आढळत आहेत.
३० सप्टेंबरपासून समुद्रकिनार्‍यावर मोठया प्रमाणात विविध जातींचे मासे येऊ लागले होते. समुद्राच्या तळाशी होत असलेल्या उलथापालथीचा हा परिणाम असल्याचे जाणकार मच्छीमार तसेच मत्स्य विभागाकडूनही सांगण्यात आले होते. अशा प्रकारच्या घटना वर्षांतून किंवा दोन वर्षांतून एकदा होतात. त्यामुळे मोठया प्रमाणात खोल समुद्रातील मासळी किनार्‍यावर येते व ती सहजपणे पकडता येते. परंतु या घटनेनंतर धोकादायक समजले जाणारे जेली फिश किनार्‍यावर दिसू लागले आहेत.

वादळी पावसाने ग्रामीण भागातील घरांचे नुकसान

E-mail Print PDF
महाड - गेल्या चार दिवसांपासून सायंकाळी महाड शहरासह संपूर्ण तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले असताना सोमवारी रात्री जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील काही घरांचे नुकसान झाले तर भात शेतीवर या वादळाचा परिणाम होत असल्याने शेतक-यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
महाड तालुक्यामध्ये मागील दोन-तीन दिवस सायंकाळी कोसळणाजया पावसामुळे जनजीवनावर त्याचा परिणाम होत असताना सोमवारी विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये काही घरांचे किरकोळ नुकसान झाले.
कोतुर्डे गावातील प्रकाश ठोंबरे यांच्या घरावर झाड कोसळल्याने सुमारे दहा हजारांचे नुकसान झाले, तर वादळी पावसामुळे अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. सवाद, धारवली या गावांमध्ये पाच विजेचे खांब कोसळल्याने गेले चार दिवस या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला असून तातडीने विजेचे खांब बसविण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
औद्योगिक वसाहतीसह जीते, धामणे, टेमघर, आसनपोई, वाघोली, पाने, पंदेरी, कोंझर, नाते, नांदगाव या काही गावांना देखील वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.
तालुक्यामध्ये भाताचे पीक समाधानकारक असले तरी अवकाळी पावसामुळे भात शेतीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकजयांकडून चिंता व्यक्त के ली जात आहे.

श्रीवर्धन तालुक्याला वादळाचा फटका

E-mail Print PDF
श्रीवर्धन - तालुक्यातील बोर्ली पंचतन, दिवेआगर, वडवली, दिघी, भरडखोल, दांडगुरी या परिसरामध्ये रविवारी मध्यरात्री वादळी वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला. वादळामुळे दिवेआगर येथे नारळ व सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने प्रचंड नुकसान झाले तर पर्यटनासाठी आलेल्या पुणे मुंबई येथील पर्यटकांच्या चारचाकी वाहनांवर नारळाचे झाड पडल्याने मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे बोर्लीपंचतन येथील एसटी स्टॅण्डजवळील रोहिदास नगरमध्ये जुनाट आंब्याचे झाड कोसळले तर काही ठिकाणी घरांच्या छपरांचेही मोठे नुकसान झाले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. दिवेआगर येथे ९ घरांचे तर भरडखोल येथे २ घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रु पयांचे नुकसान या वादळाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.
रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वादळी वारा व मेघगर्जनेसह जोरदार पाऊस सुरू झाला. वाजयाच्या प्रचंड वेगामुळे शेखाडी येथे श्रीवर्धन - बोर्ली मार्गावर मोठमोठी सुरूची झाडे उन्मळून पडल्याने सकाळी १० वाजेपर्यंत येथील वाहतूक पूर्णत: ठप्प होती, यामुळे वाहतूक दांडगुरी मार्गावरून चालू होती. वादळी वाजयामुळे समुद्रकिनारी असलेल्या सुवर्ण गणेश नगरीमध्ये म्हणजेच दिवेआगर येथे नारळ सुपारीची झाडे उन्मळून पडल्याने मोठे नुकसान झाले. यामध्ये सलग तीन दिवस सुट्टी असल्याने दिवेआगरमध्ये पर्यटकांची गर्दी होती. यातच समर्थनगर येथील कोको हट रिसॉर्ट येथे पर्यटकांच्या गाडीवरच नारळाचे झाड पडल्याने तीन गाड्यांचे नुकसान झाले. यामध्ये मुंबई येथून आलेल्या मोगसीन शेख यांच्या चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर नवी मुंबई येथील योगेश शेजुळ यांच्या व पुणे येथून आलेल्या स्वप्निल पंडित यांच्या गाड्यांचेही नुकसान झाले.
दिवेआगर येथील भट्टी विभाग येथील सुरेश शितप, बांद्रे, तळाणी विभाग येथील बाळाराम वाणी यांच्या घरांचे नुकसान झाले, तर नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून लवकरच मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. तर मध्यरात्रीच्या या वादळी वार्‍यामुळे वीजतारांवर झाडे पडल्याने रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वितरणाचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या प्रयत्नात असून रात्रीपर्यंत तरी सर्व गावांतील वीजपुरवठा सुरू होण्यास वेळ लागेल असे सांगितले.

आदिवासी वाड्यांत काळा पाऊस; भातशेती, भाजीपाला पीक धोक्यात

E-mail Print PDF
नागोठणे - पूर्वेकडील आदिवासी वाड्यांमध्ये शुक्र वारी दुपारी पाऊस पडताना पावसाच्या पाण्याबरोबर काळ्या रंगाचे रसायन खाली पडल्याचा प्रकार घडला आहे. हे रसायन नक्की कोठून आले याचा अद्याप उलगडा झाला नसला तरी साचलेल्या काळ्या रसायनामुळे भातशेती तसेच भाजीपाला पीक नष्ट होईल अशी भीती आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे. याबाबत संबंधित पाण्याची तसेच साचलेल्या फेसाची येथील कोएसोच्या आनंदीबाई प्रधान महाविद्यालयाचे पर्यावरण व जलतज्ज्ञ प्रा. डॉ. विलास जाधवर यांनी प्रयोगशाळेत तपासणी केली असता, आम्ही पाच चाचण्या केल्या असून त्यातील तीनमध्ये दोष आढळून आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केलेल्या चाचणीत पाण्याचा रंग काळसर आढळून आला असून त्यात ६.०५ आम्ल गुणधर्मी पाणी असल्याचे दिसून येत आहे.
काळा पाऊस पडून एक दिवस उलटून गेला तरी विहिरीतील पाणी रविवारीही काळेच दिसत होते. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा गाळ खाली बसल्यानंतर रसायनमिश्रित काळ्या रंगाचा थर खाली बसला असल्याने भातशेतीला ते धोकादायकच असून तयार झालेल्या भाजीपाल्याला सुद्धा याचा फटका बसणार असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडा, रामा बरतूड, चंद्रकांत हंबीर, कमलाकर बांगारा यांनी सांगितले. मोरू हंबीर, महादू निरगुडा, संतोष भला आणि आदिवासी महिलांच्या म्हणण्यानुसार जुलै महिन्यात सुद्धा एकदा असा पाऊस पडला होता. वांगी, शिराळी, कारली, मिरची, काकडी, पडवळ, भेंडी आदी भाज्यांचे पीक आम्ही घेत असून त्यावेळी पडलेल्या काळ्या पावसामुळे केलेले बहुतांशी पीक नष्ट झाले होते व प्रत्येक शेतकजयाला २० ते ४० हजार रु पयांचे नुकसान सोसावे लागले होते असे त्यांनी स्पष्ट केले.
या भागात फेरफटका मारला असता, ढोकवाडीतील ग्रामस्थांना त्याचा जास्त फटका बसला असल्याचे निदर्शनास आले आहे. या गावालगत एक विहीर असून विहिरीच्या पाण्यावर सुद्धा काळ्या रंगाचा तवंग साचला असून उन्हाळ्यात यातील पाणी जलवाहिनीद्वारे परिसरातील आदिवासीवाड्यांवर पुरवले जाते. पावसाळ्यात बहुतांशी कुटुंबे पावसाच्या पागोळीचे पाणी गाळून घरात वापरत असतात व उणीव भासल्यास संबंधित विहिरीचे पाणी आणत असतात असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. शुक्र वारी सकाळी पाणी भरले असून आता सगळीकडेच काळे पाणी साचल्याने आमच्या मुलाबाळांसाठी आता पाणी तरी कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्याकडून विचारला जात आहे.
परिसरातील एखाद्या कारखान्यामधूनच हे प्रदूषण झाले असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून सरकारी यंत्रणेने याचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

पनवेल-मुंब्रा बससेवा लवकरच

E-mail Print PDF
पनवेल - पनवेल-मुंब्रा महामार्गावर लवकरच नवी मुंबई महापालिका परिवहनची (एनएमएमटी) बससेवा सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एनएमएमटी प्रशासनाने त्या दृष्टीने पावले उचलल्याचे वृत्त आहे. सध्या या मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू आहे, मात्र एनएमएमटीची बससेवा सुरू झाल्यास प्रवाशांना नवा पर्याय मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. एनएमएमटीतील सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.
पनवेल रेल्वेस्थानक ते कळंबोली वसाहत अशी बससेवा सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने एनएमएमटी प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे पनवेल-मुंब्रा बससेवेला कळंबोली वसाहतीचा थांबा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पनवेल ते मुंब्रा या मार्गावर धावणार्‍या राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडयांची संख्या कमी आहे. त्यामुळे एनएमएमटीची बससेवा या मार्गावर असावी, अशी मागणी एनएमएमटी प्रशासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर एनएमएमटी प्रशासनामध्ये हालचाली सुरू झाल्या. मागील महिन्यात ही बससेवा सुरू करण्याचा प्रशासनाचा विचार होता, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही सेवा सुरूहोऊ शकली नाही.
एनएमएमटी प्रशासनाने मुंब्रा बस कळंबोली वसाहतीमधून सुरू केल्यास पनवेल रेल्वेस्थानकातून परजिल्ह्यांत व राज्यात जाणार्‍या रेल्वे प्रवाशांची रात्रीच्या रिक्षाभाडयातील लूट थांबणार आहे. मागील २० वर्षांत सरकारने पनवेल ते कळंबोली, अशी कोणतीही बससेवा सुरू केली नाही. आजही कळंबोली येथील रहिवाशांना खरेदीसाठी तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेले पनवेल शहर गाठावे लागते. त्यामुळे ही बससेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांनी केली आहे. याबाबत एनएमएमटी प्रशासनाकडे पाठपुरावा केला असता संबंधित बससेवा विचाराधीन असल्याची माहिती एनएमएमटीच्या सूत्रांनी दिली.

ऐरोलीतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र रद्द

E-mail Print PDF
उरण - जगातील विविध देशांचे दूतावास आणि तेथील कर्मचार्‍यांची वसाहत एकाच ठिकाणी व्हावी यासाठी ऐरोली येथे २७ हेक्टर जमीन राखीव ठेवून गेली सात वर्षे प्रतीक्षेत असलेले आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र अखेर रद्द करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या जागी आता सिडको एखादी सुंदर नागरी वसाहत उभी करण्याचा विचार करीत आहे. फॅशन टेक्नॉलॉजीला ही जागा महाग वाटल्याने त्यांनी ती नाकारली, तर जेम्स आणि ज्वेलरी उद्योजकांना ही जागा पसंत पडली नाही. त्यामुळे सिडकोने या ठिकाणी एक थीम नगरी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबईत विविध ठिकाणी विखुरलेले आंतरराष्ट्रीय दूतावास बीकेसीप्रमाणे एकाच ठिकाणी उभारण्यात यावेत यासाठी सिडकोने सात वर्षांपूर्वी ऐरोली सेक्टर दहा अ मधील २७ हेक्टर जमीन राखीव ठेवली आहे.  त्यासाठी गटार, रस्ते या सुविधांवर दहा कोटी रुपये खर्चदेखील करण्यात आला आहे. खाडीलगत असलेल्या या जागेजवळूच विस्तारित पामबीच मार्ग जात असल्याने या जागेला आंतरराष्ट्रीय दूतावास पसंती देतील अशी आशा होती, मात्र ३८ दूतावासांपैकी केवळ दक्षिण आफ्रिका, दुबई आणि सिंगापूर या देशांतील दूतावासांनी येथील भूखंड घेण्यात रस दाखविला होता. केवळ दूतावास कार्यालय न ठेवता उच्च दर्जाची सुरक्षाव्यवस्था असलेली निवासी वसाहत उभारण्याचा सिडकोचा मानस होता. त्यासाठी प्रत्येक देशाला त्यांच्या पसंतीनुसार विकास आराखडा तयार करण्याची मुभा देण्यात येणार होती, मात्र बोटावर मोजण्याइतक्या दूतावासांनी यात रस दाखविल्याने सिडकोने हा प्रकल्पच गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून ही जमिनीवर एखादी सुंदर नगरी उभारण्याचे ठरविले आहे.

धरमतर बंदरातून सुरु होणार कंटेनर वाहतूक

E-mail Print PDF
उरण - बीएमसीटी प्रा.लि., पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमान जेएनपीटी आणि धरमतर बंदराला जोडणारा जलमार्ग २०१७अखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे जलमार्गावरून कंटेनर मालाची वाहतूक करण्याचा मार्ग खुला होणार असल्याची माहिती पीएनपी भारत मुंबई प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
धरमतर बंदरात २०१२ पर्यंत पडाव आणि बार्जमधून याआधी कार्गो, कंटेनर मालाची वाहतूक केली जात होती. धरमतर बंदर हे या भागातील कार्गो मालकांसाठी माल उतरून घेण्याचे आणि पाठविण्याचे प्रमुख ठिकाण होते. मात्र, जेएनपीटी बंदराकडे वाढीव क्षमता नसल्याने २०१२च्याअखेरीस ही सेवा बंद करणे भाग पडले.
२०१७च्याअखेरीस जेएनपीटी अंतर्गत बीएमसीटी हे चौथे बंदर कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे जेएनपीटी ते धरमतर दरम्यान पडाव, बार्जद्वारे होणारी दैनंदिनी कंटेनर वाहतूक सेवा हाताळण्यासाठी पीएनपी मेरिटाइम सर्व्हिस प्रा.लि. आणि बीएमसीटी प्रा.लि. यांच्याशी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यामुळे आता पीएनपीला बीएमसीटी धरमतर येथील केंद्रातून ८० टीईयू २० फुटी इतक्या आकाराच्या माालाचे कंटेनर बार्जच्या साहाय्याने पुन्हा सुरू करता येणार आहेत. यामुळे कार्गो मालकांचा खर्चही कमी होईल व त्यांच्या वेळेचीही बचत होणार आहे. बीएमसीटी आणि धरमतर यांच्या सागरी मार्गात पुन्हा एकदा पडाव आणि बार्जद्वारे कार्गो कंटेनर मालाची वाहतूक सुरू होण्याची प्रतीक्षा कंपनीलाही लागून राहिल्याची प्रतिक्रिया पीएनपीचे संचालक सचिन टिपणीस यांनी व्यक्त केली.
धरमतर हे एक तीन प्रकारच्या दळणवळणाची यंत्रणा उपलब्ध असलेले (ट्रायमॉडल) कार्यरत बंदर आहे. राष्ट्रीय महामार्ग-१७ पासून केवल दोन कि.मी. अंतरावर आहे. रेल्वे आणि जलमार्ग अशा दोन्ही प्रकारच्या दळणवळणाच्या सुविधा इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा भारही कमी होण्यास मोठी मदत होईल. धरमतर येथील बंदर व्यापारासाठी आणि कंटेनर मालाची ने-आण आणि हाताळणी करण्यासाठी सक्षम असून, कंटेनर आणि कार्गो वाहतुकीशी संबंधित गोदाम, कंटेनर दुरुस्ती आदी आवश्यक सर्व सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळेच या परिसरातील व्यापाजयांना नवसंजीवनी मिळावी, यासाठी बीएमसीटीच्या बरोबरीने काम करण्याचा निर्णय घेतला आहे

Page 6 of 266