Saturday, Jan 20th

Headlines:

रायगड

शीव- पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यास मंजुरी

E-mail Print PDF
रायगड - नवी मुंबई महापालिका हद्दीतून जाणार्‍या शीव-पनवेल महामार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून योग्य प्रकारे देखभाल होत नसल्याने नवी मुंबईच्या हद्दीतील भाग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी महासभेने सर्वानुमते मंजुरी दिली. महापालिका हद्दीत महामार्गाचा १४ किलोमीटर भाग आहे.
पावसाळ्यात पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणारे प्राणघातक अपघात, यामुळे शीव-पनवेल महामार्ग नेहमीच वादात राहिला आहे. महामार्गालगत झुडपे, बांधकाम साहित्य, राडारोडा आणि कचरा पडलेला असतो. यामुळे राज्यातील एकमेव स्वच्छ शहर ठरलेल्या नवी मुंबईची प्रतीमा मलिन होते. या प्रकरणी पालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत, मात्र निधीअभावी दखल घेतली जात नाही.
हा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करून घेतल्यास त्याची चांगल्या प्रकारे देखभाल व दुरुस्ती होईल. प्रवाशांना चांगली सेवा दिल्याने शहराचा नावलौकिक वाढेल, त्यामुळे महामार्गाचा महापालिकेच्या हद्दीत येणारा भाग पालिकेकडे हस्तांतरित करून घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता.
या विषयावर चर्चा करताना मनोहर मढवी म्हणाले, ‘राज्य शासन हा रस्ता बनविणार्‍या कंपनीला १ हजार २०० कोटी रुपये देणार आहे. त्यातील काही रक्कम पालिकेला मिळणार आहे का? रस्त्याच्या देखभाल-दुरुस्तीचे पाच वर्षांचे काम ज्या कंत्राटदाराकडे आहे, त्याला शासनाकडून पैसे दिले जात आहेत. त्यामुळे पाच वर्षे त्याच कंत्राटदाराकडून रस्ता दुरुस्त करून घ्यावा.’

शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल

E-mail Print PDF
रायगड - शिवसेनेमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार  पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचे संपर्कप्रमुख बदलण्यात आलेत.  रवींद्र फाटक, अनंत तरे,  संजय मोरे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आलाय.
पालघर जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख अनंत तरे यांना आता रायगड जिल्हयातील महाड, श्रीवर्धन, अलिबाग, आणि पेन तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. रायगड जिल्हयातील या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून त्यांची शिवसेनेनं नेमणूक करण्यात आली आहे.
ठाणे शहराचे माजी महापौर संजय मोरे यांच्याकडे रायगड जिल्हयातील कर्जत-खालापूर, पनवेल आणि उरणची तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. या तालुक्यांचे ते जिल्हासंपर्कप्रमुख म्हणून काम पहाणार आहेत.
तसेच पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी विधान परिषद आमदार रवींद्र फाटक यांना देण्यात आलीय. रवींद्र फाटक आता पालघर जिल्हासंपर्कप्रमुखपदी असणार आहेत.
रायगड जिल्ह्याचे विद्यमान जिल्हासंपर्कप्रमुख आदेश बांदेकर यांना सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष बनवण्यात आल्यामुळे त्यांच्याकडील रायगड जिल्हा संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी काढण्यात आली आहे. यापुढे आदेश बांदेकर शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून राज्यभर दौरे करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

रोह्यात शेतजमिनीचा गैरव्यवहार, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

E-mail Print PDF
रोहा - मुंबई व पुणे येथील सात जणांनी संगनमत करून, मूळ जमीन मालकाऐवजी तोतया जमीन मालकाला उभे करून लाखो रुपये किमतीच्या शेतजमिनीचा गैरव्यवहार करून परस्पर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार रोह्यात घडला आहे. बनवाबनवी करणार्‍या सात जणांविरोधात पोलीस ठाण्यात फसवणूक व बनावट सरकारी कागदपत्रे तयार करणे व त्यांचा गैरवापर करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रोहा-चणेरा मार्गावरील शेडसई येथे हर्षद किशोरचंद मोदी (रा.विलेपार्ले, मुंबई) यांच्या मालकीची जमीन व फार्महाऊस आहे. सुटीनिमित्त मोदी परिवार व त्यांचे मित्रमंडळ या ठिकाणी येत असत. असे असताना मागील दीड ते दोन वर्षांपासून ते या ठिकाणी येत नाहीत या संधीचा गैरफायदा घेत पुणे व मुंबईतील सात जणांनी संगनमत करून जमीनमालक हर्षद मोदी यांचे नाव वापरून मुखत्यारपत्र लिहून देणार्‍या एका अनोळखी तोतया व्यक्तीशी संगनमत करून जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर विक्री केली व मूळ जमीन व फार्महाऊस मालकांची फसवणूक केली. असे असताना काही दिवसांपूर्वी हर्षद मोदी आपल्या पत्नी समवेत रोह्यातील तलाठी कार्यालयात धारा भरण्यासाठी व नूतन सातबारा मिळावे याकरिता आले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुमारे दोन लाख रु. किमतीची आपल्या मालकीची जमीन व फार्महाऊस परस्पर विकल्याचे समजताच मोदी दाम्पत्याच्या पायाखालची वाळूच सरकली.
हा प्रकार १५ ऑक्टोबर रोजी घडला असून पोलिसांनी रवींद्र यशवंत मेहेंदळे (रा. लोकमान्य पुणे), मीना जोशी (रा.सासवड, पुणे), अजय शांताराम धीवार (रा. पुरंदर, पुणे), सुप्रिया शंकर गद्रे (रा. बांद्रा, मुंबई), समिक्षा रवींद्र मेहेंदळे (रा. निर्मलबाग, पुणे), मुस्तफा काझी (रा. कोंढवी-मुंबई) व अन्य एक अशा एकूण सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो.नि.विकास रामुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. प्रशांत तायडे अधिक तपास करीत आहेत.

महाडमध्ये शिवसेनेचे २१, कॉंग्रेसचे २० सरपंच

E-mail Print PDF
महाड - तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे, २० ग्रामपंचायतींवर कॉंग्रेसचे सरपंच निवडून आले आहेत. उर्वरित ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींवर कॉंग्रेस - भाजपा आघाडीचे, एका जागेवर कॉंग्रेस - शिवसेना आघाडीचा तर तीन ग्रामपंचायतींमध्ये अपक्ष उमेदवार सरपंच म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात कॉंग्रेसने प्रथमच जोरदार मुसंडी मारली आहे.
मंगळवारी झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेस पक्षाचे निवडून आलेले सरपंच : गांधारपाले- रेहाना सोलकर, आदिस्ते - मीनाक्षी खिडबिडे, आंबावडे - नेहा चव्हाण, किंजळघर - शरद आंबावले, नाते - अशोक खातू, गोठे बु. - प्रकाश गोलांबडे, कांबळे तर्फे बिरवाडी - सरोज देशमुख, ताम्हाणे- सुनील बोरेकर, साकडी - नीलेश सालेकर, दादली - सुमीत तुपट, कोल - उषा धोंडगे, धामणे -उषा पवार, सवाणे - संदेश बोबडे, वाघोली (सरपंच बिनविरोध, निवडणुकीत बहुमत), आचळोली - विकी पालांडे, जुई बुद्रुक - मीनाझ करबेलकर, कावळे तर्फे विन्हेरे - प्रतीक येरूणकर, करंजखोल - अशोक पोटसुरे, लाडवली- कृष्णा शिंदे, केंबुर्ली- सादिक घोले.
शिवसेनेचे निवडून आलेले सरपंच : दासगाव - दिलीप ऊर्फ सोन्या उकीर्डे, कोथेरी - नथू दिवेकर, नडगाव तर्फे तुडील - रजनी बैकर, बिजघर - मनोहर खोपटकर, गोडाळे - सुरेखा महाडिक, आडी- विलास चव्हाण, शिरवली - अशोक सकपाळ, वीर - (सरपंच बिनविरोध, निवडणुकीत बहुमत), नांदगांव बुद्रुक - मोहन रेशिम, वामने - प्रवीण साळवी, कुसगांव - गंगुबाई कदम, नातोंडी - समीर नगरकर, सावरट - निर्मला पिसाळ, उंदेरी - शीतल कासार, वरंध - संगीता सकपाळ, कोळोसे - वनिता खेडेकर, खुटील - राजेश सुकुम, वारंगी - सिध्दी धुमाळ, वहूर - जितेंद्र बैकर, नागांव - चंद्रकांत उतेकर, करंजाडी - शर्मिला किलजे.
भारतीय जनता पक्षानेही या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महाड तालुक्यात आपले पाय रोवले आहेत. भाजपा-कॉंग्रेस आघाडी चिंभावे ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले असून, येथे भाजपाच्या प्राजक्ता दळवी या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तर रानवडी ग्रमपंचायतीमध्येही भाजपा-कॉंग्रेस आघाडीने विजय संपादन केला असून, येथे किसन मालुसरे हे सरपंचपदी निवडून आले आहेत. सेना-कॉंग्रेस आघाडीने अप्पर तुडील ग्रामपंचायतीमध्ये यश संपादन केले असून, येथे शिवसेनेचे इनायत देशमुख हे निवडून आले आहेत. शिरगांव ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सचिन ओझर्डे, नडगांव तर्फे बिरवाडी अपक्ष उमेदवार संजय देशमुख तर कुर्ले ग्रामपंचायतीमध्ये अपक्ष उमेदवार सचिन पवार हे निवडून आले आहेत.

रायगड जिल्ह्यात ग्रा.पं.साठी सरासरी ८६ टक्के मतदान

E-mail Print PDF
अलिबाग - रायगड जिल्ह्यातील २४२ ग्रामपंचायतींच्या एक हजार ३१८ जागांसाठी सोमवारी सरासरी ८६ टक्के मतदान झाले. तीन हजार १११ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले. ठिकठिकाणी शांततेमध्ये मतदान पार पडले. कोठेही मतदान यंत्र बंद पडण्याचे प्रकार घडले नसल्याचा दावा प्रशासनाने केला. मंगळवारी तहसीलदार कार्यालयात सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरु वात होणार आहे.
नगरपालिकेच्या निवडणुकीपासून थेट नगराध्यक्ष निवडीला सुरु वात झाल्यानतंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच थेट सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना प्रतिष्ठेची आहे. २४२ ग्रामपंचायतींमध्ये २ हजार १९८ जागांमध्ये ८१० जागांवर सरपंच व सदस्य हे निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत. ७० जागा रिक्त राहिल्या आहेत. एक हजार ३१८ जागांवर तीन हजार ३१८ उमेदवार रिंगणात होते. सोमवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानाला सुरु वात झाली होती. सकाळीपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केंद्रावर हजेरी लावली होती. दुपारी काही प्रमाणात ही संख्या रोडावली होती. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ८३ टक्के मतदान झाल्याचे तहसीलदार प्रकाश सकपाळ यांनी सांगितले. शिरवलीमध्ये ७७ टक्के, वैजाळी ८३ टक्के, आक्षी ८० टक्के, बोरीस-गुंजीस ९१ टक्के, मुळे-९३ टक्के, नारंगी-७९ टक्के मतदानाचा समावेश आहे.

दिघा रेल्वे स्थानक लांबणीवर

E-mail Print PDF
बोर्ली पंचतन- नवी मुंबईतील मोठा गाजावाजा करून दिघा रेल्वे स्थानक उभारण्यासाठी  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १० महिन्यांपूर्वी दिघा रेल्वे स्थानकाच्या कामाचा शुभारंभ झाला. या स्थानकासाठी आपणच पाठपुरावा केल्याचा दावा करत आजी-माजी खासदारांनी आणि राजकीय नेत्यांनी स्वतचीच पाठ थोपटून घेतली, मात्र आता तांत्रिक समस्या आणि जागेचे हस्तांतर यामुळे दिघा रेल्वे स्थानक लांबणीवर पडले आहे. जमीन हस्तांतराचा विषयही न्यायप्रविष्ट असल्यामुळे २०१९ पर्यंत हा प्रकल्प उभा राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिडकोने नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांची निर्मिती केली. त्यानंतर ट्रान्स हार्बर मार्गाद्वारे नवी मुंबई परिसर ठाण्याशी जोडण्यात आला. वाशी ते ठाणे मार्गावरील वाढती गर्दी विचारात घेत दिघा येथे रेल्वे स्थानक उभारण्याची मागणी माजी खासदार संजीव नाईक यांनी केली. एमआयडीसी, सिडको, एमआरव्हीसी यांच्या माध्यमातून सर्वेक्षण झाल्यानंतर दिघा रेल्वे स्थानक उभारण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत नाईक यांचा पराभव झाल्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनी या स्थानकासाठी पाठपुरावा केला. वर्षभरापूर्वी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकांर्‍यासमवेत पाहणी दौरा करण्यात आला. मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट-३ (एमयूटीपी-३) प्रकल्पांतर्गत डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधानांच्या हस्ते देशभरातील ११ हजार कोटींच्या प्रकल्पांबरोबरच दिघा स्थानकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला, मात्र आता १० महिने उलटल्यानंतरही कामाला सुरुवात झालेली नाही. कोणत्याही तांत्रिक बाबींची पूर्तता न करता ‘एमआरव्हीसी’ आणि ‘एमआयडीसी’च्या अधिकार्‍यांनी राजकीय नेत्यांना तोंडी उत्तरे देत या जागेला सहमती दर्शवली. प्रत्यक्षात मात्र ‘एमआयडीसी’अंतर्गत असणारी पटनी कंपनी, नजीकच्या मोकळ्या मैदानांची जागा दिघा रेल्वे स्थानकासाठी देण्यात येणार होती. ही जागा ‘एमआयडीसी’ने २००५ मध्ये एका कंपनीला विकली होती. नियमानुसार त्या ठिकाणी कंपनीधारकाने एमआयडीसीचे देयके भरणे आवश्यक होते. मात्र कंपनीधारकांनी वेळेत पैसे न भरल्याने नियमाप्रमाणे ही जागा एमआयडीसीने पुन्हा ताब्यात घेतली. मात्र कंपनी धारकाने न्यायालयात धाव घेतल्याने न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. २००५ पासून आजवर एमआयडीसीने पाठपुरावा करूनदेखील कायदेशीर बाबींची पूर्तता केलेली नाही. जागेचा तिढा न सुटल्याने दिघा रेल्वे स्थानकांचा प्रकल्प लांबणीवर पडला आहे. याबाबत विचारण केली असता, एमआयडीसीच्या एका अधिकार्‍याने याला दुजोरा दिला. हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी कायदेशीर लढाई सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

आश्रमशाळेतील स्लॅब कोसळून ८ विद्यार्थी गंभीर जखमी

E-mail Print PDF
पनवेल - पनवेल तालुक्यातील चिखले गावाच्या हद्दीत असलेल्या अनुदानित प्राथमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिकणार्‍या आणि राहणार्‍या विद्यार्थ्यावर आश्रम शाळेतील हॉलचा स्लॅब कोसळला. या घटनेत ८ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यावर कामोठे एमजीम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
जखमी विद्यार्थ्यांची नावे अशी- विलास विष्णू उघडे (वय १४), मोहन परशुराम मधे वय (१२), सोनू जालके निरगुड (१५), युवराज कमळा मधे (१०), दिनेश कमलाकर आव्हटे (१५), मयूर अंत खांडवी (१०), राजविर बम मधे (७), भुम्रा चौधरी (१२).

एका रात्रीत चार घरफोड्या; पोलिसांपुढे आव्हान

E-mail Print PDF
बोर्ली पंचतन- श्रीवर्धन शहरानंतर आता घरफोडीचे सत्र दिघी सागरी पोलीस ठाणे असलेल्या बोर्ली पंचतनमध्ये चोरांनी सुरू केले आहे. मंगळवारी रात्री एकाच वेळी चार ठिकाणी चोरांनी घरफोडी केली असल्याची घटना घडली. एका ठिकाणी चोरांनी किरकोळ रोख रक्कम लांबविल्याचे समजते, तर याआधी शिस्ते येथील दिलीप बबन भायदे यांच्या घरीदेखील चोरांनी सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडल्याने पोलिसांपुढे आता चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.
मंगळवारी मध्यरात्री बोर्ली पंचतन येथील एसटी स्टँड जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथील मुख्य सभागृहाचे व कार्यालयाचे कुलुप तोडून चोरांनी घरात प्रवेश केला; परंतु यामध्ये त्यांना काहीच हाती लागले नाही, त्यानंतर चोरांनी जवळील समतानगर येथील प्रभाकर खोपरे, काशिनाथ पेडणेकर, अरुण करंदेकर यांच्या राहत्या बंद घराचे कुलुप तोडून चोरांनी आतील कपाटांतून काही रक्कम किंवा घबाड मिळते का यासाठी प्रयत्न केले; परंतु फक्त काशिनाथ पेडणेकर यांच्या घरातील कपाटातून ७ हजार रुपये चोरांच्या हाती लागल्याचे समजते. यापूर्वी म्हणजेच, ९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२च्या दरम्यान शिस्ते येथील दिलीप भायदे हे काही खरेदीसाठी बाजारामध्ये आले असता व दरवाजा अर्धवट बंद असल्याचा फायदा घेत चोरांनी घरातील सोन्याचे दागिने असा एकूण ४७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेवर जप्तीची आफत, अखेर संध्याकाळी अदा केला धनादेश

E-mail Print PDF
रायगड - रायगड जिल्हा न्यायालयाने १८ ऑगस्ट २०१६ रोजी दिलेल्या निकालानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने येथील डिकेई ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयास देणे बंधनकारक असणारी १ लाख ९३ हजार ४१५ रुपयांची रक्कम एक वर्ष उलटून गेले तरी अदा केली नाही. अखेर मंगळवारी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांची खुर्ची, कॉम्प्यूटर्स व अन्य सामान जप्त करुन शाळेला देय्य असणारी रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्याचे न्यायालयीन आदेश घेवून जिल्हा न्यायालयाचे बेलीफ, डिकेई ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाचे प्रमुख अमर वार्डे, शाळेच्या पालक संघाचे अध्यक्ष योगेश मगर हे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्या दालनात दाखल झाले आणि जिल्हा परिषदेतील सर्वच अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे हादरुन गेले.
रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी नव्यानेच रुजू झालेले अभय यावलकर यांनी न्यायालयाने बजावलेले जप्ती वॉरंट स्विकारुन, तत्काळ जि.प. शिक्षणाधीकारी शेषराव बढे यांना न्यायालयाच्या आदेशाच्या पूर्ततेकरीता १ लाख ९३ हजार ४१५ रुपयांचा धनादेश तत्काळ तयार करुन डिकेई ट्रस्टच्या चिंतामणराव केळकर विद्यालयाचे प्रमुख अमर वार्डे यांना सुपूर्त करण्याचे आदेश दिले. दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आणि जि.प.चे वित्त अधिकारी राजेंद्र लाकूडझोडे यांची संयुक्त बैठक घेवून धनादेश कशा प्रकारे अदा करावा या बाबत तत्काळ आदेश दिले. व प्रत्यक्ष कार्यवाही गतिमान केली.
अखेर संध्याकाळी ५.३० वाजता राजिम बॅन्क चेक क्र. ४५९१७९ रु १,९३,४१५/- हा धनादेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांच्या दालनात उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी अमर वार्डे यांना सुपूर्त केला.
जून २०१२  मध्ये डिकेई ट्रस्टचे चिंतामणराव केळकर विद्यालय रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने अनधिकृत असल्याचे जाहिर केले. त्यावर्षी दहावी एसएससी परिक्षेची पहिली ३८ मुलांची बॅच या शाळेची होती. शिक्षण विभागाने शाळा अनधिकृत घोषित केल्याच्या निर्णया विरुद्ध शाळेच्या वतीने अमर वार्डे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल केली. त्याचा निकाल शाळेच्या बाजूने लागून, मुंबई उच्च न्यायालयाने ही शाळा डिसेंबर २०१२ मध्ये अधिकृत असल्याचा निकाल दिल्याचे वार्डे यांनी सांगीतले.
एसएससी परिक्षेस बसणा-या ३८ मुलांचे परिक्षा अर्ज एसएससी बोर्डाकडे भरण्याकरिताची मुदत संपून गेली. विलंब शुल्कासह अर्ज भरण्याचीही मुदत संपुष्टात आली होती. त्यावेळीही न्यायालयात दाद मागीतली असता न्यायालायाच्या निर्णयानुसार विलंब शुल्कासह परिक्षा अर्ज भरुन घेवून मुलांना परिक्षेस बसु देण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याचे अमर वार्डे यांनी सांगितले.

Page 5 of 266