Thursday, Nov 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

उंटाने घेतला मालकाचाच चावा!

E-mail Print PDF
मालवण- तारकर्ली समुद्र किनारी गेले काही दिवस पर्यटकाना उंट सफर घडवणार्‍या व्यावसायिकाला त्यांच्याच एका उंटाने चावा घेतला. रविवारी दुपारी दोन उंटांचे लागलेले भांडण सोडवण्यास गेलेल्या लखन शिंदे (४५) हा गेला असता एका संतप्त उंटाने त्याच्या हाताचा जोरकस चावा घेतला.  यामुळे लखन शिंदे याच्या हाताला खोल जखम होवून स्नायू तुटले व मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरू झाला. सहकार्‍यांनी लखन याला तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तातडीने उपचार केले. लखन यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अनोख्या चाव्याची चर्चा बंदर परिसर व शहरात सुरू होती.

कॉलेज युवतीची गळफास घेऊन आत्महत्या

E-mail Print PDF
मालवण - मालवण-गवंडीवाडा येथे राहणार्‍या प्राची रामदास चव्हाण (१९) या कॉलेज युवतीने रविवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या वाशाला ओढणी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
प्राची ही कुडाळ येथील संत राऊळ महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान शाखेत दुसर्‍या वर्षाला शिकत होती. परीक्षेच्या तणावामुळे तिने आत्महत्या केली असावी, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. परीक्षा जवळ आल्याने रविवारी सकाळी ११  वा. च्या सुमारास ती घरातील एका खोलीत अभ्यासासाठी गेली. तिने खोलीचा दरवाजा आतून बंद करून घेतला. बराच वेळ झाला तरी प्राची बाहेर आली नाही म्हणून  आई तिला पाहण्यासाठी खोलीत गेली असता प्राची छपराच्या वाश्याला ओढणीने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसली. तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचे निधन झाले होते. प्राचीला अभ्यासाचे टेन्शन आल्याने तिने आत्महत्या केली, असे प्राचीच्या वडिलांनी  सांगितल्याची माहिती तपासीक अंमलदार विवेक नागरगोजे यांनी दिली आहे.

मालवणमधील समुद्रात दांडी बीच सी वॉटरपार्क पर्यटकांच्या सेवेला

E-mail Print PDF
मालवण - येथील समुद्राखालील अनोख्या विश्‍वाची भुरळ देशी, विदेशी पर्यटकांना पडली आहे. स्कूबा, स्नॉर्कलिंगचा आनंद लुटण्यास येणार्‍या पर्यटकांना तसेच बच्चे कंपनीला पर्यटनाचा वेगळा आनंद लुटता यावा, यासाठी बेरोजगार, स्थानिक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक अशा चाळीस जणांनी या महिन्यात एकत्र येत सुमारे ३५ ते ४० लाख रुपयांची गुंतवणूक करून समुद्रात दांडी बीच सी वॉटरपार्क हा प्रकल्प साकारला आहे.
पर्यटन जिल्ह्यात शासनाकडून वेगळे उपक्रम राबविणे गरजेचे असताना शासनाची कोणतीही मदत न घेता स्थानिकांनी कोकण किनारपट्टीवरील हा पहिला सहकार तत्त्वावरील प्रकल्प प्रत्यक्षात साकारताना वेगळा आदर्श घालून दिला आहे. या महिन्याच्या अखेरीस हा प्रकल्प पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे.
जागतिक पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अशाप्रकारचे वॉटरपार्क प्रकल्प समुद्रात उभारले जातात. बच्चे कंपनीसह पर्यटकांची मोठी गर्दी याठिकाणी असते. येथे दाखल होणार्‍या पर्यटकांना नावीन्यता देण्यासाठी स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी एकत्र येत या पर्यटन प्रकल्पाची उभारणी केली आहे. स्थानिक मच्छीमारांना व अन्य वॉटर स्पोर्टस व्यावसायिकांना कोणताही त्रास न होता येथे आलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत या प्रकल्पाची जागा निश्‍चित करण्यात आली आहे.
बंदर विभागालाही याबाबत पत्र देण्यात आले असून, सर्व प्रकारच्या परवानगीची पूर्तता करून या वॉटरपार्क प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा मानसही आज दांडी येथील दांडेश्वर मंदिर येथे झालेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
वॉटरपार्क प्रकल्पात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाइफ जॅकेटसह अन्य सर्व सुरक्षेच्या उपाययोजना असणार आहेत. जीवरक्षकांची नियुक्तीही केली जाणार आहे. येथे आलेल्या पर्यटकाला सुरक्षितरीत्या पर्यटनाचा आनंद घेता यावा, यासाठी कोणतीही कमी ठेवली जाणार नाही. अगदी माफक दरात जास्त सुरक्षा व जास्त पर्यटन आनंद ही संकल्पना राबविली जाणार आहे.
कोणत्याही प्रकारे मासेमारी व्यावसायिकांना या वॉटरपार्कचा अडसर होणार नाही. या हेतूने अगदी किल्ले सिंधुदुर्गच्या समोरच केवळ काही फूट कामात या वॉटरपार्कची उभारणी सुरू आहे. उभारणी दरम्यान अनेक पर्यटक वॉटरपार्कमध्ये प्रवेशाची मागणी करत आहेत. मात्र, लवकरच उभारणी पूर्ण झाल्यावर पर्यटकांना प्रवेश दिला जाईल, असे व्यावसायिकांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

सर्जेकोट समुद्रात हायस्पीड ट्रॉलर पकडला

E-mail Print PDF
मालवण - सर्जेकोट बंदरापासून अकरा वाव खोल समुद्रात अनधिकृत मासेमारी करणारा मलपी कर्नाटक येथील एक हायस्पीड ट्रॉलर सागरी व मालवण पोलिसांनी सागरी गस्तीदरम्यान ताब्यात घेतला. हायस्पीड नौकेत बांगडा, बळा, म्हाकुल, सौंदाळा, दोडी आदी प्रकारची २७ क्रेट मासळी सापडली. पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला असून कारवाईचा प्रस्ताव शुक्रवारी तहसीलदारांकडे सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, देवगड पाठोपाठ मालवण येथील सागरी पोलिसांनी गस्ती दरम्यान अनधिकृत मासेमारी करणाऱया नौकेला जेरबंद केल्याने स्थानिक मच्छीमारांनी पोलिसांचे थेट पकडलेल्या नौकेवर जाऊन अभिनंदन केले.
सर्जेकोट समुद्रात हायस्पीड नौकेला अनधिकृत मासेमारी करताना सागरी पोलिसांच्या ‘सिंधुदुर्ग ५’ या गस्ती नौकेने पकडले. त्यानंतर मालवण बंदरात आणून पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला. कर्नाटक येथील गणेश पालन यांच्या मालकीची ‘कस्तुरी फिशर्स बाबा’ (केए ०२ एमएम ४७३४) ही नौका पकडण्यात आली. बोट पकडल्याची माहिती सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे यांनी मालवण पोलीस निरीक्षक अरविंद बोडके व मत्स्य विभागाला दिली. त्यानंतर नौका मालवण बंदरात आणून पोलीस व मत्स्य विभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा केला. सागरी पोलीस उपनिरीक्षक अनिल साठे, विलास तोरसकर, सोमनाथ पवार, ए. जी. ढोलये, जवूर शिरगावकर, हरिश्चंद्र जायभाय, संदीप सरकुंडे आदींच्या पथकाने कारवाई केली. मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दशरथ चव्हाण, विल्सन डिसोझा, आशिष भाबल, भाऊ नाटेकर तसेच मत्स्य विभागाचे परवाना अधिकारी श्रीकांत वारुंजीकर यांनी पंचनामा केला.

डंपर उलटून पाचजण जखमी

E-mail Print PDF
मालवण- आचरा मार्गावर भरधाव वेगाने जाणारा डंपर ओझर हायस्कूलजवळील रस्त्यावर उलटून झालेल्या अपघातात डंपरमधील पाच कामगार जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यावर कुडाळ येथे हलविण्यात आले.
उत्तर प्रदेशमधील १४ वाळू कामगारांना घेऊन हा डंपर देवली येथून हडी येथे जात होता. वेगात असलेला हा डंपर ओझर येथे आला असता चालकाचा ताबा सुटून उलटला. यात डंपरच्या हौद्यातील आणि केबीनमधील कामगार बाहेर फेकले गेले. यामध्ये सुरेश यादव, लव यादव, परमजीत राय, रविशंकर, राम प्रसाद, शाम विहारी, रमेश पटेल, रमेश यादव, राजमिंदर राम, सुग्रीम राम यांचा समावेश होता. जखमींना स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात हलविले.
अपघातानंतर रुग्णवाहिकेशी संपर्क होऊ न शकल्याने डंपर मालकाने कोळंब येथील रिक्षा व्यावसायिक गोपाळ शेलटकर यांच्याकडे सहकार्य मागितले. शेलटकर यांनी तात्काळ आपली रिक्षा घटनास्थळी नेऊन जखमींना रिक्षामधून ग्रामीण रुग्णालयात आणले. अन्य जखमींना मार्गावरून जाणाऱया रिक्षा टेम्पोतून उपचारासाठी हलविण्यात आले. अपघातानंतर काही तासांनंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली.
सुग्रीम राम याचा उजवा कान फाटला आहे, तर अन्य चौघांनाही दुखापत झाली. या मार्गावरून आचरा पोलीस स्टेशनला डयुटीवर जाणाऱया कृष्णा परुळेकर आणि सुनील चव्हाण यांनी जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी सहकार्य केले. हा डंपर भरधाव वेगाने जात होता. या मार्गावरून आडवली येथे जात असलेल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी मिताली कवटकर सुदैवाने बचावल्या.

‘किल्ले सिंधुदुर्ग’ स्वच्छता मोहिमेचा फज्जा

E-mail Print PDF
मालवण - मालवण तालुका शिवसेनेच्यावतीने मोठा गाजावाजा करून जाहीर केलेली किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहीम हाताच्या बोटावर मोजणार्‍या शिवसैनिकांच्या उपस्थितीत करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गच्या परिसरात वाढलेल्या झाडीझुडपांची कल्पना शिवसैनिकांना न आल्याने तसेच शिवसैनिकांनी पाठ फिरविल्याने वायरी-भूतनाथ परिसरातील कार्यकर्त्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांतून पदाधिकारी या मोहिमेत सहभागी न झाल्याने स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडालेला दिसून आला.
दरम्यान, किल्ले सिंधुदुर्गातील किल्ले सिंधुदुर्गला भेट देणार्‍या पर्यटकांकडून वायरी-भुतनाथ ग्रामपंचायत कर आकारणी करते. मात्र त्या बदल्यात आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत, किल्ल्यात स्वच्छता केली जात नसल्याबाबत आमदार वैभव नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीने मिळणाऱया कराच्या बदल्यात ५० टक्के रक्कम किल्ल्‌यात स्वच्छता तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च कराव्यात, अशा सूचना आमदार नाईक यांनी नवनिर्वाचित सरपंच भाई ढोके यांना दिल्या.
ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गवर तालुका शिवसेनेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत आमदार वैभव नाईक यांच्यासह नगराध्यक्ष, तालुक्मयातील शिवसेना पदाधिकारी व वायरी ग्रामपंचायत सहभागी झाली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या स्मृतिदिनानिमित्त ही मोहीम राबविण्यात आली. काही महिन्यांपूर्वी किल्ल्‌यात स्थानिक रहिवासी तसेच शिवप्रेमींच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. मात्र यावषी पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने किल्ल्‌यात मोठया प्रमाणात झाडी वाढली होती. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने गुरुवारी राबविण्यात आलेल्या मोहिमेत तटबंदीवरील झाडी, शिवराजेश्वर मंदिराकडे जाणाऱया मार्गाच्या दुतर्फा असलेली झाडी तसेच अन्य भागातील झाडी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अन्य कामगारांनी हटवित त्याची विल्हेवाट लावली. सकाळच्या सत्रात तालुका प्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नगरसेवक पंकज सादये, शहरप्रमुख बाबी जोगी, शहरप्रमुख गणेश कुडाळकर, उपशहरप्रमुख यशवंत गावकर, स्वप्नील आचरेकर, तपस्वी मयेकर, महिला नगरसेविका आकांक्षा शिरपुटे, सुनिता जाधव, तृप्ती मयेकर, शिवसेनेचे अन्य पदाधिकारी तसेच वायरी भुतनाथ सरपंच ललित वराडकर, भाई ढोके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
किल्ल्याचा परिसर पाहता एक दिवसाची स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ होणे शक्मय नसल्याने येत्या आठ दिवसांत पुन्हा स्वच्छता मोहीम राबविली जाईल, असे आमदारांनी स्पष्ट केले. यावेळी शिवसेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाल्याने आमदारांच्या चेहऱयावर साफ नाराजी दिसून येत होती.

अश्‍लील चित्रफीत व्हायरल; महिलेची पोलिसांत धाव

E-mail Print PDF
सावंतवाडी - तालुक्यातील शहराच्या बाजूला असलेल्या गावातील महिलेची अश्‍लील चित्रफीत व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली असून आपल्याला धमकी देऊन हा प्रकार करवून घेतल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. मात्र, पोलिस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार महिला सहाय्यता केंद्राकडून चौकशी सुरू असून येत्या दोन दिवसांत गुन्हा दाखल होऊ शकतो, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील एका गावात संबंधित महिला राहते. तिचा पती जिल्ह्यातील एका शासकीय कार्यालयात कार्यरत आहे. त्या महिलेशी संबंधित तरुणाने ओळख करून मैत्री वाढविली आणि त्याचाच फायदा घेऊन तिच्याकडून हा प्रकार करून घेतल्याची चर्चा आहे. संबंधित युवक हा एका एजन्सीवर चालक म्हणून काम करीत आहे.
त्याने आपल्या ओळखीचा फायदा घेऊन व धमकावून क्लिप काढल्याचे व नंतर त्यात फोटोशॉपमध्ये अश्‍लील बदल केल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे. आपल्याला बदनाम करण्याच्या उद्देशाने त्याने हा प्रकार केला असेल, असे संबंधित महिलेचे म्हणणे आहे.
सध्या गावातील काही तरुणांच्या मोबाईलमध्ये ही क्लीप फिरत आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित महिला आज आपल्या पतीसह येथील पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास आली होती. यावेळी त्या दोघांनी पोलिसांशी चर्चा केली.
याबाबत येथील पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील धनावडे यांच्याशी संपर्क साधला असता एक जोडपे अशी तक्रार घेऊन आले होते; मात्र अशा घटनांचा तपास किंवा चौकशी विशेष महिला अधिकारी नेमून केला जातो. त्यामुळे त्यांना महिला सहाय्यता केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. त्यानंतर पुढील भूमिका घेण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसात संबंधित तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे असे त्यांनी सांगितले.

डोंगर खचल्याने घरावर कोसळली भिंत

E-mail Print PDF
मालवण - मालवण तालुक्यातील देवली- वाघवणे मधलीवाडी  येथील डोंगर अचानक खचला. यामुळे सुभद्रा  राजाराम चव्हाण आणि प्रमोद अनंत चव्हाण यांच्या संरक्षक भिंत कोसळून  घराच्या पाठीमागील पडवी जमीनदोस्त झाली. यामध्ये सुमारे लाखोंचे नुकसान झाले. सोमवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कुठलीही अप्रिय घटना घडली नाही.  या घटनेबाबत मालवण तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे मंगळवारपर्यंत नोंद नव्हती. एवढ्या मोठ्या घटनेबाबत मालवण तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन कक्ष अनभिज्ञ असल्याबाबत  ग्रामस्थांनी आश्‍चर्य व्यक्त करत नाराजी व्यक्त केली.
देवली-वाघवणे गावातील अनेक घरे ही डोंगर पायथ्याशी वसलेली आहेत.  मधलीवाडी येथील डोंगर सोमवारी दुपारी ३ वा. च्या सुमारास अचानक  खचला. यामुळे चव्हाण यांच्या घरामागची संरक्षक भिंत थेट घरावर कोसळली. यामुळे घराची मागील पडवी जमीनदोस्त होत ढिगार्‍याखाली गाडली गेली. एकत्र कुटुंब पद्धती असलेल्या या घरात  आठ  माणसे राहतात.  सुदैवाने त्या वेळी घरातील व्यक्ती  बाहेर असल्याने अनर्थ टळला.
या दुर्घटनेत संरक्षक भिंत घरावर कोसळल्याने चिर्‌यांनी बांधलेली पडवी आणि पडवीत असणारे दोन संडास, दोन बाथरुम, छप्परावरील कौले, वासे, रिपी जमीनदोस्त होऊन लाखो रुपयांचे  नुकसान झाले. मात्र महसूल कर्मचार्‌यांनी केलेल्या पंचनाम्यात केवळ ३५ हजार रुपये नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. या तटपुंज्या नुकसानीचा लाभ मिळेल याची शाश्‍वती नाही.

डंपरच्या धडकेत तलाठ्याचा मृत्यू

E-mail Print PDF
दोडामार्ग - कुडासे गावचे रहिवासी, माजी सैनिक व मसुरे येथे तलाठी म्हणून कार्यरत असलेले बळीराम अमृत देसाई (४७) यांचा डेगवे येथे डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. सोमवारी सकाळी १०.३० वा.च्या दरम्यान डेगवे माऊली मंदिरनजीक सोसायटीसमोर ही दुर्घटना घडली. कुडासे येथून मसुरे येथे कामावर जात असतानाच हा अपघात घडला. या प्रकरणी डंपर चालक अदप्पा बसप्पा पुजारी (२४, रा. विजापूर) याच्यावर बांदा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
कुडासे भरपालवाडीतील मूळ रहिवासी असलेले देसाई दोडामार्ग येथील गोवेकर कॉलनीत राहत होते. देसाई हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर तलाठी म्हणून शासन सेवेत दाखल झाले होते. २०१० पासून ते तलाठी म्हणून सेवा बजावत होते. सध्या ते मसुरे (ता. मालवण) येथे तलाठी म्हणून कार्यरत होते. शनिवार व रविवार सुट्टी असल्याने ते घरी आले होते. सोमवारी मोटारसायकलने कामावर जात असताना डेगवे येथे त्यांना मोबाईल कॉल आला. दुचाकी रस्त्याच्या बाजूला थांबवून दुचाकीवर बसूनच ते मोबाईलवर बोलत असताना दोडामार्गहून बांद्याच्या दिशेने जाणाऱया डंपरने (जीए  ०५, टी  २४२७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत देसाई यांच्या डोक्याला व कंबरेच्या खाली जबर मार बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
डेगवे येथील स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत देसाई यांना पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ग्रामस्थांनी बांदा पोलीस स्थानकात माहिती दिली. अपघातग्रस्त डंपर गोव्यातील असून चालक अदप्पा याला बांदा पोलिसांनी तात्काळ अटक केली. बळीराम देसाई यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी असा परिवार आहे. कुडासे भरपालवाडी येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात सोमवारी सायंकाळी बळीराम देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Page 1 of 371

 • «
 •  Start 
 •  Prev 
 •  1 
 •  2 
 •  3 
 •  4 
 •  5 
 •  6 
 •  7 
 •  8 
 •  9 
 •  10 
 •  Next 
 •  End 
 • »