Tuesday, Jan 23rd

Headlines:

सिंधुदुर्ग

रापण संघाची चार लाखाची जाळी आगीत खाक

E-mail Print PDF
मालवण - दांडी येथील सुरेंद्र सूर्यकांत मेस्त यांच्या रापण संघाची सुमारे १२५ जाळी गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. स्थानिक मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु या दुर्घटनेत मेस्त यांचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.
सुरेंद्र सूर्यकांत मेस्त यांची मच्छीमारी जाळी दांडी किनाऱयावर ठेवण्यात आली होती. गुरुवारी मध्यरात्री एकच्या सुमारास या जाळयांना अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच दांडी किनाऱयावरील स्थानिक नागरिक व मच्छीमारांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रवीण बांदेकर, गणपत केळुसकर, अंजली बांदकर, योगेश तोडणकर, सोनल केळुसकर, मीनल केळुसकर, अक्षता केळुसकर यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, किनाऱयावर असलेल्या वाऱयाच्या जोरामुळे भडकलेल्या आगीत जाळी जळून गेली. जाळयांना आग लागण्याचे नेमके कारण समजू शकले नाही. महसूल प्रशासनाने या नुकसानीची पंचयादी केली आहे. या दुर्घटनेमुळे मासेमारी हंगामाच्या सुरुवातीलाच रापण संघावर अवलंबून असलेल्या ५० ते ७० कुटुंबियांवर संकट ओढवले आहे.
रापण संघाच्या नुकसानीची महिती आमदार वैभव नाईक व पालकमंत्री दीपक केसरकर यांना देण्यात आली. आमदार नाईक यांनी जळालेल्या जाळयांची पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष महेश कादंळगावकर, जि. प. सदस्य हरी खोबरेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे, किरण वाळके आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहायता निधीतून रापण संघाला मदत मिळावी, यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. तसेच जि. प. स्तरावर अशा आपत्ती स्थितीत मच्छीमारांना मदत मिळावी, यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही उशिरा घटनास्थळी भेट घेऊन नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली.

अंगणवाडी कर्मचार्‍यांचा सिंधुदुर्गनगरीत ‘एल्गार’

E-mail Print PDF
कुडाळ - ‘एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता...’, ‘मानधन नको वेतन हवे..’ अशा घोषणा देत अंगणवाडी कर्मचार्‌यांनी सिंधुदुर्गनगरी परिसर दणाणून सोडला. आमच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही संप करणे हे पाप आहे का? असा सवाल करत अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या नेत्या कमलाताई परूळेकर यांनी सरकारवर  टीकास्त्र सोडले. या बरोबरच जि. प. चे  मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्यावरही त्यांनी टीका केली. यावेळी आंदोलनकर्त्या नेत्या कमलाताई परूळेकर यांच्यासह १२०० अंगणवाडी कर्मचार्‍यांना ताब्यात घेत पोलिसांनी त्यांच्यावर  प्रतिबंधात्मक कारवाई करत  समज देत सोडून दिले.
गेले २५ दिवस राज्यव्यापी संप छेडणार्‌या अंगणवाडी कर्मचार्‌यांनी आंदोलन आणखी तीव्र करताना गुरुवारी जिल्हा मुख्यालयात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. यानुसार गुरुवारी सकाळी जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात एकवटल्या होत्या. कमलाताई परुळेकर यांनी या कर्मचार्‌यांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, सरकारने अंगणवाडी कर्मचार्‍यांना ऑगस्टपासून मानधन दिलेले नाही. मग कर्मचार्‌यांनी जगायचं कसं? आमच्या या आंदोलनाचे  नेते राजकारण करतात. आंदोलनादरम्यान बालमृत्यू झाले त्याला हे सरकारच जबाबदार आहे.  सरकार अंगणवाडी कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्यात वाद लावून झुंजविण्याचे काम करीत आहेत. आम्हाला  बालकांचे शत्रू मानले,आम्हाला मेस्मा कायदा लावण्याची धमकी दिली जात आहे. मुळात आम्ही मानधनावरील सेविका आहोत. आम्हाला मेस्मा लागू शकत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचार्‍यांनी घाबरू नका. अंगणवाडी कर्मचार्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येता कामा नये. म्हणूनच हा आमचा न्यायासाठी लढा आहे. सन्मानपूर्वक मानधनवाढ आणि सेवाज्येष्ठता मिळालीच पाहिजे. त्यात आम्ही कोणतीच तडजोड करणार नाही. प्रसंगी पुढच्या दोन दिवसांत जिल्हाधिकार्‌यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसण्याची तयारी ठेवा. ९ तारीखला अंगणवाडया उघडणार का? असा सवाल उपस्थित करतच उपस्थित शेकडो अंगणवाडी कर्मचार्‍यांनी एकसुरात ‘नाही’ असा प्रतिसाद  देत आपली एकजूट दाखविली.
प्रशासनाचे अधिकारी हे आमच्या करातून पोसलेले आहेत. त्यांनी आम्हाला धमक्यांची भीती दाखवू नये.  एकीकडे जि. प. सभागृह आमच्या संपाला पाठिंबा देण्याचा ठराव करत असताना दुसरीकडे त्याच जि. प. चे सीईओ कारवाईच्या धमक्या देतात. मग  लोकप्रतिनिधी करतात काय? पालकमंत्री दीपक केसरकरांनीही याबाबत आम्ही लेखी कळविले आहे. मात्र, त्यांचे अद्याप उत्तर आलेले नाही. आमच्या राज्यव्यापी संपाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे मंत्री रामदास कदम, दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत निर्णय घेतो, अशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे आपण प्रतीक्षा करूया, पण न्याय मिळाल्याशिवाय माघार नाही हे मात्र, शासनकर्त्यांनी ध्यानात ठेवावे. जिल्हा प्रशासनाने ८९ अंगणवाडया सुरू असल्याची माहिती दिली. ती पूर्णतः चुकीची असून केवळ १० अंगणवाड्या सुुरू होत्या. हे आम्ही मान्य करतो. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे सीईओ शेखर सिंह व उपमुख्यकार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग सोमनाथ रसाळ यांनी चुकीची माहिती देणे बंद करावे, असे श्रीमती परुळेकर यांनी ठणकावून सांगितले.
आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी ओरोस पोलिस स्थानकाचे प्रभारी पोलिस निरिक्षक मारूती जगताप यांच्या नेतृत्वाखाली २५ पोलिसांची फौज व एक दंगल नियंत्रक पथक रवळनाथ मंदिर आवारात तैनात होते. श्रीमती परूळेकर यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर आंदोलकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस व्हॅनमधून पोलिस स्थानकात आणले व समज देवून सोडण्यात आले.

दोन गवे विहिरीत पडले; एकाचा मृत्यू

E-mail Print PDF
सावंतवाडी - येथील बाहेरचावाडा परिसरातील गोविंद चित्रमंदिराच्या मागील बाजूस दोन गवे विहीरीत पडले. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघड झाला. यातील एका गव्याचा मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍याला बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न सुरू केले होते.
गावाला लागून असलेल्या बाहेरच्या भागात पालकमंत्री दीपक केसरकर कुटुंबियांची जमीन आहे. या जमिनीत असणार्‍या विहिरीत रात्री हे गवे कोसळले होते. हा प्रकार सकाळी तेथील कामगाराच्या लक्षात आला. त्याने याची माहिती नागरिकांना दिली. त्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी धावपळ उडाली.
दरम्यान, पाणी खोल असल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे, तर दुसर्‍या गव्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते. घटनास्थळी पालिका कर्मचारी आणि वनविभाग कर्मचार्‍यांनी धाव घेतली होती. ते काही दिवस शहराला लागून असलेल्या नरेंद्र डोंगर परिसरात हे गवे आढळून आले होते. या भागात ते संचार करत होते. पाच गव्यांचा कळप शहरात वास्तव्य करून आहे. तेथील एका गव्याचा आज मृत्यू झाला.

१० वर्षे रखडलेल्या विर्डी प्रकल्पाला १४६ कोटींची प्रशासकीय मान्यता

E-mail Print PDF
कणकवली - दोडामार्ग तालुक्यातील विर्डी लघुपाटबंधारे प्रकल्पास १४६ कोटी रूपयांची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या या प्रकल्पाला चालना मिळण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३४५ हेक्टर एवढी सिंचन क्षमता निर्माण होणार आहे.
या प्रकल्पाचे बांधकाम विर्डी गावाच्या खालच्या बाजूस सुमारे तीन किलोमीटरवर असणार्‌या गोवा राज्याच्या सीमेलगत हलतर नाल्यावर करण्यात येत आहे. हलतर नाला कर्नाटक राज्यात उगम पावून महाराष्ट्राच्या विर्डी गावातून गोवा राज्यात जातो आणि पुढे मांडवी नदीस मिळतो. महादयी खोर्यातील महाराष्ट्राचा हा एकमेव बांधकामाधीन प्रकल्प आहे. कोकण विकास पाटबंधारे महामंडळामार्फत या प्रकल्पाचे काम २००७ मध्ये हाती घेण्यात आले. या प्रकल्पाची मूळ किंमत ४३.६८ कोटी एवढी होती. ३१ मार्च २०१० पर्यंत या प्रकल्पावर ७ कोटी ३६ लाख रू. खर्च झाला होता. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जवळपास १०० कोटीहून अधिक निधीची गरज होती. २०११ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र अपुरा निधी आणि अन्य कारणांमुळे या प्रकल्पाचे काम रखडले. दोडामार्ग तालुक्यातील या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी १४६ कोटींची प्रशासकीय मान्यता दिली. अर्थात प्रत्यक्ष निधी उपलब्ध होवून काम सुरू झाले तरच या प्रकल्पाला खर्‌या अर्थाने चालना मिळणार आहे. किमान आता प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या धरण प्रकल्पाच्या कामाबाबत आशा निर्माण झाली आहे.
राज्याच्या हिश्याच्या पाणी वापरासाठी २००३-०४ च्या दरसूचीवर आधारित ४३ कोटी ६८ लाख रुपयांच्या किंमतीस सप्टेंबर २००५ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. मात्र, भूसंपादन खर्च, संकल्पचित्रातील बदल आणि दरसूची यामध्ये झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाली आहे होती. त्यामुळे मंत्रिमंडळाने दरसूचीवर आधारित सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.

एटीएम कार्डचा पासवर्ड विचारत शेतकर्‍याचे ८५ हजार रुपये केले गायब

E-mail Print PDF
बांदा - ‘मी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य ऑफिसमधून बोलतोय. तुमच्या खात्याविषयी माहिती हवी आहे’ असे सांगत एटीएम कार्डचा पासवर्ड विचारत तब्बल ८५ हजार रुपये लंपास केल्याची घटना बांदा-कोनशी येथील शेतकर्‍याच्या बाबतीत घडली. खात्यातील पैसे काढण्यात आल्याचा मेसेज आल्यानंतर या शेतकर्‍याने बांदा पोलिसात धाव घेतली. मात्र, हा फेक कॉल ज्या नंबरवरून आला होता तो बंद करण्यात आल्याने शेतकर्‍याला निराश व्हावे लागले.
फेक कॉल करून पैसे उकळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. कोनशी येथील एका  शेतकर्‌याच्या खात्यामध्ये सुमारे एक लाख रुपयांची पुंजी जमा होती. चार दिवसांपूर्वी या शेतकर्‍याला एका नंबरवरून फोन आला. त्याला त्याच्या एटीएम कार्डचा नंबर विचारण्यात आला. शेतकर्‌याने नंबर सांगितल्यानंतर काही वेळाने या शेतकर्‍याच्या मोबाईलवर वनटाईम पासवर्ड (ओटीपी) असलेला मेसेज आला. काही क्षणात त्या फेक नंबरवरून पुन्हा फोन येत तो पासवर्ड विचारण्यात आला. शेतकर्‍यानेही बँकेशी संबंधित असेल म्हणून तो पासवर्ड नंबर सांगितला. हा प्रकार सतत तीन दिवस चालू होता. या तीन दिवसात त्याच्या खात्यातील तब्बल ८५ हजार रुपये गायब झाले होते.
चार दिवसांनी त्या शेतकर्‌याने आपल्या एका मित्राला मोबाईलवर आलेले मेसेज दाखवले आणि त्यावेळी खरा प्रकार समोर आला. आपल्या खात्यातील मोठी रक्कम लुबाडण्यात आली हे समजताच त्या शेतकर्‌याने बांदा पोलिसात धाव घेतली. पोलिसांनीही त्या नंबरवर कॉल केला, मात्र तो नंबर नॉट रिचेबल होता.दरम्यान याबाबत यापूर्वी असे प्रकार घडूनही लोक या षड्यंत्राला बळी पडत आहेत.पोलिसात तक्रार करूनही पैसे काही परत मिळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. याबाबत पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी त्या शेतकर्‌याला तुमची तक्रार असेल तर द्या, आम्ही तपास करू असे सांगितले. मात्र पैसे परत मिळणार नाहीत हे समजल्यावर त्या शेतकर्‍याने तक्रार दिली नाही.

क्रेडीट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांचा गंडा

E-mail Print PDF
सावंतवाडी - शहरातील प्रथितयश सुवर्णकाराला अज्ञाताकडून क्रेडिट कार्डच्या माध्यमातून साडेतीन लाखांना ऑनलाईन गंडा घालण्यात आला. हा प्रकार गेले दोन ते तीन महिने सुरू आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, येथील पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची पोलिसांकडून देण्यात आलेली माहिती अशी, एका सुवर्णकाराने आपल्या व्यावसायिक वापरासाठी क्रेडिट कार्ड काढले होते. त्याचा ते कधी तरी वापर करायचे; मात्र गेल्या दोन महिन्यांत त्यांच्या कार्डवरून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा संदेश त्यांना आला.
आपण कोणालाच क्रेडिट कार्डने पैसे दिले नसताना अचानक खात्यातील बॅलन्स कमी झाल्याने याबाबत त्यांनी बँकेत खात्री केली. यावेळी ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या क्रेडिट खात्यातील रक्कम वळती करून घेण्यात आल्याचे बँकेतून सांगण्यात आले. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक सुनील धनावडे म्हणाले, गेल्या दोन महिन्यांत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून झालेल्या बँकिंग व्यवहारांच्या माध्यमातून अधिक तपास करण्यात येणार आहे. संबंधितांकडून ऑनलाईन व्यवहार करण्यात आला असून अज्ञात चोरट्याने नेमके कशासाठी पैसे वापरले, याची माहिती घेण्यात येणार आहे.’’

अंगणवाडी कर्मचार्‍यांनी दरोडा घातला आहे का? कमलताईंचा सवाल

E-mail Print PDF
कुडाळ - अंगणवाडी कर्मचार्‍यांचा संप अजून सुरुच असून, मुख्यमंत्री परदेश दौर्‍यावर आणि पंकजा मुंडे भगवानगडावर राजकारण करण्यात मश्गुल असल्यामुळे संपाकडे पाहण्यात त्यांना वेळ नाही. दरम्यान मुलांच्या आहारात खंड पाडणार्‍या सरकारविरोधात जनहित याचिका दाखल झाली  व सर्व अधिकार्‍यांवर कायदा लावण्यासाठी मागणी केली गेली. आपण अंगणवाडी कर्मचारी शासकीय नोकरीत नाही. आपण मानसेवी आहोत. कारवाई मुख्य कार्यकारी अधिकार्‍यापासून सुपरवायझरवर होणार आहे. आपणावर नाही. त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही. नोकरीवरुन काढून टाकायला आपण दरोडा घातला आहे का? असा सवाल कमलताई परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.

दरड कोसळल्याने खारेपाटण- गगनबावड मार्गावरील वाहतूक ठप्प

E-mail Print PDF
वैभववाडी - शुक्रवारी सायंकाळी वैभववाडी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात पुन्हा दरड कोसळली. त्यामुळे भुईबावडा घाटातील वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना सायंकाळी ५.३० वा.सुमारास घडली. दरड पडल्यामुळे घाटात अनेक वाहने अडकून पडली होती तर शुक नदीपुलानजीक रस्त्यावर झाड पडल्यामुळे खारेपाटण-गगनबावडा राज्य मार्गावरील वाहतूक सुमारे अर्धा तास ठप्प होती.  सा.बां.च्या कर्मचार्‍यांनी झाड तोडून वाहतूक सुरळीत केली.  
शुक्रवारी दुपारी तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस झाला.  सुमारे दोन अडीच तास हा पाऊस झाला. विशेषतः सह्याद्री पट्‌ट्यात झालेल्या मुसळधार पावसाने भुईबावडा घाटात गगनबावड्यापासून सुमारे तीन कि.मी. अंतरावर रस्त्यावर दरड कोसळली. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरड पडल्यामुळे काही वाहाने घाटात मध्येच अडकून पडली होती. या घाट मार्गातील वाहतूक करुळ घाटमार्गे वळविण्यात आली आहे. घाट मार्गात कोसळणार्‍या दरडी हटविण्यासाठी ठेवण्यात आलेला जेसीबी नादुरुस्त असल्यामुळे दुसरा जेसीबी बोलावून दरड हटविण्यात येईल, असे बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
करुळ घाटातून सायंकाळी उशीरापर्यंत वाहतूक सुरळीत सुरू होती.   वैभववाडी शुकनदी पुलानजीक झाड रस्त्यावर उमळून पडल्यामुळे वैभववाडी - गगनबावडा राज्य मार्ग सुमारे १५ ते २० मिनिटे ठप्प झाला होता. सा.बां.च्या कर्मचार्‌यांनी झाड हटवून वाहातूक सुरळीत सुरू केली. भुईबावडा परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने ऐनारी परिसरात भात शेतीत पाणी घुसल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सतत पडणार्‌या पावसामुळे हातातोंडाशी आलेली भातशेती वाया  जाण्याची भीत्ती शेतकरी व्यक्त करत आहेत.

कणकवली तालुक्यात सरपंचपदासाठी ५३ तर सदस्यपदासाठी २२२ अर्ज

E-mail Print PDF
कणकवली - ग्रा.पं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत तालुक्यातून सरपंचपदासाठी ५३ तर सदस्य पदासाठी २२२ अर्ज दाखल झाले. तालुक्यात एकूण सरपंचपदासाठी १३८ तर सदस्य पदासाठी ५५७ अर्ज प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील हळवल व पियाळी ग्रा. पं. ची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
कणकवली तालुक्यातील ५८ ग्रा. पं. च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी तहसील कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यातून शुक्रवारी सरपंचपदासाठी भरणी-१, नागवे-६, पिसेकामते-१, बिडवाडी-१, वरवडे-१०, हरकुळ बुद्रुक-२, तरंदळे-२, कलमठ-६, वाघेरी-१, हुंबरठ-१, असलदे-१, आयनल-१, सावडाव-१, नांदगाव-३, कोळोशी-१, साकेडी-२, सातरल-२, हळवल-१, दारिस्ते-२, वागदे-२, शेर्पे-४, कोळोशी-२ असे ५३ अर्ज दाखल झाले. तर सदस्य पदासाठी भरणी-१३, आशिये-३, नागवे-१७, पिसेकामते-७, बिडवाडी-१२, वरवडे-१७, हरकुळ बुदुक-१३, तरंदळे- १३, कलमठ-३४, वाघेरी-३, हुंबरठ-३, माईण-२, असलदे-४, आयनल-५, सावडाव-७, नांदगाव-५, कोळोशी-७, साकेडी-५, पियाळी-१, सातरल-५, हळवल-९, शिरवल-६, दारिस्ते-९, वागदे-८, शेर्पे-४, कोळोशी-७, साळिस्ते-३ असे २२२ अर्ज दाखल झाले. सायंकाळी ६.३० वाजता तहसील कार्यालयातील निवडणूक कक्षात पोचलेल्या उमेदवारांचे अर्ज उशिरापर्यंत दाखल करणे सुरू होते.  
हळवल ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते व ग्रामस्थांनी एकत्र येत कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नसलेल्या नविन उमेदवारांना संधी देत निवडणूक बिनविरोध केली. सरपंचपदासाठी दिपक गुरव तर सदस्य पदासाठीच्या ९ जागांसाठी संदेश राणे, ऋतुजा तावडे, सुजाता परब, अरूण राऊळ, उर्मिला मडवळ, उत्तम जाधव, उर्मिला ठाकूर, शुभांगी राणे, प्रकाश जोगळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सरपंच व सदस्यांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाली.
पियाळी ग्रा. पं. च्या निवडणुकीमध्ये केवळ समर्थ पॅनलचे उमेदवार दाखल झाले. पियाळी सरपंच पदासाठी पवित्रा गुरव तर सदस्यपदासाठी बाळकृष्ण सावंत, मंगेश तेली, सुनील कदम, वैष्णवी राणे, सोनाली बंदरकर, दर्शना नारकर, प्राजक्ता पावसकर यांनी अर्ज दाखल केले.

Page 10 of 375