Monday, Jan 22nd

Headlines:

विकासकामांंचा २० कोटीचा निधी पुन्हा आरोग्य उपकेंद्राकडे वळवला

E-mail Print PDF
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीमधून केंद्र शासनाच्या योजनांमधील २० कोटी जिल्ह्यातील विकासकांना वापरण्याबाबत निर्णय झाल्याने समाधान व्यक्त होत असतानाच आता त्यातील ६ कोटी जि.प. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र दुरूस्तीस दिल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. निधी अपुरा पडत आहे. अशा परिस्थितीत हा निधी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठी ६ कोटी देवून वळविला तर रस्त्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

एटीएमचा पीन मिळवून भामट्यांनी रक्कम लांबविली

E-mail Print PDF
रत्नागिरी ः बँकेतून बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद पडले आहे. त्याला आधार कार्ड लिंक करावयाचे असल्याने त्याचा नंबर व सीव्हीही नंबर घेवून बँक खात्यातून ५ हजार रुपये लांबविल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रथमेश रमेश साळुंखे (१९, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार प्रथमेशला त्याच्या मोबाईलवर अज्ञात क्रमांकावरून फोन आला होता. बोलणार्‍याने मी दिपक शर्मा बोलत असून तुमचे एटीएम कार्ड बंद झाले आहे. त्याला आधार कार्ड लिंक करावयाचे असल्याने त्याचा नंबर व एटीएमचा सीव्हीव्ही कोड १६ अंकी नंबर द्या असे सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून प्रथमेशने सर्व माहिती दिली.

सा. बां. ची विकासकामांकडे पाठ - दत्ता कदम

E-mail Print PDF
लांजा ः सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजामार्फत तालुक्यातील विकास कामांकडे होत असलेले दुर्लक्ष तसेच कामांबाबत माहिती देण्याबाबत होत असलेला हलगर्जीपणा व टाळाटाळ या विरोधात येत्या २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी दिला आहे.

भोस्ते घाटात कंटेनर कलंडला, जीवितहानी टळली

E-mail Print PDF
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात एका अवघड वळणावर भरधाव वेगातील कंटेनर दुसर्‍या मालवाहू ट्रकवर पलटी झाला. मात्र त्या ट्रकचालकाचे दैव बलवत्तर म्हणून तो चालक बालंबाल बचावला. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करणार्‍या कंटेनर चालकाला ट्रकचालकाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अस्वस्थ अशोक वालमना पोलिस गाडीत कोंबले

E-mail Print PDF
रत्नागिरीः पोलिसांच्या अटकेत असलेले रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष संघटनेचे नेते अशोक वालम यांची प्रकृती खालावलेली असतानाही मंगळवारी पोलिसांनी त्यांना राजापूर न्यायालयात हजर केले. नातेवाईकांनी वालम यांना रुग्णवाहीकेतून नेण्याची केलेली मागणी धुडकावून लावत पोलीस गाडीत अक्षरशः कोंबून नेल्याने जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. वालम यांचे नातेवाईक व समर्थकांनी पोलीसांच्या या कृतीचा निषेध केला असून रिफायनरी विरोधी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
प्रस्तावित ग्रीन रिफायनरीच्या विरोधात कुंभवडे येथे सुरू असलेल्या बैठकीत प्रकल्प समर्थक व विरोधकांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. याप्रकरणी अशोक वालम व त्यांच्या सहकार्‍यांना पोलिसांनी अटक झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वालम यांना रत्नागिरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. मात्र वालम यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सोमवारी रात्रीच उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वालम यांच्या छातीत दुखत असून जिल्हा रुग्णालयात तज्ञ डॉक्टर नसल्याने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
खासगी रूग्णालयात आवश्यक वैद्यकीय चाचण्या झाल्यानंतर वालम यांना पुन्हा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रल्हाद देवकर यांनी खासगी रुग्णालयातील वैद्यकीय चाचण्यांचे रिपोर्ट नॉर्मल असल्याचे प्रमाणपत्र देताच वालम यांना न्यायालयात नेण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. त्यावेळी वालम यांच्या नातेवाईकांनी प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना रुग्णवाहीकेतून नेण्याची मागणी केली.
नातेवाईकांची मागणी धुकावून वालम यांना अस्वस्थ अवस्थेत स्ट्रेचरवरूनच पोलीस गाडीमध्ये अक्षरशः कोंबण्यात आले. पोलिसांच्या या दडपशाहीचा वालम कुटुंबिय व समर्थकांनी तीव्र निषेध केला. त्यामुळे रुग्णालयातील वातावरण तणावाचे बनले होते. वालम समर्थकांनी रूग्णालयाबाहेर मोठी गर्दी केल्याने पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. रिफायनरी प्रकल्प रद्द झालाच पाहिजेच्या घोषणांनी रुग्णालय परिसर दणाणून गेला होता.
रिफायनरी प्रकल्प विरोधात घेतलेल्या भुमिकेमुळे पोलीस व प्रशासनाने नाहक त्रास देण्यास सुरूवात केली आहे. हे आंदोलन मोडून काढण्याचा पोलीसच डाव खेळत आहेत. वरिष्ठ स्तरावरून आलेल्या दबावाखाली सर्व यंत्रणा काम करत आहे. या त्रासामुळे अशोक वालम यांना काही झाले तर त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनानाची राहील असे वालम यांच्या पत्नी आश्विनी वालम यांनी सांगितले. आता तर आमच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली जात असल्याचा गौप्यस्फोट वालम यांनी केला आहे.

कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

E-mail Print PDF
चिपळूण ः सातारा जिल्हयातील कोयना धरण परिसरात मंगळवारी दुपारी १.०५ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची ३.३ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली असल्याची माहिती कोयना धरण उपकरण विभागाकडून देण्यात आली.
गेल्या १० नोव्हेंबर रोजीही ३.८ रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. त्यानंतर मंगळवारी दुपारी बसलेल्या भूकंपाचा धक्का सौम्य असला तरी देवरूखसह जिल्हयातील काही भागात त्याचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेपासून २२.४ कि. मी. अंतरावर असलेल्या वारणा खो़र्‍याच्या जावळी गावच्या दक्षिणेला ४ कि. मी. अंतरावर होता. त्याची खोली ९ कि. मी.असल्याची माहिती सदर कार्यालयाकडून देण्यात आली. याचा कोणताही परिणाम कोयना धरणावर झालेला नसल्याचेही सांगण्यात आले.

Page 2 of 2712